অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतीला डाळनिर्मितीची जोड

शेतीला डाळनिर्मितीची जोड

वसंत पाटील यांची पंचवीस वर्षांची सेंद्रिय शेती

रासायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय शेती किफायतशीर आहे व उत्पादनावरही परिणाम होत नाही हा अनुभव घेऊन बुलडाणा जिल्ह्यातील वडी (ता. नांदूरा) येथील वसंत पाटील यांनी सेंद्रिय शेतीची वाट चोखाळली. सन 1988-89 पासून ते शंभर टक्के सेंद्रिय शेती करतात. प्रामुख्याने कडधान्यांची शेती करून प्रक्रियेद्वारा डाळनिर्मिती करतात. विक्रीकौशल्य साधून त्यांनी आपल्या शेतमालासाठी बाजारपेठही तयार केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात नांदूरा तालुक्‍यात मुंबई-हावडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वसलेले वडी हे जेमतेम लोकवस्तीचे टूमदार गाव. येथील वसंत पाटील यांची पंधरा एकर वडिलोपार्जीत शेती आहे. सन 1989 पासून त्यांनी सेंद्रिय शेतीला सुरवात केली. ती आजगायत शंभर टक्के तत्त्वावर सुरू आहे.

सेंद्रिय शेतीला सुरवात

पाटील यांनी सेंद्रिय शेतीला सुरवात केली त्याची पार्श्‍वभूमी अशी.

एकदा वर्धा येथील सेवाग्राम संस्थेतर्फे त्यांना कमी खर्चिक सेंद्रिय शेतीविषयी व्याख्यान ऐकण्याची संधी मिळाली. त्याचे महत्त्व पाटील यांना पटले. त्याप्रमाणे 1988 मध्ये त्यांनी पाच एकरांत सेंद्रिय पद्धतीने कापूस पीक घेतले. त्यातून रासायनिक पद्धतीने यायचे तेवढेच म्हणजे एकरी सात क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. त्यानंतर पाटील यांचा विश्‍वास बळावला. तेथून टप्प्याटप्प्याने त्यांनी सेंद्रिय शेतीखालील क्षेत्र वाढवण्यास प्रारंभ केला. मनोहर परचुरे, सुभाष पाळेकर यांच्याकडून त्यांनी त्या विषयी अधिक माहिती घेतली. त्यासोबतच वर्धा येथील धारामित्र संस्थेत सेंद्रिय शेतीविषयक प्रशिक्षणही पूर्ण केले.

मिश्र पीक पद्धतीचा वापर

एकाच पिकामुळे होणारी संभावीत जोखीम कमी करण्यासाठी मिश्र पीक पद्धतीचा पॅटर्न पाटील यांनी अंगीकारला. सोयाबीन, तूर, उडीद, मूग अशी पिके त्यांनी निवडली. ती आजही कायम आहेत. सोयाबीनच्या पाच ओळी, त्यानंतर तूर अशी साधारण पीक पद्धती असते. त्यात ज्वारीही घेतली जाते. मात्र एकरातून दोन ते तीन क्विंटल उत्पादन मिळेल एवढेच त्याचे प्रमाण असते.

प्रक्रिया केल्याने उत्पन्न वाढ

पाटील यांचा भाग जिरायती आहे, त्यामुळे उत्पादन पावसावरच अवलंबून असते. तुरीचे सरासरी पाच ते सहा क्‍विंटल, उडीद व मुगाचे तीन क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. सेंद्रिय शेतीत जिवामृत, दशपर्णी अर्क यांचा वापर केला जातो. सर्व कडधान्ये सरसकट बाजार समितीत विकण्याऐवजी त्यावर प्रक्रिया म्हणजे डाळ तयार करून विक्री केली जाते. किलोला तूर डाळ 90 ते 100 रुपये, उडीद डाळ 70 रुपये, तर मूग डाळ 100 रुपये या दराने विकली जाते. डाळ तयार करून विकल्याने नफ्याचे मार्जीन वाढते.

विक्रीत जपले वेगळेपण

सामान्य ग्राहकांकडून सेंद्रिय शेतमालाला अपेक्षित दर मिळण्याची शक्‍यता नसल्याचे हेरत पाटील यानी उत्पादित सेंद्रिय शेतमाल डॉक्‍टर, वकील अशा व्यक्‍तींना विकण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता नांदूरा येथे बसने जाऊन अर्धा ते एक किलोच्या पॅकिंग मधील शेतमाल सुरवातीला नमुन्यादाखल विक्री करीत. बाजारात तूर डाळ 75 रुपये किलो असताना शंभर रुपये किलो दराने ते आपला माल विकत होते. ग्राहकांना सेंद्रिय घटक व त्यातील पोषक अन्नघटकांची माहिती ते पटवून देत, त्यामुळेच बाजारदरापेक्षा अधिक दर मिळविण्यात ते यशस्वी व्हायचे. सेंद्रिय डाळ विक्रीसाठी अर्धा व एक किलो पॅकिंगसाठी खास पिशव्या तयार केल्या आहेत. घरातील महिला सदस्यांद्वारा डाळीचे पॅकिंग होते.

डाळींना तयार केले मार्केट

पाटील यांच्या डाळींचे परिसरातील अकोला, खामगाव, नांदूर भागांतील डॉक्‍टर हे प्रमुख ग्राहक आहेत. सुमारे शंभर डॉक्‍टर त्यांच्याकडून डाळी घेऊन जातात. आरोग्याविषयी अधिक जागरुकता त्यांच्यात असल्याने हा प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणतात. या व्यतिरिक्त खामगाव येथील लोकमान्य टिळक सहकारी गृह संस्था तसेच स्थानिक ग्राहकांनाही डाळींची विक्री होते.

कृषिमंत्र्यांची भेट

तत्कालिन कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाटील त्यांच्या शेताला भेट दिली. त्यानंतर पुणे, बारामतीत हा सेंद्रिय गुणवत्तापूर्ण माल विकला जावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्‍त केली. यासंदर्भाने पाटील यांना संबंधित ठिकाणी बाजारपेठ खुली झाली. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या स्कूल ऑफ बायोटेक्‍नॉलॉजी यांच्याकडूनही धान्य महोत्सवासाठी डाळींची ऑर्डर येते. पुणे येथील वसुधा सरदार यांच्या सेंद्रिय सेतू गटासाठीही सेंद्रिय डाळी पाटील पुरवतात. वर्षभरात एकूण सुमारे 50 क्‍विंटल तूर डाळीची विक्री केली जाते.

दाल मिलची उभारणी

मुंबई येथील एका अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी गावात सेंद्रिय शेतीविषयक जाणीव जागृतीसाठी काही वर्षांपूर्वी गावात आले होते. त्या वेळी शेतीला भेट दिल्यानंतर त्यांना पाटील यांची सेंद्रिय शेतीविषयक संकल्पना आवडली. त्यानंतर संस्थेने त्यांना दाल मिल यंत्र शंभर टक्‍के अनुदानावर पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाटील यांनी डाळी तयार करण्याचा उद्योग सुरू केला. एक क्‍विंटल तुरीवर प्रक्रिया केल्यास त्याद्वारा 75 किलो डाळीचे तर एक क्विंटल उडीद, मुगापासून 90 किलो डाळीचे उत्पादन होते.

बियाणे बॅंकेतर्फे बियाणे देवाण-घेवाण

पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येत तालुक्‍यातील एरडी येथे बियाणे बॅंक तयार केली आहे. त्यात जुन्या, चवदार बियाण्यांचा संग्रह केला आहे. त्यातील बियाणे एकमेकांना मोफत दिले जाते. टोमॅटो, वांगे, अन्य भाजीपाला, तसेच कडधान्यांचे बियाणे येथे पाहण्यास मिळते. सोयाबीन बियाण्यांचा यंदा तुटवडा असल्याने पाटील यांनी राखून ठेवलेल्या सोयाबीनला 50 रुपये प्रति किलोप्रमाणे मागणी झाली आहे.

पाटील यांच्या सेंद्रिय शेतीतील काही बाबी

1) शेणखताच्या उपलब्धतेसाठी दहा जनावरे. गरजेनुसार शेणखताची खरेदी 
2) जिवामृत व गांडूळ खताचा वापर. 
3) विहिरीच्या माध्यमातून सिंचनाच पर्याय. 
4) सेंद्रिय शेतीविषयी शेतकऱ्यांत जाणीव जागृतीचे प्रयत्न

गांडूळ खताचे उत्पादन

कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या पंतप्रधान पॅकेजमधून पाटील यांनी गांडूळ शेडची उभारणी केली. वर्षाकाठी चार हजार बॅंग (प्रति बॅग 40 किलो) सेंद्रिय खताचे उत्पादन होते. मात्र या उत्पादित खताचा स्वतःच्या शेतीकामी त्यांना वापर करण्याची गरजच भासत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत असल्याने जमिनीचा पोत सुधारल्याचे पाटील म्हणतात. शेती व्यवस्थापनात त्यांना कृषी विभागाचे सहकार्य लाभले आहे 

संपर्क - वसंत पाटील- ८२७५०२७६६९

लेखक : विनोद इंगोले

माहिती संदर्भ : अॅग्रोवन


 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate