অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेंद्रिय शेती 'वर्धा पॅटर्न'

सेंद्रिय शेती 'वर्धा पॅटर्न'

सेंद्रिय शेती चळवळीचा प्रेरणादायी "वर्धा पॅटर्न'

वर्धा जिल्ह्यात गोवंश संवर्धन सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून रासायनिक विषरहित अन्न उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत आहे. शासकीय अनुदान व मदतीशिवाय शेतकऱ्यांद्वारेच ही चळवळ व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुमारे दोन हजारांवर शेतकरी या प्रकियेत सहभागी झाले आहेत. एक हजारांहून अधिक हेक्‍टर क्षेत्रावर सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू आहेत. नैसर्गिक स्रोतांचा वापर करीत शेती पिकविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांद्वारे या माध्यमातून होत आहे. राज्यात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविणारा जिल्हा म्हणून वर्ध्याचे नाव घ्यावे लागेल.


...अशी रुजली सेंद्रिय चळवळ

वर्धा जिल्ह्यात गोसंवर्धनावर भर देण्यात आल्याने दूध संकलनही समाधानकारक आहे. सुमारे तीन लाख 49 हजार दुधाळ जनावरे या जिल्ह्यात असल्याची नोंद शासन दरबारी आहे. त्यामुळेच दूधदुभत्यांची उपलब्धता विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरी आहे. जनावरांच्या माध्यमातून शेतीकामी लागणाऱ्या शेणखताची गरजही भागविली जाते. सेंद्रिय शेती रुजण्यास हेदेखील महत्त्वाचे कारण पूरक ठरले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दुधाळ जनावरांची दूध उत्पादकता वाढावी यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून चारा लागवडीला प्रोत्साहन देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रमही या जिल्ह्यात प्रभावीपणे राबविला जात आहे. "फुले जयवंत'सारख्या जातींच्या चारा लागवडीला योजनेअंतर्गत प्रोत्साहन देण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वदूर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात असल्यामुळे दुधाळ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍नही काही अंशी निकाली काढण्यात यश आले आहे. जिल्ह्यात अप्पर आणि लोअर वर्धा प्रकल्पातून सिंचन सुविधा जिल्ह्यात आहेत. त्यासोबतच विविध योजनांमधून पाणलोट विकासाची कामे होत असल्याने सामूहिक प्रयत्नातूनही भूगर्भातील जलस्रोत बळकटीकरणाचा प्रयत्न होत आहे.


खरिपासोबतच रब्बी हंगामही "सेंद्रिय'

वर्धा जिल्ह्याचे खरीप लागवड क्षेत्र सुमारे चार लाख दहा हजार हेक्‍टर आहे. त्यामध्ये सोयाबीन, तूर आदी पिके आहेत. रब्बी हंगामात गहू, हरभरा यांसारखी पिके घेतली जातात. सेलू, आष्टी, समुद्रपूर या तीन तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांनी पारंपरिक पीकपद्धतीला "खो' देत रसायनमुक्‍त शेतीचा नारा दिला आहे. याद्वारे उत्पादन खर्च कमी होत असतानाच हा शेतीमाल बाजारदराने विकला गेला तरी परवडते, असे शेतकरी सांगतात.


पंकज पाटील यांचा आदर्श

जिल्ह्यातील हळदगाव (ता. समुद्रपूर) येथील पंकज पाटील यांची सामूहिक 75 एकर शेती. या शेतीच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी सेंद्रिय शेतीचा पर्याय अवलंबिला आहे. सेंद्रिय घटकांच्या उपलब्धतेसाठी त्यांनी पंधरा जनावरांचे संगोपन केले आहे. त्यापासून त्यांना शेणाची उपलब्धता होते, त्याचा दैनंदिन शेतीकामात वापर करीत असल्याचे ते सांगतात. जिवामृताचाही वापर शेतीत केला जातो. शेण, गोमूत्र, बेसन, माती व पाणी अशाप्रकारचे मिश्रण करून त्यापासून जिवामृत तयार होते.


पेरूमध्ये चवळी

त्यांनी पेरूच्या 750 रोपांची लागवड केली आहे. नैसर्गिक आच्छादन (मल्चिंग) म्हणून पेरूच्या बेडलगत चवळी लागवडीचा प्रयोग केला आहे. जैवविविधतेचे संवर्धन त्या माध्यमातून होत असल्याचे ते सांगतात. मित्रकीटकांचे संवर्धन होण्याबरोबरच जमिनीची धूप रोखण्यात हा प्रयोग फायदेशीर ठरतो. लाभदायक जिवाणू कार्यरत राहण्यासही मदत होते. द्विदलवर्गीय पिकांच्या लागवडीमुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण होण्यास पोषक ठरते. 
पाटील यांनी पेरूप्रमाणेच एकात्मिक कीडनियंत्रण व अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा प्रयोग पपई पिकात केला आहे. एक एकरावर पपई आहे. पपईच्या झाडापासून प्रत्येकी पाच फुटांच्या अंतरावर तूर लागवड करण्यात आली आहे. तुरीचे अवशेष पुढील पिकासाठी नत्राचा पुरवठा करण्यासाठी पोषक ठरण्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.


चिकू बागेला नैसर्गिक घटकातून पोषकद्रव्ये

चिकू झाडांपासून काही अंतरावर दीड फूट खोल, चार फूट रुंद असा खड्डा खोदण्यात आला आहे. त्यात पालापाचोळा, काडीकचरा त्यात टाकला जातो. हे घटक चांगले कुजल्यानंतर झाडांच्या मुळांना अन्नद्रव्यांचा पुरवठा त्याद्वारे होतो. या संकल्पनेला त्यांनी "किचन' असे संबोधले आहे. 
शेवगा, मिरची व डाळिंब असे तिहेरी पीक पाटील घेतात. षटकोनी पद्धतीची ही लागवड आहे. या शेतीसाठीही रासायनिक घटकांचा वापर केला जात नाही.


दशपर्णी अर्काचा वापर

दशपर्णी अर्कात दहा प्रकारच्या वनस्पतींचा वापर होतो. कडूलिंब, कन्हेर, रानएरंडी, रुई, सीताफळ, धोत्रा, करंज, घाणेरी आदी वनस्पतींचा त्यात अंतर्भाव आहे. दशपर्णींचा वापर कीडनियंत्रणासाठी केला जातो. शत्रूकिडींना पिकाकडे येण्यापासून त्यामुळे प्रतिबंध केला जातो. पाटील यांच्याप्रमाणे या भागातील अनेक शेतकरीदेखील कीडनियंत्रणासाठी दशपर्णी अर्काचा वापर करतात.


थेट विक्रीमुळे वाढते नफ्याचे मार्जिन

पाटील यांच्याद्वारे सेंद्रिय शेतीमालाचे थेट मार्केटिंग होते. त्यामुळेच नफ्याचे मार्जिन वाढते असे ते सांगतात. ग्राहकांचे मोबाईल क्रमांक त्यांच्याकडे असून, माल उत्पादित झाल्यानंतर त्याची माहिती त्यांना एसएमएसद्वारे दिली जाते. त्याआधारे ग्राहकांकडून त्यांना मागण्या येतात. त्याप्रमाणे पुरवठा केला जातो. फळांच्या विक्रीसाठीदेखील अशीच थेट विक्री पद्धत त्यांनी वापरली आहे. सेंद्रिय फळांची गुणवत्ता, टिकण्याचा कालावधी व चव यात वेगळेपण असल्याने या मालाला मागणी अधिक राहते; तुलनेत पुरवठा कमी राहतो असाच दरवेळचा त्यांचा अनुभव आहे. फळांची विक्री स्थानिक बाजारात किरकोळ विक्री दरानेच होते. रासायनिक खत व कीडनाशकांचा वापर शेती व्यवस्थापनात होत नसल्याने त्या खर्चात बचत होते. मजुरी खर्चाचा काय तो भार शेतकऱ्यांवर राहतो. ही शेती पद्धती फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.


वायगाव हळद सेंद्रिय पद्धतीने

वायगाव हळद ही या भागातील प्रसिद्ध हळद. रंग, स्वादाच्या बाबतीत या हळद वाणाने खास वैशिष्ट्य जपले आहे. शेणखताच्या बळावर समुद्रपूर येथील आनंद जयस्वाल हे सव्वा दोन एकरांवर या हळदीची लागवड करतात. पंधरा वर्षांपासून सेंद्रिय शेतीत त्यांनी सातत्य ठेवले आहे. त्यांच्याकडे पंधरा जनावरे आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या शेणाचा वापर ते शेतीकामी करतात. सेंद्रिय हळदीमध्ये तेलाचे प्रमाण जास्त मिळते, त्यासोबतच रंग, गुणवत्ताही चांगले मिळते, असे ते सांगतात. सेंद्रिय शेतीपद्धतीतून एकरी पंधरा क्‍विंटलची उत्पादकता त्यांना मिळते. रासायनिक शेती पद्धतीत केवळ अर्धा क्‍विंटलची उत्पादकताच जादा मिळते, असा आपला अनुभव असल्याचे जयस्वाल म्हणतात. मात्र तुलनेत सेंद्रिय शेतीकरिता उत्पादन खर्च कमी होतो. त्यामुळे ही शेतीपद्धती परवडते असे ते म्हणतात. पिकाला चकाकी मिळावी याकरिता आंबट ताकाची फवारणी ते करतात.


सेंद्रिय माल विक्री महोत्सव

सेंद्रिय व रासायनिक शेतीमालाच्या गुणवत्तेमधील तफावती संदर्भाने ग्राहकांत जाणीव जागृतीचा प्रयत्नही वर्धा भागातील शेतकरी करतात. फेब्रुवारी व एप्रिल महिन्यांत नागपूर येथे सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी महोत्सवाचे आयोजन केले जाते. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महोत्सवात पाच क्‍विंटल हळद बेणे व पावडर, 69 क्‍विंटल गहू, ज्वारी 92 क्‍विंटल, तूरडाळ 86 क्‍विंटल याप्रमाणे अवघ्या तीन दिवसांत सेंद्रिय मालाची विक्री झाली. सुरवातीला ग्राहकांकडून या मालाला मागणी होत नव्हती, आता मात्र शेतकऱ्यांचे संपर्क क्रमांक घेऊन थेट आगाऊ मागणी होते, असा अनुभव आहे. जिल्ह्यातील दोन हजारांवर शेतकरी सेंद्रिय शेतीमाल चळवळीत सहभागी झाले आहेत. त्यावरूनच या चळवळीची व्यापकता लक्षात आल्याशिवाय राहत नाही. विशेष म्हणजे नागपूर कृषी महाविद्यालयाच्या परिसरात होणाऱ्या महोत्सवाला आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यावर होणारा खर्च सामूहिकपणे केला जातो.


विठाई कृषी फार्मचा सेंद्रिय गहू

समुद्रपूर तालुक्‍यातील पारोदी येथील नामदेव धुटे सेंद्रिय गव्हाचे उत्पादन घेतात. दरवर्षी ते सुमारे 22 एकरांवर गव्हाची लागवड करतात. विठाई कृषी फार्मद्वारे उत्पादित सेंद्रिय गहू या नावाने त्यांनी आपल्या शेतीमालाचे ब्रॅंडिंग सुरू केले आहे. या वर्षी त्यांना एकरी बारा क्‍विंटल उत्पादन मिळाले. शेतीकामी त्यांच्याकडे दोन गाई व दोन बैल आहेत. मिळणाऱ्या गोमूत्र व शेणखताचा वापर ते शेतीकामी करतात. शेणखत, पालापाचोळा, गहू काढणीनंतर राहणारा कचरा, ऊस पाचट ते शेतात वापरतात. या माध्यमातून एकरी उत्पादकता खर्च कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.


संग्रहालय समितीचा पुढाकार

वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांद्वारा सेंद्रिय शेती पद्धतीचा अंगीकार करण्यात असतानाच अनेक अशासकीय संस्थादेखील सेंद्रिय शेती प्रक्रियेला बळ देण्याचे काम करीत आहेत. जानकीदेवी बजाज फाउंडेशनच्या सहकार्याने मगन संग्रहालय समितीद्वारा सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे काम होतो. सूत कताईसाठी सेंद्रिय कापूस समितीद्वारा खरेदी केला जातो. प्राकृतिक भोजन केंद्रातही विविध प्रकारचे अन्नपदार्थ सेंद्रिय शेतीमालापासूनच तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.


40 गावांमध्ये अंमलबजावणी

संग्रहालायाच्या माध्यमातून 40 गावांमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रचार, प्रसार करण्यात आला. त्याचे फलित म्हणजे या गावात रसायनमुक्‍त शेतीची पहाट उगवली आहे. सन 2113 शेतकरी या प्रकल्पात सहभागी झाले. सुमारे 2450 एकर क्षेत्रांवरील रासायनिक निविष्ठांचा वापर त्यामुळे कमी झाला. शेतकऱ्यांद्वारे उत्पादित शेतीमालाची विक्री सुलभपणे व्हावी याकरिता वर्धा येथे विक्री केंद्रही समितीने सुरू केले आहे. या अभियानात समन्वयक गजानन गारघाटे, अनिल गुडधे, शंकर भिसेकर, सुरेश सेलोरे, चंद्रशेखर कुंभारकर हे काम पाहतात. गटशेतीच्या माध्यमातून प्रभावीपणे या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाते. बीजामृत, जिवामृत, घनामृत, वनस्पती अर्क अशा घटकांचा वापर शेती व्यवस्थापनात होतो. नैसर्गिकरीत्या या घटकांची उपलब्धता होत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आपसूक कमी होतो.


सेंद्रिय शेतकरी आहेत समाधानी

माझ्याकडील एकूण 22 एकर क्षेत्रापैकी दहा एकर शेतीत सेंद्रिय शेतीमाल पिकविला जातो. ऊस, गहू, सोयाबीन, कापूस, हरभरा, टोमॅटो, धने (कोथिंबीर) अशा पीकपद्धतींचा त्यात समावेश आहे. शेतीला लागणाऱ्या निविष्ठा विकत न आणता सेंद्रिय घटक घरीच तयार करतो. दरवर्षी सुमारे 300 लिटर गोमूत्राचा पाण्यासोबत वापर केला जातो. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होत, नफ्याचे मार्जिन वाढण्यास मदत झाली आहे. दहा एकर क्षेत्रातून तीन लाख रुपयांचे उत्पन्न खर्च वजा जाता होते. 
- संतोष दडमल, फरीदपूर, जि. वर्धा
तीन एकरावर सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला आहे. शेतीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास यामुळे मदत झाल्याचा माझा अनुभव आहे. सेंद्रिय शेतीमालाच्या गुणवत्तेमुळे मागणी चांगली राहते. वर्धा येथील विक्री केंद्रात शेतीमाल विक्रीसाठी ठेवण्यावर भर आहे. 
कमलाकर कापसे, तावी, जि. वर्धा

वर्धा जिल्ह्यातील सेंद्रिय शेती चळवळीची वैशिष्ट्ये


1) सुमारे दोन हजार शेतकऱ्यांचा सहभाग 
2) एक हजार हेक्‍टर क्षेत्र सेंद्रिय शेतीने व्यापले 
3) शेणखताच्या माध्यमातून सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढतेय 
4) सेंद्रिय प्रमाणीकरणाकरिता नागपुरातील संस्थेचे सहकार्य 
5) भविष्यात सेंद्रिय शेतीमाल निर्यातीवर भर 
6) उत्पादकता खर्चात कपात 
7) थेट मार्केटिंगवर भर 
8) कृषी विभागासह अशासकीय संस्थांचाही पुढाकार 
10) पाण्याकरिता ठिबक सिंचनाचा पर्याय
संपर्क 
पंकज पाटील, 9822363402 
-------- 
आनंद जयस्वाल, 9970139037 
-------- 
डॉ. विभा गुप्ता 
संग्रहालय, वर्धा 
9766697311 
-------- 
नामदेव थुटे 
9552019095


शेतकऱ्यांना आमच्या समितीद्वारे सेंद्रिय शेती तंत्रज्ञानविषयक माहिती दिली जाते. पिकाला पाणी किती दिले, जैविक घटक कोणते दिले या सर्वांचा "डाटा' आमच्याकडे संकलित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीविषयक जाणीवजागृती वाढीस लागावी, त्या माध्यमातून शेतीतील खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचा पैसा गावातच राहावा, त्यांना कृषी निविष्ठा विकत आणाव्या लागू नये, असेही प्रस्तावित आहे. रासायनिक निविष्ठांचा वापर टाळल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत झाली. ग्रामविकासाला पूरक प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीवरही भर देण्यात आला आहे. तूरडाळ उद्योग शेतकऱ्यांच्या सहकार्यातून उभारण्यात आला आहे. गांधीजींच्या संकल्पनेअंतर्गत गावातच कापूस ते कापड तयार व्हावे असे आम्हाला अभिप्रेत आहे. त्यानुसार गटशेतीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीची चळवळ उभारली गेली आहे. 

- डॉ. विभा गुप्ता, 
अध्यक्ष, मगन संग्रहालय समिती, वर्धा

------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate