Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 20:31:30.662361 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / शास्त्रीय संगोपनातून लालकंधारीचा होतोय विकास
शेअर करा

T3 2019/10/17 20:31:30.668994 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 20:31:30.701133 GMT+0530

शास्त्रीय संगोपनातून लालकंधारीचा होतोय विकास

विदेशी गोवंशाला लाजवेल अशा स्वरूपात काही गोपालक अथक प्रयत्नातून लालकंधारी आणि देवणी हे उत्कृष्ट गोधन सांभाळत आहेत.

देशी गोवंशाची महती सांगण्यापेक्षा अनुभवण्यात जास्त आनंद असतो. राज्यात देशी गोवंशाची "खाण' म्हणून लातूर जिल्हा ओळखला जातो. विदेशी गोवंशाला लाजवेल अशा स्वरूपात काही गोपालक अथक प्रयत्नातून लालकंधारी आणि देवणी हे उत्कृष्ट गोधन सांभाळत आहेत. यामध्ये वयाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच गर्भधारणा सुरू केलेल्या "लालकंधारी' कालवडीविषयी लातूर जिल्ह्यातील पशुपालकांचे अनुभव सर्वांना मार्गदर्शक ठरणारे आहेत.

बांधावरची कालवड किंवा रेडी कधी माजावर येणार याची माहिती नसणाऱ्या पशुपालकांना आणि त्यांच्या सान्निध्यातील पशुप्रेमींना होल्स्टिन आणि जर्सी जातीबद्दल आकर्षण असणे हे स्वाभाविक आहे. उत्कृष्ट आणि शास्त्रीय व्यवस्थापनासाठी पशुसांभाळ असं उद्दिष्ट समोर असणारे पशुपालक दूध, वेत यांचा हिशेब मांडत नाहीत, कारण त्या मिळणाऱ्याच गोष्टी आहेत. परंतु मिळकत ही बाब चांगल्या व्यवस्थापनात दडली आहे.

हे लक्षात घेता निरोगी पशुवंश, ताणमुक्त, स्वच्छंद आणि सुदृढ तेवढं उत्पन्न अधिक अशी धारणा विदेशातील पशुपालकांनी आपल्या मनात घट्ट रुजविली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र काळाच्या गरजा आणि पशुधनाबाबतचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून लातूर जिल्ह्यातील अनेक पशुपालक गोवंश व्यवस्थापनातील बारकावे समजावून घेताना दिसताहेत. या पशुपालकांनी कालवडींच्या शास्त्रीय व्यवस्थापनातून "वर्षभरात गर्भधारणा' हाच नियम अवलंबला आहे. या भागातील पशुपालकांकडे लाल कंधारी शुद्ध वंशाच्या चांगल्या कालवडी तयार झाल्या आहेत.

जन्मलेल्या वासरात दिवसाला 500 ग्रॅम वजनवाढ हे प्रमाण विदेशी गोवंशात सांगितले जाते. अशा सरासरी शरीर वजन वाढीची स्पर्धा यशस्वीपणे पार करत शरीर उंची, शरीर वजनवाढ आणि लवकर गर्भधारणेचा टप्पा ओलांडण्याचे शास्त्र लालकंधारी पशुपालकांनी अवगत केले आहे. कालवडींचे पहिले दोन माज रेतनासाठी योग्य नसतात म्हणजे किमान दोन अडीच महिन्यांचा माजचक्र टप्पा सोडला तरी अवघ्या नऊ ते साडेनऊ महिन्यांत 250 किलो शरीर वजन गाठणाऱ्या लालकंधारी कालवडी म्हणजे "बावनखणी शुद्ध लाल सोनं' म्हणावे लागेल.

जातिवंत गोवंशाची जोपासना

लातूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत केवळ कालवडीच नव्हे तर उत्तम पैदाशीसाठीचे गोऱ्हे वाढवून सिद्ध वळू पशुपालकांच्या गोठ्यात तयार होत आहे. वर्षभरात 300 किलो शरीर वजनाचा उत्कृष्ट गोऱ्हा पशुपालकांच्या गोठ्यात आता पाहायला मिळतो. बालाघाटच्या कोरडवाहू शेतीपट्ट्यातील पशुपालक लालकंधारी जनावरांची शुद्धपैदास करीत आहेत. या भागात लालकंधारी आणि देवणी अशा दोन्ही गोवंशाच्या सुधारणेची चळवळ सुरू झाली आहे.

देशी पशुवंशसुद्धा विदेशी पशुवंशाइतकाच क्षमतावान आहे. हे "वर्षभरात गर्भधारणा' या उदाहरणातून सिद्ध होते. जगातील सर्वांत उत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या होल्स्टिन जातीच्या कालवडी प्रथम माजावर येण्याचे वय सरासरीने नऊ-दहा महिने या प्रमाणात वाढविल्या जातात, त्यांची बरोबरी राज्यातील कुणकी (जि. लातूर) येथील देवणी गोवंशाच्या कालवडी करीत आहेत. त्याच्या जोडीला आता लालकंधारी गोवंश सांभाळणारे पशुपालकही आले आहेत.

व्यवस्थापनातून समृद्धी

"वासरे संगोपनाचा प्रकल्प' राबविताना अनेक दूध संघांना येणारे अडथळे लक्षात घेता "लालकंधारी' कालवडीचे योग्य व्यवस्थापन पशुपालकांनी केले आहे. भरपूर चीक आणि दूध कालवडी - गोऱ्हांना मिळालेच पाहिजे, हा पहिला नियम त्यांनी पाळला आहे. त्याचबरोबरीने दर पंधरवड्याला शरीर वजनाच्या नोंदी, वजनवाढीचा आढावा आणि पुढील नियोजन हा दुसरा नियम पशुपालकांनी पाळला आहे. "संपूर्ण आरोग्य' हा तिसरा महत्त्वाचा नियम वाढीच्या वासरांना रोगमुक्त आणि सुदृढ प्रकृतीसाठी पूरक ठरला आहे. "सेंद्रिय पद्धतीने' वासरांचे संगोपन याच तत्त्वावर कोणतेही शरीर वजन वाढप्रेरक औषधी न वापरता "लालकंधारी' प्रजननक्षम पिढी गोठ्यातच तयार होत आहे.

...असे ठेवले कालवडींचे व्यवस्थापन

पशुविज्ञानाच्या आधारातून पहिला माज म्हणजे जनावरांच्या प्रजननाची सुरवात शरीर वजन आणि वय या दोन्ही बाबीवर अवलंबून असते. मात्र पशुजातीवर पहिल्या माजाचे निकष बदलत असतात, अशी पळवाट काढून देशी जनावरात पहिल्या माजाचे वय थोडे उशिराच सांगण्याचा खटाटोप केला जाते; मात्र जो सांभाळ होल्स्टिन कालवडींना मिळाला तसाच तो लालकंधारी असो वा देवणीस मिळाल्यास प्रजननाचे नियम बदलले जात नाहीत, हेच सत्य लालकंधारी पशुपालकांनी आपल्या दारात अन्‌ गोठ्यात सिद्ध केले आहे.

महत्त्वाची बाब अशी, की उशिरा वयात येणारी, अल्प वेत देणारी आणि वंध्यत्व असणारी दुर्लक्षित जनावरे म्हणजे पशुपालकासह पर्यावरणास भार असतात. आधीच कमतरता असणाऱ्या चारा, पाणी, पशुखाद्य, मजूरबळ आणि पशुवैद्यक सेवा यांना होणारा भार टाळण्यासाठी अधिक संख्येने असणारी, सांभाळली जाणारी किंवा "शेणासाठी सांभाळतोय' म्हणून बांधावर चारली जाणारी पशुधन संख्या तत्काळ कमी होणे गरजेचे आहे. या दृष्टीने कमी संख्येची मात्र सर्वोत्कृष्ट व्यवस्थापनाची महती प्रत्येक पशुपालकाला सहज पटू शकेल अशी किमया लातूर जिल्ह्याच्या पशुपालकांनी करून दाखवली आहे.

लवकरच वयास गाभण ठरणाऱ्या कालवडी, वगारींना कोणताही धोका अपेक्षित नसतो. अशा जनावरात पुढे तीन वेतापर्यंत शरीरवाढ सुरूच असते. शरीर वजन वाढ आणि दूध उत्पादनावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. कटीचा भाग लहान असल्याने किंवा मोठ्या शरीरयष्टीचा वळू वापरल्याने प्रसूती अवघड होण्याची मोठी अवास्तव भीती पशुपालकांमध्ये आहे. जन्मणारे वासरू मातेच्या शरीरावर स्वतःचे जन्मतेवेळेचे शरीर वजन ठरवत असते म्हणून कष्टप्रसूतीची शक्‍यता चुकीची ठरते.

यातून असे लक्षात येते, की "वर्षभरात गर्भधारणेचा' वसा प्रत्येक देशी गोवंशाच्या पशुपालकांनी लालकंधारी पॅटर्नकडून स्वीकारल्यास राज्याला दुग्धसमृद्धी आणि शाश्‍वत पशुपालनाचे स्वप्न समृद्ध करता येईल. यातूनच देशी गोवंश संवर्धन आणि विकासाची चळवळ शास्त्रीय पद्धतीने नियोजनातून पुढे जाऊ शकेल. 
संपर्क - डॉ. मार्कंडेय, 9422657251

अनुभवाचे बोल ...

मावलगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील लालकंधारी गोवंश जपणारे पशुपालक शरद पाटील म्हणाले, की आमच्याकडील शेती ही कोरडवाहू. त्यामुळे पशुपालनावरच आमचा भर आहे. लालकंधारी जनावरांची जोपासना आम्ही शास्त्रीय पद्धतीने करीत आहोत. आमचा भगवान बलराम स्वयंसहायता गट आहे. लालकंधारी गोवंश सांभाळणाऱ्या पशुपालकांचे आम्ही सर्वेक्षण केले. डॉ. सरदेशपांडे, डॉ. मार्कंडेय या पशुतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन लालकंधारी जनावरांची जोपासना वाढविली. यामध्ये आम्हाला असे दिसून आले, की वयाला एक वर्ष पूर्ण होण्याअगोदर काही कालवडींमध्ये गर्भधारणा होऊ शकते. याचे शास्त्रीय आधार तपासले. आम्ही कालवडींना जास्तीत जास्त चीक आणि दूध देतो, तसेच त्याच्या शरीरवाढीसाठी पोषक आहारही देतो. त्यामुळे त्यांची वाढ चांगली होते. आमच्याकडील कालवड 19 महिने आणि नऊ दिवसाला व्यायली. चांगले व्यवस्थापन असेल तर हमखास 15 वेत लालकंधारी गाईकडून मिळतात. तसेच दुधाचेही चांगले उत्पन्न मिळते. आज एक वर्षाच्या गोऱ्ह्याची किंमत 40 हजारांच्या पुढे आणि कालवडीची 25 हजारांच्या पुढेच आहे. यामुळे पशुपालकांना लालकंधारीमधून उत्पन्नाचा चांगला स्रोत मिळाला आहे. 
शरद पाटील - 9423350747

लातूर जिल्ह्यातील लालकंधारी गोवंश जपणारी गावे

कुणकी (ता. जळकोट), मावलगाव (ता. अहमदपूर), हडळगुळी (ता. उदगीर), शिरूरताजबंद (ता. शिरूर), हडोळती (ता. अहमदपूर), वांजरवाडा (ता. जळकोट), अंधोरी (ता. अहमदपूर), जगळपूर (ता. जळकोट), हिप्पळगाव (ता. जळकोट)

लातूर जिल्ह्यातील लालकंधारी सांभाळणारे पशुपालक

सूर्यकांत केंद्रे, तुकाराम सूर्यवंशी, उत्तम पाटील, बळिराम भस्मपुरे, प्रमोद कासले, धोंडिराम स्वामी, वसंत पाटील, पपन पवार, सुभाष भदाडे, आकाश मगर, बालाजी तिडके
लवकर वयात येणाऱ्या कालवडींचे गुण

 1. जन्मतेवेळचे वजन सर्वाधिक
 2. वजनवाढीचा वेग सर्वाधिक
 3. सुदृढ व निरोगी आरोग्य
 4. उच्च प्रजननक्षमतेची शक्‍यता
 5. सर्वाधिक वेतांची संख्या शक्‍य
 6. आर्थिकदृष्टीने चांगला फायदा

लालकंधारीची गुणवैशिष्ट्ये

 1. काटक, कोरडवाहू शेतीकामास योग्य
 2. बाह्यपरजीवींचा प्रादुर्भाव होत नाही
 3. दिमाखदार बांधा
 4. वाहतूक व वहनक्षमतेस पूरक
 5. माफक दुग्धोत्पादन
 6. पर्यावरणपूरक, सांभाळण्यास सोपी जात

स्त्रोत: अग्रोवन

2.87719298246
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 20:31:30.952660 GMT+0530

T24 2019/10/17 20:31:30.959103 GMT+0530
Back to top

T12019/10/17 20:31:30.550627 GMT+0530

T612019/10/17 20:31:30.576386 GMT+0530

T622019/10/17 20:31:30.647770 GMT+0530

T632019/10/17 20:31:30.648770 GMT+0530