অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खवानिर्मिती महिलांचे सबलीकरण

रांजणी (ता. जि. नगर) येथील गावकऱ्यांनी दुग्धोत्पादन आणि खवानिर्मितीचा आपला पारंपरिक व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढवला आहे. आज नगर परिसरामध्ये रांजणीचा खवा प्रसिद्ध आहे. दुग्धोत्पादनातील जोखीम कमी करत बनवलेल्या खव्यापासून शेतकरी आणि महिलांना चांगली आर्थिक प्राप्ती होत आहे.
नगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर रांजणी हे गाव आहे. रांजणीची लोकसंख्या सुमारे दीड हजार असून, गावातील 150 कुटुंबांपैकी 80 ते 90 कुटुंबे खव्याच्या उद्योगात आहेत. एका कुटुंबातून सरासरी तीन ते पाच किलो खवानिर्मिती होतो. म्हणजेच गावातून रोज सुमारे 300 ते चारशे किलो खवानिर्मिती होतो. परिणामी, नगर परिसरामध्ये खव्याचं गाव म्हणून रांजणीची ओळख आहे. अनेकजण लग्न व अन्य कार्यक्रमांसाठी लागणारा खवा थेट गावात येऊन खरेदी करतात. पूर्वी खराब रस्ते व दळणवळणाची साधने नसल्याने दूध शहरात नेणे अवघड होते. त्यामुळे सुरू झालेला खव्याचा हा व्यवसाय आता घरातील महिलांच्या हातात असून, या पारंपरिक व्यवसायातून त्यांनी आपल्या कुटुंबांची आर्थिक भरभराट केली आहे.

व्यवसायाची निवड

  • मागील सुमारे 200 वर्षांपासून या गावात खवानिर्मितीचा व्यवसाय केला जातो. त्यामुळे या व्यवसायातील खाचाखोचा. नफा- तोट्याचे गणित लोकांना चांगल्या प्रकारे माहीत आहे.
  • हा व्यवसाय घरातील साधनांच्या साह्याने महिला करू शकतात. शहरात नेऊन विक्री करण्याचे काम घरातील पुरुष मंडळी करतात. त्यामुळे गावातील बहुतेक महिला याच व्यवसायात कार्यरत आहेत.

काय लागते या व्यवसायाला?

  • एक मोठी कढई, कवचा किंवा मोठे उलथणे, मोठे ताट किंवा टोपली, मोठी चूल (भट्टी) आणि 10 x 10 जागा.
  • भट्टीतील जळणासाठी लाकूड फाटा किंवा गॅसचा वापर केला जातो. मात्र लाकूड फाटा हा शेतातून उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर अधिक आहे.
  • दूध हे घरच्या गाईचे किंवा म्हशींचे असते. त्यामुळे अत्यंत कमी खर्चामध्ये हा व्यवसाय सुरू करता येतो.

तंत्रज्ञान व टप्पा निर्मिती

  • सध्या हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीनेच केला जातो. मात्र भविष्यात खवानिर्मितीच्या यांत्रिकीकरणाकडे वळावे लागेल. नवीन पद्धतीमुळे उत्पादन खर्चामध्ये काही प्रमाणात वाढ होणार असली तरी कष्ट कमी होणार आहेत. त्यातून अधिक खवानिर्मिती करणे शक्‍य होणार आहे.
  • यांत्रिकीकरणामध्ये मुख्य अडचण ही विजेच्या भारनियमनाची आहे. तसेच आधुनिकीकरण करताना त्यात गॅसचा वापर असणार आहे. सध्याच्या व्यावसायिक दरातील गॅसमुळे उत्पादनखर्चात मोठी वाढ होणार आहे. ते परवडणारे नाही. खव्याची किंमत वाढेल.

रांजणीचा खवा' हे तर ब्रॅंड नेम

रांजणीपासून नगर शहर 30 किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील पारंपरिक खव्याच्या व्यवसायामुळे रांजणीचा खवा प्रसिद्ध आहे. भेसळमुक्त खवा असल्याची लोकांना खात्री वाटते. बाजारपेठेत आणल्याबरोबर रांजणीचा खवा म्हटलं की तो लगेचच संपून जातो. 
  • सकाळी पाटीमध्ये खवा घेऊन ठरलेल्या हॉटेल व हलवाई व्यावसायिकांना पुरविला जातो.
  • आजपर्यंत मालाची विश्‍वासार्हता टिकवून ठेवली असून रांजणीमध्ये खव्यात कोणतीही भेसळ करणे हे पाप समजले जाते. सर्व ग्रामस्थ इमानदारीने व्यवसाय करतात.

व्यवसायातील धोके व जोखीम

  • दूध हे अधिक काळ टिकू शकत नाही. मात्र खवा दुधापेक्षा अधिक काळ राहू शकतो. मात्र अधिक काळ खवा टिकविण्यासाठी फ्रिजरची गरज असते. ग्रामीण भागामध्ये भारनियमनामुळे फ्रिजरचा फारसा उपयोग होऊ शकणार नाही, असे गावकऱ्यांचे मत आहे.
  • परिणामी, तयार केलेला खवा जास्त काळ घरात ठेवता येत नाही. रोज किंवा दिवसाआड बाजारात नेऊन त्याची विक्री करावी लागते. जास्त काळ राहिलेला खवा खराब होतो.
  • खवा उत्पादनासाठी शासकीय अनुदान नाही; परंतु दुग्धोत्पादनाचे अनुदान मिळू शकते. अनेक शेतकरी त्याचा लाभ घेतात.
  • गावात फ्रिजर असल्यास रोज बाजारपेठेत जाण्याचा खर्च कमी होऊ शकेल. तसेच खवा सुरक्षित राहून उत्पादन खर्च कमी होईल.

जोखीम कमी करण्यासाठी

  • विक्रीची जोखीम कमी करण्यासाठी अनेक शेतकरी शहरातील हॉटेल व हलवाई व्यावसायिकांकडून आधी ऑर्डर घेतात. त्यामुळे खवा आणल्याने खव्याच्या विक्रीमध्ये फारशा अडचणी येत नाहीत.
  • खव्याच्या शुद्धतेकडे आणि स्वच्छतेकडे खास लक्ष दिले जाते.

खव्याचे अर्थशास्त्र

  • एका किलो खवा बनविण्यासाठी सुमारे पाच लिटर दूध लागते.
  • गाईच्या दुधाला सध्या 18 ते 20 रुपये लिटर दर मिळतो. खव्याला शंभर ते 130 रुपये भाव मिळतो.
  • दुधापासून गॅसवर खवा तयार केल्यास परवडत नाही. मात्र जळण हे शेतातील अवशेष असल्याने काही प्रमाणात जळणाचा खर्च कमी होतो. जळणाचा खर्च न धरल्यास पाच लिटर दुधामागे 20 ते 30 रुपये खव्याच्या बाजारभावाप्रमाणे अधिक मिळतात.
  • दूध विक्रीसाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा खवा विक्री करणे सोपे असते. त्यासाठी स्वतंत्र एक माणूस गुंतून राहत नाही. त्यामुळे हे परवडत असल्याचे रांजणीतील गावकऱ्यांचे मत आहे.
  • येथे एका कुटुंबात दोन ते पाच गाई आहेत. एक गाय दिवसात 15 ते 20 लिटर दूध देते. त्यामुळे कुटुंबातून सहा ते 15 किलो खव्याची निर्मिती होते. त्यामुळे प्रति दिन सहाशे ते पंधराशे रुपये रोख रक्कम उपलब्ध होते. खुराक, व्यवस्थापन आदी खर्च वजा जाता 300 ते 800 रुपये नफा मिळतो.

महिलाच करतात सारे काम

बहुतेक सर्व कुटुंबामध्ये खवानिर्मितीचे काम महिलाच करतात. या महिला अगदी गाई- म्हशींच्या धारा काढण्यापासून भट्टी पेटवून दर्जेदार खवा बनविण्यापर्यंतची सर्व कामे करतात. खवा बनविण्यासाठी एका बाजूला योग्य आच मिळत राहणे आवश्‍यक असते, तर दुसऱ्या बाजूला दूध कढईला चिकटू नये, म्हणून सातत्याने हलवत राहावे लागते. दोन्ही बाबींकडे लक्ष ठेवत सातत्याने कालथ्याने हलवून हात गळून येतात. मात्र या महिला जिद्दीने खवानिर्मितीचे काम करतात. तयार झालेला खवा मोजून विक्रीसाठी पाठविला जातो. दुधापासून बनवलेला खवा घरातील पुरुष मंडळी शहरात नेऊन विकतात. 

बचत गटाद्वारे वाढतोय खवा व्यवसाय

खवा व्यवसायामुळे रांजणीतील महिलांच्या हाती पैसा खेळता राहतो. त्यामुळे त्यांनी बचत गटही स्थापन केला आहे. 15 महिलांचा एक बचत गट अधिक सक्रिय आहे. या बचत गटामार्फत अनेक महिलांनी गाई घेऊन आपला खव्याचा व्यवसाय वाढवला आहे. गटाच्या अध्यक्षा वंदना नाटक, सचिव सुवर्णा बापूराव चेमटे, तसेच सुवर्णा उत्तमराव चेमटे, जनाबाई थोरात, उषा थोरात, जनाबाई लिपणे, वैजयंती चेमटे, लक्ष्मी ठोंबे, सविता चव्हाण, मंगल चव्हाण, रोहिणी बारवेकर, कांता गोरे या सदस्या खवा व्यवस्थापनात पुढे असतात. आगामी काळात फ्रिजरसह अत्याधुनिक साधनांचा वापर करत एकत्रित खवा व अन्य प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्याचे त्यांचे नियोजन आहे.
(उत्तमराव चेमटे, 9421556273)
खवानिर्मितीत महिलांचे कष्ट कौतुकास्पद आहेत. त्यामुळे गावातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या संसाराला मोठा आधार मिळतो. मिळालेल्या पैशाचे योग्य नियोजनही महिला उत्कृष्टपणे करतात. भारनियमनामुळे फ्रिजर घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. मात्र हा गावातील व्यवसाय वाढविण्यासाठी फ्रिजरची आवश्‍यकता आहे. त्या दिशेने प्रयत्न चालू आहेत. 
- उत्तमराव चेमटे, माजी सरपंच
गोठ्याच्या साफसफाईपासून ते गाईंचे दूध काढून त्याचा खवा बनविण्यात गावातील महिला तरबेज आहेत. मिळालेल्या पैशातून घरखर्च सहज निघतो. घरखर्चासाठी आम्हाला पुरुष मंडळींवर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. 
- मनीषा जरे, शेतकरी महिला
खवा बनविणे तसे कष्टाचे काम. गावात लग्न होऊन आलेल्या मुलींना हे प्रारंभी अवघड वाटते; परंतु नंतर सवयीने ते काम जमू लागते. कवचा हलवून हात गळून येतो. त्यासाठी या व्यवसायाचे यांत्रिकीकरण होणे गरजेचे आहे. 
- वंदना नाटक, शेतकरी महिला

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate