অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मत्स्यसंवर्धन शेती

मत्स्यसंवर्धन शेती

असे म्हणतात की व्यक्तीच्या आयुष्यात संधी एकदाच दार ठोठावते. परंतु ध्येयवेडी व्यक्ती ही संधीची वाट न पाहता संधी निर्माण करतो. असाच काहीसा प्रत्यय आला आहे, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील थेरवडी या गावातील तरुणांच्या बाबतीत.थेरवडी गावातील बेरोजगार तरुणांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वत: संधी निर्माण केली आणि त्यातून स्वतःबरोबरच गावाचाही विकास साधण्यास मदत केली.

गावातील दहा बेरोजगार तरुणांनी एकत्र येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय पुरुष स्वयंसहायता बचत गटाची स्थापना सन 2012 मध्ये केली. त्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडले आणि गटातील प्रत्येक सदस्याने दर महिन्याला 200 रुपये बचत खात्यात जमा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या खात्यात चांगली शिल्लक राहू लागली. त्याच वेळी त्यांनी एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार सुरू केला. त्यातून त्यांना मत्स्य शेतीबद्दल माहिती मिळाली. त्यांनी यासंबंधी चौकशी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी, आत्मा यांच्या मदतीने त्यांना रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात मत्स्य संवर्धनाबाबत प्रशिक्षण घेतले. या सात दिवसांच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी तलावात पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान वापरुन मत्स्य बोटुकली ‘बँक’ तयार करणे आणि शेतकऱ्यांना मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान प्रात्याक्षिक दाखविणे यांचे तंत्र शिकून घेतले.

प्रशिक्षणानंतर गटातील सदस्यांमध्ये आत्मविश्वास वाढला. त्यांनाही आता आपण मत्स्यसंवर्धन शेती करू शकतो, याचा हुरुप आला. प्रशिक्षणानंतर त्यांनी गावातील तलावात मत्स्य संवर्धन प्रकल्प सुरू केले. बचत गटाचे अध्यक्ष दादासाहेब कांबळे, सचिव बबन थोरात, प्रकल्प प्रमुख, तालुका कृषी अधिकारी, ‘आत्मा’चे तंत्रज्ञान व्यवस्थापक, विषय विशेषज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येतो.या मत्स्यसंवर्धनासाठी कोकण कृषी विद्यापीठातून पिंजरे देण्यात आले आहेत. या व्यवसायास आतापर्यंत बारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट दिली असून कृषी विभागातर्फे शेततळेधारकांसाठी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या गटाने अकलूजमधील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व कर्जतमधील कृषी प्रदर्शनात आपला स्टॉल लावून शेकडो शेतकऱ्यांना मत्स्य संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले आहे. तसेच या बचत गटाला जिल्हा स्तरावरील प्रदर्शनात 21 हजाराचे तर तालुका स्तरावर 20 हजाराचे पारितोषिक मिळाले आहे. या मत्स्यव्यवसायात सतत भांडवल गुंतवण्याची गरज नसते तसेच पाण्याचा अपव्यय होत नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करता येतो. त्याचबरोबर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनाही हा व्यवसाय वरदान ठरेल यात शंका नाही.तलावात सुरु झाले मत्स्यपालन

  • सन 2012 मध्ये मत्स्यपालनासाठी थेरवडी गावाजवळील पळसवाडा तलावाची निवड करण्यात आली. या ठिकाणी गटातर्फे जलाशयातील पिंजरा मत्स्यसंवर्धन व्यवस्थापन प्रकल्प सुरु झाला.
  • तज्ञांच्या सल्ल्यानुसार गटातील सदस्यांनी लोखंडी जीआयपाइपचे 6 बाय 4 बाय 2 मीटर या आकाराचे चार पिंजरे बनविले. पिंजऱ्यातून मत्स्यबीज बाहेर पडू नये यासाठी विशिष्ट प्रकारची जाळी बसविली. हे पिंजरे दोनशे लिटर पाण्याच्या बॅरलच्या सहाय्याने तलावातील पाण्यात तरंगते सोडले.
  • गटातील सदस्यांनी रोहू, कटला, मृगळ, सायप्रिनस यांचे मत्स्यबीज पश्चिम बंगाल, केरळ येथून आणले. प्रत्येक पिंजऱ्यात वेगवेगळे मत्स्यबीज सोडले. रोहू, कटला, मृगजल आणि सायप्रिनस या जातींचे एकावेळी सरासरी पन्नास हजार मत्स्यबीज पिंजऱ्यात सोडले जातात. वर्षभरात पाच वेळा मत्स्यबीज पिंजऱ्यात सोडले जाते.
  • मत्स्यबीजांना दीड महिन्यात दोन वेळा लसीकरण केले जाते. या मत्स्यबीजाची दोन महिन्यांत बोटुकली तयार होते. याची विक्री शेततळे असलेल्या शेतकऱ्यांना केली जाते.मत्स्यबीज आणि माशांची विक्री
  • रोहू, कटला, मृगजळ व सायप्रिनस मत्स्यबीजांच्या खरेदीसाठी शेतकरी थेट तलावाच्या ठिकाणी येतात. दोन ते तीन रुपये प्रति बोटुकली दराने विक्री होते.
  • तलावात सोडलेल्या माशांची विक्री योग्य वाढ 10 ते 11 महिन्यांत होते. या कालावधीत मासे 500 ते 900 ग्रॅमपर्यंत वाढतात. माशांची वाढ ही त्यांना देण्यात आलेल्या खाद्यावर अवलंबून असते.
  • गटातील सदस्य भिगवण बाजारात मासे विक्री करतात. 80 ते 130 रुपये प्रति किलोप्रमाणे माशांची विक्री केली जाते.
  • गटाने सन 2013-14 मध्ये सहा लाख आणि यंदाच्या हंगामात पाच लाख मत्स्यबीजाची विक्री केली. राज्यातील विविध भागांत शेततळी असलेल्या 150 शेतकऱ्यांनी बचत गटाकडून मत्स्यबीज खरेदी करुन मत्स्यसंवर्धन सुरु केले आहे.
  • गटाने गेल्या वर्षी 8 लाख 50 हजार रुपये मत्स्य बोटुकली विक्रीतून मिळविले. गटाची सुमारे 66 हजार रुपये मासिक बचत झाली आहे.मत्स्यबीजाची काळजी :तलावात साधारणपणे 11 ते 12 महिने कमीत कमी दोन - तीन मीटर पाणी राहत असल्यामुळे तलावात मागील वर्षाचे मोठे मासे असतील तर ते जाळीच्या सहाय्याने काढले जातात. तलावात जास्त प्रमाणात शेवाळ असेल तर तेही काढले जाते. तलावात पाणकोंबड्या आणि इतर मोठे पक्षी येऊ नयेत म्हणून राखण केली जाते. दिवसा एक आणि रात्री तीन सदस्य तलावावर राखणीसाठी असतात.संजीवनी जाधव-पाटील माहिती सहाय्यक, उप माहिती कार्यालय, शिर्डी.

 

स्त्रोत : महान्युज

 

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate