অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शास्त्रीय पद्धतीने करा मेंढ्यांची पैदास

शास्त्रीय पद्धतीने करा मेंढ्यांची पैदास

प्रथम पैदाशीकरिता वापरात येणाऱ्या मेंढीचे वय एक ते दीड वर्ष असावे. पैदाशीचा मुख्य हंगाम जून-जुलै व दुय्यम हंगाम जानेवारी-फेब्रुवारीमध्ये असतो. पैदाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या नर मेंढ्यास (जावळी) रोज 200 ते 250 ग्रॅम वाढीव खुराक द्यावा.

हिवाळा हा मेंढ्यांच्या प्रजननाचा प्रमुख काळ आहे. कार्यक्षम व्यवस्थापनाचा भाग म्हणजे दोन वेतातील अंतर कमी ठेवणे. त्यासाठी कोकरे मेंढ्यांपासून वेगळे केल्यानंतर मेंढ्या मोसमानुसार परत माजावर आल्यावर त्या काळजीपूर्वक भराव्यात, जेणेकरून दोन वेतातील अंतर कमी होईल. दोन वर्षांत तीन वेत होऊन जास्त कोकरे मिळतील.

  1. प्रथम पैदासीकरिता वापरात येणाऱ्या मेंढीचे वय एक ते दीड वर्ष असावे. पैदासीचा मुख्य हंगाम जून-जुलै व दुय्यम हंगाम जानेवारी-फेब्रुवारीमध्ये असतो.
  2. मेंढ्यांना पैदासीच्या हंगामापूर्वी एक महिना 100 ते 150 ग्रॅम खाद्य द्यावे.
  3. माजावर असलेली मेंढी ओळखता येणे फारच अवघड बाब आहे. माजावर असलेल्या शेळीप्रमाणे लक्षण मेंढीमध्ये दिसून येत नाही. निरणाचा भाग थोडासा सुजलेला असतो आणि त्यात थोडासा काचेसारखा चिकट द्राव असतो, एवढ्यावरून माजावरील मेंढी ओळखता येऊ शकत नाही. तेव्हा माजावरील मेंढी ओळखण्यास मेंढा असणे आवश्‍यक असते.
  4. मार्चमध्ये जन्मणारे कोकरू सप्टेंबरमध्ये जन्मणाऱ्या कोकराच्या मानाने जन्मासाठी अधिक काळ घेते.
  5. मेंढी माजावर येण्याचे थांबणे हे गर्भधारणेचे पहिले लक्षण आहे. मेंढी गाभण असल्यास पहिले तीन महिने लक्षात येऊ शकत नाही. त्यानंतर मात्र पोटाचा आकार वाढतो. कास व सडांची वाढ पाचव्या महिन्यात लक्षात येते.
  6. माजावर येणे बंद झाल्यावर तीन महिन्यांनी पशुवैद्यकाकडून मेंढीची तपासणी करून घेतल्यास गर्भधारणेची खात्री करता येते. मेंढी विण्याच्या आठ ते दहा दिवस अगोदर सडात चिक अथवा पहिले दूध उतरते.
  7. पोटाचा आकार व गर्भाचे वजन वाढल्याने तिची चाल मंदावते.
  8. विण्याजवळ आलेल्या मेंढ्या कळपाच्या पाठीमागून चालताना आढळतात. आशा मेंढ्यांना वेगळे करावे. त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.
  9. मोसमाच्या सुरवातीच्या दिवसात जावळी (मेंढा) सोडल्यास मेंढ्या माजावर येण्यात मदत होते. त्या वेळी दोन आठवडे आधी मेंढ्यांना खुराक सुरू केल्यास त्या लवकर माजावर येतात याला इंग्रजीत "फ्लशिंग' म्हणतात. यासाठी 200 ते 250 ग्रॅम मका, बाजरी किंवा ज्वारी यापैकी कोणतेही एक धान्य दिले तरी चालते.

मेंढ्यांचे व्यवस्थापन

  1. पैदाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या नर मेंढ्यास (जावळी) रोज 200 ते 250 ग्रॅम वाढीव खुराक द्यावा. प्रजननाच्या काळात मोड आलेली मटकी 100 ते 120 ग्रॅम दररोज द्यावी. त्यामुळे पैदाशीचा जोम व विर्याची गुणवत्ता टिकविली जाते.
  2. नरांच्या आहारात 4 किलो हिरवा चारा आणि 1 किलो वाळलेला चारा द्यावा. प्रजननासाठी वापरण्यात येणाऱ्या नराचा आहार संतुलित असावा. आहारात 18 टक्के पचनीय प्रथिने व 70 टक्के एकूण पचनीय घटक असावेत.
  3. खाद्यामध्ये जास्तीत जास्त हिरवा चारा असावा. स्फुरदाचे प्रमाण वाढवावे. कॅल्शिअमचे प्रमाण कमी करावे. त्यासाठी खाद्यात गव्हाच्या कणीचा समावेश करावा.

गाभण काळातील व्यवस्थापन

  1. 1हिवाळा हा मेंढ्यांचा प्रमुख गाभण काळ असल्याने गाभण मेंढ्यांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष करू नये.
  2. गाभण काळात तिसऱ्या महिन्यापासून मेंढ्यांना 200 ते 250 ग्रॅम वाढीव खुराक गर्भरोपणासाठी देणे जरुरीचे आहे.
  3. गर्भधारणेच्या कालावधीत कॅल्शिअम, फॉस्फरस, आयोडिन, तांबे, कोबाल्ट या खनिज द्रव्याची आवश्‍यकता असते. याकरिता खनिजांनीयुक्त चाटण विटा वाडग्यात (गोठ्यात) बांधाव्यात. या विटा मेंढ्या गरजेप्रमाणे चाटतात.
  4. मेंढी व्यायल्यानंतर त्या मेंढीला तिच्या कोकरास चाटू द्यावे. त्यामुळे मेंढीचा मातृभाव वाढतो.
  5. जन्मल्यानंतर कोकराची नाळ कापावी. कोकरू 1 ते 2 तासांत उठून मेंढीला पिऊ लागते. कोकराला चिक पाजणे महत्त्वाचे असते. त्यामुळे कोकराला आईपासून रोगप्रतिकारक शक्ती मिळते. पोटातील घाण बाहेर पडून कोकरू ताजेतवाने दिसते.
  6. व्यायलेल्या मेंढीला 100 ते 150 ग्रॅम उकडलेली बाजरी चार ते पाच दिवस द्यावी.
  7. 10 ते 12 दिवसांच्या वयानंतर कोकरांना हिरवा लुसर्न किंवा इतर चारा द्यावा.
  8. कोकरांना भरपूर दूध मिळावे म्हणून मेंढ्यांना योग्य प्रमाणात संतुलित आहार द्यावा. कोकरांना दूध ठराविक अंतराने पाजावे. अवेळी दूध पाजल्यास कोकरांच्या आतड्यात गाठी तयार होतात, संडास पातळ होते. कोकरू तडकाफडकी मरते. कोकरांचे थंडीपासून संरक्षण करावे.
  9. कोकरू तीन महिने मेंढीला पाजावे. त्या काळात 15 दिवसांत कोकरे कोवळे हिरवे गवत, पाने कुरतडून खाण्याचा प्रयत्न करावयास लागतात. 5 ते 8 आठवडे वयापासून थोडे थोडे खाद्य खाण्याची कोकरांना सवय करावी. बारा आठवड्यांनंतर ते मेंढीपासून वेगळे करावे. त्यानंतर त्यांना खुराक व सकस हिरवा चारा यावर वाढवावे.
  10. 1 संशोधनामध्ये असे दिसून आलेले आहे, की मांसासाठी वाढविली तर कोकरे 130 ते 145 दिवसांत 20 किलो पेक्षा जास्त वजनाची होतात. त्यांना बाजारात चांगली किंमत मिळते.
  11. मांसोत्पादनासाठी पाळलेल्या कोकरांनी मेंढीला पिणे बंद झाल्यापासून भरडा सुरू करावा.

 

एस. टी. पाचपुते - 9970734483 
02426-243277. 
( सर्व समावेशक मेंढी सुधार प्रकल्प (प्रक्षेत्र योजना),महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate