অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बचत गटातून प्रक्रिया उद्योगाकडे

ओम साई महिला बचत गटाने विकसित केला ब्रॅण्ड महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी बचत गटांची मदत होत असून, बचत गटांच्या व्यवसायांनी चांगलेच बाळसे धरले आहे. केवळ उत्पादन करून न थांबता विक्रीसाठी योग्य ते प्रयत्न करण्यातही त्या मागे पडत नाहीत. त्याचे उदाहरण आहे, ओम साई महिला बचत गट.  
महिला बचत गट म्हणजे केवळ बचत आणि गरजेसाठी वापर असे मानले जायचे. गेल्या काही वर्षांपासून त्यात बदल होत असून, महिलांमध्ये उद्योजकता विकसित होत आहे. या उद्योगांच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर होत असून, महिला सबलीकरणाला मदत होत आहे.

ग्रामीण महिलांसोबत शहरी महिलाही बचत गटांतून व्यवसाय करत आहेत. त्यातील एक- पुण्यातील महिला बचत गट लोणच्याची केवळ विविध उत्पादने तयार करून न थांबता त्यांची ब्रॅंड नावासह विक्री करत आहे.

गटांची पार्श्‍वभूमी

पुणे जिल्ह्यात आज सुमारे 25 हजार 800 महिला बचत गट आहेत, त्यांतील अनेक महिला बचत गट स्थापन करून नवीन उद्योग उभारून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. सन 2007 मध्ये पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या ग्रामीण महिला विकास विभागाच्या मुख्य अधिकारी सौ. एम. ए. बेल्हेकर व एन. जी. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गटाची स्थापना करण्यात आली.
शोभा चक्रनारायण यांनी सुरवातीला ओळखीच्या व रास्ता पेठेत राहणाऱ्या पंधरा महिलांना बचत गटाची संकल्पना सांगितली. बचत गटाला "ओम साई महिला बचत गट' असे नाव दिले. सुरवातीला बचत गटातील बारा महिलांनी मासिक शंभर रुपयांची बचत म्हणजेच वार्षिक बचत सुरू केली. अंतर्गत बचतीतून साठलेल्या पहिल्या वर्षीच्या 18 हजार रुपयांमध्ये भाजणीच्या चकल्या तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्याकडे विविध पदार्थांची मागणी होत असल्याने व्यवसायात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अनुभवातून शिकत पुढे गेलो...

या उद्योगाबाबत माहिती देताना सौ. चक्रनारायण म्हणाल्या, की बचत गटाची सुरवात जरी 2007 मध्ये झाली असली, तरी 2000 मध्ये 1200 रुपये भरून आगाखान पॅलेस येथे फळांपासून विविध उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्याचा लाभ बचत गट स्थापन झाल्यानंतर झाला.

भाजणीच्या चकल्या तयार करत होतो. सुरवातीला ग्राहकांची संख्या कमी होती. काही वेळेस झालेल्या चुकांमुळे तयार केलेला माल फेकूनही द्यावा लागला. तरी, मागे न हटता व्यवसाय करायचाच, असा पक्का निर्धार होता. रोजच्या अनुभवातून शिकत पुढे जात राहिलो. हळूहळू मालाला मागणी वाढत गेली. चकल्यांनंतर कैरी व आवळ्यापासून लोणचे तयार करायला सुरवात केली.

गटातील एक महिला पहाटे बाजार समितीतून फळांची खरेदी करत असे, त्यापासून उत्पादन तयार करायचो. सुरवातीला लोणचे तयार करून 50, 100 ग्रॅम वजनांच्या पॅकेटमध्ये विक्री केली जायची. विक्री करण्यासाठी जागा नव्हती. मालाच्या विक्रीचा प्रश्‍न यायचा. त्यासाठी जिल्हा बॅंकेच्या अधिकाऱ्यांची मदत घेत बॅंकेच्या आवारात छोटा स्टॉल मिळवला. आम्ही रोज स्टॉल मांडून भाजणीच्या चकल्या, मटकी व हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे, कैरीचे लोणचे अशा वस्तूंची विक्री करण्यास सुरवात केली. बॅंकेत येणाऱ्या नागरिकांकडून मालाला मागणी वाढत गेली. मग आम्ही उत्पादनाला "प्रिया ऍग्रो प्रॉडक्‍ट' असे नाव दिले. पुढे विक्री वाढल्यानंतर या नावाचा ट्रेड मार्क असलेला परवानाही मिळवला आहे.

गटाचे अर्थशास्त्र गटाची रोजची उलाढाल

  • आठ ते दहा प्रकारची विविध उत्पादने
  • सध्या 50, 100, 200, 500 ग्रॅममध्ये उपलब्ध
  • रोजची विक्री सुमारे दोन ते तीन हजार रुपये
  • महिन्याला सरासरी 60 हजार रुपये
  • उत्पादन खर्च शेतीमालाच्या भावाच्या चढ- उताराप्रमाणे कमी- जास्त होतो, तसेच एका महिलेला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झालेला आहे. उत्पादन खर्च वजा जाता 20 ते 30 टक्के नफा ठेवूनच विक्री केली जाते. प्रति माह 18 ते 20 हजार रुपये मिळतात.

उद्योगातील अडचणींवर करतोय मात

  • गटाचे वैयक्तिक विक्री केंद्र नाही. सध्या विक्रीसाठी स्वतंत्र जागा मिळविण्याचा प्रयत्न.
  • विविध मॉलना भेट देऊन तिथे उत्पादने ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते, त्याला यश आले असून, एका साखळी दुकानाने उत्पादनांची मागणी केलेली आहे. त्यांची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आणखी महिलांची मदत घेण्यात येत आहे.
  • सध्या बाजार समितीतून कच्च्या मालाची खरेदी केली जाते. भविष्यात उत्पादकांशी संपर्क वाढविण्यासाठी प्रयत्न.
  • गटामार्फत सध्या श्री. बेळगावकर, लीलाबाई गायकवाड, जयश्री वैद्य, मेघना झुझम करतात विक्री.
  • प्रक्रियेसाठी आधुनिक यंत्रं नाहीत, ती हळूहळू घेण्यात येणार आहेत.
  • मालाची ने- आण करण्यासाठी स्वतःचे वाहन नाही.

शेतकऱ्यांकडून घेणार माल


सध्या उत्पादने तयार करण्यासाठी आम्ही बाजार समितीतून माल घेत आहोत; मात्र हा उद्योग वाढविण्यास त्यासाठी लागणारा माल थेट उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून घेण्याचा विचार आहे, त्यासाठी काही शेतकऱ्यांना हमीभाव देऊन त्यांच्याकडून माल घेण्याचा आमचा विचार आहे. त्यामुळे शेतकरी ते उत्पादक व उत्पादक ते ग्राहक अशा थेट व्यवस्थेमुळे दोघांनाही फायदा मिळू शकतो. गटाला दर्जेदार माल मिळण्यास मदत होईल.

बचत गटाची उत्पादने

  • कैरी, कारले, मिरची, ओली हळद, लिंबाचे गोड आणि नेहमीचे असे लोणच्याचे प्रकार. लिंबू- मिरची एकत्रित लोणचे.
  • खजूर लाडू
  • शेंगदाणे चटणी
  • खोबरे- लसूण चटणी

महिलांनी शोधला पर्याय


विक्रीसाठी विविध प्रदर्शनांमध्ये स्टॉल मांडण्यात येतो. महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी होत असलेल्या प्रदर्शनांतून मालाची चांगली विक्री होते. गेल्या वर्षी ओम साई महिला बचत गटाची नाबार्डकडून हैदराबाद येथे महालक्ष्मी सरस येथे भरविलेल्या 12 दिवसांच्या प्रदर्शनाकरिता निवड करण्यात आली होती.

बचत गटामार्फत महिलांना प्रशिक्षण

ओम साई महिला बचत गटामार्फत अनेक शेतकरी, महिला बचत गट यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामध्ये बारामती येथील सतीश जगदाळे, विम्सदी पॉल संस्था, श्री शांता सुखदा यांचा समावेश आहे. सध्या आम्ही हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिला बचत गटांना एक महिन्याचे प्रशिक्षण अल्प शुल्क घेऊन देण्याचा विचार करत आहोत. 

- शोभा चक्रनारायण, 
अध्यक्ष, 
ओम साई महिला बचत गट, पुणे 
मो - 9370496799

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate