অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बेदाणा प्रक्रिया उद्योग

 

भोसे येथील विठ्ठल बचत गटाचा उपक्रम प्रति तास तीन टन बेदाण्याची रंगीत प्रतवारी श्रम, वेळ व पैशांत बचत सोलापूर जिल्ह्यातील भोसे (ता. पंढरपूर) येथील विठ्ठल बचत गटाच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बेदाणा प्रतवारी व प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. प्रचलित बेदाणा निर्मितीची प्रक्रिया वेळखाऊ असतेच, शिवाय मजूरटंचाईची समस्याही द्राक्ष बागायतदारांसमोर उभी राहिली आहे. अशा परिस्थितीत कमी वेळेत, कमी श्रमात उत्तम दर्जाचा बेदाणा पॅकिंगसह उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम बागायतदारांसाठी फायदेशीर ठरू लागला आहे. 
भोसे येथील विठ्ठल बचत गटाचा प्रयत्न सुरवातीपासूनच शेतकऱ्यांच्या मालाची बाजारपेठ सुकर कशी करता येईल या दृष्टीने होता. गटातील पन्नास लोक एकत्रित येऊन प्रत्येकी दोन हजार रुपयांची बचत करण्यास सुरवात केली होती. पोल्ट्री फार्म, पशुखाद्य यासारखे उद्योग समोर होते; परंतु आपल्याकडे मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक आहेत. सुमारे चारशे टन बेदाणा तयार होतो. त्यांना मजुरांची टंचाई कायम जाणवते. याचा विचार करून बेदाणा ग्रेडिंग, वॉशिंग, निवड व पॅकिंग हा उद्योग फायदेशीर वाटला. तोच उभारण्याचे ठरवले. त्यानंतर गटातील सभासद नाशिक, नगर आदी ठिकाणी गेले. या उद्योगाची शक्‍य ती माहिती संकलित केली. साधारण एक महिना उद्योगाचा व मशिनरीचा अभ्यास सुरू होता. 

उद्योग निर्मितीचे निश्‍चित झाल्यावर गटातील प्रत्येकाने पन्नास हजार रुपये व गटातील बचत अशाप्रकारे पन्नास लाख रुपयांचे भांडवल गोळा केले. त्यानंतर जागा खरेदी केली. कोइमतूर येथून तीन प्रतीत बेदाण्याची निवड करणारे (कलर सॉर्टर मशिन) यंत्र खरेदी केले, त्यासाठी दोन तरुण व होतकरू मुलांना प्रशिक्षणासाठी पाठविले. आता हे तरुणच ही संपूर्ण मशिनरी चालवतात. यासाठी मोहोळ येथील डॉ. शिरगावे व सोलापूर येथील श्री. कांचन यांनी मार्गदर्शन केले.


कसा आहे यांत्रिक बेदाणा प्रक्रिया उद्योग


सध्या या उद्योगांतर्गत दररोज 20 ते 25 टन बेदाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. यात कलर सॉर्टर मशिनद्वारे प्रति तासात अडीच ते तीन टन बेदाण्याची तीन रंगांच्या प्रतीत निवड केली जाते, याशिवाय दोन ग्रेडिंग यंत्रे तसेच पोचट बेदाणा व काड्यांमधून बेदाणा निवड करणारे यंत्रही आहे. एक वॉशिंग युनिट (मालात आर्द्रता असेल तर त्याला दर कमी मिळतो, त्यामुळे या युनिटद्वारे तो वॉश करून सुकवला जातो) आहे. याशिवाय साडेबासष्ट के.व्ही. क्षमतेचे जनरेटर (विद्युतपुरवठा खंडित झाल्यावर सर्व मशिनरी चालवण्यासाठी), 15 एच.पी. क्षमतेचे कॉम्प्रेसर मशिन आदी यंत्रांची भक्कम जोड उद्योगाला देण्यात आली आहे. बाहेरगावाहून बेदाणा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येऊ नयेत यासाठी बेदाणा पॅकिंग बॉक्‍स, चिकटपट्टी, प्लॅस्टिक पिशवी आदी साहित्य वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येते. शेतकऱ्यांनीच सुरू केलेला हा उद्योग असल्याने गटातील सदस्यांना जे दर लागू आहेत, तेच दर अन्य शेतकऱ्यांना लावले जातात. 75 कुशल कामगार तीन शिफ्टमध्ये येथे काम करतात. पहिलाच उपक्रम असल्याने थोड्या चुकाही झाल्या; परंतु व्यापारी, शेतकरी व ग्राहक यांच्याशी चर्चा करून आवश्‍यक सुधारणा केल्या जात आहेत, त्यामुळे बाजारपेठेच्या अडचणी कमी होत आहेत. 

गटाचे अध्यक्ष अन्वर शेख म्हणाले, की गटातील सर्वांचा एकमेकांवर पूर्ण विश्‍वास आहे. कुशल कामगार, आधुनिक यंत्रसामग्री यामुळे जोखीम कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. शासकीय मदत, राष्ट्रीय बॅंकेसह सोलापूर विभागांतर्गत "आत्मा' प्रकल्पातील व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले आहे.


भविष्यातील नियोजन


गटाचे अध्यक्ष शेख यांच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसांतच अडीच हजार मेट्रिक टन बेदाणा साठवण क्षमतेच्या शीतगृहाच्या (कोल्ड स्टोअरेज) बांधकामास सुरवात केली जाणार आहे. भाजीपाल्यासाठीही अशी सुविधा लवकरच उभारली जाईल. कृषी विभागाच्या शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या या योजनेमधून "भोसे ऍग्रो प्रा. लि.' या कंपनीची स्थापना करण्याचे प्रयत्न प्रगतिपथावर आहेत. या कंपनीच्या माध्यमातून गट शेती सुरू करणार आहे. गटातील शेतकऱ्यांची एकत्रित सुमारे साडेसातशे एकर शेती असून, सुरवातीला दोनशे एकर क्षेत्रावर भाजीपाला पिकवण्यात येणार आहे. त्याच्या मार्केटिंगसाठी पुणे येथील व्यापाऱ्यांशी चर्चाही केली आहे.


बेदाणा प्रक्रिया उद्योगासाठीचा खर्च (रु.) (थोडक्‍यात)


1) जागा - 37.5 लाख 
2) प्रकल्प व संबंधित सामग्री उभारणी - 60 लाख 
यात सर्व प्रकारची यंत्रे, शेड उभारणी (16 लाख), पूर्वतयारी, कामगारांसाठी खोल्या, कंपाउंड, 
वीज कनेक्‍शन, वॉशिंग युनिट, प्लॅस्टिक क्रेट, पाण्याची व्यवस्था तसेच अन्य खर्चाचा समावेश आहे.


प्रतिदिन होणारी उलाढाल


बेदाणा ग्रेडिंग - दोन रुपये प्रति किलो. 
वॉशिंग - दोन रुपये प्रति किलो. 
रंगनिहाय प्रतवारी व पॅकिंग : सव्वादोन रुपये प्रति किलो. 
  • प्रति दिन सरासरी पंचवीस टन बेदाण्यावर प्रक्रिया केली जाते.
  • एका महिन्यात सुमारे एक हजार टन बेदाण्यावर प्रक्रिया झाली आहे. सुमारे 200 ते 300 शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.
  • खर्च वजा जाता सुमारे 15 टक्‍क्‍यांपर्यंत निव्वळ नफा शिल्लक राहत असून, ती रक्कम नवीन उद्योगाचे भागभांडवल म्हणून वापरणार येणार आहे.
  • एखाद्या शेतकऱ्याने आपल्या यंत्राद्वारे ग्रेडिंग करून बेदाणा आणला, तर रंगानुसार प्रतवारी व पॅकिंगचाच खर्च आकारला जातो.
  • या उद्योगामुळे सुमारे आठवडाभर चालणारी प्रचलित वेळखाऊ बेदाणा प्रक्रिया कमी वेळेत व श्रमात होऊ लागली आहे. मजुरी समस्याही कमी झाली आहे.


बेदाणा उत्पादकांच्या प्रतिक्रिया


महादेव खटके, रा. भोसे, ता. पंढरपूर 
पंधरा एकर द्राक्ष बाग असून, गेल्या बारा वर्षांपासून बेदाणा निर्मिती करीत आहे. सुमारे पन्नास टन बेदाणा दरवर्षी उपलब्ध होतो. यासाठी खूप मजूर व वेळ लागत होता. आता उद्योगातील सुविधेमुळे वेळ व श्रम या दोन्ही घटकांत बचत झाली आहे.

विकास सूळ, रा. पिलीव, ता. माळशिरस 
अडीच एकर द्राक्ष बाग आहे. सात वर्षांपासून बेदाणा निर्मिती करत आहे. मजुरांची टंचाई लक्षात घेता गटाने सुरू केलेला उपक्रम चांगला पर्याय आहे. 

पुरुषोत्तम मगर, रा. मगराचे निमगाव, ता. माळशिरस 
दोन एकर द्राक्ष शेती असून, गेल्या सात वर्षांपासून बेदाणा निर्मिती करतो. या उद्योगामुळे द्राक्ष उत्पादकांना नवीन द्राक्ष लागवडीसाठी प्रेरणा मिळाली आहे. द्राक्ष उत्पादनानंतर बेदाणा प्रक्रियांसाठी लागणारा बराच वेळ वाचणार आहे. 

दत्तात्रेय नानासाहेब काळे, रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर 
सोलापूर जिल्ह्यातील मी पहिला द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. सन 1952 पासून द्राक्ष शेती करतो. एखाद्या द्राक्ष संघटनेने जे काम करायला पाहिजे होते, ते काम या गटाने सुरू करून आदर्श निर्माण केला आहे. 

संपर्क - अन्वर शेख, अध्यक्ष, विठ्ठल बचत गट - 9604557777, 9890576895.

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate