অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेशीम कोषनिर्मितीत सातत्य

सातारा जिल्ह्यात दुष्काळी खटाव तालुक्‍यातील शेतकरी निसर्गाशी दोन हात करून शेतीतून अर्थार्जन करीत आहेत. तालुक्‍यातील येरळवाडी येथील सदाशिव लक्ष्मण थोरात यांनी गेल्या सुमारे पाच वर्षांपासून रेशीम शेतीत व कोष उत्पादनातही सातत्य ठेवीत दुष्काळात आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा चांगला पर्याय शोधला आहे. येरळवाडी (ता. खटाव) येथील सदाशिव लक्ष्मण थोरात यांची अडीच एकर जिरायती शेती. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. भाजीपाला, सोयाबीन, कापूस ही पिके घेतली जात होती.

मात्र कायम दुष्काळी भाग असल्याने प्रगतीवर मर्यादा येत होत्या. थोरात यांनी काही काळ खासगी कंपन्यांत कोकण भागात नोकरीही केली. पण अखेर आपल्या गावी ते परतले. घरी दुग्ध व्यवसाय सुरू करून आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. दुकान व्यवसायही केला. पण काही ना काही कारणाने मनासारखे यश मिळत नव्हते. दुष्काळात तेरावा महिना या उक्तीनुसार वादळी वाऱ्याने घरावरील पत्रा उडून जाऊन नुकसान होणे, पायाला दुखापत होणे यासारख्या समस्यांची भर पडली. हे सर्व म्हणजे मनोधैर्य खचण्याचाच प्रकार होता. पण थोरात यांनी वृत्ती स्थिर ठेवून हतबल न होता परिस्थितीतून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला.

रेशीम शेतीकडे सुरू झाला प्रवास


दरम्यानच्या काळात शेजारच्या गावातून रेशीम शेतीविषयी माहिती मिळाली. त्यातून आश्‍वासक काही मिळेल असे वाटल्याने वाई येथील जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधून त्याविषयी परिपूर्ण तांत्रिक माहिती घेतली. यशस्वी रेशीम उत्पादकांचे अनुभव, अयशस्वी शेतकऱ्यांच्या समस्या अशी सखोल माहिती घेतली. अखेर या शेतीत उतरण्याचा निर्णय घेतला.

सुरवातीला अपयश, पण पुढे आशावादी वाटचाल


सन 2008 मध्ये एक एकर तुती लागवडीपासून रेशीम शेतीचा श्रीगणेशा केला. मातीपरीक्षण करून घेतले. शेजारी असलेल्या गणेशवाडी गावातून तुतीची रोपे आणली. पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ठिबक सिंचनाचा वापर सुरू केला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सुरवातीस साधेपणाने ताडपत्री व प्लॅस्टिक कागदाचा वापर करून शेड उभे केले. सुरवातीचा अनुभव कमी पडला. या शेडचे नुकसान झालेच, शिवाय आवश्‍यक कोषांचे उत्पादन मिळाले नाही.व्यवसाय बंद करावा असे क्षणभर वाटले. मात्र खचून न जाता रेशीम शेती यशस्वी करायची असा निश्‍चय थोरात यांनी केला. त्यासाठी दूध देणाऱ्या म्हशीची विक्री घरातून विरोध असतानाही नाइलाजाने करावी लागली. त्या वेळी डोळ्यातून अक्षरशः पाणी आले, मात्र उपाय नव्हता. त्यातून आलेले पैसे व अन्य ठिकाणाहून घेतलेल्या रकमेतून 2009 मध्ये 20 बाय 40 फुटांच्या नवीन पक्‍क्‍या शेडची उभारणी केली. 
व्यवस्थापन पुन्हा चांगल्या प्रकारे सुरू केले. त्या वर्षी उत्पादन मिळाले. किमान 125 रुपये तर कमाल 200 रुपये प्रति किलो दर रेशीम कोषांना मिळाला. सरासरी 160 रुपये किलो दराने एक लाख 56 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

आत्मविश्‍वास वाढीस लागला


या उत्पादनापासून थोरात यांनी रेशीम शेतीत वेग घेतला. त्यानंतर आत्तापर्यंत त्यांनी रेशीम शेतीत सातत्य ठेवत कोष उत्पादनाच्या आकड्यांतही सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षी हवामान, पाणी, पाला परिस्थिती या नुसार वर्षाला चार, सहा ते अगदी नऊपर्यंत बॅचेस घेतल्या जातात. 
मागील वर्षीच्या दुष्काळात तुती पिकाच्या सिंचनासाठी मोठी टाकी खरेदी करून त्यामध्ये मिळेल तसे पाणी आणून त्याची साठवणूक केली. हे पाणी ठिबकद्वारे देऊन तुती जगवली. दुष्काळात काही किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणूनही बाग जगवावी लागते असे थोरात म्हणाले. परंतु आजपर्यंत केलेल्या कष्टांचे फळ त्यांना चांगले मिळू लागले आहे.

थोरात यांच्या रेशीम शेती व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी

  • थोरात म्हणतात की रेशीम शेतीत 90 टक्के महत्त्व पाला व्यवस्थापनास तर 10 टक्के अन्य व्यवस्थापनास आहे. तुतीचा पानांचा दर्जा टिकविण्यावर सर्वाधिक भर असतो. वेळापत्रकानुसार काटेकोरपणे अळ्यांना पाला घातला जातो.
  • रेशीम शेडचे दररोज बारकाईने निरीक्षण केले जाते. दिलेला पाला शिल्लक राहिला असेल तर तो का राहिला?
  • अळ्यांना कसला प्रादुर्भाव झाला आहे का, ते पाहिले जाते. रोगग्रस्त अळ्या बाजूला काढून त्यांचा नायनाट केला जातो.
  • अळ्यांच्या वाढीनुसार वेळेत जागा वाढ केली जाते.
  • शेडमध्ये स्वच्छता ठेवली जाते.
  • प्रत्येक बॅच घेतल्यानंतर शेड निर्जंतुकीकरण केले जाते.
  • तुतीच्या क्षेत्रात माती परीक्षण केले जाते.
  • हवामानानुसार शेडमधील वातावरणात बदल केला जातो.
  • अळ्यांपुढे फांदी-पाला ठेवताना तो एकसारखा सर्वांना मिळावा यासाठी बेडची उंची एकसारखी ठेवण्याला महत्त्व दिले जाते.
  • अळ्यांचा आकार एकसारखा राहील अशी काळजी घेतली जाते.

काही वैशिष्ट्ये

  • थोरात उत्पादनाचे शास्त्र सांगताना म्हणाले की प्रति बॅच मी 100 अंडीपुंजांची घेत असेन तर त्यातून शंभर रेशीम कोषांचे उत्पादन घेतो. यापूर्वी 100 अंडीपुंजांपासून 118 ते 132 किलोपर्यंतही कोष उत्पादन घेतले आहे.
  • कोषांची प्रतवारी केली जात असल्यामुळे त्यांना चांगला दर मिळतो.
  • रेशीम शेतीत मजुरांचा वापर न करता कुटुंबातील सर्व सदस्य (आई, पत्नी, दोन मुले) काम करतात. त्यामुळे घरातील वातावरण एकोप्याचे राहते.
  • थोरात यांच्या रेशीम शेतीला अनेक शेतकरी भेट देतात. त्या सर्वांना ते मोफत मार्गदर्शन करतात.

थोडक्‍यात ताळेबंद


वर्ष.................. अंडीपुंज...........कोष उत्पादन..........सरासरी दर(किलो)...........
2009-10..............970...................980................160.................. 
10-11..............1000...............1130.................225............. 
11-12.............1240...............1380..................200............. 
12-13.............400................440..................350................ 
(सप्टेंबरअखेर)

व्यापारीच जागेवरून खरेदी करतात

रेशीम कार्यालयातून अंडीपुंज दिले जात असले तरी कोष तिथे द्यावे असे बंधन नसल्यामुळे व खासगी दर चांगले असल्याने खासगी व्यापाऱ्यांकडे कोषांची विक्री केली जाते. प्रतवारी व दर्जाला महत्त्व दिल्याने अल्पावधीत व्यापाऱ्यांचा विश्‍वास संपादन केला. कोष देण्यासाठी मार्केटमध्ये जावे लागत नाही, व्यापारी घरी येऊन कोष घेऊन जातात, इतकी गुणवत्ता थोरात यांनी कोषनिर्मितीत जपली आहे. सध्या किलोला 650 रुपये दर कर्नाटकातील प्रसिद्ध रामनगरम येथे मिळत असल्याने यंदा तेथे जाऊन विक्रीचे नियोजन असल्याचे थोरात म्हणाले.

केवळ एक एकरातील रेशीम शेतीतून मुलाला "इंजिनिअरिंग'च्या शिक्षणाला तर मुलीला अकरावी (विज्ञान) वर्गात दाखल करणे शक्‍य झाले. कठीण परिस्थितीत कुटुंबातील सर्व सदस्य पाठीशी उभे राहिल्याने दुष्काळातही रेशीम शेती यशस्वी झाल्याचे थोरात म्हणाले. जिल्हा रेशीम कार्यालयातील विनीत पवार, आर. पी. भोसले, टी. ए. शिर्के यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. 

संपर्कः सदाशिव थोरात - 9881032828.

लेखक : विकास जाधव

माहिती संदर्भ : अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate