Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 14:50:26.347936 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / गुरे पालन / सदोष चाऱ्यामुळे होतात चयापचयाचे आजार
शेअर करा

T3 2019/10/18 14:50:26.354465 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 14:50:26.455385 GMT+0530

सदोष चाऱ्यामुळे होतात चयापचयाचे आजार

सदोष चारा व्यवस्थापनामुळे जनावरांमध्ये चयापचयाचे आजार दिसून येतात. त्याचा जनावरांच्या दूधउत्पादनावर विपरीत परिणाम होतो. योग्य चारा व्यवस्थापन ठेवल्यास आजार आपण टाळू शकतो.

सदोष चारा व्यवस्थापनामुळे जनावरांमध्ये चयापचयाचे आजार दिसून येतात. त्याचा जनावरांच्या दूधउत्पादनावर विपरीत परिणाम होतो. योग्य चारा व्यवस्थापन ठेवल्यास आजार आपण टाळू शकतो. आजाराची लक्षणे ओळखून पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात.

दुधी ताप

 1. गायी, मेंढ्या, तसेच कधी तरी शेळ्यांमध्ये रक्तातील कॅल्शिअम व फॉस्फरस या क्षारांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो.
 2. कॅल्शिअम व फॉस्फरस या क्षारांच्या कमतरतेमुळे रक्तातील मॅग्नेशियमच्या प्रमाणात तुलनात्मक वाढ होते. हा आजार कॅल्शिअमच्या अतिरेकीमुळेच होतो.
 3. अधिक दूध उत्पादन असणाऱ्या गायींमध्ये सातत्याने हा आजार आढळून येतो. गाय व्यायल्यानंतर 2 ते 3 दिवसांत हा आजार आढळून येतो.

लक्षणे

 1. या आजारामध्ये स्नायूंच्या हालचाली मंदावतात. शरीराचे तापमान साधारण असते. पण काही वेळेस नेहमीपेक्षा कमी होते.
 2. जनावर सुस्त दिसते, गाय मान आडवी करून बसते, रवंथ करत नाही.

उपचार

रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढविण्यासाठी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

प्रतिबंध

 1. जनावरांच्या आहारात कॅल्शिअम व फॉस्फरसचे प्रमाण 2ः3ः1 असे ठेवावे. म्हणजेच आहारात एकूण 0.5 ते 0.7 टक्के कॅल्शिअम व 0.3 ते 0.4 टक्के फॉस्फरसचे प्रमाण असावे.
 2. गाय व्यायण्यापूर्वी पाच दिवस आधी ते व्यायल्यानंतर साधारणतः दोन दिवसांनंतर आहारात 20 दशलक्ष युनिट, जीवनसत्त्व "ड' प्रतिगाय प्रतिदिवस मात्रा द्यावी.
 3. गायींना कॅल्शिअम कमतरता असलेले खाद्य गाय व्यायण्यापूर्वी दोन आठवडे द्यावे. जेणेकरून हाडातील कॅल्शिअमचे वहन रक्ताकडे होण्याची प्रक्रिया सुरू होऊन हा आजार टाळता येतो.

ऍसिडोसिस

 1. आहारातील खुराकाचे अतिरिक्त प्रमाण, आहारातील अचानक केलेले बदल, चाऱ्याचे प्रमाण कमी करून खुराकाचे अचानक वाढविलेले प्रमाण यामुळे कोठीपोटातील लॅक्‍टिक ऍसिड तयार करणाऱ्या जिवाणूंची वेगाने वाढ होऊन पोटातील लॅक्‍टिक ऍसिडचे प्रमाण वाढते. त्यामुळे ऍसिडोसिस हा आजार होतो.
 2. गायींच्या आहारात धान्याच्या भरड्याचा अतिरिक्त वापर यामुळे लॅक्‍टिक ऍसिडच्या प्रमाणात वाढ होऊन हा आजार होतो.
 3. कोठीपोटामध्ये असणारे जिवाणू हे अतिरिक्त खुराकातील स्टार्च हे अन्नद्रव्य खातात. मोठ्या प्रमाणावर लॅक्‍टिक ऍसिड तयार होते.
 4. प्रोटोझोआ हे स्टार्चचे रूपांतर ऍसिटिक ऍसिड व ब्युटिरिक ऍसिडमध्ये रूपांतरित करतात. लॅक्‍टिक ऍसिड तयार होण्याचे प्रमाण अधिक असते. परंतु कोठीपोटामध्ये लॅक्‍टिक ऍसिड धीम्यागतीने शोषले जाते. यामुळे कोठीपोटामध्ये अतिरिक्त लॅक्‍टिक ऍसिड तयार होते.

लक्षणे

 1. मोठ्या प्रमाणात ऍसिडॉसिस झाल्यास कोठीपोटाची हालचाल मंदावते.
 2. श्‍वासोच्छवास व नाडीचा वेग वाढतो. तापमानात चढ-उतार दिसून येतात. यामुळे अवयवांचे दौर्बल्य येऊन गायींना चक्कर येते. गाय कोमात जाऊन शेवटी दगावण्याची शक्‍यता असते.

प्रतिबंध

 1. आहारात होणारे अचानक बदल टाळावेत. आहारातील अनियमितता टाळावी.
 2. खुराक व चारा एकत्रित करून द्यावा.
 3. मोठ्या प्रमाणावर धान्याचा व खुराकाचा वापर टाळावा.

पोटफुगी

 1. द्विदल वर्गातील चारा पिके लसूणघास, बरसीम इत्यादी अतिरिक्त व मोठ्या प्रमाणावर खाऊ घातल्यास पोटफुगी हा आजार होतो.
 2. द्विदलवर्गीय चारापिकांत विद्राव्य प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. कोठीपोटातील जिवाणू त्यांचे विविध वायू निर्माण करतात.
 3. ज्या आहारात खुराकाचे प्रमाण जास्त आहे, त्याचे चिकट पदार्थ तयार होऊन फेस तयार होतो. त्यामुळे पोट फुगण्यास सुरवात होते.
 4. चाऱ्यातील सॅपोनिनसारखे व लाळेतील प्रथिने यापासूनदेखील फेस मोठ्या प्रमाणावर तयार होतो. परंतु सोयाबीन व वाटाणा यापासून फेस होत नाही.

लक्षणे

 1. कोठीपोटातील वायूचा दाब मोठ्या प्रमाणावर वाढून जनावर जमिनीवर पडते. डाव्या बाजूने माकड हाडाजवळ पोट बाहेर येते.
 2. जनावर चारा खाणे बंद करते. छातीवर दाब येऊन श्‍वसनास त्रास होऊ लागतो. रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होऊन जीभ निळी पडू लागते. यानंतर जनावराचा तडफडून मृत्यू होतो.

प्रतिबंध

 1. अतिप्रमाणात द्विदलवर्गीय चारा पिकांचा गाईच्या आहारातील वापर टाळावा.
 2. पाणी व मीठ पाजल्यास गाईस आराम मिळू शकेल.

उपचार

पोटफुगी झालेल्या गाईस तातडीने पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

चारा व्यवस्थापन

 • युरिया मोलासेस विटेमध्ये रूमेनसीनसारखी औषधे आहेत. त्याचा वापर आहारात केल्यास पोटफुगी टाळता येईल.
 • उपाशीपोटी जनावरांना हिरवा लुसलुशीत लसूणघास खाऊ घालू नये.
 • आधी वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी खाऊ घालावी. त्यानंतर लसूणघास द्यावा.
 • फुलोऱ्यात येण्याआधी लसूणघास खायला घालू नये.
 • जनावर फुगल्यास 20 मि.लि. तज्ज्ञांशी शिफारस केलेले टर्पेंटाईन तेल, 5 ग्रॅम हिंग, 5 ग्रॅम सुंठ, 5 ग्रॅम लसूण, 5 ग्रॅम ओवा, 5 ग्रॅम काळे मीठ एक लिटर गोडेतेलात मिसळून पाजावी किंवा तज्ज्ञांनी शिफारस केलेले टर्पेंटाईन तेल 20 मि.लि. एक लिटर दुधातून पाजावे.
 • तज्ज्ञांच्या सल्ल्याने 1 लिटर गोडेतेल, 1 लिटर पाणी व 20 ग्रॅम खाण्याचा सोडा एकत्र मिसळून जनावरांना पाजावे.

नायट्रेट्‌सची विषबाधा

 1. ज्या चारा पिकांच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर नत्रयुक्त खतांचा वापर केला जातो, अशा चाऱ्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त असते.
 2. ज्या ठिकाणी चारा पिकाच्या वाढीस पाण्याची कमतरता आहे किंवा दुष्काळी परिस्थिती आहे, अशा चारा पिकांना नायट्रेटचे प्रमाण जास्त असते.
 3. अतिरिक्त नायट्रेट खाण्यात आल्यास कोठीपोटातील जिवाणू नायट्रेटचे रूपांतर नायट्राईटमध्ये करतात. पुढे नायट्राईटचे रूपांतर अमोनिया वायूत होऊन जनावरांना विषबाधा होते.
 4. नायट्राईट व अमोनिया वायू रक्तात शोषला जाऊन रक्तातील हिमोग्लोबिनसोबत संयोग पावतो. त्यातून मेटहिमोग्लोबिन तयार होते. लाल रंगाचे रक्त गडद तपकिरी रंगाचे होते. त्यामुळे ते ऑक्‍सिजन वाहण्याची क्षमता गमावून बसते.
 5. रक्तातील 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक हिमोग्लोबिनचे रूपांतर मेटहिमोग्लोबिनमध्ये झाल्यास जनावर ऑक्‍सिजन (प्राणवायू) अभावी दगावते. मेंढीमध्ये दोन ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट, 60 टक्के हिमोग्लोबिनचे मेटहिमोग्लोबिनमध्ये रूपांतर करण्यास पुरेसे आहे.
 6. गायींना पुरेशा प्रमाणात खुराक दिल्यास नायट्रेट विषबाधा सहन करण्याची क्षमता चांगल्या प्रमाणात असते.

लक्षणे

 1. नायट्रेट विषबाधा झाल्यास नाडीचा वेग वाढतो. श्‍वासोच्छवास वेगाने होण्यास सुरवात होते.
 2. वारंवार मूत्रविसर्जन, अतिसार, थरथर कापणे, चक्कर आल्यासारखे जनावर चालते.
 3. जनावरांच्या तोंडातून फेस येतो.

उपचार

 1. जास्त प्रमाणात धान्याचा भरडा आणि जीवनसत्त्व "अ' खाऊ घातल्यास नायट्रेटची विषबाधा टाळता येते.
 2. लक्षणे दिसताच तातडीने पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.

चारा व्यवस्थापन

जास्त नायट्रेट असलेल्या चारा पिकांपासून मुरघास बनविल्यास नायट्रेटचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांपर्यंत कमी होऊ शकते.

अमोनियाची विषबाधा/ युरियाची विषबाधा

अतिरिक्त प्रमाणात युरिया जनावरांच्या आहारात खाण्यात आल्यास कोठीपोटाचा सामू जास्त असल्यास युरियाचे अमोनिया वायूत रूपांतर होऊन तो रक्तात शोषला जातो.

लक्षणे

 1. तीव्र अमोनिया विषबाधेमुळे जनावर अस्वस्थ होते. अतिप्रमाणात लाळ गाळते. स्नायूंचा थरकाप होतो. हालचालीतील सुसूत्रता नष्ट होते. श्‍वासोच्छवास अवघड होतो.
 2. जनावर वारंवार मूत्रविसर्जन करते, शेण टाकते. पोटफुगी होते.
 3. तीव्र विषबाधेमध्ये 30 मिनिटे ते अडीच तास या काळात जनावराचा मृत्यू होतो.

विषबाधा होण्याची कारणे

 • युरियाची सवय नसलेल्या जनावरांच्या आहारात अचानक युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्याचा वापर.
 • सहज विद्राव्य कर्बोदकांचा जनावरांच्या आहारात अभाव.
 • उपाशीपोटी राहणे किंवा कोठीपोट रिकामे असणे.
 • ज्या खाद्यामुळे कोठीपोटाचा सामू वाढणे अशा खाद्याचा जास्त वापर.
 • पाण्याचे कमी सेवन इत्यादी कारणांनी अमोनियाचे शरीरात मोठ्या प्रमाणात शोषण होते.
 • उपचार

 • जनावरांना भरपूर पाणी पाजावे अथवा तोंडावाटे पोटात सोडावे. त्यानंतर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने व्हिनेगार तोंडावाटे पोटात सोडावे.
 • युरिया प्रक्रिया केलेला चारा जनावरांच्या आहारात वापर करताना विशेष काळजी घ्यावी. सुरवातीस थोड्या प्रमाणावर व नंतर प्रमाण वाढवावे.

केटोसिस

 1. सातत्याने आहारात कर्बोदकांच्या कमतरतेमुळे केटोसिस हा आजार होतो. या आजारात रक्तातील केटोन पदार्थ अधिक प्रमाणात साचतात.
 2. प्रसूतीपश्‍चात, जास्त उत्पादन देणाऱ्या गायींमध्ये केटोसिस, अपचन सर्रासपणे दिसून येते. प्रसूतीपश्‍चात ज्या वेळी चाऱ्याची, खाद्याची गरज मोठी असते आणि गाय मोठ्या प्रमाणावर दूध देते अशा परिस्थितीत रक्तातील किटोन पदार्थ उदा. बिटा हायड्रॉक्‍सीब्युटिरीक ऍसिड, ऍसिटोऍसिटीक ऍसिड आणि ऍसिटोन यांचे रक्तातील व मूत्रातील प्रमाण वाढते.
 3. अतिजास्त प्रमाणात प्रथिने खाऊ घातल्याने दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण खूप कमी होते. रक्तातील ग्लुकोजचे/ साखरेचे प्रमाण कमी होते. साधारण गायींमध्ये ग्लुकोजचे प्रमाण 50 ते 70 mg/dl असते. ते कमी होऊन 28 mg/dl पर्यंत खाली येते. तसेच किटान पदार्थांचे प्रमाण 3 टक्‍क्‍यांपासून वाढून 41 टक्‍क्‍यांपर्यंत पोचते.

लक्षणे

 1. कोठीपोटाची हालचाल कमी होते. भूक मंदावते. दुधाला व मूत्राला ऍसिटोनचा वास येतो. (गोड वास येतो).
 2. गायींना एकदा केटोसिस आजार झाल्यास पुढील वितात पुन्हा हा आजार उद्‌भवण्याची शक्‍यता दाट असते.

प्रतिबंध

 1. चांगला पौष्टिक हिरवा चारा व खुराक खाऊ घातल्यास केटोसिस हा आजार टाळता येतो.

उपचार

पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.

ओस्टेओमलेसिआ

 1. वयस्क जनावरांमध्ये हाडातील क्षाराच्या मुख्यतः कॅल्शिअम व फॉस्फरस यांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो.
 2. या आजारात हाडातील कॅल्शिअम व फॉस्फरस इतर भागाकडे वहन झाल्याने हाडे ठिसूळ होतात.
 3. गायी, म्हशी, शेळ्या व मेंढ्या यामध्ये खाद्यातील कॅल्शिअम व फॉस्फरसच्या अभावी, तसेच सतत गोठ्यात राहणाऱ्या जनावरांत सूर्यप्रकाशाअभावी हा आजार होऊ शकतो.

उपाय

 1. आहारात योग्य प्रमाणात व पुरेसे कॅल्शिअम व फॉस्फरस असेल याची काळजी घ्यावी.

ग्रास टेटॅनी

 1. रक्तातील मॅग्नेशियम क्षारच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. रक्तातील मॅग्नेशियमचे साधारण प्रमाण 2.5 mg/dl हे कमी होऊन 1 mg/dl इथपर्यंत खाली येते.
 2. पावसाळ्यात जेव्हा जनावरे कुरणामध्ये चरायला जातात व कोवळे हिरवे गवत मोठ्या प्रमाणावर खातात, त्या वेळी हा आजार उद्‌भवतो.
 3. अतिरिक्त पोटॅशियम आणि सायट्रिक ऍसिड किंवा ट्रान्सकोनायटिक ऍसिड यामुळे हा आजार होतो.

उपाय

 1. पावसाळ्यात जनावरांच्या आहाराची योग्य काळजी घेतल्यास हा आजार टाळता येतो.

संपर्क - डॉ. ढगे - 9423863596 
(पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे)

स्त्रोत: अग्रोवन

2.98305084746
shrikant londhe Aug 06, 2016 07:25 AM

शेळीला हगवण इलाज काय

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 14:50:27.572811 GMT+0530

T24 2019/10/18 14:50:27.580471 GMT+0530
Back to top

T12019/10/18 14:50:26.262373 GMT+0530

T612019/10/18 14:50:26.286637 GMT+0530

T622019/10/18 14:50:26.335647 GMT+0530

T632019/10/18 14:50:26.336684 GMT+0530