অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्यावसायिक बीजोत्पादन करा

मंदार मुंडले अजहर पठाण यांनी पैठण (जि. औरंगाबाद) परिसरात 40 एकर जमीन लीजवर घेऊन तेथे विविध संकरित भाजीपाल्याचे बीजोत्पादन सुरू केले आहे. त्यांच्या व्यावसायिक बीजोत्पादन शेतीची काही माहिती आपण कालच्या (ता. 21) भागात आपण घेतली. उर्वरित माहिती आजच्या भागात.

टोमॅटो, कलिंगड, ढोबळी मिरचीसह हॉट पेपरचे (तिखट मिरची) बीजोत्पादन केले जाते. प्रति झाड सरासरी दीडशे ते सव्वा दोनशे फळे ठेवली जातात. फळे पूर्ण लाल झाल्यानंतर काढणी व यंत्राद्वारे बिया काढून योग्य प्रकारे वाळवल्या जातात. स्वच्छ व पॅक करून बियाणे पुढे पाठवले जाते. ही मिरची जाड व तिखट आहे. विविध देशांची मिरचीची डिमांड वेगवेगळी असते. आपल्या भागात खूप कमी मात्र इंडोनेशिया वा आफ्रिकेत ती चांगली चालते.

शेती व्यवस्थापन

अजहर पठाण यांच्या फार्ममध्ये सुमारे दोनशे कर्मचारी तैनात आहेत. महिलांची संख्या त्यात कमी नाही. दोन महिलांकडे बीजोत्पादन पिकाच्या प्रत्येकी तीस ओळींची प्रमुख या नात्याने जबाबदारी असते. त्यांच्या हाताखालील प्रत्येक महिला तीन ओळी सांभाळतात. पॉलीनेशन, प्रुनिंग, स्टेकिंग, निर्जंतुकीकरण या सर्व गोष्टीत त्या कुशल आहेत. निवडक कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे पठाण म्हणाले.

कर्मचारी सेट अप

  • कर्मचारी- दोनशेपेक्षा अधिक लोक. परिसरातील आठ ते नऊ गावांमधील लोकांना रोजगार मिळाला.
  • आठ पर्यवेक्षक. त्यातील सहा डिप्लोमाधारक.
  • शेती व्यवस्थापक- एमएस्सी, कृषी

पर्यवेक्षकांत राज्यातील कृषी व अन्य विद्यापीठांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मजूर व्यवस्थापन, त्यांचे प्रशिक्षण, शेतीचा जमा-खर्च, तंत्रज्ञान वापर, किडी-रोगनियंत्रण आदी गोष्टी त्यांना इथे शिकायला मिळतात. सामग्री पुरवठा, त्यासाठी व्यावसायिक संबंध जोपासणे, टीम वर्क यातील कौशल्य वाढीस लागते. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेलेही येथे बीजोत्पादनात तरबेज झाले असून, मुक्त विद्यापीठात बीएस्सी ऍग्रीसाठी प्रवेश घेण्यापर्यंत उंची त्यांनी गाठली आहे. पठाण म्हणाले, की बियाणे क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीसोबत शेतकरी म्हणूनच मी करार केला आहे.

बियाण्यासाठी कंपनीचा दर हंगामाआधीच फिक्‍स होतो. त्यामुळे नफा संतुलित ठेवण्यासाठी खर्च कसा नियंत्रित करायचा त्याचे नियोजन करता येते. कोणता वाण लावला तर किती उत्पादन, खर्च व नफा मिळेल या गोष्टींचे गणित काढता येते. चाळीस एकर क्षेत्र टप्प्याटप्प्याने विकसित करताना गेल्या वर्षीपर्यंत माझ्याकडे नऊ नेटकेजेस होत्या. आता ही संख्या साठवर गेली आहे. पूर्वी पाच-सहा केजेस उभारणं अवघड वाटत होतं, आज 100, 150 केजेस उभारायला काहीच वाटत नाही असं पठाण म्हणतात. तांत्रिक ज्ञान अद्ययावत करणे, तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण या गोष्टींवर त्यांची श्रद्धा आहे.

शेतकऱ्यांनो, तुम्हीही हे करू शकता


पठाण म्हणतात, की वीज, पैसा व पाणी या शेतकऱ्याच्या तीन मूलभूत गोष्टी आहेत. विजेच्या समस्येवर उत्तर शोधताना त्यांनी ट्रॅक्‍टर घेतला. त्यावर डायनोमा लावून पॉवर बॅकअप मिळाला. पाण्यासाठी एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे बांधले. पैशाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रीय बॅंकेच्या कृषी व्यापारी शाखेकडून कर्ज काढले. शेती व्यावसायिक होऊ शकते हे बॅंकेला पटवून दिले. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन भांडवल उभे केले, बॅंकेकडे गेले तर त्यांना कर्जाची चांगली रक्कम उभी करता येईल. बीजोत्पादनाचा लेखी कायदेशीर करार असतो. तो बॅंकेत चालतो.

भांडवल व खर्च


ड्रीप, फर्टिगेशन, नेटकेजेस, स्ट्रक्‍चर उभारणे असा सुरवातीचा मूलभूत खर्च जास्त आहे. सुरवातीला गुंतवणूक खूप करावी लागली. प्रत्येक गोष्ट खरेदी करावी लागली. 10 गुंठ्यांच्या साध्या केजसाठी किमान 60 ते 65 हजार रुपये व अन्य खर्च पकडून पहिल्या वर्षी एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. एका नेटकेजमधून वर्षाला 70 ते 80 हजार रुपये व अधिक चांगल्या व्यवस्थापनाअंती उत्पन्न एक लाखांपर्यंतही जाते. तुम्ही किती पिके व कशी घेता, तसेच कोणत्या प्रकारचे नेटकेज व साहित्य वापरणार यावर खर्च अवलंबून असतो.

कोणत्या पिकांचे बीजोत्पादन होते?

  • काकडी, तिखट मिरची, ढोबळी मिरची, टोमॅटो, कलिंगड (विविध गुणधर्मांचे वाण)
  • फेरपालट महत्त्वाची. एकाच कुळातील पिके सलग घेणे नाही.
  • मार्चमध्ये बीजोत्पादन संपते. तेव्हा स्ट्रक्‍चर काढून ट्रॅक्‍टरने नांगरट होते. जमीन चांगली तापवली जाते. स्ट्रक्‍चर दुसऱ्या शेतात जूनपर्यंत फिक्‍स होते. तेथे नवे पीक सुरू होते. दरवर्षी या गोष्टी व खर्च करावा लागतोच.
  • सीड काढणी यंत्रांद्वारे होते. त्यामुळे कार्यक्षमता वाढून वेळ व पैसे वाचतात. यंत्राद्वारे 10 गुंठ्यांच्या एक केजमध्ये हे काम चार तासांत संपते.

उत्पादन (10 गुंठे)

टोमॅटो- वाणानुसार- 10 ते 15 किलो 
तिखट मिरची- 30 ते 40 किलो 
काकडी- 30 ते 40 किलो 
कॅप्सिकम- 10 ते 15 किलो
मागील वर्षी उपलब्ध : सर्व पिकांचे 20 ते 25 केजेसमध्ये बीजोत्पादन केले. या वेळी 60 ते 70 केजेसमध्ये उत्पादन होईल. बियाणे फेल होण्याचे प्रमाण नाही.

गुणवत्ता कशी असते?


पठाण म्हणतात...

  • बीजोत्पादन प्लॉटमध्ये गुणवत्तेला प्रचंड महत्त्व आहे. त्यात तडजोड नाही. कारण हेच बियाणेच पुढे शेतकऱ्याला मिळणार असते.
  • केवळ 10 गुंठ्यांची एकच केज घेण्यापेक्षा विविध केज व त्यात विविध पिके घेतली तर अधिक फायदा होऊ शकतो.
  • उत्पादन व गुणवत्ता शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो. जे बियाणे तयार केले ते शंभर टक्के शुद्धतेचे दिले. त्याची आनुवंशिक शुद्धता (जेनेटिक प्युरिटी) व उगवणक्षमताही (जर्मिनेशन प्युरिटी) चांगलीच होती. उदाहरण सांगायचे तर काकडीच्या 18 केजेसमधून 10 केजेसमध्ये शंभर टक्के जर्मिनेशन प्युरिटी होती. बाकी केजेसमध्ये ती 98 ते 99 टक्के होती.
  • जगाला चांगल्या बियाण्याची गरज आहे. ते पुरवण्याची क्षमता आपल्या शेतकऱ्यांत आहे. राज्यात कुठल्याही भागात राहणारा शेतकरी बीजोत्पादन करू शकतो.

पठाण यांच्या मते बीजोत्पादनात जोखीम काय?


1) पावसाळ्यात रोग वाढतात. वेळेवर नियंत्रण करता यायला हवे. नेटमध्ये ते शक्‍य होऊ शकते. 
2) कंपनीसोबत करार झाल्यानंतरच बीजोत्पादनाला सुरवात करावी. अभ्यास करीत थोड्या-थोड्या केजेस वाढवत जावे. प्रत्येक केजमध्ये किती झाडे, प्रत्येक झाडावर किती फळे, प्रत्येक फळात किती बी असायला हवी असे परिपूर्ण ज्ञान नसेल तोपर्यंत यशस्वी होता येणार नाही. 
3) खर्च जास्त आहे. तो आधी करावा लागतो. पैसे नंतर मिळणार असतात. 
4) मजूर उपलब्धता भरपूर पाहिजे. ते प्रशिक्षित असणे गरजेचे. 
5) तांत्रिक ज्ञान खूप चांगले हवे. नियोजन व अंमलबजावणी तसेच निर्णय वेगाने घेण्याची तयारी हवी.

जमेच्या गोष्टी काय असाव्यात?

  • तांत्रिक ज्ञान
  • या क्षेत्रातील अनुभव
  • मजुरांची व व्यवस्थापकांची उपलब्धता, त्यांना चांगले प्रशिक्षण
  • पाणी, जमीन यांची प्रत चांगली. सुपीकता चांगली
  • शंभर टक्के ड्रीप
  • आपण या शेतकऱ्याकडे नक्की बीजोत्पादन कार्यक्रम देऊ शकतो इतकी विश्‍वासार्हता कंपनीप्रति निर्माण करणे

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate