অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सहकारातून काजूप्रक्रिया उद्योग


रत्नागिरी कृषी प्रक्रिया संस्थेच्या काजूला देश-परदेशात मागणी



पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर चळवळीचा आदर्श ठेवून जयवंत विचारे आणि समविचारी मंडळींनी गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचा काजूप्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. संस्थेने उत्पादनाला चांगल्या विक्री व्यवस्थेची जोड देत मुंबई व अन्य शहरांमध्ये आपल्या काजूला चांगली बाजारपेठ मिळवली आहे. कोकणातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने संस्थेचा प्रक्रिया उद्योग आशेचा किरण ठरू शकतो. 

रत्नागिरी जिल्ह्यात काजू लागवडीत राजापूर पाठोपाठ लांजाचा क्रमांक लागतो. मात्र तेथे काजूप्रक्रिया उद्योगाला चालना मिळालेली नाही. त्यातच हापूस आंब्याचे अर्थकारण तोट्यात चालल्याने कोकणची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काजूप्रक्रिया उद्योगाकडे पाहिले जात आहे.

काही वर्षांपूर्वी रत्नागिरीतील जयवंत विचारे आणि समविचारी मित्रांनी याच दृष्टिकोनातून सहकारी तत्त्वावर काजूप्रक्रिया उद्योग उभारण्याचे ठरवले. ही मंडळी सहकार क्षेत्रात आधीपासून कार्यरत असल्याने एकत्र येण्यात अडचणी आल्या नाहीत. त्यातूनच जन्म झाला काजू उत्पादक शेतकरी सभासद असलेल्या र त्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचा. सहकारी प्रक्रिया उद्योगांना राज्य शासनाचे 36 टक्के भागभांडवल आणि राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून 60 टक्के कर्ज उपलब्ध होते.

संस्थेने त्याचा लाभ घेत गव्हाणे (ता. लांजा) येथे सव्वानऊ एकरांवर प्रकल्प उभारला. संस्थेच्या सभासदांचा भांडवल हिस्सा होता चार टक्‍क्‍यांचा. कर्ज मिळेपर्यंत पाच वर्षे लोटली. सुमारे 2010 मध्ये काजूप्रक्रिया उद्योग सुरू झाला.

प्रकल्पातील सुरवातीच्या बाबी


प्रकल्पाच्या सुरवातीला कच्चा माल म्हणून काजूबियांचा दर किलोला 30 ते 35 रुपये होता. पुढे तो 75 ते 90 रुपयांवर पोचला. त्यामुळे भांडवल वाढले. प्रकल्पाची क्षमता दररोज चार टन काजू प्रक्रियेची होती. मात्र संस्थेला एक टन प्रक्रियेवरच समाधान मानावे लागले. गव्हाणे परिसरातील महिलांना काजूप्रक्रियेच्या प्रशिक्षणाची गरज होती.

संस्थेचे अध्यक्ष विचारे यांनी गोव्यातील काजू प्रक्रिया उद्योजक ए. एस. कामत यांना विनंती केली. त्यानुसार दहा महिलांनी गोव्यात दहा दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी पुढे परिसरातील दोनशे महिलांना प्रशिक्षण दिले.

तंत्रज्ञान निर्मिती टप्पा


प्रकल्पात जिल्ह्यातील बहुधा सर्वांत मोठे सुकवणी क्षेत्र (ड्राइंग यार्ड) उभारले. त्यात एका वेळी दहा टन काजू बिया सुकवल्या जातात. सुकविण्यापूर्वी आणि त्यानंतर आर्द्रता मापक यंत्राने बियांतील आर्द्रता तपासली जाते. बी आर्द्रतेनुसार कुकरमध्ये कमी- जास्त कालावधीत वाफवली जाते. यामुळे काजूगरावरील तेलाचे डाग टाळता येतात.

प्रकल्पात एक बॉयलर आणि दोन कुकर आहेत. एका कुकरमध्ये एका वेळी 320 किलो काजू बी टाकता येते. प्रक्रियेत सुमारे वीस मिनिटांत 640 बिया वाफवता येतात. सालीसह काजूगर वाळवण्यासाठी इलेक्‍ट्रिक ड्रायरऐवजी लाकडावर जळणाऱ्या भट्टीद्वारे वाळवणी यंत्राचा वापर होतो.

एका चेंबरमध्ये एका वेळी सहाशे किलो काजू (गर) वाळवता येतो. त्यासाठी 50 किलो लाकडाचे इंधन लागते. विशेष म्हणजे काजूगराची चवही खमंग होते.

  • काजू बी फोडण्यासाठी चाळीस कटर.
  • प्रति महिला सुमारे दहा ते पंधरा किलो काजूगर काढते. त्याचे 100 ते 150 रुपये मिळतात.
  • दरवर्षी एकदा काजू बी फोडण्याची स्पर्धाही घेण्यात येते.

बाजारपेठ, मार्केटिंग


संस्थेचा काजूगर वाशी मार्केटला मोठ्या प्रमाणात पाठवला जातो. तेथील व्यापाऱ्यांमध्ये संस्थेच्या काजूची ओळख "आरकेपी" नावाने केली जाते. पुण्यासह राज्यातील अन्य भागांतील व्यापारीही संस्थेकडून माल घेतात.

दहा किलोच्या टीनच्या डब्यात पॅकिंग होते. काजूगराचे 36 प्रकारचे ग्रेड केले आहेत. त्यांना प्रति किलो 400 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत दर मिळतो. ग्रेडिंगमधील तज्ज्ञ शिवाजी राणे यांनी येथील महिलांना ग्रेडिंगचे प्रशिक्षण दिले आहे.

अर्थशास्त्र


  • गेल्या दोन आर्थिक वर्षांत संस्थेने प्रति वर्ष दोन कोटी रुपयांचा काजूगर विकला.
  • यंदा (मार्च अखेरीस) आकडा दोन कोटी 80 लाख रुपयांच्या घरात नेण्याचे उद्दिष्ट
  • गेल्या आर्थिक वर्षात संस्थेला झालेला ढोबळ नफा- 38 लाख 86 हजार रु.

यातून कर्जावरील व्याजाचा हप्ता पहिल्या वर्षांपासून वसूल होत असल्याने व्यवसायवृद्धीस फटका बसतो. हप्त्याला तीन वर्षांचा विलंबावधी मिळावा अशी संस्थेची मागणी आहे.

वाशी मार्केटमध्येही दलालीपोटी वर्षाला दहा लाख रुपये भरावे लागतात. बाजार समितीतील गाळा संस्थेला उपलब्ध झाल्यास ही रक्कम टाळता येते. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रत्येक पॅकिंगसाठी 100 रुपये खर्च येतो. लवकरच नवीन वातविरहित पॅकिंग मशिन घेऊन हा खर्च 30 रुपयांवर आणण्याचा संस्थेचा विचार आहे. काजूच्या स्वयंचलित फोडणी यंत्राची गरज आहे. त्यासाठी संस्थेच्या 220 सभासदांकडून निधी संकलित होणार आहे.

उद्योग फायद्यात आणण्यासाठी प्रयत्न


  • प्रक्रिया उद्योगात महिलांना प्रशिक्षण देऊन कुशल केले
  • मार्केटिंगसाठी व्यापारी संबंध वाढविण्यावर भर.
  • काजूगराच्या दरातील बदलांवर सतत निरीक्षण.
  • ग्रेडिंग आणि स्वच्छतेबाबत तडजोड नाही.
  • भांडवल वाढवण्याच्या दृष्टीने शासकीय मदत मिळवण्यासाठी संघटित पाठपुरावा.

विचारे म्हणाले, की मुंबईतील एका प्रसिद्ध ड्रायफ्रूट विक्रेत्याकडे आमचा ग्रेड नं. एकचा काजू पाहण्यास मिळतो. या ग्रेडचा काजू डब्ल्यू 180 नावाने ओळखला जातो.

आमच्या 36 ग्रेडमधील काजूला किलोला 400 ते 800 रुपयांपर्यंत दर असताना या ड्रायफ्रूट विक्रेत्याकडे ग्रेड वनला किलोला 1500 रुपयांचा दर असतो. 

रत्नागिरी कृषी प्रक्रिया संस्थेचा काजू वाशी मार्केटला तर जातोच. शिवाय पुणे, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणीही त्याची विक्री होते. पुण्यातील चिवडानिर्मिती उद्योगातील एका कंपनीला तर आमचाच काजू लागतो असे विचारे म्हणाले.

मुंबईसह आंतरराष्ट्रीय बाजारातही संस्थेचा काजू लोकप्रिय व्हावा यासाठी संस्थेचे जोरदार प्रयत्न आहेत. विविध औद्योगिक संस्थांच्या मदतीने होणारी प्रदर्शने, तसेच ऍग्रोवनच्या प्रदर्शनांमध्येही त्यांनी आपला काजू सादर केला आहे. 

दुबई, शारजा आदी ठिकाणीही प्रदर्शनातही संधी मिळाली. तेथे सुमारे कंटेनर म्हणजे 18 ते 20 टन माल पाठवण्याची मागणी आली आहे. देशांतर्गतही काजूला चांगली मागणी आहे. मात्र तेवढे उत्पादन करणे व त्यासाठी भांडवलाचा अभाव असल्याने मागणी पुरवणे शक्‍य नसल्याचे विचारे म्हणाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यातक्षम व्यापाऱ्यांशी संबंध वाढविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

जोखीम व उपाय


मनुष्य व भांडवलाअभावी कोकणातील अनेक उद्योग बंद पडले. गव्हाणे प्रकल्पाला मोठी जोखीम हीच होती. त्यातच गावातील बहुसंख्य पुरुष मंडळी नोकरीनिमित्त मुंबईला होती. मात्र संस्थेने स्थानिक महिलांना प्रशिक्षण देऊन सक्षम केले. त्यांची ने-आण करण्यासाठी संस्थेची बस आहे. कामाच्या तीन वेळा निश्‍चित केल्या आहेत.

प्रकल्पाचे अनुदान व कर्जाची रक्कम मिळण्यास पाच वर्षे विलंब झाल्याने कच्चा मालासाठी आवश्‍यक भांडवल कमी पडू लागले आहे. त्यामुळे प्रकल्प सध्या 25 टक्के क्षमतेनेच चालू आहे. यापूर्वी 12 टक्के व्हॅट भरावा लागत होता. आता ती रक्कम पाच टक्‍क्‍यांवर आली आहे. 


संपर्क : जयवंत विचारे, 9833394319 
अध्यक्ष, रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था, 
मु.पो. गव्हाणे, ता. लांजा, जि. रत्नागिरी

लेखक- राजगोपाल मयेकर

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 


 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate