অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुग्धव्यवसायाचे मॅनेजमेंट

दुग्ध व्यवसाय वर्षभर किफायतशीर पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी रोजचे दूध संकलन किती हवे, गाई व कालवडींचे प्रमाण किती हवे, याचा अभ्यास नागेश श्रीकांत धुमाळ यांनी केला. सातारा जिल्ह्यात आदर्की बुद्रुक (ता. फलटण) येथील 27 वर्षीय या युवकाने याच उद्दिष्टातून प्रभावी व्यवस्थापन व सुधारित तंत्राच्या जोरावर या व्यवसायात आत्मविश्‍वासाने पावले टाकली आहेत. नोकरीतील चांगल्या पगाराएवढे उत्पन्न त्यांना मिळू लागले आहे.
सातारा ते फलटण मार्गावर साताऱ्यापासून 35 किलोमीटरवर आदर्की बुद्रुक गाव लागते. गावच्या एकूण क्षेत्रापैकी 65 टक्के क्षेत्र बागायती आहे. ऊस व डाळिंब ही येथील मुख्य पीक पद्धत. गावातील प्रगतिशील शेतकरी श्रीकांत धुमाळ यांना दोन मुलगे. थोरला निखिल शेतीत, तर धाकटा नागेश दुग्ध व्यवसायाबरोबर ट्रॅक्‍टर वाहतुकीचा व्यवसाय सांभाळतो. धुमाळ यांची पाच एकर बागायती व चार एकर जिरायती शेती आहे. विहिरीतील पाण्याच्या आधारावर ते डाळिंब, ऊस, टोमॅटो, मका, कडवळ घेतात.

पंजाबातील दौऱ्यातून दृष्टी बदलली

नागेश शिक्षण घेत कोल्हापूर येथील एका कुरिअर कंपनीत नोकरीस होते. सुट्टीच्या काळात दुग्ध व्यवसाय पाहायचे. मध्यंतरी फलटण येथील गोविंद दूध डेअरीच्या माध्यमातून पंजाब दौऱ्यात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. तेथील तीनशे ते चारशे गाईंचे मुक्त पद्धतीचे आधुनिक गोठे पाहिल्यानंतर आपण किमान दहा गाईंचे व्यवस्थापन याप्रकारे करू शकत नाही का, असा प्रश्‍न त्यांना पडला. अखेर एकूण परिस्थिती पाहता नोकरी सोडून पूर्णवेळ दुग्ध व्यवसायात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गावातील समविचारी मित्र अमोल धुमाळ यांनी त्यांना प्रोत्साहन देत त्यासाठी प्रवृत्त केले.

नागेश यांचा दुग्ध व्यवसाय

  1. नागेश यांनी दुग्ध व्यवसायातील प्रत्येक टप्प्यावरील बारकावे जाणून वाटचाल केली आहे. सध्या गोठ्यात सहा गाई (एक जर्सी व उर्वरित होल्स्टिन फ्रिजीयन), चार कालवडी व म्हैस आहे. सुरवातीला नोकरीतील काहीसे उत्पन्न व्यवसायासाठी वापरले. त्यातून छोटे वासरू व गाय, टप्प्या-टप्प्याने दोन गाई विकत घेतल्या. गोठ्यात पैदासही केली.
  2. राहत्या घरापासून अर्धा किलोमीटरवर शेतात गोठा आहे. दररोज रात्री नागेश गोठ्यातच मुक्कामी राहतात. सकाळी सहा वाजता सुरवातीला गोठा स्वच्छ करतात. त्यानंतर गाई बंदिस्त शेडमध्ये घेऊन यंत्राच्या साहाय्याने दूध काढणी होते. भुसा, सरकी, शेंगदाणा पेंड एकत्रित करून दूध उत्पादनानुसार गाईंना दिले जाते. गाभण, दुधाळ आणि भाकड गाईंच्या वर्गवारीनुसार खुराकाचे प्रमाण राहते. 70 टक्के ओला व 30 टक्के कोरडा चारा कुट्टी करून दिला जातो.

मुक्‍त संचार गोठा पद्धतीचा वापर

दुग्ध व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब केला आहे. या पद्धतीत गाईंची चलनक्रिया होत असल्याने त्या माजावर आल्याचे वेळेत लक्षात येते. घरच्या शेतातील चाऱ्याचे व्यवस्थित नियोजन केले आहे. गाईंच्या दूध उत्पादन क्षमतेनुसार पशुखाद्य दिले जाते. नागेश आपल्या वडिलांसमवेत गोठ्यातील व्यवस्थापन सांभाळतात, त्यामुळे बाहेरील मजुरांवरील खर्च नाही. कृत्रिम रेतनाद्वारे जातिवंत कालवडींची पैदास केली जाते. दूध काढणी यंत्र, कुट्टी मशिनचा वापर केला जातो. गोविंद डेअरीचे सतत मार्गदर्शन मिळते. सकाळी व सायंकाळी सहा ते आठ या वेळेत गोठ्यातील स्वच्छता, चारा, खुराक व दूध काढणी होते.
ओल्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी 20 गुंठ्यांत डीएचएन- 6 चारा पीक, मका व कडवळ आहे. कोरड्या चाऱ्यासाठी कडबा व वाळलेल्या मक्‍याचा वापर होतो. जिरायती क्षेत्रात दरवर्षी कडब्यासाठी ज्वारी असते. चारा खाल्ल्यानंतर गाईंना पाणी पिण्यासाठी सोडले जाते. चारा, खुराक व दूध काढणीपर्यंत बंदिस्त गोठ्यात गाई असतात, त्यानंतर त्या मुक्त संचार करतात.
गाईंना लाळ्या खुरकूत, फऱ्या, घटसर्प यांचे लसीकरण होते. वर्षातून तीन वेळा जंतनाशक दिले जाते. पूर्वी बंदिस्त गोठ्यात आजारांचे प्रमाण जास्त असायचे. औषधोपचारावर जास्त खर्च व्हायचा. शारीरिक कष्ट जास्त व्हायचे. त्यामुळे गाईंची स्वच्छता व देखभाल जास्त करावी लागे. मुक्तसंचार पद्धतीच्या वापरानंतर व्यवस्थापन अधिक सोपे झाले आहे. आजारांचे प्रमाण कमी झाले. त्याचबरोबर दुधाचे उत्पादन वाढले. 30 बाय 45 फूट आकाराचा पूर्वीचा बंदिस्त गोठा आहे. त्यालगत एका बाजूने 30 बाय 50 फूट आकाराचा मुक्तसंचार गोठा विस्तारित केला आहे. लाकडी बांबू व तारेची जाळी वापरून गोठ्यास "कंपाउंड' केले आहे.

दुग्ध व्यवसायाचा ताळेबंद

गाईंच्या दूध देण्याच्या उच्चांकी काळात प्रतिगाय प्रतिदिन सरासरी 20 ते 22 लिटरपर्यंत दूध मिळते. 
वार्षिक सरासरी प्रतिदिन 12 लिटरच्या आसपास, तर एकूण संकलन (दररोजचे) 65 ते 70 लिटरपर्यंत होते. गोविंद डेअरीला विक्री होते. प्रतिलिटर 24 रुपये दर मिळतो. दररोज सुमारे 1560 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. 
रोज खर्च वजा जाता 800 ते एक हजार रुपयांपर्यंत नफा हाती राहतो.
दहा गाई व पाच कालवडी अशी माझ्या व्यवसायाची संकल्पना आहे. म्हणजे दूध आटलेल्या गाई विकणे, काही कालवडी विकणे व काही आपल्याजवळ ठेवणे शक्‍य होते. सध्या हे गुणोत्तर सहास चार आहे, त्यामुळे कालवडी विकण्याचा अद्याप विचार नाही. संपूर्ण वर्षात दिवसाचे संकलन 65 ते 60 लिटरपेक्षा कमी येणार नाही असे नियोजन ठेवूनच व्यवस्थापन करतो. हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या मी किफायतशीर केला आहे. 
नागेश धुमाळ

सेंद्रिय खताच्या वापरातून

उत्पादनात वाढदरवर्षी 20 ते 22 ट्रेलर उपलब्ध शेणखताचा शेतात वापर होतो. मुक्तसंचार गोठ्यात आसपासच्या शेतातील पाचटही वापरले जाते, त्यामुळे गाईंना खाली बसण्यास आरामदायी वातावरण तयार झाले. पाचटावर गाईंचे शेण-मूत्र पडते. यात दर पंधरा दिवसाला गुंठ्यास अर्धा लिटर उपयुक्त लाभदायक सूक्ष्म जिवाणूंचे मिश्रण फवारले जाते. तयार झालेले हे खत शेतात वापरले आहे. पूर्वी धुमाळ यांना 20 गुंठ्यांत टोमॅटोचे आठ टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. सेंद्रिय खताचा वापर वाढवल्यापासून रासायनिक खतांवरील खर्च कमी झाला आहे. 20 गुंठ्यांत उत्पादन 12 टनांवर पोचल्याचे लक्षात आले. फळाची गुणवत्ताही वाढली.

नागेश धुमाळ - 9096963234.

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate