অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुग्धोत्पादन ठरले स्थैर्याचे कारण

नोकरीऐवजी दुग्धोत्पादनासारख्या शेतीपूरक व्यवसायात उतरून वाशीम जिल्ह्यातील फाळेगाव (कोरडे) येथील बालाजी कोरडे यांनी आपली आर्थिक स्थिती स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न केला आहे. पारंपरिक शेतीची सुधारणा करताना त्याच वेळी पूरक व्यवसायाची निवड करून नव्या पिढीतील शेतीचे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.
वाशीम या जिल्ह्याच्या ठिकाणापासून काही किलोमीटर अंतरावरील फाळेगाव (कोरडे) येथील बालाजी कोरडे यांची वडिलोपार्जित अकरा एकर शेती आहे. बालाजी व त्यांचे धाकटे बंधू गणेश मिळून शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात. शेताजवळील विहिरीच्या बळावर सोयाबीन, तूर यांसारखी पारंपरिक पिके घेण्यावर त्यांचा भर होता; परंतु नजीकच्या काळात नाबार्डच्या पुढाकारातून गावकुसात पाणलोटाची कामे झाली, परिणामी भूजल पातळीत वाढ होऊन त्यांनी हरभरा लागवडीकडे लक्ष केंद्रित केले. हरभऱ्याच्या प्रायोगिक तत्त्वावरील एक एकर क्षेत्रातून त्यांना एकरी सहा क्‍विंटल उत्पादन मिळाले. 3400 रुपये प्रति क्‍विंटल दर मिळाला. सुमारे 15 हजार 400 रुपयांचा निव्वळ नफा त्यांना त्यातून झाला. पुढील वर्षी हरभऱ्याचे लागवड क्षेत्र तीन एकरांवर वाढविले. या वर्षी एकरी एक क्‍विंटल वाढ मिळाली. शेणखताच्या वापरावर भर, तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब यामुळे उत्पादकतेत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. पिकाच्या व्यवस्थापनावर एकरी पाच हजारांवरील खर्च अपेक्षित धरता 18 हजार रुपयांचे एकरी उत्पन्न मिळाले. 

सोयाबीन पीक पद्धतीत सातत्य

वाशीम जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक आहे. सन 1996 पासून कोरडे कुटुंबीयांनी या पिकाच्या लागवडीत सातत्य ठेवले आहे. कृषी विज्ञान केंद्रातील एका चर्चासत्रात सोयाबीन पिकातील खत व्यवस्थापन त्यांनी समजावून घेतले. सन 2011 या वर्षापासून त्यांनी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करताना संतुलित खत वापर सुरू केला आहे. पिकाला गंधकयुक्त खताचा वापरही आवर्जून केला जातो. एकूण व्यवस्थापनातून त्यांना एकरी नऊ क्‍विंटल उत्पादन मागील वर्षी मिळाले. प्रति क्विंटल 3300 रुपये दराने सोयाबीनची विक्री करण्यात आली. त्यानुसार एकरी 29 हजार 700 रुपयांचे उत्पन्न मिळाले. उत्पादन खर्च वजा जाता सुमारे 23 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. सोयाबीनमध्ये तुरीचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव केला जातो, त्यामुळे खत व अन्य बाबींवर होणारा खर्च आपसूकच कमी होतो. सोयाबीनच्या आठ तासांत तुरीची एक तास असते. तुरीचे उत्पादन एकरी तीन क्‍विंटल मिळाले आहे. प्रति क्विंटल 4500 रुपये दराने मालाची विक्री वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात आली. त्यानुसार 13 हजार 500 रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

दुग्धोत्पादनात उल्लेखनीय वाटचाल

"नाबार्ड'च्या सहकार्याने गावात पाणलोटाची कामे करणाऱ्या "मित्र' या अशासकीय संस्थेच्या वतीने गावात शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यासोबतच 2010 मध्ये नगर जिल्ह्यातील हिवरेबाजार, मसवंडी, राळेगणसिद्धी या गावांत अभ्यास दौरे काढण्यात आले. दौऱ्यांदरम्यान पाणलोटाच्या कामांची पाहणी करण्यासोबत शेतकऱ्यांनी त्या भागातील दुग्धोत्पादकांच्या प्रकल्पांनाही भेट दिली. त्यातूनच प्रेरणा घेत बालाजी यांनी दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरवले. बालाजी सुरवातीला खासगी नोकरीत होते. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून कुटुंबाचा खर्च भागविणे अवघड जात होते. परिणामी त्यांनी दुग्ध व्यवसायात राबण्याचा निर्णय घेतला. 
आपल्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करीत गावरान म्हशींची खरेदी त्यांनी गावातीलच एका शेतकऱ्याकडून केली. मिळणाऱ्या दुधाची थेट विक्री न करता आठवड्याला तूपनिर्मिती त्यांनी सुरू केली. महिन्याकाठी चार किलो तुपाची विक्री वाशीम या जिल्ह्याच्या ठिकाणी केली. त्यातून गाठीशी जुळलेले पैसे व शेतीतून मिळालेल्या पैशांतून ऑगस्ट 2010 मध्ये नव्याने दोन मुऱ्हा जातीच्या म्हशींची खरेदी केली. एका राष्ट्रीय बॅंकेच्या वाशीम शाखेकडे त्यांनी पाच लाख रुपये कर्जाचा प्रस्ताव दिला. बॅंकेने 35 हजार रुपयांप्रमाणे प्रत्येक म्हशीसाठी कर्ज रकमेची तरतूद केली. चांगल्या दर्जाच्या मुऱ्हा म्हशींची 45 हजार रुपयांप्रमाणे खरेदी बालाजी यांनी करीत उर्वरित पैशांची सोय स्वतः केली. आजमितीस त्यांच्याकडे एकूण सहा म्हशी व एक होलस्टीन फ्रिजीयन जातीची गाय आहे, ती नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून 34 हजार रुपयांना खरेदी करण्यात आली. गावापर्यंत वाहतुकीसाठी चार हजारांवर खर्च आला. सहा म्हशींपासून 40 लिटर, तर गाईपासून बारा लिटर याप्रमाणे दुधाचे दैनंदिन संकलन होते. मुऱ्हा जातीच्या म्हशींची दूध उत्पादकता गावरान दुधाळ जनावरांच्या तुलनेत अधिक आहे. दूध देण्याचा काळही जास्त असल्याचे बालाजी सांगतात. 

गोठा संगोपन व जनावरांचे आरोग्य

गोठा 64 फूट लांब व 52 फूट रुंद आहे. पावणेचार लाख रुपये खर्च गोठा उभारणीसाठी आला. त्यातील एक लाख रुपयांची सोय त्यांनी बॅंक कर्जातून केली. गोठ्यातील वातावरण थंड राहावे याकरिता कूलरची व्यवस्था आहे. गोठ्याच्या भिंती चार फूट असून, त्यावर हिरवी नेट लावण्यात आली आहे. 
वाशीम येथील पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सव्वालाखे यांचे मार्गदर्शन जनावरांचे आरोग्य जपण्यासाठी होते. फऱ्या, तोंडखुरी, पायखुरी यासाठी मे ते जून या काळात लसीकरण केले जाते. जनावरांसाठी पाण्याची सोय गोठ्यालगतच हौद बांधून केली आहे. जनावरांना सकाळी सहा, दुपारी बारा, दुपारी चार आणि रात्री आठ वाजता या नियोजित वेळेत पाणी पाजण्यासाठी गोठ्याबाहेर आणले जाते. सकाळी पाच, संध्याकाळी चार या जनावरांच्या आहाराच्या वेळा आहेत. हरभरा कुटार, गव्हांडा, गवत, कडबा, सरकी पेंड, ढेप याप्रमाणे खाद्य दिले जाते. यातील बहुतांश चाऱ्याची उपलब्धता घरच्या शेतातूनच होते. बाजारातील चाऱ्यावर वर्षाकाठी दहा हजार रुपयांचा खर्च होतो. 

दूध उत्पादन व विक्री

मुऱ्हा जातीच्या प्रति म्हशीपासून सरासरी नऊ ते दहा लिटर दूध मिळते. दिवसाकाठी एकूण 50 लिटर दुधाचे संकलन होते. वाशीमला ठरावीक ग्राहकांकडे दररोज पहाटे दुधाची विक्री 40 रुपये प्रति लिटर दराने केली जाते. गाईचे दूध दररोज 12 लिटर मिळते. शासकीय दुग्ध योजनेला त्याची विक्री 18 ते 20 रुपये प्रति लिटर या दराने होते. यानुसार 2200 रुपये प्रति दिन या व्यवसायातून अर्थार्जन होते. दररोज सकाळी दुचाकीने दूध ग्राहकांच्या दाराशी पोचविले जाते. जनावरांचे शेणखत जमिनीची सुपीकता वाढविण्यास उपयोगी ठरत आहे. बालाजी यांनी शेतीपूरक व्यवसायात केलेली वाटचाल विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच आशावाद निर्माण करणारी आहे. 
संपर्क - 
बालाजी कोरडे 
९७६७६२०८३३

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate