অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लाळ्या खुरकूत आला, पशुधन सांभाळा...

लाळ्या खुरकूत या आजाराचा कालावधी अधिक असल्याने बैल शेतीकामाला लावता येत नाहीत, गाईंच्या दूध उत्पादनात घट होते. आजारी जनावरांसाठी अधिक मनुष्यबळ, दैनंदिन उपचारावर होणारा खर्च, काही अंशी जनावरे गाभडण्याचे प्रमाण दिसते. हा आजार संसर्गजन्य असल्याने एका जनावराकडून दुसऱ्या जनावरास सहज लागण होते.
दरवर्षी ऑक्‍टोबर - नोव्हेंबर महिन्यात लाळ्या खुरकूत या आजाराची सुरवात होते. हा आजार जून महिन्यापर्यंत दिसून येतो; परंतु पशुपालक या गोष्टीकडे पाहिजे तेवढ्या गांभीर्याने लक्ष देत नाहीत. आजार नियंत्रणात येण्याचा कालावधी हा अधिक असल्याने उपचारासाठी अधिक खर्च येतो. ऐन शेतीकामाच्या दिवसांत बैल कामासाठी उपलब्ध न झाल्याने दुसऱ्या साधनांचा वापर शेतीकामासाठी करावा लागतो, असा दुहेरी तोटा होतो. या रोगाची लागण होण्याची शक्‍यता ही 100 टक्के आहे. परिसरामधील जनावरांना लागण झाल्यास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जरी सुदृढ जनावरांचा पीडित जनावरांशी संबंध आला, तरी रोगाचे प्रसारण होते. 
या आजारामध्ये जनावर लंगडणे फार काळ राहते. परिणामी बैल शेतात काम करण्याऐवजी घरी बांधून राहतात. तीव्र आजारामध्ये कासेवरसुद्धा फोड आल्याने कासदाह होतो. परिणामी आधीच उपचार करून थकलेला पशुपालक या नवीन आजाराने हवालदिल होतो. गाभण जनावरांत लाळ्या खुरकूत आजारामुळे गर्भपात होऊ शकतात. पुढे जनावर कायमस्वरूपी वांझही राहू शकते. डुकराच्या लहान पिल्लांमध्ये मर दिसून येण्याचे प्रमाण खूप आहे. वराहपालकांना त्यामुळे खूप जास्त आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

आजाराची कारणे

ज्या जनावरांच्या पायाच्या खुरी दुभंगलेल्या आहेत, त्यांना हा आजार होतो. यामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर, हरिण, रेनडिअर आणि उंट यांचा समावेश होतो. गाई व म्हशींना या रोगाची लागण होण्याची शक्‍यता जास्त असली, तरी डुकरांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. 
हा रोग पिंकोर्ना जातीच्या विषाणूंमुळे होतो. सर्वज्ञात विषाणूंमध्ये हा सर्वांत लहान विषाणू असला, तरी प्रतिकार क्षमतेनुसार त्याचे वेगवेगळे सात उपप्रकार आहेत. जसे A, O, C, ASIA, SAT-1, SAT-2, SAT-3. हा विषाणू सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या जंतूनाशकाने मरत तर नाहीच, शिवाय जनावर आजारी असल्याच्या परिसरात एक वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. माणसामध्ये या रोगाची लागण होत नसली, तरी 24 तासांपर्यंत हा विषाणू नाक व घशामध्ये राहू शकतो. सोडिअम हायड्रॉक्‍साईड फॉर्मलीन (एक - दोन टक्के) व सोडिअम कार्बोनेट (चार टक्के) यांच्या वापरामुळे या विषाणूचे अस्तित्व त्वरित संपुष्टात येते. जागतिक पातळीवर व विशेषतः भारतामध्ये या रोगाचे प्रसारण मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे साथीच्या रोगामध्ये गणला जाणारा असा हा आजार आहे. याच्या प्रसारासाठी वारा, पाणी, संसर्ग झालेला जनावरांचा चारा, रोगी जनावर, याचबरोबर भटकी कुत्री, जंगली जनावरे, पक्षी हे घटकही कारणीभूत होतात. या रोगाचे विषाणू सर्वप्रथम घशामध्ये शिरकाव करतात, नंतर ते विषाणू दूध, लाळेमध्ये आढळतात.

आजाराची लक्षणे

या रोगाचा संक्रमण काळ दोन ते 12 दिवस आहे. आजारी जनावरास ताप येतो व तोंडामध्ये, खुरांच्या बेचक्‍यात व कासेवर फोड येतात. या फोडांमुळे जनावर तोंडातून सारखी लाळ गाळते. कालांतराने हे फोड फुटल्यानंतर तेथे जखमा तयार होतात. जिभेवरील वरचा थर पूर्णपणे सोलपटून निघतो. यामुळे जनावर अन्न, पाणी वर्ज्य करते. साहजिकच अधिक थकवा येऊन रूक्षपणा जाणवतो. खुरावरही अशा प्रकारचे फोड येत असल्याने जनावर चालताना लंगडते. नवजात वासरांना या रोगाची लागण झाल्यास मृत्यूचे प्रमाण 90 ते 92 टक्के इतके असू शकते. वेळीच उपचाराने ही मर घटवणे शक्‍य आहे. जिवाणूंच्या दुय्यम संक्रमणामुळे इतर संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण होऊ शकतो. कासेवर फोड येऊन नंतर फुटल्यामुळे कासदाह होतो. गर्भपाताची शक्‍यता लाळ्या खुरकूत रोगामध्ये नाकारता येत नाही.

उपचार व औषधोपचार

हा विषाणूजन्य आजार असल्याने औषधोपचार नाही; परंतु रोगाचे होणारे दुय्यम संक्रमण टाळण्यासाठी आजाराच्या लक्षणांनुसार उपचार करता येतो. यामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पोटॅशिअम परमॅंग्नेटने किंवा खाण्याच्या सोड्याने तोंडामध्ये व शरीरावर इतर ठिकाणी आलेले फोड धुऊन घ्यावेत. जिभेवर मऊपणा येण्यासाठी बोरो ग्लिसरीन अथवा लोणी अथवा खोबऱ्याचे तेल व हळद एकत्र करून लावावे. खुरांवरील जखमाही पोटॅशिअम परमॅंग्नेटच्या पाण्याने धुऊन त्या ठिकाणी मोरचूद व झिंक ऑक्‍साईड सारख्या प्रमाणात घेऊन मलम करून लावता येऊ शकते. याबरोबरच शरीराचा दाह कमी करणारी वेदनाशामक औषधे व प्रतिजैविके चार - पाच दिवस पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार देणे गरजेचे आहे. जखमांमध्ये अळ्या पडू न देणे महत्त्वाचे आहे.

प्रतिबंधात्मक उपाय

1) लाळ्या खुरकूत रोगामध्ये उपचारापेक्षा प्रतिबंधक उपाय अधिक महत्त्वाचा आहे. लसीकरण हा महत्त्वाचा उपचार आहे, त्याच्यासारखा सहज, सोपा व स्वस्त प्रतिबंधात्मक उपाय कोणताही नाही. यासाठी वर्षातून दोन वेळेस लाळ्या खुरकूत रोगाची लस टोचून घ्यावी. 
2) आजारी जनावरांना त्वरित वेगळ्या ठिकाणी बांधून त्यांचा इतर चांगल्या जनावरांशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. 
3) लसीकरण न केलेली जनावरे प्रदर्शन व बाजारामध्ये येऊ देण्यास परवानगी देऊ नये. 
4) ऊसतोड करणाऱ्या कामगारांची जनावरे बऱ्याच ठिकाणी फिरल्यामुळे आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरवतात, त्यामुळे अशा जनावरांना जाणीवपूर्वक लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. 
5) फक्त लसीकरण केलेली जनावरेच गावामध्ये येऊ देण्याचे सर्व पशुपालकांनी ग्रामसभेमध्ये ठरविले पाहिजे. 
6) साथ असल्यास शक्‍यतो जनावरांना मुक्त पद्धतीने चरू देऊ नये. 
7) जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पाजण्याऐवजी वैयक्तिक ठिकाणी पाणी पाजल्यास रोगाचा प्रसार कमी होऊ शकतो. 
8) नवजात वासरांना लाळ्या खुरकूतग्रस्त मातेपासून दूर ठेवावे व दूध पिण्यास प्रतिबंध करावा. 
डॉ. पंकज हासे - 9890248494.
(लेखक पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी येथे कार्यरत आहेत.)

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate