অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गो संवर्धन आणि शाश्वत शेती

गो संवर्धन आणि शाश्वत शेती

शेती शाश्वत करण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शेती हा फायद्याचा व्यवसाय ठरावा यासाठी अनेक जण आपापल्या पद्धतीने मार्ग धुंडाळतायेत. जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील हरिपुरा येथील सेवाभावी कार्यकर्ते आणि संशोधक प्रभाकर मुरलीधर उपाख्य बापूसाहेब मांडे यांनी गो-संगोपन आणि संवर्धन हाच शेती शाश्वत करण्याचा मार्ग आहे, असे सप्रमाण सिद्ध केलेय. गो अनुसंधान केंद्र व बहुउद्देशीय संस्था हरिपूरा येथे 16 मार्च 2003 पासून त्यांनी हे कार्य सुरु केले आहे.

देशी गाईंचे संवर्धन करणे, त्यांचे शेण, मूत्र यांचा वापर करुन शेतीचा कस वाढविणे, पर्यायी कीटकनाशके तयार करणे आणि दुग्धोत्पादन करुन गो वंशाचे संवर्धन करणे आदी त्यांची उद्दिष्ट्ये आहेत. गो अनुसंधान केंद्राचा मूळ उद्देशच देशी गाईंचे पालन करणे हा आहे.

दुग्धोत्पादनाचा विचार करता देशी गाई परवडत नाहीत, असा एक सार्वत्रिक समज शेतकऱ्यांत आहे, त्यामुळे बरेच शेतकरी शेतीसाठी सर्वाधिक उपयुक्त असा जोडधंदा असणाऱ्या पशूपालन आणि त्यातही गो-पालनाकडे वळत नाहीत. मात्र ही बाब शेतकऱ्यांसमोर शास्त्रीयदृष्ट्या मांडावी या उद्देशाने श्री.मांडे यांनी हरिपूरा या दुर्गम आदिवासी पाड्यात सातपुड्याच्या पायथ्याशी गो अनुसंधान केंद्र स्थापन केले.

सुरुवातीला त्यांच्याकडे दहा गाई होत्या. आज 80 गाई आहेत. त्यात माळवी, लाल कंधार, नीमाड, काठेवाडी, कंकरेज, गीर, थार पारकर अशा आणि फक्त देशी जातींच्याच गाई आहेत. गाईंसाठी सुसज्ज गोठा, चारा ठेवण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी सोय केलेली आहे.

दुग्धोत्पादन हे गाईपासून मिळणारे ‘बाय प्रॉडक्ट’ असून खरे उत्पन्न गोमूत्र आणि शेण हेच आहे, असे श्री.मांडे सांगतात. योग्य आहार, देखभाल, सशक्त वळूंची पैदास यामुळे वंश सुदृढ होऊन तिसऱ्या पिढीत देशी गाईंपासून मिळणारे दुग्धोत्पादन तीन पटीने वाढते, असेही या अनुसंधान केंद्रात सप्रमाण सिद्ध झाल्याचे श्री.मांडे यांनी सांगितले.गाईंचे शेण, मूत्र एकत्र संकलित करुन त्यापासून बायोगॅस (मिथेन) तयार करण्याचे सयंत्र त्यांनी बसविलेले आहे. त्यासाठी त्यांनी 30 घनमीटरचे एक सयंत्र बसविण्याऐवजी सहा घनमीटरचे पाच दीनबंधू गोबरगॅस सयंत्र बसविले. आवश्यकतेनुसार ती चालविणे सहज शक्य होते व देखभाल दुरुस्ती अथवा बिघाडाच्यावेळी गॅसनिर्मिती अन्य सयंत्रातून सुरु राहू शकते. तयार झालेला गॅस एका मोठ्या रबरी फुग्यात साठविला जातो.

या गॅसपासून त्यांनी वीजनिर्मितीही सुरु केली आहे. दिवसभराच्या गॅस निर्मितीत 15 केव्हीए वीज तयार होते. साधारणतः या विजेपासून 10 अश्वशक्तीचा वीज पंप चार तास चालतो. निर्माण झालेली ही वीज ते आवश्यक तेव्हा वापरु शकतात. वर्षाकाठी 1 लाख 86 हजार रुपयांची इंधन निर्मिती होते. या गोबरगॅस सयंत्राला त्यांनी त्यांच्या संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळेचे संडास आणि सांडपाणीही जोडले आहे.

गॅस निर्मितीनंतर मागे राहणाऱ्या शेणराबचा वापर शेतात खत म्हणून केला जातो. अधिक काळ प्रक्रिया झाली असल्याने या शेणराब मध्ये साध्या शेणापेक्षा 20 टक्के जादा नत्र, स्फूरद आणि पलाश मिळते.गाईंनी शिल्लक टाकलेल्या वैरणीतही शेणपाणी टाकून त्याचे नॅडेप पद्धतीने खतनिर्मिती करुन, अर्धवट तयार झालेले हे खत गांडूळ खतनिर्मितीसाठी वापरले जाते. त्यामुळे खतनिर्मिती कमी कालावधीत होते. हे सर्व खत संस्थेच्या शेतीत वापरुन धान्य, कडधान्ये, भाजीपाल्याचे पीक घेतले जाते. हेच पीक संलग्न आश्रम शाळेसाठी वापरले जाते.

पीक संरक्षणासाठी स्थानिक वनस्पतींचा वापर करुन दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, ताक (आठ दिवस साठवलेले), गांडूळ पाणी, जीवामृत यांचा वापर केला जातो. त्याशिवाय समाधीखत (मृत जनावरांना जमिनीत पूरून), वटवृक्षाखालील माती, शिंगापासून खत यांचाही पीक संवर्धनासाठी वापर केला जातो. याशिवाय संस्थेचे क्षेत्र हे सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने तेथे चढ उताराची जमीन होती त्यावर समतल चर, लहान बंधारे बांधून माती अडवून जमीन तयार केली आहे. नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करुन पाणी साठवलेले आहे.

तसेच पंचायत समितीने के.टी.वेअर बंधाराही तयार करुन दिला आहे. त्यामुळे जलसंधारण होऊन पाण्याची उपलब्धता चांगली झाली आहे. गेल्या अकरा वर्षात या क्षेत्राचा कायापालट झाला आहे.

श्री.मांडे यांनी आपल्या क्षेत्रावर सामाजिक वनीकरण विभागाच्या योजनेअंतर्गत 15 हजार झाडे लावून जगवली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा सन 2009 चा वनश्री पुरस्कार आणि 2013 चा कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. शेतकऱ्याने आपली शेती शाश्वत करण्यासाठी गो-संवर्धनाची जोड देणे आवश्यक आहे, असेही श्री.मांडे आग्रहपूर्वक सांगतात.

- मिलिंद मधुकर दुसानेमाहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव

स्त्रोत : महान्युज

 

 

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate