অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रोगनिदानासाठी करा रक्त परीक्षण

रक्त हे जसे जगण्यासाठी आवश्‍यक आहे, तसेच ते आजारांच्या निदानासाठीसुद्धा महत्त्वाचे आहे. रक्त तपासणीद्वारे जनावरास होणाऱ्या विविध प्रकारच्या आजारांचे अचूक निदान होते. त्यानंतर योग्य औषधोपचार करता येतात.
जनावरांच्यामध्ये सडकून ताप येणे, लाल लघवी होणे, गरगर फिरणे, धडका मारणे, अशक्तपणा वाढणे, ऍनिमियासारखी लक्षणे दाखवताच पशुवैद्यकाच्या सल्ल्याने ताबडतोब रक्तपरीक्षण करून घ्यावे.

रक्त तपासणीचे फायदे


1) रक्त हे शरीरात घडणाऱ्या विविध शरीरक्रियांचे किंबहुना संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब असते.
2) रक्त तपासणीद्वारे आरोग्यविषयक महत्त्वाची माहिती मिळते.
3) विविध तपासण्यांद्वारे जनावरास होणाऱ्या विविध प्रकारच्या आजारांचे अचूक निदान होऊन योग्य औषधोपचार करता येतो.
4) विविध तपासण्यांच्या अनुमानावरून जनावरांना द्यावयाच्या संतुलित आहाराचे नियोजनदेखील करता येते.
5) मोठ्या शस्त्रक्रियेपूर्वी संपूर्ण रक्त तपासणी अत्यावश्‍यक असते. कारण जनावर शस्त्रक्रियेस योग्य आहे किंवा नाही हे रक्त तपासणीनंतरच निश्‍चित केले जाते.

रक्त तपासणीमधील महत्त्वाचे घटक

1) हिमोग्लोबीन (Hb)
2) पेशी घनता (PCV)
3) लाल रक्त पेशींची संख्या (TEC)
4) पांढऱ्या रक्त पेशींची संख्या (TLC)
5) वेगवेगळ्या पांढऱ्या पेशींचे प्रमाण (DLC)
6) रक्त काचपट्टीका तपासणी
7) इ.एस.आर. (ESR)
8) रक्तजलाचे रासायनिक पृथःकरण करून त्यामधील शर्करा, प्रथिने, कोलेस्टेरॉल, युरिया नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, झिंक, कॉपर, इत्यादी महत्त्वाच्या घटकांचे प्रमाण तपासले जाते.

रक्त तपासणीवरून आजारांचे अचूक निदान

पंडुरोगाचे निदान

1) हिमोग्लोबीन, पेशी घनता तसेच लाल रक्तपेशींची संख्या, इत्यादीच्या तपासणीद्वारे पंडुरोगाचे (ऍनिमिया) निदान करता येते.
2) जनावरांमध्ये प्रामुख्याने पोट व आतड्याचा संसर्ग, आतड्यांतील तसेच बाह्यपरजीवींचा संसर्ग, अन्नद्रव्ये व खनिजद्रव्यांची कमतरता, आदिजीवजन्य आजार तसेच काही जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगांमुळे पंडुरोग होतो.
3) रक्त तपासणीद्वारे पंडुरोगाचे निदान होताच वरील महत्त्वाच्या कारणांचे प्रयोगशाळेतून अचूक निदान करावे.

रक्त काचपट्टीका तपासणीतून रोग निदान

1) रक्त काचपट्टीका तपासणीतून थायलेरीओसीस, बबेसिओसीस सारख्या गोचीड तापाचे निदान करता येते.
2) ट्रीपॅनोसोमोसीस, हिपॅटोझोनोसीससारख्या आदी जीवजन्य रोगांचे निदान करता येते.
3) ऍनाप्लासमोसीस आणि अहरलिचीओसीससारख्या रिकेटशियल रोगांचे अचूक निदान करण्यामध्ये रक्त काचपट्टी तपासणी महत्त्वाची आहे.
4) घटसर्प, फाशी हेदेखील रक्‍त काचपट्टी तपासणी करून ओळखता येतात.

पांढऱ्या पेशींच्या प्रमाणावरून रोग निदान

1) रक्तातील विविध प्रकारच्या पांढऱ्या पेशींच्या प्रमाणावरून जनावरास होणारे आजार हे तीव्र किंवा जुनाट स्वरूपाचे आहेत हे समजते.
2) आजार जीवाणूजन्य, विषाणूजन्य किंवा परजिवीजन्य आहे हे कळण्यास मदत होते.
ड) रक्ततपासणीद्वारे ब्लड कॅन्सर (ल्युकेमिया) सारख्या कर्करोगाचे अचूक निदान करता येते.
इ) रक्त जल परीक्षणाद्वारे अन्नद्रव्य तसेच खनिजद्रव्यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या मिल्क फिवर, ग्रास टिटॅनी, पोस्ट पाश्‍चुरंट हिमोग्लोबीन्युरीया, इत्यादी आजारांचे निदान करता येते.

संपर्क : डॉ. धायगुडे

9860534482
(लेखक मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे कार्यरत आहेत)

संदर्भ: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate