অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रशिक्षणातून मधमाशीपालन

मधमाशीपालनातून पूरक उद्योगाची उभारली गुढी

ठाणे जिल्ह्यातील मुकेश कडू यांनी आपली चिकू बाग व अन्य फळबागांमध्ये मधपेट्या ठेवून उत्तम प्रकारे मधमाशीपालन केले आहे. परागीभवनाद्वारे पीक उत्पादनवाढीचा हेतू साधताना मधाच्या विक्रीतूनही आर्थिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. शेतीला पूरक व्यवसायाची जोड देताना प्रगतीची गुढी त्यांनी उंचावली आहे. 
ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुका म्हणजे उत्तर कोकणचा भाग. या भागात पाऊस चांगला पडतो. चिकू फळपिकासाठी प्रसिद्ध असलेला हा भाग आहे. येथील वाकी गावामध्ये मुकेश कडू यांची चिकूची वाडी आहे. येथे त्यांनी शेतीला मधमाशीपालन व्यवसायाची चांगल्या प्रकारे जोड दिलेली पाहायला मिळते. मुकेश यांनी एका मुक्त कृषी विद्यापीठातून कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी शेतीसाठी करण्यास सुरवात केली आहे.

सुमारे साडेसात एकर क्षेत्रावर असलेल्या आपल्या चिकूच्या वाडीचे (बाग) व्यवस्थापन मुकेश सांभाळतात. वाडीच्या कडेने बांधावर सुमारे 125 नारळाची झाडे आहेत. आंब्याची 15 झाडे, पेरूची 100 झाडे, लिचीची पाच झाडे, सफेद जांबूची 20 आणि शेवग्याची 50 झाडे आहेत. सुमारे एक एकर क्षेत्रात भातशेती केली जाते. याव्यतिरिक्त दुधासाठी पाच गाई आहेत. त्यांच्या शेणापासून गोबरगॅस निर्मिती केली जाते. उरलेले सर्व शेण शेतीमध्ये खत म्हणून उपयोगात आणले जाते. याशिवाय 20 गावठी कोंबड्या पाळल्या आहेत. हा सर्व शेती व्यवसाय सांभाळताना मुकेश यांना पत्नी सौ. प्रवीणा, वडील जयप्रकाश कडू आणि आईची चांगली साथ मिळते.

...असे सुरू केले मधमाशीपालन

कृषी विषयात पदविका घेतल्यानंतर मुकेश यांनी सन 2008 मध्ये डहाणू तालुक्‍यातीलच कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्रातून मधमाशीपालनाचे प्रशिक्षण घेतले. त्यातून या पूरक व्यवसायाविषयी आवड वाढीस लागली. त्यानंतर दुसऱ्या वर्षी डहाणू येथील महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाकडून एक मधपेटी आणली. मधमाशीपालनामध्ये मुकेश यांच्या वडिलांचाही अनुभव चांगला होता. या व्यवसायातून शेतीला होणारा फायदा आणि मधाचे उत्पन्न लक्षात आल्यानंतर त्याच वर्षी म्हणजे 2009 मध्ये मुकेश यांनी डहाणूतील राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्या कर्जाला पस्तीस हजार रुपये अनुदान मिळाले.

यातून त्यांनी 50 मधपेट्या खरेदी केल्या. आज त्यांच्याकडे वसाहतींसह 15 ते 20 मधपेट्या आहेत. तर सुमारे 50 रिकाम्या पेट्या आहेत. मधमाश्‍या सातेरी जातीच्या आहेत. या मधमाश्‍यांच्या संगोपनाविषयी काही अडचणी आल्यास जवळच असलेल्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मुकेश यांना मिळते असते. तसेच नाशिक येथील मधुमक्षिकातज्ज्ञ डॉ. निकम यांचेही मार्गदर्शन ते घेत असतात.

मधमाशीपालनातून झाले फायदे

मुकेश यांनी मधपेट्या आंबा, नारळ, चिकू, सफेद जांबू, पेरू, शेवगा, लिची आदी फळपिकांच्या बागेत ठेवल्या आहेत. मधमाशीपालनापूर्वी त्यांना आंब्याच्या प्रति झाडापासून सरासरी उत्पादन 100 ते 150 किलो यायचे. तेच उत्पादन मधपेट्या ठेवल्यानंतर थोड्या फार प्रमाणात वाढल्याचे आढळले.

दुसऱ्या वर्षी प्रति झाड हे उत्पादन 200 किलोपर्यंत पोचले. त्याचप्रमाणे नारळ पिकातील परागसिंचनासाठीही मधमाश्‍यांची खूप चांगली मदत झाली. नारळाच्या उत्पादनात सुमारे 20 ते 30 टक्के वाढ झाली. प्रति झाडापासून जवळपास 130 पर्यंत नारळ निघतात. मधपेट्यांमुळे सफेद जांबू, पेरू व अन्य पिकांतील फलधारणेमध्येही चांगला फायदा झाल्याचा मुकेश यांचा अनुभव आहे.

मधपेटी ठेवण्याची पद्धती

जमिनीवर पेटीसाठी लोखंडी किंवा लाकडाचा सांगाडा ठेवला जातो.

या सांगाड्याच्या खांबावर मधोमध एक वाटी असते. त्यामध्ये पाणी ओतले जाते. त्यामुळे जमिनीकडून पेटीकडे मुंग्या जात नाहीत. या सांगाड्यावर मधपेटी ठेवली जाते. एका पेटीमध्ये आठ लाकडी फ्रेम असतात. त्यावर मधमाश्‍या पोळे तयार करतात. पेटीच्या वरच्या बाजूला लाकडाचे आणि पत्र्याचे झाकण लावलेले असते. त्यामुळे पेटीचे पावसापासून संरक्षण होते.

मधमाशीपालनात विशेष बाबी

मुकेश मागील काही वर्षांपासून मधमाशीपालनाचा व्यवसाय करत असल्याने त्यांचा याविषयी चांगला अभ्यास झालेला आहे. उन्हाळ्यात फुलांची संख्या कमी झाल्यावर मधमाश्‍यांना पाक देण्यात येतो. तसेच पावसाळ्यात पेट्यांचे पावसापासून संरक्षण करावे लागते. पावसात मधमाश्‍या बाहेर फुलांकडे जात नसतील तर त्या वेळीही साखरपाणी द्यावे लागते. ऑक्‍टोबर तसेच मार्च महिन्यामध्ये राणीमाशी पेटीच्या बाहेर जाण्याची शक्‍यता असते. त्या वेळी विशेष काळजी घ्यावी लागते.

दसऱ्यानंतर पेटीमध्ये मधमाश्‍यांची नवीन पिलावळ तयार होत असते. त्या दरम्यान भाताच्या पिकाला चांगली फुले असतात. या वेळेला पेटीमध्ये मधही जास्त प्रमाणात तयार होतो. पावसाळ्याच्या दिवसांत पोळ्याला मेणकिडा लागू शकतो. ही कीड लागू नये म्हणून पेटीमध्ये ज्या पोळ्यांवर मधमाश्‍या नाहीत असे पोळे काढून टाकले जाते, तसेच अधूनमधून पेटीची साफसफाई केली जाते.

मधाची काढणी

ऑक्‍टोबर - नोव्हेंबर महिन्यात मध जास्त तयार होत असते. त्यानंतर त्याचे प्रमाण कमी होऊन मार्च - एप्रिलपर्यंत हंगाम चालू राहतो. मध काढण्यासाठी मुकेश यांनी खास स्टीलच्या टाकीचे उपकरण तयार केले आहे. या मशिनमध्ये मधपोळी ठेवल्यानंतर बाहेरच्या बाजूने हॅण्डल फिरविला जातो. पोळ्याला किंवा मधाला स्पर्श न करता पूर्ण मध टाकीमध्ये गोळा होतो. वर्षभरात एका पेटीपासून चार ते पाच किलो मध काढला जातो.

नवरात्र ते दिवाळी या कालावधीत मध उत्पादनाचा मुख्य हंगाम असतो. याच काळात अधिक मध मिळतो. फुलोऱ्यावर त्याचे प्रमाण अवलंबून असते. मार्च-एप्रिलच्या काळातही मध मिळतो, पण प्रति पेटी त्याचे प्रमाण तीन किलोपर्यंत असते. सध्या मधमाश्‍यांवर आलेल्या रोगामुळे त्यांच्याकडे मधमाश्‍या वसाहतींचे व त्यांच्यासहित पेट्यांचे प्रमाण कमी झाले आहे.

मधाची विक्री

मुकेश यांना मधाच्या विक्रीसाठी खास परिश्रम घ्यावे लागत नाहीत. मुंबईचे बहुतेक पर्यटक डहाणूच्या आसपास येत असतात. त्यांच्याकडून मधाची खरेदी होते. तसेच आजूबाजूच्या गावांतील लोकही मध घेऊन जातात.

साधारण 400 रुपये प्रति किलोचा भाव मिळतो. काही वेळा तो त्याहून अधिकही मिळतो. अशा प्रकारे 30 ते 35 पेट्यांपासून वर्षभरात चांगले उत्पन्न मिळते.

मधपेटीच्या विक्रीपासून उत्पन्न

मुकेश मधाच्या उत्पादनाव्यतिरिक्त मधपेट्या तयार करण्याचेही काम करतात. एका मधपेटीपासून दुसरी नवीन मधाची पेटी तयार करणे तसेच झाडावरील मधाचे पोळे पेट्यांमध्ये स्थलांतरित करण्याची कलाही त्यांच्याकडे आहे. अशा नवीन तयार केलेल्या वसाहतींसह मधपेट्या प्रति नग तीन हजार रुपये याप्रमाणे अन्य शेतकऱ्यांना विकत दिल्या जातात.

मधमाशीपालनातील मुकेश यांचा शेतकऱ्यांना सल्ला

मधमाशीपालनासारखा व्यवसाय शेतीला जोडधंदा असायलाच हवा. मधमाशीपालन करायचं तर रासायनिक कीडनाशकांचा उपयोग कमी केला पाहिजे. सेंद्रिय शेतीला ही गोष्ट पोषकच आहे. मधमाशीपालनामुळे पिकाची फलधारणा वाढून उत्पादनात वाढ तर होतेच. शिवाय मधाचे उत्पन्नही चांगले मिळते. चांगला रोजगार आणि उत्पन्न देणाऱ्या या व्यवसायाकडे आपण गांभीर्याने पाहायला हवे. सहज करता येण्याजोगा हा व्यवसाय आहे. माझ्याकडे मधाला कायम मोठ्या प्रमाणात मागणी असते. कितीही मध तयार झाला तरी तो अपुराच पडतो. 
हा वाव शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवा. 

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. ठाणे. येथे कार्यरत आहेत.) 
संपर्क - मुकेश कडू, 9226852744, 9270610655 
उत्तम सहाणे, 8087985890

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate