অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मेंढ्यामध्ये आढळणारे रोग

रोग

मेंढ्‌यांमधील आजार सहजासहजी ओळखू येत नाहीत. त्या बऱ्याच आजारी झाल्या म्हणजेच आजाराची लक्षणे दिसू लागतात. आपल्या कळपातील मेंढ्या काही प्रमाणात रोगाने मृत्युमुखी पडणारच - ते अनिवार्य आहे-अशीच जगातील सर्व मेंढपाळांची समजूत विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत होती. त्यानंतरच्या २५ वर्षांमध्ये व्हायरसजन्य व सूक्ष्मजंतुजन्य रोगांच्या नियंत्रणाच्या बाबतीत पशुवैद्यकशास्त्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मेंढ्यांचे कित्येक संसर्गजन्य रोग आटोक्यात आले आहेत. कळपामध्ये एकमेकींना बिलगून राहण्याच्या मेंढ्यांच्या सवयीमुळे साथीच्या रोगांचा झपाट्याने फैलाव होतो. ताप, जलद श्वासोच्छ्‌वास, त्वचेवर लाली येणे, अंगावर सूज येणे, शिंका, खोकला व हगवण ही बऱ्याच संसर्गजन्य रोगांत दिसून येणारी सर्वसामान्य लक्षणे आहेत.

भारतामध्ये मेंढ्यांचे संसर्गजन्य रोग पशुस्थानिक (रोगकारक जंतूंच्या अस्तित्वामुळे एखाद्या भागातील जनावरांत उद्‌भवणाऱ्या) स्वरूपात आढळून येतात व त्यामुळे या भागातील मेंढ्या रोगांना मोठ्या प्रमाणावर बळी पडतात. मेंढ्यांच्या काही महत्त्वाच्या रोगांची माहिती येथे दिली आहे.

सूक्ष्मजंतुजन्य रोग

क्लॉस्ट्रिडियम प्रजातीतील काही सूक्ष्मजंतूमुळे मेंढ्यांना तीव्र स्वरूपाचे आजार होतात. हे सूक्ष्मजंतू बीजाणुरूप (सूक्ष्मजंतूंचे सुप्तावस्थेतील निरोधक स्वरूप) धारण करणारे, अनॉक्सिजीवी (ऑक्सिजनविरहित वातावरणात वाढणारे) असून शरीरामध्ये मारक स्वरूपाची विषे तयार करतात. यामुळे विषरक्तता (रक्तामध्ये विष भिनणे) होऊन मेंढ्या बऱ्याच प्रमाणावर मृत्युमुखी पडतात.

आंत्रविषबाधा

क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स (वेल्चाय) या सूक्ष्मजंतूंच्या ड प्रकारामुळे जगातील सर्व देशांमध्ये मेंढ्यांना होणारा हा संहारक रोग आहे. दोन वर्षे वयाच्या आतील मेंढ्यांमध्ये हा जास्त प्रमाणात आढळतो. खाणे बंद होणे, तोंडातून फेस येणे, आचके देणे, हगवण इ. लक्षणे कोकरामध्ये दिसतात व विषरक्तता होऊन ती २ ते १२ तासांत मरण पावतात. वयस्क मेढ्यांना हा रोग झाल्यास दात खाणे, तोंडावाटे लाळ गळणे, पोटफुगी, चालताना झोक जाणे, गोल गोल फिरणे इ. लक्षणे दिसतात व त्या १२ ते २४ तासांत मरण पावतात. सर्वसामान्यपणे असे दिसून येते की, नेहमी निकृष्ट प्रकारच्या चराऊ रानामध्ये चरणाऱ्या मेंढ्या चांगल्या प्रतीच्या रानामध्ये सोडल्या, तर त्या अधाशीपणाने चरतात. रोगाचे सूक्ष्मजंतू मेंढ्यांच्या आतड्यात बहुधा नेहमी असतात व अशा वेळी ते वाढीस लागतात आणि रोगोदभव होतो. भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये हा रोग आढळून येतो. आजारी मेंढ्यांवर उपचार करण्याइतका अवधी सहसा मिळत नाही. रोगाविरुद्धच्या प्रतिविषाचे (सूक्ष्मजंतुजन्य विषाचा परिणाम नाहीसा करणारे प्रथिन असलेल्या रक्तरसाचे) मोठ्या मात्रेने अंतःक्षेपण केल्यास आजारी मेंढ्या बऱ्या  होऊ शकतात. रोगकारक सूक्ष्मजंतूंच्या विषापासून तयार केलेले विषाभ (जंतुविषातील विषारीपणा नष्ट करुन पण प्रतिरक्षेचा गुणधर्म वर्षातून दोनदा कायम राखून तयार केलेली लस) परिणामकारक असून वर्षातून दोनदा टोचल्यास रोगप्रतिबंध होऊ शकतो.

लिबलिबीत वृक्क (मूत्रपिंड)

(पल्पी किडनी). वरील सूक्ष्मजंतूमुळे हा आणखी एक रोगप्रकार ६ ते १६ आठवडे वयाच्या कोकरांमध्ये आढळून येतो. कळपामध्ये एकाएकी एखादे कोकरू मेलेले आढळते. त्यानंतर इतर कोकरांमध्येही फारशी रोगलक्षणे न दिसता ती मरू लागतात. मरणोत्तर तपासणीत वृक्क लिबलिबीत झालेले व त्यावर पांढरे ठिपके दिसून येतात. यकृतातील कोशिकांतून (सूक्ष्म रक्तवाहिन्यांतून) रक्तस्त्राव झाल्यामुळे यकृतावर तांबडे ठिपके दिसून येतात. विण्यापूर्वी दहा दिवस गाभण माद्यांना वर उल्लेखिलेली लस टोचल्यास जन्मणाऱ्या कोकरांना चिकावाटे गेलेल्या प्रतिपिंडामुळे (प्रतिजनाच्या संभाव्य हानिकारक बाह्य पदार्थाच्या संपर्कामुळे रक्तरसात तयार होणाऱ्या विशिष्ट प्रथिनामुळे) परार्जित प्रतिरक्षा (दुसऱ्या जनावरात उत्पन्न झालेली व त्याच्या रक्तापासून मिळणारी रोगप्रतिकारकक्षमता) मिळते व ती ८ ते १३ आठवडे सुरक्षित राहतात.

स्ट्रक व कोकरांना आमांश

वरील सूक्ष्मजंतूंच्या क प्रकारामुळे स्ट्रक व ब प्रकारामुळे कोकरांना आमांश असे आणखी दोन सांसर्गिक रोग मेंढ्यांमध्ये आढळून येतात.

स्ट्रक हा एक ते दोन महिने वयाच्या कोकरांमध्ये इंग्लंडमध्ये वेल्स परगण्यात व अमेरिकेत आढळला आहे. क प्रकारच्या सूक्ष्मजंतूपासून आल्फा व बीटा ही विषे तयार होऊन रोगलक्षणे दिसण्यापूर्वीच मेंढ्या एकाएकी मरून पडलेल्या आढळतात. सूक्ष्मजंतूविरुद्ध तयार केलेले प्रतिविष योग्य मात्रेमध्ये टोचणे हा एकच उपाय या रोगावर आहे. तसेच सूक्ष्मजंतूच्या विषापासून तयार केलेले विषाभ निरोगी कोकरांना टोचल्यास रोगप्रतिबंध होऊ शकतो. प्रतिविषे बहुधा घोड्यामध्ये तयार करतात. त्यामुळे कोकरामध्ये अधिहृषतेची (ॲलर्जीची) लक्षणे दिसण्याचा संभव असतो, हे लक्षात घेणे जरूर आहे. याशिवाय क्लॉस्ट्रिडियम प्रजातीतील क्लॉ. नोव्ही (क्लॉ. इडिमॉशिअन्स) या सूक्ष्मजंतूंच्या ब प्रकारामुळे ब्लॅक डिझीज (संसर्गजन्य ऊतक मृत्ये यकृतशोथ) व क्लॉ. सेप्टिकम या सूक्ष्मजंतूमुळे व रक्तमूत्र हे तीव्र स्वरूपाचे मेंढ्यांचे संसर्गजन्य रोग ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यूरोप व इंग्लंडमध्ये आढळून आले आहेत. दोन्ही रोगांमध्ये मेंढ्या-कोकरे फारशी रोगलक्षणे दिसण्याआधीच विषबाधा होऊन काही तासांमध्ये मरून पडतात. रोगजंतूपासून तयार केलेली लस अगर रोगजंतुविषापासून तयार केलेले विषाभ टोचल्याने रोगप्रतिबंध होऊ शकतो.

क्षय रोग

मेंढ्यांना सहसा क्षय होत नाही; परंतु कोंबड्यांच्या क्षयजंतूमुळे क्षय झाल्याचे क्वचित उदहरणे आहेत. मात्र कॉरिनिबॅक्टिरियम ओव्हिस या सूक्ष्मजंतूमध्ये आभासी क्षय रोग होतो. रोगामुळे शरीरातील ⇨लसीका ग्रंथीचा शोथ (दाहयुक्त सूज) होऊन त्यांमध्ये कॅल्शियमाचे निक्षेपण (साचणे) होते. खाटिकखान्यामध्ये मांस तपासणीच्या वेळी या रोगामुळे होणाऱ्या विकृती लक्षात घ्याव्या लागतात.

खूरसडा

पायावरील त्वचा व खूर यांच्या संधीपाशी झालेल्या जखमांमधून ॲक्टिनोमायसीज नोडोसस या सूक्ष्मजीवांच्या प्रवेशामुळे मेंढ्यांना होणारा हा रोग आहे. भारतामधील काही राज्यांत बहुधा हिवाळ्यामध्ये हा रोग आढळून येतो. या ठिकाणची त्वचा सुजून तो भाग दुखरा बनतो व मेंढ्या लंगडत चालतात. कधी कधी खूर मऊ पडून ते संपूर्णपणे गळून पडतात. एकाहून अधिक पाय ग्रस्त झाल्यास मेंढ्या गुडघ्यावर खुरडत चालतात. सडलेला खुराचा भाग कापून काढून जंतुनाशक द्रावणाने तो स्वच्छ करून त्यावर जंतुरोधी औषधे लावतात. अलीकडे पेनिसिलीन अथवा स्ट्रेप्टोमायसीन या प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांची अंतःक्षेपणे करतात.

व्हायरसजन्य रोग

देवी

सर्व जनावरांना येणाऱ्या देवीपेक्षा मेंढ्यांना येणाऱ्या देवी हा अतिसंहारक रोग आहे. सहा महिन्यांचया आतील कोकरांना देवी झाल्यास मृत्यूचे प्रमाण ५०% इतके असू शकते. वयस्क मेंढ्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असते; परंतु लोकरीच्या उत्पादनात घट होते. संसर्गाने रोग प्रसार होतोच; परंतु हवेतील धूलिकणांबरोबर श्वसन तंत्रावाटे (श्वसन संस्थेवाटे) व्हायरसाचा शरीरात प्रवेश झाल्याने रोगसंसर्ग होऊन रोगाचा प्रसार होतो. पिटिका (पुटकुळ्या), पुटिका (द्रवयुक्त फोड), पूयिका (पूयुक्त फोड) व खपली अवस्था या देवीच्या फोडाच्या सर्व अवस्था मेंढ्यांच्या देवीच्या फोडामध्ये दिसून येतात. प्रामुख्याने ताप, नाकावाटे, उत्सर्ग, खाणे बंद होणे इ. लक्षणेही दिसून येतात. लोकर नसलेल्या भागावर –जांघेमध्ये, तोंडाभोवती, स्तनावर व स्तनाग्रावर – देवीचे फोड प्रामुख्याने दिसून येतात. शेळीच्या देवीच्या रोगकारक व्हायरसामुळे मेंढ्यांना देवी येतात. रोगकारक व्हायरसाच्या क्षीणन केलेल्या विभेदापासून ऊतक-संवर्धन

तंत्र (कृत्रिम पद्धतीने शरीराबाहेर पेशींची वाढ करून) वापरून बनविलेली लस प्रतिबंधक म्हणून वापरात आले. लस टोचल्यावर दोन आठवड्यांत प्रतिकारशक्ती निर्माण होते व ती ९ ते १२ महिने टिकते.

निळी जीभ

(ब्ल्यू टंग). व्हायरसामुळे मेंढ्यांना होणारा एक संक्रामक (साथीचा) रोग असून वालुमक्षिका व डास या कीटकांमार्फत याचा प्रसार होतो. आफ्रिकेमधील सर्व देशांत, पाकिस्तान, तुर्कस्तान, भारत व अमेरिकेतील काही राज्यांत हा आढळून आला आहे. पोटाच्या व आतड्याच्या श्लेष्मकलेला (अस्तर त्वचेला) सूज येणे, ताप, नाकावाटे शेंब व रक्तमिश्रित उत्सर्ग, तोंडातून फेसाळ लाळ, जिभेला सूज येऊन ती निळी पडणे ही सर्वसामान्य रोगलक्षणे दिसतात. हतप्रभ केलेल्या व्हायरसाच्या अनेक विभेदांपासून तयार केलेली बहुशक्तिक लस रोगप्रतिबंधक म्हणून वापरात आहे. वर उल्लेखिलेल्या माश्यांचा व डासांचा नाश करणे हे कायमचा प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने जरूर आहे.

इतर व्हायरसजन्य रोग

पूयिकायुक्त त्वचाशोथ व एक्थायमा हे व्हायरसांमुळे होणारे दोन सांसर्गिक रोग मेंढ्यांना होतात. दोन्ही रोगांमध्ये कोकरांमध्ये मृत्यूचे प्रमाण बरेच असते. पहिल्यामध्ये अंगावर केस नसलेल्या जागी त्वचा लाल होऊन तीवर देवीसारखे फोड येतात. या फोडांमध्ये द्रव असत नाही व ते गाठाळ असतात. रोगावर गुणकारी लस उपलब्ध आहे. एक्थायमा (स्टोमॅटायटीस) या रोगामध्ये मेंढ्यांच्या तोंडाभोवती चामखिळीसारखे फोड येतात. हे फोड तोंडाच्या बेचक्यात सुरू होऊन नाक, गाल, डोळे व कानांपर्यंत पसरतात. फोडावर जंतुनाशक औषधी मलम लावतात. फोडातील रोगकारक व्हायरसांपासून बनविलेली लस गुणकारी आहे, असे आढळून आले आहे.

रशियातील किरघिझ ॲकॅडेमीच्या जीवरसायनशास्त्र व शरीरक्रियाविज्ञान संस्थेचे संचालक एंजेल इमॅनोव्ह व त्यांचे सहकारी यांनी ऊतकसवंर्धन तंत्र वापरून या लसीपेक्षा अधिक गुणकारी लस तयार करण्यता अलीकडे यश मिळविले आहे.

स्क्रॅपी व लूपिंग इल हे दोन मेंढ्यांच्या तंत्रिका तंत्रामध्ये (मज्जा संस्थेमध्ये) दोष उत्पन्न झाल्यामुहे होणारे व्हायरसजन्य रोग आहेत. स्क्रॅपी हा चिरकारी (दीर्घकालीन) स्वरूपाचा असून मेंढ्या २ ते १२ महिने आजारी राहातात. रोगावर उपचार किंवा प्रतिबंधक उपाय नाही. रोगी किंवा संस्पर्शित (रोगी मेंढ्यांच्या सहवासात असणाऱ्या) मेंढ्या मारून टाकतात. रोग आनुवंशिक असावा असा संशय आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांत हा आढळून येतो. भारतामध्ये उत्तर प्रदेशातील काही भागांत हा आढळून आला आहे.

लूपिंग इल हा तीव्र स्वरूपाचा रोग असून एक्सोडेस रिसिनस व ऱ्हिफिसेफॅलस ॲपेंडीक्युलस या गोचिड्यांच्या मार्फत रोगकारक व्हायरस मेंढ्यांच्या शरीरात प्रवेश करतो. फक्त स्कॉटलंडमध्ये रोग झाल्याचे आढळून आले आहे. पण रशिया व मध्य यूरोपामध्ये या रोगासारखी लक्षणे दिसणारा आजार मेंढ्यांमध्ये आढळून आला आहे. स्नायूंना कंप सुटणे, क्षोभक अवस्था, हेलकावे देत चालणे ही सर्वसामान्य लक्षणे दोन्ही रोगांत आढळून येतात. पायांना झटके देऊन उचलून उड्या मारल्याप्रमाणे चालणे या लक्षणांवरून लूपिंग इल हे नाव पडले आहे. रोगावर हतप्रभ केलेल्या व्हायरसापासून तयार केलेली लस व रक्तरस दोन्हीही उपलब्ध आहेत. गाभण मेंढ्यांना ही लस टोचल्यास जन्मणाऱ्या कोकरांना परार्जित प्रतिरक्षा मिळते.

परजीवीजन्य रोग

इतर कोणत्याही पाळीव जनावरापेक्षा परजीवींमुळे (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणाऱ्या जीवांमुळे) होणाऱ्या रोगांचे प्रमाण मेंढ्यांमध्ये अधिक आहे. साथीच्या रोगाप्रमाणे थोड्या अवधीत अनेक मेंढ्या मरत नसल्या, तरी अधूनमधून अनेक मेंढ्या मरण पावत असल्यामुळे काही वेळा मेंढ्या पाळणे ही समस्या होत असे. तथापि आता अशा रोगावर प्रतिबंधक उपाय व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत.

प्रोटोझोआ, प्लॅटिहेल्मिंथिस, नेमॅटहेल्मिंथिस या परजीवींमुळे मेंढ्यांमध्ये आजार होतात. प्रोटोझोआ संघातील बदराणू (कॉक्सिडिया) गणातीलआयमेरिया आरलाइंगी या परजीवीमुळे मेंढ्यांमध्ये मारक आजार होतो. बदगणुजन्य रोग.

प्लॅटिहेल्मिंथिस संघातील पर्णकृमींमुळे मेंढ्यांमध्ये मारक आजार होतात. त्यातील फॅसिओला जायगँटिका व डिक्रोसीलियम डेंड्रिट्रिकम हे यकृत पर्णकृमी जगातील सर्व देशांतील मेंढ्यांमध्ये आढळून येतात. यामुळे पित्तवाहिनीचा शोथ, यकृत उपवृद्धी (रक्तपुरवठ्यातील व्यत्ययामुळे कार्यशक्ती व आकारमान कमी होणे) व सूत्रण (तंत्वात्मक ऊतक-कोशिकासमूह–जास्त प्रमाणात वाढणे) हे यकृताचे आजार होतात. अशक्तपणा, हगवण, रक्तक्षय व गळ्याखाली शोफ (द्रवयुक्त सूज) ही लक्षणे दिसतात. कार्बन टेट्राक्लोराइड हे औषध या परजीवीवर उपयुक्त आहे. गोगलगाईच्या काही जातींमध्ये (लिम्निया ॲक्युमिनेटा) या परजीवीच्या जीवनचक्रातील काही अवस्थांची वाढ होते. यामुळे गोगलगाईचा नाश हा कृमीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी एक रोगप्रतिबंधक उपाय म्हणून आवश्यक ठरतो.

शंकूच्या आकाराचे पॅराफिस्टोमा जातीतील काही पर्णकृमी मेंढ्यांच्या आतड्यात व शिस्टोसोमा जातीचे त्यांच्या रक्तात आढळतात.

पॅराफिस्टोमा जातीच्या पर्णकृमीवरील औषधयोजना यकृत पर्णकृमीप्रमाणे करतात. शिस्टोस्टोमा पर्णकृमीवर अँटिमोसान या औषधची अंतःक्षेपणे देतात. रवंथ करणाऱ्या जनावरात पट्टकृमीमुळे फारसे आजार होत नाहीत. तथापि मोनिशिया एक्सपान्सा या कृमीमुळे मेंढ्या (विशेषतः कोकरे) आजारी होतात.

नेमॅटहेल्मिंथिस या संघातील नेमॅटोडा वर्गातील हीमाँकस कंटोर्टस हे सुतासारखे दिसणारे कृमी मेंढ्यांच्या लहान व मोठ्या आतड्यांत गाठी उत्पन्न करतात. इसोफॅगोस्टोमम जातीच्या अनेक उपजातींमुळे आतड्यांमध्ये व व्हारस्ट्राँगिलिस न्यूमोनिकस या कृमीमुळे खोकला, फुप्फुसशोथ हे विकार होतात. या महत्त्वाच्या कृमींव्यतिरिक्त आणखी काही जातींचे कृमी मेंढ्यांमध्ये आढळतात आणि त्यांमुळे अशक्तता, रक्तक्षय, हगवण इ. रोगलक्षणे दिसतात.

कीटकजन्य रोग

इस्ट्रस, फॉर्मिया, कॅलिफोरा या व इतर काही प्रजातींच्या माश्यांमुळे मेंढ्यांना आजार होतात. इस्ट्रम ओव्हिस (नेझलबॉट्स) या माश्या मेंढ्यांच्या नाकपुड्यांभोवती घोंघावतात व नाकपुड्यांवर अंडी किंवा डिंभ (अळी अवस्था) घालतात. अळ्या नाकामध्ये वर सरकत जाऊन नाकाच्या हाडातील किंवा ललाटास्थीच्या कोटरात (कपाळाच्या हाडाच्या पोकळीत) शिरतात व तेथे त्यांची वाढ काही आठवड्यांनंतर पूर्ण होते. पर्याक्रमित (पछाडलेल्या) मेंढ्या पाय आपटतात, एकसारख्या शिंकतात, डोक्याला हिसके देतात व बेचैन झाल्यामुळे रोडावतात. शिंकेबरोबर डिंभ जमिनीवर पडतात व तिथे त्यांची कोषावस्था पूर्ण होऊन ३ ते ६ आठवड्यांत माश्यांमध्ये रूपांतर होते. तसेच फॉर्मिया व कॅलिफोरा (ब्लो फ्लाय) प्रजातींच्या माश्या आपली अंडी मेंढ्यांच्या जखमांच्या कडांवर घालतात. अंड्यातून बाहेर पडलेले डिंभ लोकरीच्या धाग्याच्या मुळामध्ये शिरून रक्तशोषण करतात. यामुळे त्वचेचा क्षोम होतो व मेंढ्या खाजवतात, अंग घासतात. परिणामी त्या भागावरील लोकर गळून पडते.

गोचिड्यांच्या बहुतेक जाती रक्तपिपासून आहेत व त्यांतील काही मेंढ्यांच्या अंगावर आढळतात. भारतामध्ये ऑर्निथोडोरस लाहोरेन्सिस व बूफिलस मायक्रोप्लस या जातींच्या गोचिड्या काश्मीर व वायव्येकडील भागांत आढळतात. गोचिड्यांच्या उपद्रव मोठ्या प्रमाणावर झाल्यास मेंढ्यांना रक्तक्षय होतो. यांशिवाय लिनोग्नॅथस पेडॅलिस या रक्तपिपासू उवांमुळेही रक्तक्षय व सारकॉप्टीस प्रजातींच्या किडीमुळे त्वचाक्षोभ होऊन गळून पडते.

माशीप्रतिवारक (ज्यापासून माश्या दूर राहतात असे) रसायन मेंढ्यांच्या नाकाला लावल्याने माश्यांचा त्रास कमी होतो. कार्बनी फॉस्फेट (उदा., बेअर कंपनीचे ३७,३४२ किंवा ३७,३४१) पोटात दिल्याने हा उपद्रव बराच कमी होतो. गोचिड्या, उवा व कीड यांचा उपद्रव कमी करण्यसाठी बेंझीन हेक्झॅक्लोराइड व डायझोन यांसारखी औषधे मुद्दाम बांधण्यात आलेल्या विशिष्ट हौदाच्या पाण्यात योग्य प्रमाणात टाकतात व त्यातून मेंढ्यांना गळ्याइतक्या पाण्यातून चालवतात. या औषधांच्या रासायनिक द्रावणाने लोकर भिजून त्याबरोबर गोचिड्या, उवा व कीड यांचा नाश होतो.

मेंढ्यांना होणाऱ्या नैमित्तिक आजारांमध्ये पोटदुखी, नाळीचा रोग, संधिरोग या आजारांचा समावेश आहे. यांशिवाय काळपुळी (सांसर्गिक), गळसुजी रोग, बुळकांड्या, लाळरोग हे रोगही मेंढ्यांना होतात. या रोगांची माहिती त्या त्या रोगाच्या शीर्षकाच्या स्वतंत्र नोंदीमध्ये पहावी. (चित्रपत्र ३०).

ऑस्ट्रेलियन मेरिनो मेंढीऑस्ट्रेलियन मेरिनो मेंढी ऑस्ट्रेलियन मेरिनो मेंढाऑस्ट्रेलियन मेरिनो मेंढा रॅम्ब्युलेट मेंढारॅम्ब्युलेट मेंढा
रामपूर बशीर मेंढारामपूर बशीर मेंढा कॉरिडेल मेंढाकॉरिडेल मेंढा रशियन मेरिनो मेंढारशियन मेरिनो मेंढा
नेलोर मेंढानेलोर मेंढा दख्खनी मेंढादख्खनी मेंढा मारवाडी मेंढामारवाडी मेंढा

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate