Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 13:43:39.951962 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / उन्हाळ्यात जनावरांची काळजी
शेअर करा

T3 2019/10/18 13:43:39.957785 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 13:43:39.989388 GMT+0530

उन्हाळ्यात जनावरांची काळजी

आपल्या जनावरांना रोगांपासून मुक्त ठेवण्यासाठी योग्य प्रकारे लसीकरण केले तरच आपली जनावरे सुरक्षित राहतील.

प्रस्तावना

सध्या बऱ्याच भागात उन्हाळा तीव्र असल्यामुळे माणसांप्रमाणेच जनावरांनाही त्रास होतो. सामान्यतः उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता, तसेच म्हशींमध्ये उष्णतेस असणारी कमी प्रतिकारशक्ती यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जर जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील, तर त्याच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो. वाढत्या तापमानामुळे शरीराचे तापमान वाढते, चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. पाणी पिण्याचे प्रमाण वाढते, दुधात घट होते. दिवसा म्हशी कमी चरतात आणि संध्याकाळी चरण्याकडे जास्त कल असतो, तसेच उष्णतेच्या वाढत्या प्रमाणाबरोबर जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढत जाते.

प्रजननाची क्रिया ही जनावरांच्या इतर सर्व शरीरक्रियांवर अवलंबून असते. उन्हाळ्यात जनावरांना अल्प खाद्य, कमी व वाळलेला चारा, अल्प पाणी व अति उष्णता यांचा त्रास होतो. जगण्यासाठी आवश्‍यक त्याच शरीरक्रियांचा शरीरास बराच ताण असतो, त्यामुळे प्रजननक्रिया थांबते किंवा प्रजननक्रियेस हानी होते. मार्च ते जून या काळात वातावरणातील उष्णता फार वाढते आणि त्यामुळे जनावरे माजावर येण्याचे थांबते.

उन्हाळ्यात गाई-म्हशींप्रमाणेच वळू व रेडे यांची प्रजननक्षमता कमी होते. प्रामुख्याने वीर्याची प्रत कमी झाल्याने नैसर्गिक रेतनामुळे जनावरे गाभण न होण्याचे आणि उलटण्याचे प्रमाण वाढते. तेव्हा वळू व रेडे यांचा प्रजननासाठी उपयोग करून दिवसाआड एकच जनावर भरवल्यास ही जनावरे उलटणार नाहीत. उन्हाळ्यात गाभण असलेल्या जनावरांची काळजी घेणे महत्त्वाचे असते. कारण जन्मणाऱ्या वासराची प्रजननक्षमता ही त्याच्या गर्भावस्थेपासून झालेल्या पोषणावर अवलंबून असते. संकरित व विदेशी जनावरे उन्हाळ्यातील अति उष्णतेचा त्रास सहन करू शकत नाहीत. या काळात जनावरे सकाळी व दुपारी उशिरा चरावयास नेणे, दुपारच्या रखरखत्या उन्हाच्या वेळी गोठा अथवा सावलीत बांधणे, त्यांना मुबलक व स्वच्छ पाणी देणे इ. उपाय योजल्यास संकरित व विदेशी गाई उन्हाळ्यातही माजावर येतील.

म्हशीचे व्यवस्थापन

गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात. सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी आवश्‍यक असणारी गाईसारखी कातडी असण्याऐवजी सूर्यप्रकाश काळ्या कातडीतून शोषला जाऊन म्हशीचे शारीरिक उष्णतामान वाढते म्हणून उष्णतेचा त्रास म्हशींना अधिक होतो व म्हशी माजावर येण्याचे प्रमाण बंद होते. याउलट थंड हवामान असलेल्या गोठ्यात गाईप्रमाणे म्हशीसुद्धा उन्हाळ्यातही नियमित माजावर येतात. माजावर आलेल्या म्हशी ओळखाव्यात कारण या दिवसात त्यांच्यामध्ये माजाची लक्षणे कमी तीव्रतेची असतात. त्यामुळे दिवसातून तीन-चार वेळा निरीक्षण करावे. कृत्रिम रेतन करावयाचे असल्यास शक्‍यतो सकाळ अथवा संध्याकाळी करावे. म्हशींना डुंबण्यास द्यावे, ही त्यांची नैसर्गिक आवड आहे, त्यामुळे शरीराचे तापमान योग्य राखले जाते. म्हशींच्या अंगावर पडेल अशी पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था करावी, अशी व्यवस्था नसल्यास दिवसातून तीन-चार वेळा त्यांना पाण्याने धुवावे. दुपारच्या वेळी जनावरे गोठ्यामध्ये बांधावीत, या वेळेला ती सावलीत असणे गरजेचे आहे. गोठ्याच्या सभोवताली थंडावा राहण्यासाठी झाडे असणे आवश्‍यक आहे. उन्हाळ्यात छपरावर गवताचे आच्छादन टाकावे. शक्‍य असल्यास गोठ्याच्या बाजूंनी गोणपाटाचे किंवा पोत्याचे पडदे लोंबत ठेवून त्यावर पाणी फवारावे. जनावरांना पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था आवश्‍यक आहे, शक्‍य झाल्यास त्यात मीठ व गूळ टाकावे. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास उन्हाळ्यात होणारे कमी दूध उत्पादन वाढू शकते.

...असे ठेवा जनावरांचे व्यवस्थापन

जनावरांना खरारा


जनावरांना दिवसातून किमान एकदा तरी खरारा करावा. खराऱ्यासाठी नारळाच्या काथ्याचा वापर करावा. खरारा करतेवेळी तो सोयीचा व हळुवारपणे करावा. त्यामुळे जनावरास थोडे तरतरीत वाटते व अंगावरील गोचीड व मरकट केस गळून पडतात.

चारा व पाण्याचे व्यवस्थापन


जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करून तीन ते चार वेळेस द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. चारा तसाच टाकला तर 33 टक्के वाया जातो, कुट्टी करून दिल्यास केवळ दोन टक्के वाया जातो. कुट्टी केलेला चारा टोपल्यात किंवा लाकडाच्या गव्हाणीत टाकून खाऊ घालावा. उपलब्ध असल्यास हिरवा व वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे म्हणजे जनावरे आवडीने चारा खातात. चाऱ्याची कमतरता असल्यास खाद्यामध्ये कडुनिंब, अंजन, वड, पिंपळ, शेवरी इत्यादी झाडांची ओली पाने, हरभरा, भुईमुगाची टरफले, गव्हाचा भुस्सा, उसाचे वाढे यांचा योग्य प्रमाणात वापर करावा. अति उष्णतेचा जनावरांच्या आहारावर, दूध उत्पादनावर व प्रजननक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो, म्हणून जनावरांना रांजणातील पाणी पाजावे. दिवसातून एक ते दोन वेळा पाणी पाजण्याऐवजी चार ते पाच वेळा पाणी पाजावे.

जनावरांच्या आरोग्याची काळजी


अपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे जनावरे अशक्त बनून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते व ते विविध रोगांना बळी पडतात, म्हणून पशुतज्ज्ञांकडून वेळीच जनावरांना लाळ-खुरकूत, घटसर्प, फऱ्या रोगाची लस टोचावी. परोपजीवी जंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतुनाशक औषधे पाजावीत. गाभण जनावरे व दूध उत्पादक जनावराची विशेष काळजी घ्यावी. जनावरांचा गोठा व परिसर स्वच्छ असावा. मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावावी.

जनावरांच्या सुदृढतेसाठी लसीकरण

आपल्या जनावरांना रोगांपासून मुक्त ठेवण्यासाठी योग्य प्रकारे लसीकरण केले तरच आपली जनावरे सुरक्षित राहतील. त्यासाठी मोठ्या जनावरांतील रोगनिहाय लसीकरण आणि लसीकरण करताना घ्यावयाची काळजी याविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

डॉ. सारीपुत लांडगे

लाळ्या खुरकूत


हा रोग साधारणतः फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आढळतो देशी आणि संकरित जनावरे या रोगामुळे प्रभावित होतात. विशेषतः संकरित आणि लहान जनावरांमध्ये हा रोग अत्यंत तीव्रतेने आढळतो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या रोगांवरील लस ही लहान जनावरांमध्ये प्रथमतः सहा ते आठव्या आठवड्यात देण्यात येते व पुढील लसीकरण या नंतर दरवर्षी द्यायचे असते व ते साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांत देण्यात येते. ज्या भागात खुरकूत हा रोग सातत्याने आढळतो अशा भागात हे लसीकरण वर्षात दोनदा देण्यात येते आणि ते साधारणतः सप्टेंबर आणि मार्च या महिन्यात करायचे असते.

घटसर्प


हा रोग मोठ्या जनावरांसोबत शेळ्या-मेंढ्यांतही आढळतो. पावसाळ्यात होणारा हा रोग हवामानातील तीव्र बदलांमुळे किंवा लांबच्या प्रवासाअंती येणाऱ्या त्रासामुळे उद्‌भवतो. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या दगावण्याचे प्रमाण हे अधिक असते. यामुळे या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण राबवण्यात येते. सर्वच वयोगटातील जनावरांमध्ये हे लसीकरण करण्यात येते. हे लसीकरण दरवर्षी पावसाळ्याआधी मे किंवा जून महिन्यांत घेण्यात येते. घटसर्प हा रोग सातत्याने आढळणाऱ्या भागात हे लसीकरण वर्षात दोन वेळेस घेण्यात येते.

फऱ्या


हा रोग मोठी जनावरे आणि शेळ्या-मेंढ्यांनादेखील होतो. सहा ते 24 महिन्यांची चांगल्या वाढीतील लहान जनावरे या रोगाने आजारी पडतात. फऱ्या हा रोग साधारणतः पावसाळ्यात आढळतो. जनावरांमध्ये प्राणघातक असणाऱ्या या रोगापासून बचावाकरिता या रोगांवरील प्रतिबंधक लस ही पावसाळा सुरू होण्याआधी देण्यात येते. या रोगाचा प्रादुर्भाव असणाऱ्या ठिकाणी ही लस सर्व वयोगटातील जनावरांना देण्यात येते. प्रथम लसीकरणानंतर सहा महिन्यांनी आणि त्यानंतर दरवर्षी या प्रकारे ही लस देण्यात येते.

काळपुळी


हा रोग प्राण्यांमधील अत्यंत घातक रोग आहे. प्राण्यांकडून मानवाला संक्रमित करणाऱ्या या रोगाचे लसीकरण अशा भागात विशेषतः राबवण्यात येते, जेथे हा रोग सातत्याने आढळतो. या रोगासाठी लसीकरण हे फेब्रुवारी ते मे महिन्यात पावसाळ्याआधी घेण्यात येते. कारण साधारणतः पावसाळ्याच्या सुरवातीस या रोगांची लागण होते. सर्व वयोगटांतील जनावरांना ही लस देण्यात येते व दरवर्षी याच कालावधीत ही लस पुन्हा देण्यात येते.

गोचीड ज्वर


संकरित जनावरांमध्ये महत्त्वाचा असा हा रोग साधारणतः उन्हाळा आणि पावसाळ्यादरम्यान होतो. जनावरांवर असणाऱ्या गोचिडांमुळे हा रोग पसरतो. गोचीड नियंत्रणासोबतच या रोगावरील प्रतिबंधात्मक लस ही हा रोग प्रामुख्याने आढळणाऱ्या भागात देण्यात येते. सर्व वयोगटांतील जनावरांना दरवर्षी ही लस जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात देण्यात येते.

लसीकरणादरम्यान घ्यावयाची काळजी


लसीकरण शक्‍यतो सकाळ किंवा संध्याकाळी करावे. लसीकरण हे फक्त निरोगी जनावरांमध्ये करण्यात येते. लसीची मात्रा आणि लस देण्याची पद्धती ही लस उत्पादन करणाऱ्या कंपनीने ठरवलेलीच वापरावी. शक्‍यतो एका ठिकाणच्या जनावरांचे लसीकरण हे एकाच दिवशी करावे. गाभण जनावरांत लसीकरण करू नये.

दूरध्वनी क्र. - 022-24132792, 24131180 
(लेखक मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे कार्यरत आहेत.) 

संपर्क
1) दूरध्वनी क्र. - 02169-244227, 244214
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा
2) दूरध्वनी क्र. - 02385- 257448, 256630
पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर
3) दूरध्वनी क्र. - 0724- 2258643
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला

स्त्रोत: अग्रोवन,

२ एप्रिल २०१२

3.07462686567
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 13:43:40.284919 GMT+0530

T24 2019/10/18 13:43:40.292204 GMT+0530
Back to top

T12019/10/18 13:43:39.874338 GMT+0530

T612019/10/18 13:43:39.895346 GMT+0530

T622019/10/18 13:43:39.940693 GMT+0530

T632019/10/18 13:43:39.941601 GMT+0530