অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुग्ध व्यवसायातून यशाकडे

जिल्हा ठिकाण असलेल्या वाशीमपासून अवघ्या चार किलोमीटरवरील वाळकी मजरे गावाने दुग्ध व्यवसायात मोठी झेप घेतली आहे. वाशीम नगरपालिका हद्दीत समावेशीत या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे लोकसंख्येच्या सुमारे दुप्पट दुधाळ जनावरे येथे आहेत. कधीकाळी माथाडी कामगारांचे समजल्या जाणाऱ्या या गावाने दुग्ध व्यवसायाच्या बळावर धवल यश साधले आहे. 
विदर्भात शेतीबरोबरच पूरक व्यवसायातही आता वेगवेगळे प्रयोग घडू लागले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्राची दुग्ध व्यवसायात आघाडी असली तरी विदर्भातील शेतकरीही काळाची पाऊले ओळखून या व्यवसायात प्रगती साधण्याची धडपड करीत आहेत. वाशीम नगरपालिका हद्दीत समावेशीत वाळकी मजरे या गावाची लोकसंख्या सुमारे 547 च्या घरात आहे. येथील बहुतांश कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती कधीकाळी हातावर पोट असण्यासारखी होती. सकाळी कामाला जाणे आणि त्या बळावर संध्याकाळी धान्याची वा खाण्याची सोय करणे अशी स्थिती होती. येथील बहुतांश ग्रामस्थ बाजार समितीत माथाडी कामगार म्हणून कामास होते. काही ग्रामस्थ शेतमजुरीतील उत्पन्नातून कुटुंबाचा गाडा हाकत ही परिस्थिती बदलायची असे येथील ग्रामस्थांनी ठरवले. गाठीशी जुळलेल्या पैशातून दुग्ध व्यवसायात उतरायचे असे त्यांनी निश्‍चित केले. त्याप्रमाणे आर्थिक गुंतवणूक केली. सुरवातीला एक, दोन म्हशींच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला. वाशीम हे त्या वेळचे तालुक्‍याचे तर आताचे जिल्ह्याचे ठिकाण जवळ असल्याने दूध विक्रीकरिता बाजारपेठ शोधणे तसे अवघड नव्हते. इच्छा तेथे मार्ग एवढेच उद्दिष्ट घेऊन ग्रामस्थांची वाटताल सुरू झाली होती. आता हळूहळू ग्रामस्थांना या व्यवसायात आत्मविश्‍वास येऊ लागला आहे. कौशल्य व व्यवस्थापनाच्या जोरावर आर्थिक स्थैर्याकडे त्यांनी वाटचाल केली आहे. याच व्यवसायात त्यांच्या पुढील पिढ्याही राबू लागल्या आहेत.

वैयक्तिक विक्रीचा पर्याय

गावातील दुधाची विक्री किरकोळ स्वरूपात घरगुती ग्राहक किंवा हॉटेल व्यावसायिकांना होते. सरासरी 40 रुपये प्रति लिटर असा दर त्याला मिळतो, असे गावातील वयोवृद्ध शेतकरी शहाजी वाळके यांनी सांगितले. शासकीय दुग्ध योजनेत दर कमी मिळत असल्याने त्याऐवजी खासगी ग्राहक किंवा हॉटेल व्यावसायिकांना विक्रीसाठी प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले.

घरच्या शेतीतून चाऱ्याची उपलब्धता

दुग्ध व्यवसायातून पैसा खुळखूळू लागल्याने तो शेतीत गुंतविण्यात आला. कधीकाळी मजुरीवर जाणाऱ्या ग्रामस्थांकडे आता वैयक्‍तिक मालकीची शेती झाली आहे. एक ते दहा एकरांपर्यंत मालकी हक्क असलेला शेतकरी गावात आहे. त्यामध्ये सोयाबीन, हरभरा, गहूयिासारखी पिके घेतली जातात. पीक काढणीचे अवशेष, काड यांचा उपयोग जनावरांना चारा म्हणून केला जातोच. शिवाय मका, दादर ज्वारी यासारखा हिरवा चाराही उपलब्ध केला जातो. प्रसंगी अशा चाऱ्याची खरेदी चारा उत्पादकांकडून आवश्‍यकतेच्या प्रमाणात केली जात असल्याचे दत्ता वाळके यांनी सांगितले.

आणि अर्थकारण बदलले

बाजार समितीत त्यासोबतच अन्यत्र माथाडी कामगार म्हणून वाळकी मजरे गावातील अनेकांवर राबण्याची वेळ येत होती; परंतु दुग्ध व्यवसायातील सातत्यामुळे या गावाचे आज अर्थकारण पालटले आहे. गावाने प्रगतीकडे झेप घेतल्याचे गावात प्रवेश करता क्षणीच लक्षात येते. विदर्भातील या गावाने वेगळेपण चोखाळत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या गावात लोकसंख्येच्या दुप्पट म्हणजे एक हजार व त्या आसपास म्हशी आहेत. त्यामध्ये जाफराबादी व मुऱ्हा जातींच्या म्हशींचा समावेश आहे. त्यांची सरासरी उत्पादकता दरदिवशी सात लिटर अपेक्षित धरल्यास गावचे दररोजचे दूध संकलन 7000 लिटरपर्यंत आहे. सदाशिव वाळके
माझ्याकडे सहा मुऱ्हा जातीच्या म्हशी आहेत. सरासरी 57 ते 60 हजार रुपये प्रति म्हशीची खरेदी करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे शुक्रवारी भरणाऱ्या बाजारातून या म्हशी आणल्या आहेत. प्रति म्हशीची दूध देण्याची दररोजची क्षमता 12 लिटरपर्यंत आहे. त्यांना पाच किलो ढेप (100 रुपये), 20 किलो (100 रुपये) वाळलेला चारा याप्रमाणे दररोज आहार दिला जातो. 40 रुपये प्रति लिटर असा दर दुधाला मिळतो. घरचे राबणारे सदस्य असतील तर निश्‍चितच अशा व्यवसायातून मोठे यश साधता येते, असा विश्‍वास मला गवसला आहे.

सोपान वानखडे- 9767776260
"मुऱ्हा व जाफराबादी म्हशींचे संगोपन आम्ही करतो. दररोज सरासरी प्रति म्हैस 10 लिटर दुधाचे उत्पादन मिळते. वाशीम येथील ग्राहकांना सायकलद्वारा दररोज दूध पोचविले जाते. या व्यवसायात येण्यापूर्वी मी शेतमजुरी करीत होतो. गावातील अन्य शेतकऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत दुग्ध व्यवसायात उडी घेतली आणि कधीकाळी भूमिहीन अशी माझी ओळख दोन एकर शेतीच्या मालकीने पुसली गेली. या व्यवसायातून आर्थिक स्थैर्य मी मिळवले आहे.
मारोती वानखडे- 9552263233
संपर्क - दत्ता वाळके- 996043612

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate