অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जनावरांना योग्य आहार द्या, पचनसंस्थेचे विकार टाळा

जनावरांची देखभाल करताना चारा, पाणी देण्यामध्ये काही चूक झाल्यास किंवा हवामान बदलल्यास चयापचयाचे विकार जनावरांना होतात. हे लक्षात घेता जनावरांची पचनसंस्था योग्य क्षमतेने कार्यान्वित ठेवावी.

जनावरांच्या चारा, पाण्यामधून विषारी पदार्थ, अखाद्य पदार्थ पोटात गेल्यावरदेखील पचनसंस्थेचे विकार होतात. असे झाल्यावर जनावराचे उत्पादनाचे चक्र बिघडते, कधी जनावर दगावते.

तोंड येणे

  1. दाहक रसायन, खते, फवारणी केलेली पिके, तीक्ष्ण अणकुचीदार धातूचे तुकडे, दगड, कठीण टोकदार खाद्य पदार्थ, कठीण काटेरी फांदी असे पदार्थ चाऱ्यातून जनावरांच्या तोंडात गेल्याने तोंड येण्याचा प्रकार होतो.
  2. लाळ्या खुरकूत, आंत्रविषार, बुळकांडी, गळू, नीलजिव्हा यांच्या संसर्गांमुळे तोंडाचा दाह होतो.

लक्षणे

  1. तोंडातील जिव्हा, ओठ, नासिका, हिरड्या, टाळू यावर फोड येऊन जखमा होतात, त्यामधून पू अथवा रक्तस्राव होतो.
  2. या जनावरांना अन्न घेण्यास त्रास होतो, ती उपाशी राहतात. तोंडावाटे जास्त लाळ गाळल्याने शरीराला पाण्याची कमतरता भासते.

उपाय

  1. जनावरांचे तोंड तुरटी आणि पोटाशिअम परमॅंगनेटच्या द्रावणाने धुवावे.
  2. त्वचा मऊ राहावी यासाठी ग्लिसरीन आणि शिफारशीत जंतुशाशक यांचे मिश्रण चोळावे.
  3. आजार तीव्र वाटल्यास तत्काळ पशुवैद्यकाकडून औषधोपचार करून घ्यावा.
  4. जनावरांना मऊ आणि हिरवा चारा द्यावा.

घशाचा दाह

  1. घशापासून अन्न नलिका आणि श्‍वास नलिका सुरू होतात, त्यामुळे या दोन्ही संस्थांच्या आजारात घशाचा दाह होऊ शकतो.
  2. घशाचा दाह होण्याचे सर्वसाधारण प्रमुख कारण म्हणजे खाण्यातून अति थंड अथवा अति उष्ण पदार्थांचे सेवन, रासायनिक खते, विषारी द्रावण, पातळ औषधे, टोकदार अणकुचीदार पदार्थांमुळे होणाऱ्या जखमा तसेच सर्दी, पडसे, खोकला, जिवाणूजन्य, विषाणूजन्य संसर्ग झाल्यामुळेसुद्धा होतो.
  3. लाळ्या खुरकूत, बुळकांडी, नीलजिव्हा, घटसर्प, जिवाणूजन्य गळू या आजारात घशाला गंभीर इजा होते.

लक्षणे

  1. घशाच्या दाहमध्ये जनावरांना चारा- पाणी गिळण्यास, श्‍वास घेण्यास त्रास होतो. खोकला येतो, घशातून खर खर आवाज येतो.
  2. चारा खाताना जनावर घास बाहेर टाकते, त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहते. तोंड उघडून पाहिल्यास घशातील स्लेश्‍म त्वचेवर सूज, लालसारपणा, पुरळ, फोड, जखमा झालेल्या आढळतात. श्‍वासाला दुर्गंधी येते.

उपाय

  1. घशाचा दाह होऊ नये यासाठी त्यांच्या चाऱ्यात अभक्ष घटक येऊ नयेत याची दक्षता घ्यावी.
  2. इतर आजारांमुळे घशाचा दाह झाला असेल, तर पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.
  3. मऊ चारा खायला द्यावा, कोरडी वैरण देऊ नये.

जठराचा दाह

  1. सामान्य जठर असणाऱ्या प्राण्यांबरोबरच रुमिनंट जठर असलेल्या जनावरांमध्ये देखील आढळतो. सामान्य जठर असणाऱ्या प्राण्यांमध्ये याची प्रमुख लक्षणे म्हणजे ढेकर येणे, उलटी, होणे, पोट दुखणे आणि नंतर जुलाब लागणे अशी असतात.
  2. नेहमीच्या चारा- पाण्यात अचानक केलेला फेरबदल हे या आजाराचे प्रमुख कारण आहे. एकदम जास्त धान्य, पीठ अथवा मऊ खाद्य खाल्ल्यामुळे अपचन होते. त्यामुळे जठरात निर्माण होणाऱ्या पाचक रसात अनैसर्गिक बदल होतात.
  3. सामान्यपणे जठरात असणारी सहायक सूक्ष्मजीवांच्या जागी विकार निर्माण करणारे सूक्ष्मजीव वाढतात.
  4. रासायनिक खते, विषारी पदार्थ, फवारणी केलेला चारा सेवन केल्यामुळे पोटाच्या आतील स्लेश्‍म आवरणास इजा, जखमा होतात. बाधित चारा खाल्ल्यामुळे जिवाणूंचा संसर्ग होतो.
  5. काही विषाणू आणि कृमीदेखील पोटात संसर्ग करून जठराचा दाह निर्माण करतात. भुकेलेली जनावरे अधाशीपणे चारा खातात. जनावरांना कॅल्शिअम, फॉस्फरससारख्या सूक्ष्म घटकांची, जीवनसत्त्वांची कमतरता असेल, तर ते दगड, माती, विटा, मेलेल्या जनावरांची हाडे, प्लॅस्टिक कागद गिळतात.
  6. उन्हाळा संपून पावसाला सुरवात झाली, की कुरणावर चरणाऱ्या जनावरांना हिरवे गवत भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. ते अधाशीपणाने खातात.
  7. अपचनामुळे बद्धकोष्ठता होते. पोटात चारा घट्ट होऊन पोटाची हालचाल थांबते, जनावर रवंथ करायचे थांबते. या सगळ्यांमुळे जठराचा दाह होत असतो.
  8. जनावरांना बद्धकोष्ठता झाल्यामुळे चारा खात नाहीत, रवंथ करीत नाहीत, पोटदुखीची लक्षणे दाखवितात, पोटात वायू निर्माण होऊन पोट डांबरते. आंत्राविषार आजाराचे जिवाणू या जनावरांच्या पोटात वाढतात. त्यामुळे त्यांना हगवण लागते.

उपाय

  1. जनावरे अखाद्य वस्तू खाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
  2. जठराचा दाह होऊ नये, तसेच अपचन झालेले असल्यास जनावरांच्या चारा, पाण्यातील केले जाणारे फेरबदल टाळावेत.
  3. अपचनात रेचक देऊन पचनसंस्थेतील अडसर दूर करावा.
  4. पचन पूर्ववत होईपर्यंत जनावरांना पचनास हलके आणि काहीसे कमी आणि भरड खाद्य द्यावे.
  5. पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.

पोटफुगी

  1. जनावरांच्या जठरात मोठ्या प्रमाणात वायू आणि फेस तयार होतो, ज्यामुळे जनावराचे पोट खूपच फुगते आणि गुदमरून अशा जनावरांचा मृत्यू होतो.
  2. अधाशीपणाने हिरवे गवत खाणे, लसूण घासाचे अति सेवन, खरकटे सडलेले अन्न, धान्य पीठ खाल्ल्यामुळे जनावरांच्या पचन क्रियेवर ताण पडून रवंथ बंद होते. जठराची हालचाल मंदावते.
  3. अनावश्‍यक जिवाणू वाढून वायू आणि फेस जास्त प्रमाणात तयार होतो.
  4. कधी कधी जनावरे दगड, टोकदार वस्तू खातात. हे घटक जठरात आतून रुतून बसतात आणि जठराची हालचाल मंदावते, जखमेत संसर्ग होऊन त्याचे रूपांतर पोटफुगीमध्ये होते. अशा वस्तू पचननलिकेच्या आवरणातून घुसून जठराच्या जवळ असणाऱ्या इतर इंद्रियांमध्ये शिरतात. त्यांच्याबरोबर जिवाणू त्या अवयवांपर्यंत पोचून गंभीर इजा करतात, याला टीआरपी असे म्हणतात.
  5. जनावरांत हर्निया होतो. ज्यात पचननलिकेचा काही भाग शरीरातील स्नायू कमकुवत झाल्याने छिद्र तयार होऊन त्यातून बाहेर घुसतो. अशा प्रकारच्या विकारांमध्ये पोटफुगी आणि बद्धकोष्ठता वारंवार उद्‌भवते.

लक्षणे

  1. पोटफुगीमुळे जनावराचे पोट फुग्यासारखे तीव्रपणे फुगलेले दिसते. ते अत्यंत बेचैन होते.
  2. जनावराला धाप लागते, श्‍वास घेण्यास त्रास होतो, सारखे उठबस करते, अथवा पाय ताणून आडवे पडून राहते.
  3. जनावराच्या डाव्या कुशीवर वाजविले असता ड्रमसारखा आवाज येतो. उपचारास विलंब झाल्यास ते दगावते.

उपाय

  1. जनावरांच्या आहारात अखाद्य पदार्थ येऊ नयेत याची काळजी घ्यावी.
  2. योग्य प्रमाणात सकस, समतोल आहार जनावरांना खाऊ घालणे,
  3. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावराच्या पोटफुगीवर तत्काळ निदान करावे.

 

डॉ. प्रशांत पवार 
(लेखक क्रांतिसिह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate