অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुग्ध व्यवसाय फायदेशीर


सदाशिवनगर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील संजय सालगुडे-पाटील या आयटीआय पदवीप्राप्त तरुणाने नोकरीच्या मागे न लागता दुग्ध व्यवसाय सुरू केला. व्यवसायातील अनेक संकटांना सामोरे जात आज तो व्यवसायात चांगलाच स्थिरस्थावर झाला आहे. दूध व्यवसायातूनच आपल्या दोन भावंडांचे शिक्षण त्याने पूर्ण केले.

पंढरपूर-पुणे रस्त्यावर शंकर सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीनंतर नव्याने वसलेल्या सदाशिवनगर येथील बहुतांश शेतकरी ऊस, केळी पिकांबरोबर दूध व्यवसाय करतात. कारखान्यामुळे परिसरातच दुधाला ग्राहक मिळत असल्याने हा व्यवसाय चांगलाच फायदेशीर ठरला आहे. वडिलांच्या अचानक निधनामुळे कुटुंबाची जबाबदारी पडलेल्या संजय यांनी खासगी कंपनीतील नोकरी सोडून गावाकडे परतून दूध व्यवसाय सुरू केला. त्यासाठीचे नियोजन, काटकसर, श्रम, सातत्य यांची सांगड घालून त्यांना परिसरात 22 गाईंचा आदर्श गोठा तयार केला आहे.

एका गाईपासून दूध व्यवसायाला सुरवात

घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने दूध व्यवसायासाठी लागणारे पुरेसे भांडवल नव्हते. वडिलोपार्जित देशी गाईचा संकर करून तिच्यापासून झालेल्या कालवडीचा सांभाळ केला. गाईंची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले.

जनावरांचे संगोपन

संजय यांच्या गोठ्यात 22 संकरित होल्स्टिन फ्रिजीयन गाईंचे संगोपन केले जाते. पैकी 17 गाई सध्या दुभत्या तर पाच गाभण आहेत. नियमित ओला चारा उपलब्ध व्हावा यासाठी आपल्या सात एकर क्षेत्रामध्ये ऊस, कडवळ, मका तसेच अन्य चारा पिके आलटून पालटून घेतली जातात. जनावरांसाठी कडबा कुट्टीचा वापरही केला जातो. नियमित संतुलित आहार दिल्यामुळे दूध उत्पादनात सातत्य टिकून राहते, शिवाय गाईंची शारीरिक क्षमताही चांगली राहते. याच पद्धतीने सहा ते 18 महिने वयाच्या सुमारे 18 संकरित कालवडींचेही संगोपन केले जाते. गोठ्यातील लहान-मोठ्या मिळून जवळपास 42 जनावरांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी काळजी घेतली जाते. गाईंना वर्षातून दोन वेळा लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण, तर गोचीड प्रतिबंधक थायलेरियासिसचे एक वेळ लसीकरण केले जाते.

आदर्श गोठा व्यवस्थापन

दूध व्यवसायात वाढ करायची असेल तर प्रथम जनावरांच्या गोठ्याला आधुनिक व्यवस्थापनाची जोड द्यावी लागते. त्याप्रमाणे गोठा स्वच्छ, मोकळ्या वातावरणात 70 फूट लांब व 28 फूट रुंद उत्तर- दक्षिण उभारला आहे. गोठ्यातच चारा-पाण्याची सोय आहे. गरजेएवढेच पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाते. गोठ्यात रात्रभर पुरेसा प्रकाश राहावा यासाठी हॅलोजन बल्बची व्यवस्था आहे. दूध काढण्यासाठी मिल्किंग मशिनचा वापर केला जातो. दूध काढताना वीज गेली तर जनरेटरचा वापर केला जातो.

जनावरांच्या पैदास वाढीकडे लक्ष

संजय यांनी एका गाईपासून दूध व्यवसाय सुरू केला असल्यामुळे त्यांना प्रत्येक गाईचे महत्त्व पटले आहे. 16 वर्षांच्या आपल्या व्यवसायात आतापर्यंत 100 हून अधिक कालवडींची पैदास त्यांनी वाढवली आहे. त्यातील काही आपल्याकडे ठेवल्या. काहींची विक्री केली. दोन वर्षे वयापर्यंतच्या प्रति कालवडीची पैदास करण्यासाठी किमान 40 ते 45 हजार खर्च येतो. यातून आतापर्यंत बावीस गाईंचे संगोपन केले.

'गौरी'ची केली पैदास

वडिलांनी सांभाळलेल्या गौरी या देशी गाईच्या कालवडीचा संजय यांनी चार वर्षे भाकड म्हणून सांभाळ केला. शेवटी अकलूज येथे ती विक्रीसाठी नेली. तिचे खपाटीला गेलेले पोट पाहून ती विकत घेण्यासाठी कोणी पुढे येईना. कसायाला गाय विकायची नाही म्हणून अखेर ती मोकळी सोडून दिली. परंतु ती अकलूज येथून त्याच दिवशी संध्याकाळी घरी परत आली. काही दिवसांनी ती गाभण राहिली. तिने पुढे चौदा वेते दिली. तेथूनच दूध व्यवसायाला खरी गती मिळाल्याचे संजय म्हणाले.

दुग्ध व्यवसायातील उत्पादन- उत्पन्न

सध्या दुभत्या 17 गाई आहेत. त्यांच्यापासून दररोज दोन वेळचे मिळून 275 ते 300 लिटर दूध मिळते. दुधाला 3.9 ते चार फॅट मिळते. त्यामुळे प्रति लिटर 18 रुपये दर मिळतो. दुधाची जागेवरच खासगी दूध संघाला विक्री होते. यापासून दररोज किमान साडेचार हजार ते पाच हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. यासाठी दररोज प्रति गाईला सहा किलो पशुखाद्य, तीन किलो भुसा, 50 ग्रॅम मिनरल मिक्‍स्चर तसेच पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार क्षारमिश्रण दिले जाते.

दैनिक अर्थशास्त्र

सुमारे 22 गाईंसाठी दैनंदिन चारा, औषधे, देखभालीसाठी दररोज सुमारे 3,850 रुपये खर्च होतो. यात दोन हजार रुपयांचे पशुखाद्य, 600 रुपयांचा भुसा, मिनरल मिक्‍स्चर 100 रुपये, दोन मजुरांची 500 रुपये मजुरी, देखभाल व औषधांसाठी 200 रु., तर ओला व सुक्‍या चाऱ्यासाठी 450 असा हा खर्च आहे.

वर्षभरातील अतिरिक्त उत्पादन

लहान- मोठ्या मिळून 42 जनावरांपासून दरवर्षी सुमारे 50 ट्रॉली शेणखत मिळते. सध्या तीन ते चार हजार रुपये प्रति ट्रॉली शेणखताचा दर आहे. त्यातून दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. दरवर्षी किमान 12 ते 15 नवीन कालवडी विक्रीसाठी तयार होतात. किमान 18 महिने वयाच्या प्रति कालवडीपासून 20 ते 25 हजार रुपये मिळतात. शेणखतापासून मिळालेले पैसे जनावरांच्या खाद्यासाठी वापरले जातात. त्यामुळे दूध व कालवडीपासूनचे उत्पन्न फायद्यात राहते असे संजय म्हणाले.

गोमूत्राचा वापर पिकांसाठी

गोठ्यातून बाहेर पडलेले मूत्र एका खड्ड्यात साठवले जाते. तेथून पाइपमधून ते थेट शेतापर्यंत म्हणजे मका, कडवळ व अन्य चारा पिकांपर्यंत पोचवले जाते. जमिनीची प्रत वाढविण्यासाठीही त्याची चांगली मदत झाली आहे. स्लरी व गोमूत्रामुळे चारा पिकांना रासायनिक खतांचा वापर मर्यादित केला जातो.

दुग्ध व्यवसाय झाला कुटुंबाचा आधार !

संजय यांनी या दूध व्यवसायातून टप्प्याटप्प्याने कुटुंबाची प्रगती साधली आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने संजय यांना आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. मात्र आपल्या लहान भावाला म्हणजे युवराजला प्रोत्साहन देत बी.एस्सी. व पुढे स्पर्धा परीक्षा देण्याची त्याची मानसिक तयारी केली. सध्या युवराज पोलिस निरीक्षक पदी मुंबईत नोकरीस आहेत. दुसरा भाऊ लखोजी यांची दुग्ध व्यवसायात मदत होते. 

संपर्क - शिवाजी सालगुडे-पाटील, 9860512438

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate