অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जनावरांसाठी कॅल्शिअम महत्त्वाचे

जनावरांसाठी कॅल्शिअम महत्त्वाचे

जनावरांच्या शरीरामध्ये आम्ल-अल्कली संतुलन, पाण्याचे संतुलन राखण्याचे काम कॅल्शियम करते. मांसपेशी व मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भाच्या वाढीसाठी आणि दूधउत्पादनासाठी कॅल्शिअम महत्त्वाचे ठरते. याच्या कमतरतेमुळे जनावरांच्यामध्ये प्रजोत्पादनासंबंधी समस्या उद्‍भवतात. दुग्धज्वर आजार होतो. हे लक्षात घेऊन पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत.

जनावरांच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण जवळजवळ १.३३ टक्के एवढे असते. शरीरातील ९९ टक्के कॅल्शियम हाड व दातांमध्ये असते. तसेच एक टक्का कॅल्शियम मऊ पेशीत व रक्तात साठवलेले असते. जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनात कॅल्शिअम महत्त्वाचा घटक आहे. हिरवा पालेदार चारा विशेषतः द्विदल चारापिके ही कॅल्शिअमचा उत्तम स्रोत आहेत. तेलविरहित पेंडी, कॉडलिव्हर ऑइल, फिश ऑईल हे चांगले स्रोत आहेत. मात्र कडबा, ‘हे‘, पिकांचे दुय्यम पदार्थ, कडधान्ये यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अत्यल्प असते.

कॅल्शियमची कार्ये

१) हाडांची, दातांची वाढ होण्यासाठी, रक्त गोठण्यासाठी कॅल्शियमची गरज असते.
२) शरीरामध्ये आम्ल-अल्कली संतुलन, पाण्याचे संतुलन, ऑस्मॅटिक प्रेशर इ. साठी कॅल्शियम उपयुक्त.
३) मांसपेशी व मज्जा संस्थेवर नियंत्रण, तसेच शरीरामध्ये विविध विकर तयार होण्यासाठी कॅल्शियम मदत करते.
४) चारा पचनाच्या क्रियेत उपयोगी, गाभणकाळात गर्भाच्या वाढीसाठी उपयुक्त.
५) दूधउत्पादन वाढीसाठी उपयुक्त.

कॅल्शियम कमतरतेची कारणे

चाऱ्यात किंवा खाद्यात कॅल्शियमचे प्रमाण कमी असते.


१) जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यास अशा जमिनीवर वाढलेल्या चाऱ्यात कॅल्शियमचे प्रमाण कमी असते.
२) कडधान्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी असते.


कॅल्शियमचे शोषण योग्य प्रमाणात न होणे.

१) आहारात कॅल्शिअम व स्फुरदाचे प्रमाण २-१ नसणे.
२) आतड्याचे आजार, ‘ड’ जीवनसत्त्वांचा अभाव
३) आहारात ऑक्झलेटचे प्रमाण अधिक असणे.
४) चारा न खाणे/कमी खाणे (गाभणकाळात किंवा गाया-म्हैस वितेवेळी)
५) अल्कलीयुक्त आहार

हाडांमधून कमी प्रमाणात होणारी कॅल्शियमची हालचाल

१) पॅराथारमोनचे कमी प्रमाण किंवा कमतरता
२) रक्तातील कॅल्सीटोनीनचे अधिक प्रमाण
३) भाकड काळात कॅल्शियमचे अतिसेवन केल्यामुळे पॅराथारमोनचे कार्य कमी होते.

कॅल्शियमची शरीराची वाढती गरज

१) गाभण जनावरात गर्भाच्या वाढीसाठी
२) दुधाळ जनावरात दुधाद्वारे कॅल्शियमचा निचरा होणे.
३) वाढत्या जनावरात शरीराच्या/हाडाच्या वाढीसाठी

कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे आढळणारी लक्षणे

१) वाढ खुंटणे, दूधउत्पादन घटणे, रक्त गोठण्यास वेळ लागणे, हाडे ठिसूळ होणे, स्नायूत अशक्तपणा येतो.
२) लहान व तरुण जनावरात मुडदूस व प्रौढ/ वयस्कर जनावरात ‘उरमोडी’ होणे, चारा खाण्याचे प्रमाण कमी होते.
३) प्रजोत्पादनासंबंधी समस्या उद्‍भवतात. गाई व म्हशीमध्ये दुग्धज्वर आजार होतो.

निदान

रोग लक्षणे व रक्तजलातील कॅल्शियमचे प्रमाण यावरून कॅल्शिअमच्या कमतरतेचे निदान करता येते.

उपचार


१) नियमितपणे खाद्यातून कॅल्शियमयुक्त क्षारमिश्रणे मोठ्या जनावरात ५० ते १०० ग्रॅम तर लहान जनावरांत १५ ते २० ग्रॅम रोज याप्रमाणे द्यावीत.
२) दुग्धज्वर आजारावर पशुतज्ज्ञाच्या सल्याने उपचार करावेत.

कॅल्शियमची कमतरता होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय

१) गाभणकाळाच्या शेवटच्या १ ते २ आठवड्यात कमी कॅल्शियमयुक्त आहार द्यावा.
२) रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये विशेषतः दुधाळ गाई-म्हशीत २५ ते ५० ग्रॅम क्षारमिश्रण द्यावे. आहारात लसूणघास किंवा इतर डाळवर्गीय चाऱ्याचा समावेश असावा.
३) पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार ‘ड’ जीवनसत्त्वाचे इंजेक्शन गाय-म्हैस विण्याअगोदर एक आठवडा आधी द्यावे.
४) जनावरांना नियमित व्यायाम होईल याची काळजी घ्यावी. त्यामुळे पचनव्यवस्था व्यवस्थित राहते.

रक्तातील सर्वसाधारण कॅल्शियम, फॉस्फरस व मॅग्नेशियमचे प्रमाण

कॅल्शियम - ८ - १२ मि.ग्रॅ./ १०० मि.लि.
फॉस्फरस/ स्फुरद - ४ - ६ मि.ग्रॅ./ १०० मि.लि.
मॅग्नेशियम - १.८ ते ३.० मि.ग्रॅ./ १०० मि.लि.

कॅल्शियमची शरीराला असणारी गरज

वजन ( किलो) ---- शरीरपोषण ---- गाभणकाळ ---- दूधउत्पादन
४०० ------------ १७ ग्रॅम ---------- २३ ग्रॅम --------- २-३ ग्रॅम प्रतिकिलो दुधाच्या प्रमाणात.
५०० ----------- २० ग्रॅम ----------- २९ ग्रॅम --------- २-३ ग्रॅम प्रतिकिलो दुधाच्या प्रमाणात.

अतिप्रमाणातील कॅल्शियमचे दुष्परिणाम

१) कॅल्शियमची जास्त मात्रा देणे.
२) शिरेद्वारे जलद कॅल्शियम देणे.
३) विनाकारण सतत कॅल्शियम देणे.
४) रक्तामध्ये इतर हानिकारक घटक असणे. (टॉक्सेमिया), विषामुळे झालेला रक्तदोष.
५) कॅल्शियम देतेवेळी जनावर एकदम घाबरणे किंवा उत्तेजित होणे.
कॅल्शियमच्या दुष्परिणामामुळे हृदयाच्या ठोक्यांची संख्या वाढणे, श्‍वसनास त्रास होणे, जनावर थरथरते, पडणे तसेच काही वेळा तत्काळ मृत्युमुखी पडते, अशी लक्षणे आढळतात.

कॅल्शियमचे दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाय

१) कॅल्शियमयुक्त द्रावणामध्ये कचरा, बुरशीजन्य वाढ नसावी.
२) कॅल्शियमच्या द्रावणाची बाटली शरीर तापमानाबरोबर गरम करावी.
३) कॅल्शियमयुक्त द्रावण पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार योग्य प्रमाणात द्यावे.
४) कॅल्शियमची अतिमात्रा देणे टाळावे.
५) विषामुळे रक्तदोष झालेल्या जनावराला कॅल्शियमचे द्रावण शिरेतून न देता कातडीखाली द्यावे. शिफारशीत प्रमाण ठेवावे.
६) कॅल्शियम शिरेतून देतेवेळी जनावर शांत उभे राहील याची काळजी घ्यावी.
७) विनाकारण वारंवार कॅल्शियमची इंजेक्शन देणे टाळावे.

संपर्क - डॉ. प्रफुल्लकुमार पाटील - ९४२३८७०८६३
(लेखक पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate