অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतीय गायींच्या विविध जाती

भारतीय गायींच्या विविध जाती

"डांगी" गायी (महाराष्ट्र)

आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक व ठाणे ह्या जिल्ह्यांतील पर्वतरांगामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो व पर्जन्यकाळ हा जास्त कालावधीचा आहे अशा ठिकाणी शेतीमधील काम समर्थपणे करणारा गायी म्हणजे "डांगी" गायी होय.

दुर्गम डोंगरात जाऊन चरुन येणे, मोठ्या पावसामध्ये शेतीची कामे करणे, भातलावणीचे वेळी रेड्यांप्रमाणे उत्तम चिखलणी करणे ही या गायीच्या बैलांची खास वैशिष्टये आहेत. या गायीला "डांगी" हे नाव डांग पर्वतरांगामधील गाय ह्या वरून पडल्याचे सांगितले जाते.

गायीची उपलब्धता

आपल्या महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कवळण व या जिल्ह्यातील पश्चिमेकडील प्रदेश; तसेच ठाणे जिलह्यातील पुर्वेकडील तालुक्यांमध्ये आणि अहमदनगर जिलह्यातील ठाणे व नाशिक जिल्ह्यांचे जवळील प्रदेशामध्ये हा गायी चांगल्या पद्धतीने सांभाळला जातो व विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.

शारीरिक ठेवण

स्थानिक निसर्गाशी जुळवून घेणारा वंश असल्याने हा गायी लहानसर हे मध्यम ठेवणीचा आहे. ह्या गायीच्या कातडीखाली तैलग्रंथीचा हलका स्तर असतो ह्यामुळे मोठ्या पावसामध्ये गायी/बैल भिजले तरीही पाणी अंगात मुरत नाही व आजारपण येत नाही हे सर्वात मोठे नैसर्गिक वरदान या गायीला प्राप्त आहे. हा गायी काळ्या रंगावर पांढरे ठिपके, पांढ-या रंगावर काळे ठिपके अशा संमीश्र रंगाचा असतो. ह्या रंगाच्या मिश्रणानुरुप स्थानिक परिभाषेत सहा प्रकारे संबोधला जातो १) काळाबाळा २) पांढराबाळा ३) मणेरी ४) लालबाळा ५) लाला ६) बाळा. भाद्रपद महिन्यातील माजरीचारा खाऊन जनावरे पुष्ठ झाली की अतिशय विलक्षण चमक या गायीला प्राप्त होते. नजरेत भरेल अशी आकर्षक कपाळाची ठेवण असते, कपाळामध्ये अगदी मधोमध लहानसर उंचवटा असतो, शिंगे लहान दंडगोलाकृती किंचीत मागे झुकलेली व संपूर्णपणे काळ्या रंगाची असतात, नाकपुडे संपुर्णत: काळी व मध्यभागी फुगीर असते, खांदे भक्कम असतात, वशिंड लहानसर आकाराचे पण घट्ट असते, पाय उंचीने जरा लहानसर असतात, खूप एकसंघ लहान परंतु अत्यंत टणक व संपुर्णत: काळे असतात ह्या गुणामुळेच उंच डोंगरांमध्ये अवघडजागी जाऊन चरणे ह्या गायीला सहज शक्य होते. कान लांबट गोलाकार असतात, डोळे गोटीसारखे चकचकीत असतात, कास लहानसर व गोलाकार असते आणि बहुतांशी कास पांढ-या रंगाची व चारही सड (आचळ) काळ्या रंगाचे लहानसर असतात, छाती कडून कासेकडे येणारी दूधाची शिर लहान आकाराची व सरळ असते, शेपूट सर्वसाधारण उंचीची गोंडा काळा झुपकेदार असतो, बैलांचे चौक उंचीला शोभतील असे रेखीव उताराचे असतात, या बैलांच्या अंगामध्ये शेतीकामाची विलक्षण चिकाटी व ताकद असते त्यामुळे सलग ५ ते ६ तास सुद्धा अडचणीच्या उताराच्या खाचरांमध्ये उखळणी व चिखलणीची कामे सहज करतात.

या गायीच्या कालवडींचे प्रथम माजाचे वय सर्वसाधारणपणे ३६ ते ४४ महिन्यांचे असते. विशेष मेहनत घेतलेल्या कालवडी ३० ते ३२ महिन्यांच्या माजावर येऊन गाभण राहिल्याच्या गोशाळांमध्ये नोंदी आहेत. या गायींचे दोन वेतांमधील अंतर २० ते २४ महिन्यांपर्यंत आहे; तसेच संपूर्णत: भाकडकाळ ९ ते १० महिन्यांच्या सुद्धा असू शकतो. या गायीच्या गायी उत्तमप्रकारे चरून आल्यावर नगदी खाणे ( पेंड, भूस इ.) नसले तरीही दिवसाकाळी ३ ते ४ लिटर दूध सहज देतात. या गायींच्या दुधामधील स्निग्धांशाचे प्रमाण ३ ते ३.५% पर्यंत असते. या गायीपासून संकर केलेल्या जर्सी/होल्स्टीन ५०% पर्यंतच्या कालवडी उत्तम गुणवत्तेच्या व दुधाळ सिद्ध झाल्या आहेत तसेच ५०% संकरीत खोंडे सुद्धा शेतीकामात उत्तम काम करतात. वयाची ४ वर्षे पूर्ण झाली की खोंडे शेतीकामासाटी योग्य ठरतात. या गायीचे बैल एकजागी उत्तम जपणुकीवर १५ ते १६ वर्षे उत्तम काम करतात तसेच गायींची उत्तम मेहनतीवर ८ ते १० वेमी सहज होतात.

या गायीवर नाशिक व ठाणे जिल्ह्यांमध्ये सरकारी गोशाळा किंवा खाजगी गोशाळांमध्ये चांगल्या प्रकारे उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने संशोधनात्मक प्रयत्न चालू आहेत. "डांगी" गायी हा सह्याद्री पर्वतरांगामधील शेतक-यांचेसाठी वरदान ठरलेला असा गायी आहे.


"देवणी" गायी (महाराष्ट्र)

आपल्या भारतीय गायीमधील दुहेरी उपयुक्तता असलेले जे गायी आहेत त्यांच्यामध्ये अत्यंत देखणा, विविध स्तरांवरील प्रदर्शनांमध्ये मानांकन सिद्ध करणारा गायी म्हणजे "देवणी" गायी आहे. ह्या गायीला "मराठवाडा भुषण" अशी बिरुदावली सुद्धा प्राप्त झाली आहे. विदेशी संकर केल्यास उत्तम दुधाच्या गायी देणारा, दुग्धोत्पादन व शेतीकाम यांमध्ये समान उपयुक्ततेचा व दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये समर्थपणे तोंड देणारा असा हा गायी आहे

गायीची उपलब्धता

सुमारे २०० वर्षापूर्वी डांगी व गिर गायीच्या संकरामधून मराठवाड्यात हा 'देवणी' गायी उदयास आला. आपल्या महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर, चाकूर, शिरूर अनंतपाळ, हरंगूळ, देवणी, निलंगा, अहमदपूर येथे तसेच मोठ्या प्रमाणांवर उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बिड या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात खास हौशीने विक्रीसाठी पैदास करणारे शेतकरी आहेत.

शारीरिक ठेवण

या गायीच्या गायी मध्यम आकाराच्या व आपोटशीर बांधण्याच्या असतात. गायींच्या मूळ रंग पांढरा व त्यावर काळ्या रंगाचे अनियमित आकाराचे पट्टे (ठिपके) येतात. गायींच्या कातडीला विलक्षण अशी देखणी चमक असते; त्वचा अत्यंत मऊ असते आणि कातडी शारीराला घट्ट चिकटलेली असते. या गायीच्या कपाळाची ठेवण भरदार व नजरेत भरणारी असते, शिंगे मागाहून बाहेरच्या बाजूस येणारी बाकदार व दंडगोलाकृती असतात, शिंगाचा रंग काळा असतो, डोळे लांबट व अंडाकृती असतात, पापण्या संपूर्णपणे काळ्या असतात. बैलांच्या नजरेत जरब असते व कायम रोखून बघण्याची सवय असते. कान मध्यभागी पसरट, टोकाला गोलाकार व मागे पडलेले असतात, नाकपुडी काळी पसरट व मध्यभागी फुगीर असते, वशिंड पिळदार घट्ट परंतु शरीराच्या एका बाजूस थोडे झुकलेले असते. मानेखालची पोळी (लोळी) शरीराला शोभेल अशी असते, मान लांब व रुंद असते, बैल लांब पौंडी असतात, मागचे पाय शरीराच्या मानाने किंचित उंच असतात व मांड्या पुष्टदार असतात, पाठ मागच्या बाजूने वशिंडाकेड किंचीत उतरती असते त्यामुळे शोभा येते, खूर संपूर्णत: काळे, एकमेकांशी सलग व भक्कम असतात त्यामुळे हे बैल कमी उगाळतात व नालबंदाचा खर्च आपोआप कमी होतो, शेपूट मागच्या ढोपरा पर्यंत येणारी व शेपूट गोंडा काळा किंवा पांढरा झुपकेदार असतो, गायींमध्ये कास कासंडीसारखी गोलकार व शरीराबाहेर जास्त न येणारी असते, चारही सड (स्तन) गोलाकार व बहुतांशी काळ्या रंगाचे असतात. या गायीची उभे राहण्याची पद्धत विलक्षण ऐटबाज असते. हा गायी शांत व सुस्वभावी असतो. स्थानिक शेतकरी ज्या बैलांचा चेहरा संपूर्णत: काळा आहे त्याला "काळतोंड्या" व ज्याचे चेह-यावर कळा पांढरा मिश्र रंग आहे त्याला "वानरतोंड्या" म्हणून उल्लेखतात.

या गायीच्या कालवडींचे प्रथम माजावर येण्याची वय सर्वसाधारणपणे ३० ते ३५ महिन्यांपर्यंत असते. परंतु उत्तम मेहनतीवर २४ ते २७ महिन्यांपर्यंत माजावर येऊन गाभण राहिल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. ऐन दुधाच्या भरात दिवसाकाठी ६ ते ७ लिटर दूध सहज देतात, दूध सलगपणे विनातक्रार अंत १८ ते २१ महिने देतात. या गायींचे दोन वेतांमधील अंतर १८ ते २१ महिन्यांचे असते; दोन वेतांमधील भाकडकाळ हा ४ ते ६ महिन्यांचा असू शकतो. दुधाला सरासरी फॅट ३.५ ते ४.५ लागते.

या जाती्या बैलांना मराठवाड्यामधील तीव्र उन्हामध्ये सुद्धा काम करण्याची प्रचंड शक्ती ही निसर्गाची मोठी देणगी आहे. तीन वर्षे पूर्ण झालेली खोंडे शेतीकामात हलक्या कामासाठी वापरण्यास सुरुवात करतात. खोंड संपूर्णत: दाती जुळला की खच्चीकरण करावे. एकजागी उत्तमरीत्या सांभाळलेले बैल २० ते २२ वर्षांपर्यंत सहज काम करतात. या जातीचे बैल क्कचीतच मारके निघतात. पूर्ण वाढ झालेल्या गायीचे वजन ३५० ते ४५० कि.ग्रॅ. पर्यंत असू शकते तर पूर्ण वाढ झालेल्या बैलाचे वजन ५०० ते ६०० कि. ग्रॅ. पर्यंत असू शकते. पूर्ण वाढ झालेल्या गायीचे आकारमान साधारणत: पुढील प्रमाणे असते.

शरीराची उंची छातीजवळील लांबी घेर
गाय १२० सें.मी. १२५ सें.मी. १५० सें.मी.
बैल १३५ सेंमी. १४० सें.मी. १८० सें.मी.

या जातीचा उत्तम बैल जोडीची किंमत रु. १.५० लाखापर्यंत तर चांगल्या गायीची किंमत रु. ३५ ते ४० हजारापर्यंत असते.

संशोधनात्मक कार्य लाईव्ह स्टॉक रिसर्च अँड इनफरमेशन सेंटर ( देवणी), मु.पो. करंजा – हल्लीखेड बिदर सरकारी डेअरी


"गीर" गायी (गुजरात)

आपल्या भारतीय गायीमध्ये दूध उत्पादनासाठी जे गायी प्रसिद्ध आहेत त्यापैकी सर्वोत्तम गायी म्हणून सिद्ध झालेला "गीर" गायी आहे. आपल्या देशामध्ये गुजरात राज्याचा पश्चिम व दक्षिण भाग, महाराष्ट्र राज्याचा गुजरातच्या सीमेलगतचा प्रदेश तसेच राजस्थान राज्यामधील टोंक व कोट जिल्हे हे गीर गायीचे उगमस्थान मानले जातात.

या भागामध्ये ह्या गायीची मोठ्या प्रमाणावर संशोधनात्मक उत्तम वंश निर्मिती केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर गायी विक्रीसाठी उपलब्ध असतो. गुजरात सरकार गीर गायीवर मोठ्या प्रमाणावर संशोधनात्मक कार्य उंच वंशावळ प्राप्तीसाठी करत आहे. 'कॅटल ब्रिडींग फार्म' जुनागड – अँग्री. युनि. हे त्याचे आदर्श उदाहरण आहे.

शारीरिक ठेवण

या गायीच्या गायी थोराड, उंच व भक्कम बांधण्याच्या असतात. नजरेत भरेल अशी शारीरिक ठेवण असते. भक्कम मोटे व भरदार डोके, शिंगे गोलाकार व मागून पुढे आलेली बुंध्यापासूनच जाड व बहुतांशी काळ्या रंगाची असतात, कान लांबलचक खाली पडलेले व नाकपुडी पर्यंत पोचणारे असतात, कानाच्या पाळ्यांचा रंग कडेला गडद काळसर छटेचा असतो, नाकपुडी संपूर्णपणे काळीभोर असते व चेह-याचे मानाने लहान असते, डोळे लंबट गोल व काजळ घातल्यासारखे व अतिशय बोलके असतात, वशिंडे मोठे व घट्ट आकर्षक असते, गायींच्या मानेखाली पोळी ( लोळी) मोठी असते, पाय मोठे व भक्कम असतात, खूप काळे उंच व एकसंध असल्यासारखे दिसतात, मागे चौक उतरते नसतात, गायी कोठीपोटात आखुड नसतात, लोंबी मोठी असते. छातीकडून कासेकडे जाणा-या दूधाच्या शीरा सुस्पष्ट व नागमोठी असतात, गायींची कासेची ठेवण मोठी व शरीराबाहेर जास्त असते, चारही स्तन लांबटगोल व समान अंतरावर असतात. शेपूट लांबलचक व गोंडा काळसर झुपकेदार असतो, निरण (सोवाळी) काळी व सैलसर ठेवणीची असते. रंग बहुतांशी तांबडा व त्यामधील विविध छटांचा असतो, क्वचित ठिपके असतात.

या जातीचे बैल गायींप्रमाणेच धष्टपृष्ट व थोराड असतात, बैलांचे मस्तकाची ठेवण चेह-याचे मानाने मोटे व नजरेत भरणारी असते. बैलांमध्ये वशिंड मोठे व घट्ट आणि गडद अशा काळसर छटेचे असते, बैल लाबपौंडी असतात, बैल अत्यंत शांत व सुस्वभावी असतात मारकेपणा क्वचीतच आढळतो, बैल ओढकाम शेतीकामासाठी चांगले असतात पण जरा मंदपणे चालतात.

पूर्ण वाढ झालेल्या गायीचे वजन साधारण: ३५० ते ४०० कि. ग्रॅ. असते आणि पूर्ण वाढ झालेल्या बैलाचे वजन ४५० ते ५५० कि. ग्रॅ. पर्यंत असते. पूर्णवाढ झालेल्या गायी व बैलांची मापे साधारणत: पुढील प्रमाणे असतात.

शरीराची उंची छातीजवळील लांबी घेर
1) बैल १४५ ते १४५ ते १८० ते १५५ सें.मी. १५५ सें.मी. २१० सें.मी
२) गाय १२५ ते १२० ते १६०ते
१३५ से.मी. १३५ से.मी. १८० सें.मी

या गायीच्या कालवडींचे प्रथम माजावर येण्याचे वय साधारणपणे ३० ते ३८ महिन्यांचे असते. चांगल्या सांभाळलेल्या कालवडी २४ महिन्यांच्या सुद्धा माजावर आल्याची उदाहरणे पाहण्यात आहेत. दुग्धोत्पादनाची क्षमता प्रथम वेतापासन तिस-या वेतापर्यंत आकर्षक चढत्या कमानीची असते. हा गायी सलग जास्तकाळ, उत्तम स्निग्धांश व भरपूर दुग्धोत्पादन यासाठीच प्रसिद्ध आहे. सर्वसाधारण मेहनतीवर दिवसाकाठी ६ ते ७ लिटर दूध सहज देतात. आपल्या देशामध्ये दुग्धोत्पादन स्पर्धेमध्ये २४ तासांमध्ये १७ लिटर दूध देण्याची नोंद आहे. सरासरी स्निग्धांश ४.५० ते ५.५० पर्यंत असू शकतो. एका वेतामधील सरासरी दुग्धोत्पादन ३२१० कि.ग्रॅ. मिळते. दोन वेतामधील अंतर १८ ते २४ महिन्यांचे असते. दोन वेतांमधील भाकडकाळ १०० ते १५० दिवसापर्यंत असू शकतो.

अशा उत्तम गुणवत्तेच्या गायीवर ब्राझील व अमेरीकेमध्ये संशोधन झाले व त्यातून 'ब्राह्मणी' गायी विकसित झाला. या गायी एकाच किणी उत्तम पद्धतीने सांभाळल्यास १० ते १२ वेणी एकाच घरी निश्चित होतात. तसेच चांगली बैलजोडी १५ ते १८ वर्षे उत्तम काम करु शकते. या जातीची खोंड वयाच्या तिस-या वर्षापासून शेतीकामात हळूहळू धरण्यास योग्य असतात.

१) या जातीचा वळू निश्चित करतात पुढील निकष आवर्जून लक्षात घ्यावेत.
२) वळू पासून मिळणारे मादी वासरांचे प्रमाण.
३) उपजत वासरे उत्तम वाढीची व निकोप असणे गरजेचे आहे.
४) गायीची सर्व चिन्हे वासरांमध्ये संक्रमीत होणे.
५) मादी वासरांचे प्रथम माजावर येण्याचे वय.

दारात गीर गाय दूधासाठी असणे हे भारतीय शेतक-याचे दृष्टीने लैकिकार्थाचे चिन्ह आहे.

"खिल्लारी" गायी (महाराष्ट्र)

आपल्या भारतीय गायीमध्ये अत्यंत चपळ, अत्यंत काटक व अत्यंत देखणा तसाच सर्वात जास्त किमतीचा गायी म्हणजे "खिल्लार" गायी होय. या गायीला 'पांढरे सोने' संबोधणे हेच उचीत ठरते. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये बहुतांशी सर्वत्र तर अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण व पुर्वेकडील भाग तसेच कोकण व मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात हा गायी वापरला जातो.

गायींची उपलब्धता

आपल्या महाराष्ट्राच्या लगतच्या कर्नाटकातील सीमा भागत व गायीची मोठ्या प्रमाणावर पैदास केली जाते. (या गायीच्या भौगोलिक रचनेनुसार काही पोटजाती निर्माण झाल्या आहेत. उदा. माणदेशी खिल्लार, कर्नाटकी खिल्लार, पंढरपूरी खिल्लार, नकली खिल्लार अशा आहेत.

शारीरिक ठेवण

शिंगाचा रंग सफेद गुलाबी किंवा काळसर, शिंगे कोचर किंवा सरळ, कर्नाटक खिल्लार मध्ये शिंगे कपाळमाथ्या जवळ एकदम लगत व चिंचकुळी सरळ तर माणदेशी खिल्लार मध्ये जाडजूड व दोन शिंगांमध्ये योग्य अंतर असते.

नाकपुडी लालसर गुलाबी किवा काळ्या रंगाची असते, डोळे काळे व लांबट आकाराचे असतात, कान चेह-याचे मनाने लहान व शेवटला टोक असते, मान लांब व रुंद असते. पाठी पोटात आपरेपणा नसतो, मानेखाली पोळी (लोळी) मोठी नसते, गायींमध्ये बेंबीच्या येथील जागा अत्यंत अस्पष्ट असते, माणदेशी खिल्लार बैलांचे वशिंड मोठे व घट्ट असते, कातडी शरिरालगत घट्ट असते, केस अत्यंत लहान असतात, कातडीचा स्पर्श मुलायम असतो शेपूट लांबलचक सापासारखे असते, शेपुटगोंडा काळा व झुपकेदार असतो, बैलांमध्ये अंडकोष मध्यम आकाराचे व आटोपशीर असतात. गायींमध्ये निरणाची ठेवण आटोपशीर व लहानसर असते, गायींमध्ये छातीकडून कासेकडे येणा-या दुधाच्या शिरा या लहान व अस्पष्ट असतात. कास आटोपशीर व लहान असते. चारही सड लगत व समान उंचीचे असतात, या गायीचा रंग प्रामुख्याने चमकदार पांढरा असतो, म्हैसूरी खिल्लार आणि नकली खिल्लार यांचे मध्ये रंग काही वेळा कोसा किंवा जांभळट कोसा छटेचा येतो.

पूर्ण वाढ झालेल्या गायी व बैलांची मापे पुढील प्रमाणे असतात.

शरीराची लांबी उंची छातीजवळील घेर
१. बैल १४० ते १५० सें.मी. १३५ ते १४५ से.मी. २०० ते २१० सें.मी
२. गाय १२० ते १३० सें.मी १२५ ते १३५ सें.मी. १५० ते १६० सें.मी.

या गायींचे प्रथम वेताचे वय ४० ते ५० महिन्यांचे दरम्यान असते, दोन वेतांमधील अंतर १८ ते २४ महिन्यापर्यंत असते, एका वेतामध्ये सलग ८ ते १० महिन्यांपर्यंत दूध देतात. व्यायल्यानंतर दिवसाकाठी ३ ते ४ लिटर दूध देतात. वासरु दिवसभर गायीबरोबर मोकळे असल्यास या गायी ५ ते ६ वेळा चांगल्या पान्हवतात व दूध पाजतात. या गायींचा माजाचा कालावधी ६ ते ८ तासांचा असतो.

या गायीचे बैल शेतीकामासाठी व ओढकामासाठी ताकदवान असल्याने प्रसिद्ध आहेत; तसेच शर्यतीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत. वयाच्या ३ ते ६ वर्षापर्यंत शर्यतीसाठी व हलक्या कामासाठी धरतात. बैल दाती जुळला की लगेच रक्त्यीकरण करावे म्हणजे अंगात भरतो देखील चांगला. मारकेपणा कमी होतो व मोठ्या कामांना धरता येतो.

या जातीचे बैल तापट स्वभाव व मारकेपणाबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत तरी बैलांजवळ कधीही बेसावधपणा व फाजील आत्मविश्वासाने वावरु नये कारण हे बैल माणसांचा व जनावरांचा डुख (राग) धरतात त्यामुळे कधी मारतील ह्याचा नेम नसतो. या तापटपणा मुळेच काम रागारागाने झटपट करतात. या गायींची किंमत अंदाजे ३० ते ४० हजारापर्यंत असेत तसेच चारदाती खोंडाची किंमत ६० ते ७५ हजारापर्यंत आहे व नवथर बढीव बैलाची किंमत रु ४० हजारापर्यंत सहज असते. या गायीच्य खरेदी विक्रीसाठी पुढील बाजार प्रसिद्ध आहेत. पुणे, जिल्ह्यातील चाकण, सांगली जिल्ह्यामधील खरसुंडी, कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव, सातारा जिल्ह्यामधील सर्व महत्त्वाच्या देवांच्या यात्रा, सोलापूर जिल्ह्यातील सिद्वेश्वराची यात्रा विशेष प्रसिद्ध आहेत.

हा गायी अनेक गुणांनी परीपूर्ण असल्याने ग्रामीण लेखकांनी, कवींनी तसेच ग्रामीण चित्रपटांमध्ये ही कौतुक केलेला असा गायी आहे. काहीह झाले तरी चालेल एकदा तरी दारात खिल्लार जोडी असावी हे प्रत्येक शेतक-याचे एक स्वप्न असते.

वळूसाठी आवश्यक गुण –
१. खुर काळे व सलग पाहीजेत
२. शिंगे कोचर किवा सरळ
३. वळूपासून नर वासरांचे प्रमाण अधिक आवश्यक
४. शांत व सुस्वभावी स्वभाव आवश्यक
५. लाब पौंडी असणे गरजेचे
६. कातडी पातळ व चमकदार तसेच रंग दुधासारखा पांढरा असायलाच हवा.

"थारपरकर" गायी (राजस्थान)

आपल्या भारतीय गायीमधील दुहेरी उपयुक्तता असलेले जे गायी आहेत त्यामध्ये गुणवत्तेनुसार अग्रभागी असलेला गायी म्हणजे "थारपारकर' गोवंश होय. या गायीला कमी पावसाच्या प्रदेशात सातत्याने येणा-या दुष्काळ सदृश परिस्थितीशी सामना करुन तग धरून राहण्याचे असे निसर्गाचे प्रचंड वरदान लाभलेले आहे.

उत्पत्तिस्थान

या गायीचे मूळ उत्पत्तीस्थान दक्षिण सिंध (सध्या पाकिस्तान) येथील 'थारपारकर' या जिल्ह्यामधील आहे. त्यवरुनच या गायीला "थारपारकर" असे नाव नोदणीकृत झाले. सध्या आपल्या देशामध्ये पाकसीमेजवळील राजस्थानचा भाग; या पश्चिमी भागापासून ते थेट गुजरातमधील कच्छच्या रणापर्यंत हा गोवंश मोठ्या प्रमाणात सांभाळला जातो व विक्रीसाठी उपलब्ध असतो. राजस्थान व गुजराथ मधील गोशाळांमध्ये हा गोवंश अतिशय चांगल्याप्रकारे अभ्यासपूर्वक जोपासला जात आहे.

शारीरिक ठेवण

या गायीचा रंग चंदेरी पांढरा ते करडा (राखाडी) यांमधील विविध छटांमध्ये आढळतो. जन्मत: वासरे संपूर्णपणे करड्या रंगाची असतात परंतु जसे वय वाढत जाते तसा रंग बदलतो व कायमचा निश्चित होतो. सर्वसामान्यपणे या गायीच्या गायी मध्यम बांध्याच्या असतात; शरिराची ठेवण आटोपशीर असते. शिंगे अगदी लहानसर काळी किंवा गुलबट पांढरी असतात, शिंगे बहुतांशी पाळीमागे झुकलेली किंवा जागेवरच कललेली असतात. शिंगाच्या जागची चेह-याची ठेवण दोन्ही आखांचे बाजुला उतरती असते. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये चेह-यावर किंचीत उभा खड्डा असतो. डोळे काळेभोर शांत व वात्सल्यपूर्ण असतात. नाकपुडी संपूर्णपणे काळी फक्त तोंडाच्या जवळ किंचीत गुलाबी असते. कान मध्यम आकाराचे आतून लालसर छोटेसे असतात. मान शरीराच्या मानाने थोडी आखूड असते; माने खालची पोळी (लोळी) आखीव रेखीव असते. गायींमध्ये कास मोठी व गोलाकार कळशी सारखी असते, कास बेंबीपासून सुरु होते, चारही सड (आचळ) गुलाबी रंगाचे व मध्यम आकाराचे असतात. गायींमध्ये छातीकडून कासेकडे येणा-या दूधाच्या शिरा अत्यंत स्पष्ट, मोठ्या व नागमोडी असतात. मागचे चौक प्रमाणबद्ध उताराचे असतात. खूर काळे उंच व टणक असतात. शेपूट पायापर्यंत येणारी असते व शेपूट गोंडा काळा व झुपकेदार असतो.

पूर्ण वाढ झालेल्या बैलांमध्ये मानेच्या अर्ध्यांभागापासून ते वशिंडा पर्यंतचा रंग काळसर गडद छटेचा असतो, चेहरा लांबट निमुळता असतो, नाकपुडी संपूर्णपणे काळी असते, पुढच्या ढोपराच्या जागचे केस काळ्या गडद छटेचे असतात, खुर काळे उंच टणक असतात, मागच्या मांड्या व पुठ्ठे गोलाकार असतात, बैलामध्ये कातडी जरा जाडसर असते व बैल वेसीला किंचीत जड असतात.

पूर्ण वाढ झालेल्या उत्तम तयारीच्या बैलाचे वजन ४७५ ते ५०० कि. ग्रॅ पर्यंत असते तर पूर्ण वाढ झालेल्या व उत्तम गायीचे वजन ३७५ ते ४०० कि. ग्रॅ. पर्यंत असू शकते.

आकारमान लांबी शरीराची उंची छातीजवळील घेर
१. बैल १३५ ते १४५ सें. मी १३० ते १३५ सें.मी. १८० ते १८५ सें. मी.
२. गाय १२५ ते १३० से.मी. १२५ ते १३० सें.मी. १७० ते १७५ सें.मी.

या गायीच्या कालवडींचे प्रथम माजाचे वय ३२ ते ३६ महिन्यांचे दरम्यान असते. प्रथम वेतापासून चौथ्यावेतापर्यंत दुग्धोत्पादनामध्ये सातत्याने लक्षणीय वाढ दिसते. प्रथम वेतामध्ये दिवसाकाठी सर्वसामान्य मेहनतीवर ६ ते ७ लिटर दूध सहज देतात. दोन वेतांमधील अंतर १५ ते २० महिन्यांचे दरम्यान असते तर त्यामधील संपूर्णत: भाकडाकाळ ४ ते ७ महिन्यांचा सहज असू शकतो. दुधाला सरासरी फॅट ४ ते ५ दरम्यान लागते.

स्वातंत्र्यपूर्व काळात या गायीवर संशोधनात्मक कार्य मोठ्या प्रमाणावर चालू होते. सन १९३७ ते १९३८ या काळात कर्नाळ येथे झालेल्या अभ्यासानुसार एका गायीचे एक वेतामधील २८४ दिवसांमधील दूध उत्पादन ४७१९ पौंड भरले होते. या उत्तम गुणवत्तेमुळेच संपूर्ण भारतभर शेती महाविद्यालये, सरकारी फार्म, मिलेटरी डेअरी फार्म यांमध्ये मुळचा गोवंश म्हणून "थारपारकर" या गायीची निवड करण्यात आली होती.

"कांकरेज" गोवंश (गुजरात)

भारतीय गायीमधील प्रथम बघताचक्षणी प्रेमात पडावे असा लोभस गोवंश म्हणजे "कांकरेज गोवंश" होय. ह्या गायीने त्याच्या अंगच्या गुणवत्तेने परदेशीयांना सुद्धा संशोधन करण्यास भाग पाडले आहे. आर्यांनी ज्यावेळी आक्रमण केले त्यावेळी त्यांच्या बरोबर असलेला गोवंश म्हणून ह्या गायीची नोंद आहे. कमी पावसाच्या प्रदेशात निकृष्ट अन्नावर पोषण होऊन देखील उत्तम गुणवत्ता सिद्ध करणे हे या गायीचे प्रमुख वैशिष्टय आहे.

उत्पत्ती स्थान 

आपल्या भारतामध्ये कच्छ च्या रणाच्या दक्षिण भागात म्हणजेच पुर्वेकडील देशापासून ते पश्चिमेकडील राधानूपूर जिल्ह्यापर्यंत हा गोवंश उत्तम पद्धतीने सांभाळला जातो व दरवर्षी उत्तम जनावरे माघ महिन्यापासून चैत्र पौर्णिमे पर्यंत विक्रिसाठी उपलब्ध असतात. बानस आणि सरस्वती या दोन नद्यांचे खो-यामधील भागामध्ये सुद्धा हा गोवंश उत्तम पद्धतीने जोपासला जातो; हा प्रदेश या गायीजे मुळ उगमस्थान आहे. असे जुने जाणकार सांगतात, त्याच प्रमाणे काठेवाड, बरोडा, सुरत या भागात सुद्धा हा गोवंश मोठ्या प्रमाणावर व उत्तम पद्धतीने सांभाळला जात आहे. ह्या गायीला स्थानिक भाषेत वडीहार, वगाड, वगाडीया अशा उपनावांनी देखील संबोधले जाते.

शारीरिक ठेवण

भरदार छाती, सशक्त भक्कम व मोठी शरीरयष्टी जाडसर व सैलसर कातडी, सर्वात महत्त्वाची अत्यंत देखणी चंद्रकोरी प्रमाणे रेखीव व डौलदार शिंगे, रंग सफेद भूरा ते जांभळट कोसा पर्यंतच्या सर्व छटांमध्ये असतो. एकूण शरीराच्या मानाने चेहरा थोडा लहान असतो पण जबडा रुंद असतो. नाकपुडी संपूर्णपणे काळी व किंचीत उचलल्यासारखी दिसते. कान लांबट अरुंद व शेवटला टोक असलेले असतात. शिंगाच्या मुळाशी जाड केसांचे घट्ट आवरण असते, शिंगे बहुंताशी करड्या रंगाची असतात क्वचीत लालसर गुलाबी छटेची आढळतात. जनावर थोराड व लाबरुंद असते त्यामुळे बैलांमध्ये 'पावलावर पाऊल' कधीच पडत नाही, मागचे चौक रुंद व सरळ तसेच कमी उताराचे असतात, शेपुट उंचीला मध्यम असते पण शेपूटगोंडा काळा व मोठा झुपकेदार असतो, वशिंड एकूण शरीराच्या मानाने फार मोठे नसते. गायींच्या मध्ये कास मोठी व घोळदार असते, चारही सड (आचळ) लांबट मोठे समान अंतरावर असतात. गायींमध्ये छातीकडून कासेकडे येणा-या दुधाच्या शिरा अत्यंत स्पष्ट नागमोडी व ठळक असतात. चारही खूप मोठे व घट्ट ठेवणीचे असतात. पुर्ण वाढ झालेल्या जनावरांच्या शरिराची मापे साधारणत: पुढील प्रमाणे आकारमान

शरीराची लाबी उंची छातीजवळील घेर
१. बैल १३० ते १३५ सें.मी १४०ते १४५ सें.मी. १७०ते १८० सें.मी. २. गाय २ २. गाय १२० ते १३० से.मी. १२५ ते १३५ सें.मी. १५० ते १६० सें.मी.

पूर्ण वाढ झालेल्या बैलाचे वजन ५०० ते ५५० कि.ग्रॅ तर गायीचे वजन ३४० ते ३६५ कि.ग्रॅ. पर्यंत असते.

या गायीच्या कालवडीचे प्रथम माजावर येण्याचे वय साधारणत: ३० ते ३६ महिन्यांचे दरम्यान असते. प्रथम वेतामध्ये या गायी दिवसाकाठी सर्वसाधारण मेहनतीवर ६ ते ७ लिटर दूध सहज देतात, सलग २७० ते ३०० दिवस विनातक्रार जेवढे आहे तेवढे दूध देणे ही या गायीची खासीयत आहे. सर्वसाधारणपणे दूधाची फॅट ३.५ ते ४ चे दरम्यान असते. दोन वेतांमधील अंतर १८ ते २२ महिन्यांचे दरम्यान असते तर संपुर्णत: भाकडकाळ ४ ते ६ महिन्यांचा असतो. जन्मत: वासरांचे अंगावर विविध रंगाच्या छटा असतात पण वासरू जसे ६ ते ७ महिन्यांपेक्षा मोठे होऊ लागते तसा मुळ गायीचा रंग येऊ लागतो. ह्या गायीचे बैल वयाची चार वर्षे पुर्ण झाली की शेतीकामास योग्य होतात. बैल लांब पौंडी असल्यामुळे अंतर कमीतकमी श्रमात व झपाट्याने कापतात. बैल ओढ कामात व शेतीकामात अंगची विलक्षण ताकद सिद्ध करुन दाखवतात. या बैलांमध्ये मारकेपरणा क्वचीत आढळतो, ही जनावरे अत्यंत शांत व सुस्वभावी असतात. एका मालकाकडे उत्तम मेहनतीवर ही बैलजोडी २० ते २२ वर्षे सहज काम करते तसेच गायीची ८ ते १० वेणीसहज होतात. या गायीच्या उत्तम बैलजोडीची किंमत ७५ ते ८० हजाराचे दरम्यान असते तर उत्तम गायीची किंमत २५ ते ३५ हजाराचे दरम्यान असते.

आपल्या सरकारने या गायीचे महत्त्व जाणून पोस्टाचे रु. ३/- चे टपालाचे तिकीट काढले आहे.

ब्राझील देशाने हा गोवंश स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्याकडे नेऊन अभ्यासपूर्ण संशोधन करुन उत्तम गुणवत्तेचा परीपूर्ण असा "गुजेरात" नामकरण केलेला गोवंश निर्माण केला. त्याच प्रमाणे अमेरीकेमध्ये सुद्धा या गायीवर विशेष संशोधन झाले आहे.

ह्या गायीबद्दल संशोधनात्मक सरकारी पैदास केंद्रे पुढील ठिकाणी कार्यरत आहेत.
१) भुज, जिल्हा कच्छ, राज्य गुजराथ
२) थारा, जिल्हा बसनकंठा, रा. गुजराथ
३) मांडवी, जिल्हा सुरत, राज्य गुजराथ

"साहिवाल" गोवंश (राज्यस्थान)

आपल्या भारतीय गायीमध्ये सर्वोत्तम दूध देणारा व दुधाची खाण म्हणून परिचीत असलेला गोवंश म्हणजे "साहिवाल" गोवंश होय तीव्र उन्हाळ्यात व विषम हवामानात तग धरुन राहणारा असा गोवंश चांगले गुण पुढच्या पिढीत खात्रीने संक्रमीत करणारा म्हणून देखील या गायीची ओळख आहे.

गायीची उपलब्धता

या गायीचे मुळ उगमस्थान माँटगोमेरी (सध्या पाकीस्तान मध्ये) हे आहे, तेथून हा गोवंश पंजाब राज्यापर्यंत पसरला आहे. भारत पाक सीमेजवळील फिरोजपूर, अमृतसर, हरीयाना, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड तसेच मध्यप्रदेश या राज्यांमधील काही भागात हा गोवंश चांगल्या प्रकारे सांभाळला जात आहे व विक्रिसाठी उपलब्ध असतो.

शारीरिक ठेवण

या गायीचा रंग प्रामुख्याने किंचीत लालसर ते गडद लालसर यामधील विविध छटांमध्ये आढळतो, काही गायींमध्ये लालसर रंगावर पिवळे किंवा पांढरे गोल ठिपके आढळतात. या गायीची शिंगे अगदी लहान मस्तका लगतच मागच्या बाजूस किवा खालच्या बाजूस झुकलेली दंडगोलाकार टोकाला निमुळती असतात. डोळे काळे किवा पिंगट लाल असतात, पापण्याभोवती पांढरी छटा असते. कान चपटे परंतु लांबट असतात. मान अखूड असते प पोळी (लोळी) मोठी व सैलसर कातडीची असते, पाय एकूण शरीराच्या मानाने लहानसर असतात, कूर काळे किंवा गुलाबी लहान असतात. बेंबीची जागा जाणवण्या इतपत स्पष्ट असते, कास (ओटी) पुर्णत: मागच्या पायात न मावणारी, नजरेत भरणारी चौकोनी लांबटगोल असते. छातीकडून कासेकडे येणा-या दुधाच्या शीरा स्पष्ट मोठ्या व नागमोडी असतात. शेपूट लांबलचक असते प गोंडा शेपटीचा झुपकेदार नसतो. गायींच्या अंगावर कधीही चमक नसते.

या गायीचे बैल मध्यम आकाराचे असतात. बैलांचा रंग गायींप्रमाणेच असतो परंतु वशिंड जवळ काळसर गडद छटेचा असतो. कपाळाच्या मध्यभागी जरा केस जाड असतात. नाकपुडी काळी गोलाकार असते. वशिंड मध्यम आकाराचे घट्ट असते. या गायीचे बैल मंद असतात त्यामुळे फक्त पैदाशीसाठी वापरले जातात. शेतीकाम व वाहतुकीसाठी कमी वापरेल जातात. पूर्ण वाढ झालेल्या व उत्तम तयारीच्या बैलाचे वजन ५०० ते ५२५ कि. गॅ. असू शकते तर पूर्ण वाढ झालेल्या व उत्तम तयारीच्या गायीचे वजन ३२० ते ३४५ कि. ग्रॅ पर्यंत असू शकते. शरिराची मापे पुढील प्रमाणे असतात.

आकारमान शरीराची उंची छातीजवळील लांबी घेर
१. बैल १४० ते १६० ते १८०ते १५० सें.मी. १७० से.मी. १९० सें.मी.
२. गाय १२० ते ११५ ते १५५ ते १३० से.मी. १२५ से.मी. १६६ सें.मी.

या गायीच्या कालवडींचे प्रथम माजाचे वय अंदाजे ३० ते ३६ महिन्यांचे दरम्यान असते. प्रथम वेतामधील दुग्धोत्पादन (सर्वात जास्त) २४ तासामधील ८ ते ९ लिटरच्या दरम्यान सहज असते. दोन वेतांमधील ८ ते ९ लिटरच्या दरम्यान सहज असते. दोन वेतांमधील अंतर १८ ते २१ महिन्यांचे दरम्यान असते, तर यामधील संपुर्णत: भाकडकाळ हा ३ ते ५ महिन्यांचे दरम्यान असु शकतो. या गायीच्या गायी स्वभावाने अतिशय शांत असतात, मालकावर जिवापाड प्रेम करतात, सर्वात महत्वाचे म्हणजे दूध काढण्याचे वेळी पान्हा चोरणे, लाथ मारणे, वासरासाठी दुधाचा पान्हा परत सोडणे अशा प्रकारच्या कोणत्याही खोड्या नसतात.

या उत्तम गुणवत्तेमुळे ऑस्ट्रेलीयन सरकारने सन १९५० पर्यंत हा गोवंश त्यांच्याकडे अनेक वेळा सन १९५० पर्यंत हा गोवंश त्यांच्याकडे अनेक वेळा नेला आणि संशोधनात्मक अभ्यास करुन संकरीत दोन आदर्श गोवंश निर्माण केले. आपल्या देशात प्रथमपासून मिलेटरी डेअरी फार्म, सरकारी डेअरी फार्म, शासकीय कृषी महाविद्यालय ह्यांचेकडे मुळचा गोवंश म्हणून उपयोगात आणला आहे. ह्या गायीच्या उत्तम गाजीची किंमत साधारणपणे ३५ ते ४० हजारांचे दरम्यान असते व एका जागी चांगल्या मेहनतीवर एका मालकाकडे १० ते १२ वेणी सहज होतात.

"लाल कंधारी" गोवंश (मराठवाडा)

मराठवाड्यामध्ये सातत्याने पडणा-या दुष्काळात तसेच तीव्र उन्हाळ्यामध्ये सुद्धा तग धरुन राहणारा आणि सर्वसाधारण मेहनतीवर जास्त काळ दूध देणारा तसेच राष्ट्रीय स्तरांवरील पशुप्रदर्शनांमध्ये अग्र मानांकने मिळवणारा गोवंश म्हणून फक्त "लालकंधारी" गायीचीच ओळख आहे. शेतीमधील कामे नेटाने व चपळाईने करणे यासाठी हा गोवंश प्रसिद्ध आहे;

तसेच या बैलांची उभे राहण्याची ढब व चालण्यामधील नजाकत व अंगावरील चमक कोणत्याही शेतक-याला या गायीच्या प्रेमात पाडते.

गायीची उपलब्धता

आपल्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, नांदेड, बिलोली आणि नायगाव या तालुक्यांमध्ये तसेच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, चाकूर, शिरूर अनंतपाळ औसा, उद्गीर आणि बीड जिल्ह्यामधील परळी व हिंगोली या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हौसेने या गायीची पैदास करतात व विक्री देखील करतात.

शारीरिक ठेवण

या गायीच्या गायी मध्यम आकारामानाच्या व आटोपशीर असतात. या गायीचा रंग किंचीत लालसर फिकटसर छटा ते लालसर गडद छटा यांमधील विविध छटांमध्ये असतो. या गायींमध्ये अन्य कोणत्याही रंगाचा ठिपका किंवा पट्टा नसतो. या गायींचे मस्तक कानाच्या वरच्या बाजूला किंचीत आत गेलेले व मध्यभागी फुगीर असते, शिंगे कधीही कोचर नसतात बाहेरच्या बाजूला निघालेली फुगीर काळी किंवा लालसर काळी असतात, कान पसरट आखूड व टोकाला गोलाकार असतात तसेच जमिनीला समांतर असतात. नाकपुडी संपुर्णत: काळी, जबडा चेह-याच्या मानाने किंचीत रुंद असतो, डोळे टपोरे तेजस्वी काळेभोर व अत्यंत बोलके असतात, डोळ्या भोवती काळ्या रंगाचे आकर्षक वर्तुळ असते. पाय शरीराच्या मानाने उंच व भक्कम असतात, खूर काळ्या रंगाचे किंवा गुलाबी रंगाचे परंतु जरा विलग असतात, पाठ सपाट व मागील चौक उताराचे असतात, या गायींची कास आटोपशीर आणि शरीराबाहेर किंचीत दिसणारी असते. चारही सड (आचळ) लहानसर व गुलाबी असतात, बहुतेक गायी व मेणकासी असतात. शेपूट लांबलचक मागच्या नखीपर्यंत पोचणारी असते, शेपूट गोंडा काळा असतो, या बेलांचे वशिंड गडद कालसर छटेचे देखणे व भरदार असते.

पूर्ण वाढ झालेल्या बहलाचे वजन ४०० ते ४५० कि.ग्रॅ पर्यंत तर गायीचे वजन ३०० ते ३५० कि.ग्रॅ. पर्यंत असू शकते.

पूर्ण वाढ झालेल्या गायीची साधारणत: मापे
शरीराची उंची छातीजवळील लांबी घेर
१. बैल ११० ते १२० १५०
२. गाय १३० त १४० १७०

या गायीच्या कालवडींचे प्रथम माजावर कालावधी फक्त ८ ते १० तासांचा असतो त्यामुळे माज लक्षात येताच त्वरीत संकर घडवून आणावा. ऐन दूध देण्याच्या भरामध्ये दिवसाकाठी ४ ते ५ लिटर लूध सहज देतात, परंतु सलग दूध देण्याचा कालावधी १० ते १२ महिन्यापर्यंतचा आहे. नवजात वारसाचे वजन १२ ते १५ कि.ग्रॅ. असते पण या वासरांचा वाढीचा वेग विलक्षण असतो. दुधातील स्निग्धतेचे प्रमाण ३.५० ते ४.०० पर्यंत असते. दोन वेतांमधील अंतर १८ ते २० महिन्यापर्यंत असते व संपूर्णत: भाकड कालावधी १२० ते १८० दिवसापर्यंत असू शकतो.

या जातीचे बैल ओढकाम, शेतीकाम व शर्यतीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. खिलारी गायी खालोखाल या बैलांमध्ये चपळाई असते. या गायी एकाजागी चांगल्या पद्धतीने सांभाळल्यावर १० ते १२ वेणी सहज देतात तसेच १८ ते २० वर्षे बैल उत्तम पद्धतीने काम करतात ह्या गायींमध्ये मारेकपण सहसा नसतो. आपल्या मराठवाड्यातील मु.पो. मावलगाव येथील प्रगतीशील शेतकरी व निष्ठावान गोसेवक श्री. शरद पाटील ह्यांना ह्या गायीचे संवरधना बद्दल केंद्र शासनाचा "बाबू जगजीवन राम किसान" पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ह्या जातीच्या उत्तम बैलजोडीची किंमत रु. १.५० लाखापर्यंत तर उत्तम गायीची किंमत ३५ ते ४० हजारापर्यंत आहे.

कंधारी बैलजोडी दारात असणे ही मराठवाड्यामधील शेतक-याचे दृष्टीने भूषणाची गोष्ट आहे.

"अमृतमहल" गोवंश (म्हैसूर)

आपल्या भारतीय गायीपैकी ज्या गायीचे ब्रिटीश सत्तेला सुद्धा मोहीत केले व संशोधनात्मक कार्यास भाग पाहले, असा अंगामध्ये प्रचड ताकद, विलक्षण चपळाई व कामामध्ये कमालीचे सातत्य असा त्रिवेरी गुणांचा संगम असलेला गोवंश म्हणजे "अमृतामहल" गोवंश होय.

या गायीचे मुळ उत्पत्तीस्थान स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हैसूर संस्थान हे आहे. टिपू सुलतानाचे या गायीवर अपरंपार प्रेम होते, त्यांचे पदरी आदर्श अमृतमहल गोवंश अत्यंत प्रयत्नपूर्वक विकसीत केलेला होता. सन. १८६६ मध्ये ब्रिटीशांच्या नोंदी २१/२ दिवसांमध्ये १०० मैल अंतर वाहून नेल्याची विक्रमी नोंद दप्तरी आहे. त्याकाळात "मिलेटरी बैल' म्हणून या बैलांची ओळख परिचीत होती कारण सैन्याच्या तोफा वाहून नेणे, आरमाराचे अवजड सामान अडचणीचे जागी वाहून नेणे, लांबपल्याची वाहतूक कमीतकमी वेळात करणे. इ. कामे हे बैल करत असत.

गायीची उपलब्धता

सध्या कर्नाटक राज्यामधील हसन, चिकमंगळूर, चित्रदुर्ग, तुमकर या प्रदेशामध्ये शेतकरी फक्त बैलांची निर्मिती ह्याच हेतूने मोठ्या प्रमाणावर गोवंश सांभाळतात. शारीरिक ठेवण या गायीचे संपूर्णत: पांढरा ते संपूर्णत: काळसर छटा यामधील अनेक छटा आढळतात. ज्या गायीचा रंग काळा किंवा काळसर छटेचा आहे. त्यांचा रगं उतार वयात फिका होत जातो. पण रंगामध्ये छटा विविध असल्या तरीही रंगाचे मिश्रण कधीही नसते. संपूर्ण जनावर एक रंगीच असते. या जनावरांची शिंगे उगमस्थानी अगदी लगत असून पुढे जनावरांची शिंगे उगमस्थानी अगदी लगत असून पुढे सरळ किंवा कोचर होतात, शिंगे कधीही जाडी नसतात, रंगाने काळी किंवा पांढरट गुलाबी रंगाची असतात. डोळे लांबट संपूर्णपणे काळे व कायम रोखलेले असतात, या जनावरांच्या मनाविरुद्ध जरा वर्तन झाले की डोळे लगेच इंगळी सारखे लाल करतात. कान लहानसर लांबट शेवटला टोकदार व आतील बाजूने पिवळसर असतात, कानांची ठेवण कायम टक्करालेली व जमिनीला संमातर असते. चेहरा लांबट निमुळता व आकर्षक असतो, नाकपुडी काळी व लहानसर असते आणि चेह-याला अत्यंत शोभणारी असते. मानेखालची पोळी (लोळी) लहानसर व घट्ट असते, मान लांबरुंद असते, ही जनावरे उंचनिंच व लांबडी असतात. खूर बहुतांशी काळे उंच व सलग असतात. पाय उंच व सरळ असतात, वशिड एकदम घट्ट व भरीव असते. कातडी शरिराशी एकदम घट्ट व पातळ असते. अंगावर एक प्रकारची विलक्षण चमक असते. या जनावरांमध्ये बेंबी कधीही दिसत नाही इतपत पोटाला घट्ट चिकटून असते. गायींमध्ये कास कधीही बाहेरुन दिसत नाही, चारही सड (आचळ) लहानसर व एकमेकांचे अगदी लगत असतात. गायींमध्ये छातीकडून कासेकडे येणा-या दुधाच्या शिरा लहान व सरळ आणि अस्पष्ट असतात. या गायीतील बैलांचे मागचे चौक अगदी साचेबंद रेखीव उताराचे असतात. शेपूट लांबलचक असते, शेपूट गोंडा काळा व झुपकेदार असतो.

या जातीचे बैल एकहाती जास्त होतात. त्यांना चार माणसांची सवय करणे अत्यंत गरजेचे आहे. हया बैलांचा विश्वास येण्यास बराच कालावधी लागतो पण एकदा खात्री झाली की विश्वासघात कमी होतो. अत्यंत तापट स्वभावाचे असतात.

या गायीतील कालवडींचे प्रथम माजावर येण्याचे वय ३६ ते ४२ महिन्यापर्यंत असते. गायींमध्ये पहिल्या पाच वेतांमध्ये सलग दुग्धोत्पादन वाढीव असते. व्यायल्यानंतर दुधाच्या ऐनभरामध्ये दिवसाकाठी ४ लिटस पर्यंत दूध सहज देतात. वासरु गायी बरोबर मोकळे ठेवल्यास दोनदोन तासांनी सुद्धा संपूर्णपणे पान्हावून वासरांना दूध पाजतात. या जातीच्या खोंडाना वयाची ३ वर्षे पूर्ण झाली की हळूहळू शेतीची कामे शिकवण्यास व कायम थोडाथोडा वेळ धरण्यास सुरुवात करावे, खोंड दाती जुळवा की लगेच रक्त्यीकरण करावे म्हणजे अंगाने चांगला भरतो. या गायींचे दोन वेतांमधील अंतर १८ ते २४ महिन्यांचे असते तर त्यामधील संपूर्णत: भाकडकाळ ६ ते ९ महिन्यांचे दरम्यान असतो.

पूर्ण वाढ झालेल्या जनावरांची मापे सर्वसाधारपणे पुढीलप्रमाणे असतात.

शरीराची लांबी उंची तीजवळील घेर
१.  बैल १३० ते १३५ ते १८० ते १४० सें.मी १४० सें.मी १९० सें.मी.
२.  गाय ११० ते ११५ ते १४४ ते १२० सें.मी १२० सें.मी. १५० सें.मी.
पूर्ण वाढ झालेल्या बैलाचे वजन ४०० ते ४२५ कि.ग्रॅ. तर गायीचे वजन २७५ ते ३०० कि.ग्रॅ. असते.

हा गोवंश शेती व शर्यतीचे बैल म्हणून प्रामुख्याने उपयोगी असल्याने खोंडाना लहानपणापासून विशेष काळजीने वाढविले जाते. उत्तम अशा एका खोंडाची किंमत ५० हजारापासून १ लाखापर्यंत असते तर उत्तम गायीची किंमत ४० हजारापर्यंत सहज असते.

माहिती संकलन : छाया निक्रड

माहिती संदर्भ : गोदान.इन

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate