অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पानमळा, रेशीम, दुग्ध व्यवसाय

सातारा जिल्ह्यातील शेणोली (ता. कऱ्हाड) येथील लोंढे कुटुंबीयांनी पानमळा, रेशीम शेती व दुग्ध व्यवसाय या तिन्ही आघाड्यांवर यशस्वी वाटचाल चोखाळली आहे. सातत्यपूर्ण कष्ट, चिकाटी व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब हा लोंढे पिता-पुत्रांच्या शेतीचा मूलमंत्र ठरला आहे. 

सातारा जिल्ह्यातील शेवटचे व सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर शेणोली गाव आहे. येथील आनंदराव लोंढे शेतीनिष्ठ शेतकरी. पानमळा हे त्यांचे मुख्य पीक, तर त्याच्या जोडीला रेशीम व दुग्ध व्यवसाय सांभाळून आपली शेती त्यांनी सक्षम केली आहे. त्यांची माळरान स्वरूपाची तीन व काळी कसदार एक एकर शेती आहे. सध्या एक एकर 20 गुंठे ऊस, एक एकर तुती लागवड, 20 गुंठे पानमळा, चारा पीक व नवीन तुती लागवड व त्यात भुईमूग आंतरपीक आहे. सुमारे 1992-93 पासून या कुटुंबाला पानमळा शेतीचा गाढा अनुभव आहे. शेतीला दर आठवड्याला खेळत्या भांडवलाची प्राप्ती होण्याच्या दृष्टीने या पानमळ्याची उभारणी त्यांनी केली आहे. सन 2010 मध्ये नवीन अडीच हजार खाऊच्या पानवेलींची लागवड केली आहे.

शेतीचा सर्व व्याप आनंदराव सांभाळत आले असले तरी थोरला अमोल व धाकटा अमर या मुलांनी म्हणजे नव्या पिढीने पूरक व्यवसायाचा भार सांभाळला आहे. अमोल याने बारावीनंतर आयटीआय कोर्स केला, पुणे येथे नोकरी केली; परंतु नोकरीऐवजी शेती बरी या हेतूने दोघे भाऊ पूर्णवेळ शेतीच पाहतात.

लोंढे कुटुंबाकडे काही वर्षांपूर्वी केवळ खरिपातील पिके घेतली जायची. सन 1993 मध्ये एकत्रित कुटुंबाच्या सहयोगाने विहीर खोदाई, त्यानंतर साखर जलसिंचन योजनेमुळे बहुतांश क्षेत्र बागायती झाले. त्यानंतर पानमळा व नंतरच्या टप्प्यात तुती लागवड व दुग्ध व्यवसाय सुरू केला. स्वमालकीची नवीन विहीरही खोदली आहे.

लोंढे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • ठिबक सिंचनाचा वापर. गोठ्यातील चांगल्या कुजलेल्या शेणखताचा पिकांना वापर. जनावरांचे मल-मूत्र थेट पानमळ्यात सोडल्याने वेलींना सेंद्रिय खताची ताकद मिळते.
  • गांडूळ खत प्रकल्पातून दर तीन महिन्यांनी उत्पादित 750 किलो शुद्ध गांडूळ खताचा वापर, त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होण्यास मदत.
  • पानमळ्याचे व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने करण्यावर भर. निंबोळी, शेंगदाणा पेंडीसह गांडूळ खताचा संतुलित वापर, त्यामुळे पानांची गुणवत्ता व टिकाऊपणा वाढला.
  • कमीत कमी मजुरांचा आधार घेत शेती व पूरक व्यवसाय करतात, त्यामुळे उत्पादन खर्च नियंत्रित ठेवला.
  • तुती क्षेत्रात पाला कापणीनंतर व तळछाटणीचे बुडके वर आल्यानंतर असे वर्षातून दोनदा एकरी चार ट्रेलर, तर ऊस पिकात लागवडीपूर्वी एकरी चार ट्रेलर शेणखत देतात. रेशीम किड्यांच्या विष्ठेचाही खत म्हणून वापर होतो.
  • पानमळा, तुतीचे क्षेत्र माळरान भागात असल्याने आठवड्यातून एकवेळ, तर हिवाळ्यात दहा ते बारा दिवसांनी पाटाने पाणी दिले जाते.
  • शेतीत उत्तम व्यवहार, काटकसर यांचा अंगीकार.
  • पहाटे साडेपाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत लोंढे पिता-पुत्र शेतीत मन लावून काम करतात.

पानमळ्यासंबंधी

दरवर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये पानमळ्याची उतरणी करतात. त्यानंतर दोन महिन्यांनी पानांचे उत्पादन सुरू होते. सुरवातीच्या खुड्यांपासून माल कमी मिळतो. जून व जुलैमध्ये कळी, फापडा व हतकल या तीन प्रकारच्या पानांचे उत्पादन चांगल्या पद्धतीने सुरू होते. पावसाळ्यापासून उतरणीपर्यंतच्या काळात दररोज खुडा घेतात. उत्पादित मालाची मध्यस्थांमार्फत कऱ्हाड, सातारा, पुणे, मुंबई आदी ठिकाणी विक्री करतात. गेल्यावर्षी 350 डागांचे (प्रति 12 हजार पाने) उत्पादन मिळाले. फापड्यास मागणी व दर्जानुसार प्रतिडाग तीन हजारांपासून कमाल 11 हजार रुपयांपर्यंत, तर कळीच्या पानांस प्रतिडाग 800 रुपयांपासून तीन- चार हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. सर्व खर्च वजा जाता मागील वर्षी सुमारे दीड लाख रुपयांचा नफा हाती आला. 2012 मध्ये एकूण 200 डाग उत्पादन, तर एक लाख रुपयांचा नफा मिळाला.

रेशीम शेती

सध्या वर्षातून चार ते पाचवेळा कोष उत्पादन घेतले जाते. सुमारे दोन महिन्यातून एकदा बॅच घेतली जाते. सुरवातीला दरमहा 350 अंडीपुंजांपासून उत्पादन घेतले जायचे. या वर्षी दुग्ध व्यवसायातील व्याप वाढल्याने बॅचचे प्रमाण कमी केले आहे. गेल्यावर्षी प्रतिबॅच 170 ते 180 किलो असे पूर्ण वर्षात 900 किलो कोषांचे उत्पादन मिळाले. कोषांची अथणी, मुदळ व बंगळूर येथील बाजारपेठेत विक्री केली. प्रतिकिलोस किमान 300 रुपये, तर कमाल 390 रुपयांपर्यंत दर मिळाला. सरासरी 175 किलो मालास प्रतिकिलो 350 रुपयांप्रमाणे 54 हजार 250 रुपयांचे उत्पन्न मिळाले. प्रतिबॅच 20 हजार रुपयांपर्यंत खर्च आला. सन 2012 मध्ये एकूण 850 किलो कोषांचे उत्पादन मिळाले.

दुग्धव्यवसाय

2011 पर्यंत प्रत्येकी दोन गायी व म्हशींचा सांभाळ सुरू होता. नोव्हेंबर 2013 पासून दुग्धव्यवसाय वाढीसाठी गोठ्यात गायींची संख्या वाढवली. दर दोन महिन्यांच्या टप्प्याने गायी खरेदी केल्या. यात रेशीम शेतीतील शिल्लक उत्पन्नाचा आधार घेतला. मुक्त संचार पद्धतीचा गोठा करताना कुट्टी मशिन व दूध काढणी यंत्रही घेतले आहे. गावातील भूमिपुत्र शेतकरी स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून फलटण तालुक्‍यातील विविध ठिकाणच्या गोठ्यांना भेटी देऊन त्यांनी गोठा व्यवस्थापन सुधारले आहे. सध्या दुभत्या नऊ, तर एक गाभण अशा 10 गायी आहेत. दररोज सुमारे 120 लिटर दूध संकलन होते. डेअरीकडून प्रति लिटरला 24 रुपये सरासरी दर मिळतो.

अमोल लोंढे - 9637861926.



---------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate