অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेळ्या - मेंढ्यांचे आरोग्य

शेळ्या, मेंढ्यांमध्ये पट्टिका कृमी, चापट कृमी आणि गोल कृमींचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर दिसतो. यांच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हे कृमी (जंत) घातक रोगाचा प्रसार करीत असतात. दूषित पाणी, चारा या मार्गाने जंत शेळ्या व मेंढ्यांच्या पोटात जातात.

पट्टिका कृमी

  • शेळ्या व मेंढ्यांमध्ये विविध प्रकारचे पट्टिका कृमी हे प्रामुख्याने लहान आतडे व पीलनलिका यामध्ये आढळतात.
  • हे कृमी दोन्ही बाजूंनी चपटे व लांबलचक पट्टीसारखे असतात. कमीत कमी २०० सें. मी. व जास्तीत जास्त पाच मीटरपर्यंत लांबीचे असू शकतात. त्यांची रुंदी ३ मि. मी. ते ३.६ सें. मी. एवढी असू शकते.
  • साधारणतः मोनिझिया, अव्हायटेलिना, स्टालेसिया, थायसॅनोसोमा या जातीचे पट्टिका कृमी शेळ्या व मेंढ्यांमध्ये आढळतात.

चापट कृमी/ पर्णाकृती कृमी

  • हे कृमी लहान पिंपळाच्या पानाच्या आकाराचे असतात. यांची रुंदी साधारणतः २ ते ३ सें. मी. असू शकते व लांबी ही ५ ते ६ सें. मी. असू शकते.
  • हे कृमी साधारणतः यकृत, पीलनलिका, कधी कधी इतर अवयवांमध्ये आढळतात.
  • या प्रकारच्या कृमींमध्ये प्रामुख्याने फॅसिओला , डायक्रोसेलियम, ॲम्पिस्टोअम, सिस्टोसोमा जातीचे कृमी आढळतात.

गोल कृमी

हे कृमी गोल दोऱ्यासारखे असतात. या प्रकारचे कृमी प्रामुख्याने लहान आतडे, मोठे आतडे, यकृत, फुफ्फुस, किडनी या अवयवांमध्ये आढळतात. हे कृमी खूप लहान म्हणजे ४ ते ५ मि. मी.पासून मोठे ८ ते १२ सें. मी.पर्यंत असू शकतात. गोल कृमींमध्ये प्रामुख्याने हिमाँकस, ओस्टररेजिया, ट्रायकोस्ट्रॉगाल्स, कुपेरिया, ट्रायचुरीस, बनोस्टोमम्‌, ईसोलेगोस्ट्रोमन या जातींचे कृमी आढळतात.

जंतांचा जीवनक्रम

१) कृमी (जंत) हे लहान व मोठ्या आतड्यामध्ये राहतात. काही प्रकारचे जंत हे शरीराच्या इतर भागामध्ये किंवा महत्त्वाच्या अवयवांमध्ये वास्तव्य करतात.

२) शेळ्या व मेंढ्यांच्या शरीरामध्ये राहून ते जंत परिपक्व होतात, त्यानंतर ते अंडी घालतात. घातलेली अंडी ही प्रामुख्याने लेंड्यांवाटे, लघवीवाटे व फेफड्यांमार्फत शरीराच्या बाहेर येतात.

३) ही अंडी जमिनीवर, शेतामध्ये, चराऊ रानामध्ये, गवतामध्ये, चाऱ्यामध्ये उबतात व या अंड्यांमध्ये कृमीची अर्भक अवस्था विकसित होते. ही विकसित झालेली अर्भक अवस्था शेळ्या व मेंढ्यांच्या पोटामध्ये चारा व दूषित पाण्याद्वारा जाते.

४) अर्भक अवस्था आतडे आणि इतर महत्त्वपूर्ण अवयवांमध्ये प्रवेश करून वास्तव्य करतात. कालांतराने हे जंत परिपक्व होऊन अंडी घालतात.

५) साधारणतः गोल कृमींच्या जीवनक्रमामध्ये दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या यजमानाचा समावेश नसतो. हे गोल कृमी सरळ मार्गाचा जीवनक्रम पूर्ण करतात. हे चाऱ्यामार्फत शेळ्या व मेंढ्यांच्या पोटात जातात.

६) पट्टिका कृमी हे आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी मातीतील कीटक (ऑरिबेटिड माईट) यांचा यजमान म्हणून उपयोग करून जीवनक्रम पुर्ण करतात.

७) पर्णकृमींच्या जीवनक्रमामध्ये गोगलगाईमध्ये जंताची अभ्रक अवस्था विकसित होऊन ती गवतावर/ पाण्याद्वारे शेळ्या व मेंढ्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करते.

शेळ्या, मेंढ्यांच्या वाढीवर होणारा परिणाम

१) कृमी शेळ्या, मेंढ्यांच्या शरीरात तयार अन्नघटक खातात.

२) काही कृमी आतडे, यकृत, पोट व इतर महत्त्वाच्या अवयवांना इजा पोचवतात.

३) रक्त शोषणारे कृमी प्रामुख्याने आतड्याला चिकटून रक्तशोषणाचे कार्य करीत आपला जीवनक्रम पूर्ण करतात.

४) यकृतामध्ये आढळणारे कृमी यकृतपेशींचा नाश करून इजा पोचवतात, त्यामुळे यकृत निकामी होते.

५) आतड्यातील कृमींमुळे आतड्याचा दाह होतो, त्यामुळे अन्नपचन होत नाही.

६) अन्नपचन संस्थेवर मोठ्या प्रमाणावर ताण येतो. त्यामुळे वाढीसाठी विशेष व अतिआवश्यक मूलद्रव्ये/ घटक यांचे पचनसंस्थेमध्ये शोषण होत नाही.

७) शेळ्या व मेंढ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा रक्तक्षय व अशक्तपणा दिसून येतो.

८) लहान जनावरांच्या पचनसंस्थेचे कार्य बिघडते, त्यामुळे भूक मंदावते.

९) जनावरामध्ये रक्ती हगवण लागते.

१०) शेळ्या व मेंढ्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात कमी होते.

११) शेळ्या व मेंढ्यांच्या जबड्याखाली सूज येते.

१२) कृमींमुळे शेळ्या व मेंढ्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, त्या विविध आजारांना बळी पडतात.

१३) शरीरामधील प्रथिने, शर्करा, क्षार, मूलभूत घटक द्रव्ये अतिआवश्यक खनिज पदार्थ शरीराबाहेर गेल्याने शेळ्या व मेंढ्या अशक्त होतात.

१४) पचनक्रिया बिघडून लेंड्यांना दुर्गंधी येते. न पचलेले अन्न लेंड्यांमध्ये दिसते. लेंड्या नरम, पातळ, दुर्गंधीयुक्त व काळ्या रंगाच्या दिसतात.

१५) शेळ्या व मेंढ्यांची लहान पिले/ करडे यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. रक्तक्षय उद्‍भवतो, करडांची वाढ खुंटते, रक्तक्षय होतो. तीव्र अशा रक्तक्षयामुळे पिले मृत्युमुखी पडू शकतात.

नियंत्रणाचे उपाय

१) कृमीचे प्रकार, त्यांची संख्या आणि शेळ्या व मेंढ्यांच्या पोषणाचा स्तर यावर कृमिबाधेचे दुष्परिणाम अवलंबून असतात.

२) ज्या शेळ्या व मेंढ्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, त्यांच्यामध्ये कृमीची वाढ प्रमाणाबाहेर होत नाही, परंतु ज्यांचे योग्य आरोग्य आणि आहार व्यवस्थापन नसते, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे कृमिबाधेचे प्रमाण वाढते. याचे दुष्परिणाम प्रामुख्याने लहान करडांमध्ये दिसून येतात.

३) सतत पावसाची झड, योग्य निवाऱ्याचा अभाव, गोठ्याची अस्वच्छता, दूषित चारा, गवत व पाणी पिलांना / करडांना दुधावरील वाढीच्या काळातील शरीरावरील ताण, असंतुलित आहार इत्यादी कारणांमुळे कृमिबाधेचे प्रमाण वाढत जाते, पिलांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होते.

४) शेतकऱ्यांनी आपल्या भागात कोणत्या प्रकारचे कृमी आहेत याची माहिती करून घ्यावी. जंतांचे प्रकार जाणून घेण्यासाठी आपल्या कळपातील १०-१५ टक्के शेळ्या किंवा मेंढ्यांची लेंड्यांची नियमित व वेळोवेळी तपासणी करून घ्यावी. त्यामुळे जंताचा प्रकार समजल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी व प्रतिबंधक उपायांसाठी उपयुक्त औषधे निवडणे व व्यवस्थापन करणे सुलभ होते.

५) अशक्त, बाधित शेळ्या व मेंढ्या इतर निरोगी जनावरांपासून वेगळ्या ठेवाव्यात. विशेषकरून पिले व करडे वेगळ्या गोठ्यात ठेवावीत.

६) शेळ्या व मेंढ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी, संतुलित आहार देण्यासाठी नियोजन करावे.

७) आजारी किंवा अशक्त शेळ्या व मेंढ्यांवर वेळीच उपचार करून त्यांना वेगळे ठेवण्याची व्यवस्था करावी.

८) नवीन येणाऱ्या कळप किंवा जनावरे यांचे पशुवैद्यकाकडून परीक्षण करून निरोगी कळपामध्ये सोडावे.

९) शेड स्वच्छ, कोरडे व हवेशीर ठेवणे व निर्जंतुकीकरण करणे महत्त्वाचे आहे.

१०) खताच्या खड्ड्यामध्ये लेंढ्या रापल्यानंतर शेतावर लगेच पसराव्यात.. जेणेकरून त्यातील कृमीची अंडी मृत पावतात व पुढील पिढ्या तयार होत नाहीत.

११) कॉपर सल्फेटचे योग्य प्रमाणात द्रावण करून ते शेडमध्ये व पाणथळीच्या जागी फवारावे. त्याद्वारे गोगलगाईंचे नियंत्रण होते.

१२) गावातील सर्व शेळी व मेंढ्यापालकांनी एकाच वेळी जंतनिर्मूलन मोहीम राबवावी. त्यामुळे लेंड्यांद्वारे जमिनीवरील पडणाऱ्या कृमीच्या अंड्यांची संख्या कमी होईल. त्यामुळे पुन्हा नव्याने होणारी जंतबाधा थांबेल.

१३) निरोगी कळपामध्येसुद्धा कृमींची बाधा होऊ नये म्हणून ठराविक अंतराने जंतुनाशकाचे वेळापत्रक पशुवैद्यकाच्या सल्ल्याने ठरवावे. ते योग्य रीत्या पाळावे.


डॉ. पी. डी. पवार - ९७३०३८३१०७
(लेखक क्रांतिसिह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

संदर्भ : अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate