অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टुटी फ्रुटीतील विजय

टुटी फ्रुटीतील विजय

 

पपई प्रक्रियेतून राशिवडेच्या तरुणाने शोधला उत्पन्नाचा स्रोत; धाडसाने उभा केला प्रकल्प

समाधानकारक दर नाही म्हणून हताश होऊन बसण्याऐवजी कोल्हापूर जिल्ह्यातील विजय तापेकर पपई प्रक्रिया उद्योगाकडे वळले. त्यासाठी प्रशिक्षण घेतले. भांडवल उभे केले. धाडसाने या उद्योगाची उभारणी केली. आज पपईतून टुटी-फ्रुटीची निर्मिती करून या व्यवसायातून त्यांनी आपली आर्थिक स्थिती मजबूत केली आहे. 
विजय तापेकर यांची वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. त्यांचे वडील गणपती तापेकर केळी, आले, झेंडू, भाजीपाला आदी पिकांची लागवड करतात. गेल्या 22 वर्षांपासून त्यांच्याकडे पपईची शेती होते. अन्य शेतकऱ्यांची तीन एकर शेतीही भाडेपट्टीने कसायला घेतली आहे. कला शाखेची पदवी घेतल्यानंतर विजय यांनीही घरची शेतीच सांभाळण्याचा निर्णय घेतला. 

व्यापाऱ्यांचा थेट विक्रीस विरोध

वडिलांसोबत गोवा बाजारपेठेत पपई, केळीची विक्री करण्यासाठी विजय जायचे. व्यापाऱ्यांना माल विकण्याऐवजी अधिक नफा मिळतो म्हणून विजय यांनी गोवा बाजारपेठेत थेट विक्री सुरू केली; मात्र तेथील व्यापाऱ्यांनी यास कडाडून विरोध दर्शविला. एकदा तर काही व्यापाऱ्यांनी त्यांच्या पपईचे नुकसानही केले. त्यानंतर विजय यांनी थेट विक्रीचा नाद सोडला. काही व्यापाऱ्यांशी संबंध वाढवून नियमित विक्री सुरू केली. 

प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल ...

विजय यांनी स्वतःच्या पपईबरोबरच अन्य शेतकऱ्यांचीही पपई खरेदी करून गोवा बाजारपेठेत विक्री सुरू केली; मात्र समाधानकारक दर न मिळाल्याने अनेकदा नुकसान व्हायचे, पपई फेकून देण्याची वेळ यायची. बाग शेवटच्या टप्प्यात असताना शिल्लक पपई टाकून द्यावी लागे. हे नुकसान एक ते पाच टनांपर्यंत व्हायचे. इतर शेतकऱ्यांचेही असेच नुकसान व्हायचे. ही शिल्लक पपई प्रक्रियेसाठी सांगली, इस्लामपूर, सातारा जिल्ह्यात पाठविण्याचाही विजय यांनी प्रयत्न केला; पण वाहतुकीचा खर्च वगळता काहीच पैसे हाती पडले नाहीत, यामुळे आपल्याच भागात प्रक्रिया उद्योग उभारण्याचा विचार विजय यांच्या मनात घोळू लागला. 

प्रकिया उद्योगाची वाटचाल

प्रक्रियेतून होणारे नुकसान टाळता येऊ शकते, हे विजय यांच्या मनात पक्के रुजले. प्रक्रिया उद्योगाचा निर्धार पक्का केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ- माणगाव येथे डॉ. हेडगेवार प्रकल्प सेवांतर्गत महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्राचे प्रशिक्षण वर्ग चालत असल्याचे समजले. त्यादृष्टीने 2004 मध्ये फळप्रक्रिया उद्योगाचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. जेवण व राहण्याच्या सोयीसुविधेसह दोन हजार रुपये खर्च आला. 

उद्योगाची उभारणी

प्रशिक्षण घेतले, पण उद्योग उभारणी कशी करणार, हाच प्रश्‍न होता. भांडवल मोठे लागते. लाखो रुपयांचे कर्ज कोणी सहजासहजी देत नाही. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी तर हजारो प्रश्‍न विचारून भेडसावून सोडले. कित्येकदा प्रक्रिया उद्योगाचा नाद सोडावा की काय, असे विजय यांना वाटायचे. अखेर एका सहकारी बॅंकेने दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. विजय बायोटेक या नावाने उद्योग सुरू झाला. बांधकामासाठी चार लाख रुपये खर्च आला. पिलिंग मशिन (साल काढणी यंत्र), स्लायझिंग, क्‍युबिंग (लहान तुकडे करणारे यंत्र), 50 लिटर क्षमतेचा बॉयलर, केटल (शिजविण्याचे पात्र) आदींच्या खरेदीसाठी सहा लाख रुपये खर्च आला. कच्चा मालाच्या खरेदीसाठी बॅंकेत खेळते भांडवल चार लाख रुपये ठेवले. असा सुमारे चौदा ते पंधरा लाख रुपये खर्च उद्योग उभारणीसाठी आला. राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योगासाठी 50 टक्के अनुदान मिळाले. यामध्ये कृषी अधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य झाले. 

अशी होते पपई प्रक्रिया

- टुटी फ्रुटी तयार करण्यासाठी तैवान 786 या जातीची कच्ची पपई लागते. 
- पपई सोलणी यंत्राच्या साहाय्याने सोलून घेऊन साल काढली जाते. 
- काप करून 18 टक्के मिठाच्या द्रावणात 21 दिवस भिजत ठेवले जातात. 
- त्यानंतर तुकडे बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊन त्यांचे क्‍युबिंग मशिनच्या साहाय्याने तुकडे केले जातात. 
- त्यानंतर केटलमध्ये स्टीमच्या साहाय्याने शिजवले जातात. 
- उकळत्या पाण्यात शिजलेले तुकडे 65 टक्के साखरेच्या द्रावणात 24 तास ठेवले जातात. 
- त्यानंतर पुन्हा केटलमध्ये शिजवून घेतले जातात. त्यात विविध प्रकारचे रंग, प्रिझरवेटिव्ह आदींचा वापर केला जातो. 
- त्यानंतर ते योग्य प्रकारे वाळवण्यात येतात, त्यानंतर पॅकिंग होते. 

टुटी फ्रुटीचे उत्पादन

टुटी फ्रुटीचे उत्पादन - दररोज अंदाजे 300 किलो 
यासाठी कच्चा माल - 700 किलो पपई 

महिन्याला - पाच ते सहा टन 
वार्षिक - सुमारे 50 टन 

300 किलो टुटी फ्रुटीच्या उत्पादनाचा खर्च (एका दिवसासाठी) 
पपई 700 किलो (दर 4 रुपये प्रति किलो) ......2800 रुपये 
यासह साखर, मीठ, मजुरी, इंधन, पॅकिंग मटेरिअल, रसायने, वीज, पाणी, वाहतूक आदी मिळून 
अंदाजे एकूण खर्च 12 हजार रुपये. घटकांचे दर कमी- जास्त होतील तसा उत्पादन खर्च वाढतो. खर्चाच्या 15 टक्के मार्जिन पकडून दर ठरविला जातो. 

विक्री - प्रति किलो - 40 ते 50 रुपये 

अद्याप बॅंकेचे कर्ज आहे, त्यामुळे 15 हजार रुपयांचा महिन्याचा हप्ता येतो. दिवसाला हप्ता गृहीत धरून येणारा सर्व खर्च वजा जाता दिवसाला हजार रुपये निव्वळ नफा मिळतो. 

टुटी फ्रुटीची विक्री -

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील बेकरी व्यावसायिक, पान मसाला दुकानदार, कोल्ड्रिंक व्यावसायिक, होलसेल मालाचे विक्रेते टुटी फ्रुटीची खरेदी करतात. आठवड्यातून एकदाच सर्व मालाची डिलिव्हरी जागेवर केली जाते, यामुळे वाहतूक खर्च व रोजच्या मालाची ने- आण करण्याचा त्रास वाचतो. 

पपईची गोव्याला विक्री

उन्हाळ्यात पपई लगेच पिकते. अशी पपई टुटी फ्रुटीला वापरता येत नसल्याने गोवा बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविली जाते. आठवड्यातून दोन वेळा अंदाजे पाच टन माल गोवा व मुंबई बाजारपेठेला पाठवला जातो. स्थानिक शेतकऱ्यांकडून प्रति किलो चार ते सहा रुपये दराने मालाची खरेदी होते. बाजारपेठेत सात ते 12 रुपये प्रति किलो दर मिळतो. रमझानमध्ये हा दर 20 ते 30 रुपयांपर्यंतही जातो. 

विजय तापेकर - 9420582444 
राशिवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate