অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गोचिडांच्या प्रादुर्भावाने वाढतोय मेंढ्यांच्या मरतुकीचा दर

गोचिडांच्या प्रादुर्भावाने वाढतोय मेंढ्यांच्या मरतुकीचा दर

नॉर्वेमधील संशोधकांचे मत

गोचिडांमुळे जनावरांमध्ये अशक्तपणा येऊन काही रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे माहिती असले, तरी मेंढ्या आणि कोकराच्या प्रतिकारकतेत घट होऊन मरतुकीच्या शक्‍यता वाढत असल्याचे समोर आले आहे. नॉर्वेतील गोचीड प्रादुर्भाव अधिक असलेल्या भागामध्ये मेंढराच्या कळपामध्ये मरतुकीचा दर 30 टक्के इतका प्रचंड असल्याचे संशोधकांचे मत आहे. त्यामुळे गोचिडांच्या निर्मूलनासाठी नॉर्वेमध्ये गोचीड येण्यामागील कारणे शोधत प्रतिबंधात्मक उपचार करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी मेंढ्या आणि शेळ्यांच्या जनुकीय संशोधनातून मार्ग काढण्याचे प्रयत्न आवश्‍यक आहेत.

रोग प्रतिकारकतेत होते घट

  • गोचिडामुळे मेंढ्यामध्ये ऍनाप्लाझ्मा फॅगोसायटोफायलम (Anaplasma phagocytophilum A.ph) चा प्रादुर्भाव होऊन ताप (TBF) येतो. या तापामध्ये प्रतिकार शक्ती कमी होते. गोचिडामुळे प्रतिवर्ष साधारणपणे तीन लाख कोकरांना जिवाणूंची बाधा होत असल्याचे नॉर्वेतील बायोफोर्स्क ऑरगॅनिक येथील गोचिडावर संशोधन करणारे लिसे ग्रोवा यांनी सांगितले. हा रोग मूलतः फारसा हानिकारक नसला तरी त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन अन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो.
  • ऑर्थरायटीस हा सांध्याशी संबंधित आजार गोचीडबाधित क्षेत्रामध्ये सामान्यतः सर्व कोकरांच्या रक्त नमुन्यामध्ये आढळून येतो. त्याची लक्षणे कोकरांनी चरायला सुरवात केल्यानंतर 10 ते 14 दिवसांच्या कालावधीमध्ये दिसून येते.
  • तसेच पाश्‍चेरूल्ला या जिवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन रक्तामध्ये विषारी घटकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदय, फुफ्फुस आणि पचनसंस्थेमध्ये वेदना होतात. या रोगाला रोखण्यासाठी शेळ्या मेंढ्यांना लसीकरण करणे आवश्‍यक असते. तसेच कोकराच्या जन्मानंतर त्वरित नाळ योग्य रीतीने वेगळी करणे आवश्‍यक असते. त्याद्वारे रक्तामध्ये होणारा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. पाश्‍चेरुल्ला जिवाणू शरीरामध्ये अधिक काळापर्यंत तग धरून राहू शकतो. प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव होतो.
  • सध्या गोचिडामुळे नेमके किती मृत्यू होतात, याची नेमकी नोंद उपलब्ध नाही. त्यासाठी रेडिओ ट्रान्समीटरच्या माध्यमातून कळपांचे निरीक्षण करण्याची पद्धत राबवली होती. मात्र, त्यातून योग्य ती माहिती उपलब्ध होण्यामध्ये अडचणी आल्या आहेत.

काय असू शकतील उपाय?

  • गोचीड प्रतिबंधक प्राण्यांची पैदास -
  • गोचिडांचा प्रादुर्भाव कमी होणाऱ्या किंवा गोचीड सहनशील जाती विकसित करण्यासाठी संशोधन आवश्‍यक आहे. त्या बाबत बोलताना ग्रोवा म्हणाल्या, की प्रत्येक मेंढी ही गोचिंडाना वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते. काही कोकरांमध्ये कमी प्रमाणात ताप आणि कमी कालावधीसाठी प्रतिकारशक्तीचा ऱ्हास होतो. अशा कोकरांपासून चांगल्या प्रतिकारशक्तीचे कळप विकसित करण्याचीही गरज आहे.
  • सध्या गोचिडांच्या नियंत्रणासाठी अनेक ठिकाणी कोळीनाशकांचा वापर केला जातो. मात्र, गोचिडांच्या निर्मूलनासाठी काही कोळीनाशकांच्या परिणामांचा अभ्यास सुरू आहे.

गोचिडामुळे माणसांमध्ये रोगांचा प्रसार

  • माणसांनाही गोचिडांच्या चाव्यामुळे ऍनाप्लाझ्मा फॅगोसायटोफायलम या जिवाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यातून फ्लूसारख्या तापाची लक्षणे दिसून येतात. प्रतिकारशक्ती कमी होऊन न्यूमोनियाचाही प्रादुर्भाव होऊ शकतो. मात्र, आजवरच्या उपलब्ध माहितीनुसार, माणसांचा मृत्यू गोचिडामुळे झाल्याची नोंद नाही.
  • आजारी मेंढ्या कत्तलखान्याकडे जाता कामा नयेत. काही मेंढ्या या रोगांच्या चांगल्या वाहक असल्या तरी मांस सुरक्षित असू शकते. कारण हे जिवाणू गोठवण केलेल्या किंवा शिजवलेल्या मांसामध्ये तसेच पचनसंस्थेमध्ये जगू शकत नाहीत.
  • नॉर्वेतील बायोफोर्स्क कृषी व पर्यावरण संशोधन संस्थेमध्ये मेंढ्या आणि गोचिडांच्या संदर्भात संशोधन करण्यात येत आहे. त्याचा प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष माणसांना फायदा होणार आहे.

गोचिडांच्या जैविक नियंत्रणासाठी मेटारायझियम बुरशीचा होईल फायदा

बायोफोर्स्क पीकआरोग्य आणि पीकसंरक्षण विभागाच्या प्रमुख इन्गेबोर्ग क्‍लिंगेन आणि त्यांचे सहकारी गोचिडांवर प्रादुर्भाव होणाऱ्या विविध बुरशींच्या संदर्भात अभ्यास करत असून, त्याच्या चाचण्या घेत आहेत. त्यामध्ये नॉर्वेसह विविध देशांतील मातीमध्ये आढळून येणारी मेटारायझीयम या बुरशीचे "बिपस्को 5' हे फॉर्मूलेशन वेगळे केले आहे. त्याचा उपयोग जैविक नियंत्रण पद्धतीमध्ये करणे शक्‍य आहे. त्याविषयी माहिती देताना क्‍लिंगेन यांनी सांगितले, की मेटारायझीयम बुरशीचे बिजाणू गोचिडांच्या त्वचेवर पडल्यानंतर आत प्रवेश मिळवितात. शरीराच्या आतमध्ये वाढ होण्यास सुरवात होते. वाढीच्या कालावधीमध्ये काही विषारी घटक तयार केले जातात. संपूर्ण शरीरभर बुरशीची वाढ होते. त्यानंतर गोचिडाचे शरीर फुटून त्यातून बिजाणू बाहेर पडतात. त्याचा प्रादुर्भाव अन्य गोचिडाना होतो. त्यातून गोचिडांची संख्या वेगाने कमी होते.

  • मेंढ्या कळपांच्या चराई आणि कुरण क्षेत्रामध्ये बिपस्को 5 चा वापर करण्यासंबंधी विविध गट आणि संस्थांतर्फे विचारणा होत आहे. ज्या ठिकाणी गोचिंडाचा जास्त प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी बुरशींचा वापर करणे शक्‍य आहे. ऑस्ट्रियातील इन्सब्रुक विद्यापीठाच्या सहकार्याने संशोधनाअंती योग्य ती पद्धती तयार करण्यात येत आहे.
  • या आधी बायोफोर्स्क मध्ये कीटक आणि कोळ्यांच्या नियंत्रणासाठी बुरशींचा वापर केला आहे. गोचिडाची शरीररचना आणि त्यांचे नैसर्गिक शत्रू यांचाही अभ्यास या नियंत्रण पद्धतीमध्ये केला जात आहे.

माणूस आणि पर्यावरणाची सुरक्षितता महत्त्वाची

  • मेटारायझियम बुरशी हा मुख्य घटक असलेल्या बिपस्को-5 या फॉरम्युलेशनच्या प्राणी आणि माणसांसंदर्भात विषारीपणाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहे. त्यातून पर्यावरण आणि माणसांवर कोणतेही विपरित परिणाम होत नसल्याचे दिसून आले आहे. सुरक्षित आढळल्यानंतर युरोपीय संघाच्या यादीमध्ये या फॉरम्युलेशनला स्थान मिळाले आहे.
  • क्‍लिंगेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिपस्को-5 हे नॉर्वेतील थंड वातावरणामध्ये कार्यक्षम असून, पर्यावरणासाठी धोक्‍याचे नसल्याचे चाचण्यांद्वारे स्पष्ट झाले असले, तरी नॉर्वेतील जंगली वातावरणामध्ये मोकळ्या अवस्थेमध्ये ही बुरशी किती कालावधीपर्यंत जिवंत राहील, अशी विचारणा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे गोचिडांच्या शरीरावर आणि तत्पश्‍चात जंगली वातावरणात मोकळ्या स्थितीमध्ये राहण्याचा कालावधी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
  • तज्ज्ञांचे मत...

  • परभणी येथील पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयातील डॉ. बाबासाहेब नरळदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,
  • एक गोचीड एका वेळी जनावरांच्या शरीरातील 0.5 ते 2 मिली रक्त शोषते. गोचिडीची अर्भक अवस्थादेखील रक्ताचे शोषण करते. रक्ताच्या शोषणासाठी त्वचेला पाडलेल्या छिद्रातून अन्य जिवाणूंचा प्रवेश शरीरात होऊन रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
  • जनावरांमध्ये गोचिडीच्या प्रादुर्भावामुळे बॅबेसिया आणि थायलेरियासिस या दोन आदिजीवजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. या रोगांच्या प्रादुर्भावामुळे काही वेळा दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडतात.
  • क्‍यूबामध्ये झालेल्या अभ्यासात गोचिडीच्या नियंत्रणानंतर जनावरांपासून मिळणाऱ्या दुधामध्ये 18 टक्‍क्‍यांनी वाढ होत असल्याचे आढळले आहे.
  • मराठवाड्यामध्ये गोचीड नियंत्रणासाठी मेटारायझियम बुरशीच्या वापराचे प्रयोग करण्यात आले आहेत. मात्र, मराठवाड्यातील कोरड्या वातावरणामुळे मेटारायझियमची फवारणी गोठ्यामध्ये वारंवार करावी लागत असल्याचे डॉ. नरळदकर यांनी सांगितले. मेटारायझियम हे जनावरांच्या शरीरावर फवारण्यासाठी नसून, त्याची केवळ गोठ्यामध्ये फवारणी करावी, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

छायाचित्र

इक्‍सोडेस रिसिनस प्रजातीची गोचिडाची मादी. या मादीच्या शरीरात मेटारायझीयम बुरशीची वाढ झाली असून, संपूर्ण शरीर भरेपर्यंत बुरशीची वाढ होईल. त्यानंतर गोचिडाचे शरीर फुटून त्यातून बुरशीचे बिजाणू बाहेर पडतील. अन्य गोचिडाना त्यापासून प्रादुर्भाव होईल.

 

(स्रोत - करीन वेस्ट्रम, बायोफोर्स्क)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 8/8/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate