অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुग्धव्यवसायात अतुलनीय यश

कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ली येथील अतुल कदम यांनी 2007 मध्ये तीन एचएफ संकरित गाईंच्या संगोपनापासून शास्त्रीय पद्धतीने दुग्धव्यवसाय सुरू केला. आज त्यांच्याकडे 25 एचएफ गाई आहेत. आपल्या व्यवसायाला त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. त्यातून वर्षाला चांगले उत्पन्न घेतातच, शिवाय केवळ शेणींच्या विक्रीतूनच वर्षाला दीड लाखाची कमाई ते करू लागले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगराच्या पायथ्याशीच केर्ली (ता. करवीर) हे गाव आहे. रस्त्यालगतच अतुल कदम यांचा गोठा आहे. त्यांची वडिलोपार्जित चार एकर शेती. बारावीनंतर अतुल यांनी नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय घेतला. पशुपालनात त्यांना अधिक रस होता. घरी जर्सी गाय होती. ती दिवसाला 10- 12 लिटर दूध द्यायची. त्यांच्या वडिलांचे बंगळूर येथील मित्र गोपाळ नायडू यांनी दिवसाला 30 लिटर दूध देणाऱ्या होलस्टीन फ्रिजीयन (एचएफ) गाईंबाबत सांगितले. तेव्हा त्यांनी या गाई खरेदीचा निर्णय घेतला. सन 2007 मध्ये बंगळूर येथील चिंतामणी बाजारातून 30 हजार रुपयांना एक याप्रमाणे जातिवंत चार एचएफ गाई खरेदी केल्या. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे गाईंच्या खरेदीसाठी (विशेषतः वाहतुकीसाठी) प्रति गाय पाच हजार रुपये अनुदान मिळाले.

संकरित गाईंच्या व्यवस्थापनाला सुरवात


एचएफ गाईंच्या व्यवस्थापनाबाबत फारशी माहिती अतुल यांना नव्हती. त्यांना दूध संघाचे डॉ. प्रकाश दळवी यांनी मार्गदर्शन केले. गाईंचे दूध डेअरीस जाऊ लागले, त्या वेळी दुधाचा दर प्रति लिटर 18 रुपये होता. दिवसाला अंदाजे 500 रुपये खर्च व्हायचा; पण खर्च वजा जाता त्याहून थोडे जास्त उत्पन्न मिळत होते. चांगले व्यवस्थापन केले तर फायदा वाढतो, हे दिसू लागल्यावर व्यवसाय वाढविण्याचा निर्णय अतुल यांनी घेतला.

अधिक क्षमतेच्या गाईंचेच संगोपन


हळूहळू गोठ्यातच गाईंची पैदास सुरू केली. गाभण लवकर न जाणाऱ्या, वयस्कर, खुऱ्या, कमकुवत झालेल्या अशा गाईंची विक्री करून अधिक क्षमतेच्या गाईच गोठ्यात ठेवल्या. गोठा व्यवस्थापनाच्या दृष्टीने याला महत्त्व आहे. पूर्वी गाईंची चार असलेली संख्या आज 25 पर्यंत पोचली आहे. दोन वर्षांपूर्वी साडेतीन लाख रुपयांचे कर्ज काढून मुक्त गोठा पद्धत सुरू केली आहे. दूधकाढणी यंत्राच्या साहाय्याने केली जाते. 
जातिवंत व 75 टक्के एचएफ व्यतिरिक्त संकरित जर्सी, पाच वासरे, दोन वळू (खिलार व एचएफ), पंढरपुरी म्हैस, 
खिलारी गाय अशी पशुसंपत्ती अमोल यांच्याकडे आहे.

शेणातून कमाई

प्रति आठवड्यास सुमारे एक ट्रॉली शेण जमा होते. त्यापासून आठवड्याला तीन ते साडेतीन हजारांपर्यंत शेणी तयार होतात. शेणी थापणाऱ्यांना मजुरी किंवा निम्म्या शेणी अशी पद्धती ठेवली जाते. वर्षाला अंदाजे दीड लाखावर शेणींचे उत्पादन होते. जिल्ह्यातील हुपरी येथील चांदीचे कारखानदार प्रति रुपयास एक या दराने शेणी विकत घेतात. यातून वर्षाला अंदाजे दीड लाख रुपये मिळतात.

खिलार गाईचे संगोपन

संकरित गाई भरपूर दूध देतात, त्या तुलनेत देशी गाई देत नाहीत; पण देशी गाईंचे महत्त्व आहे. हे महत्त्व विचारात घेऊन अतुल यांनी खिलार जातीची एक देशी गायही पाळली आहे. ही गाय अंदाजे तीन ते पाच लिटर दूध देते; पण या गाईमुळे गोठ्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव होत नाही. गोमूत्रामुळे परिसरातील पर्यावरण शुद्ध राहते. जतच्या बाजारातून तीन हजार रुपयांना ही गाय त्यांनी विकत घेतली आहे. पंढरपुरी गवळाट जातीची एक म्हैसही त्यांनी पाळली आहे. पहिल्या वेतामध्ये ही म्हैस दिवसाला आठ लिटर दूध देत होती.

दुधातील फॅट पाचपेक्षा कमी नाही

दुधाचा दर फॅटवर ठरविला जातो. अस्सल जातिवंत एचएफ जातीच्या गाईच्या दुधात तीन ते पाच टक्के फॅट असते, तर संकरित जर्सी गाईच्या दुधात पाच टक्के फॅट असते. 75 टक्के एचएफ जातीच्या गाईच्या दुधातही पाच टक्के फॅट असते. दुधातील फॅटचे प्रमाण चार ते पाच टक्‍क्‍यांच्या खाली येणार नाही यादृष्टीने प्रयत्न केले जातात.

चारा व्यवस्थापन

आपल्या चार एकर शेतीपैकी अतुल यांनी एक एकर क्षेत्र चारा पिकांसाठी राखून ठेवले आहे. पंधरा गुठ्यांत मका, अन्य क्षेत्रावर यशवंत गवत, कडवळ, बाजरी यांची लागवड केली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर डोंगरावरील गवतही चाऱ्यासाठी उपलब्ध होते. मळीचे गवतही उपलब्ध होते. त्यात पाच टक्के प्रथिने असतात. त्याची पौष्टिकता चांगली आहे. याचा परिणाम दुधावर होतो. मक्‍याची कणसे कोवळी असताना त्याची कुट्टी जनावरांना वाळल्या चाऱ्यासोबत दिल्यास दुधाचे प्रमाण वाढते, असा अतुल यांचा अनुभव आहे.

पावसाळ्यासाठी मुरघास

नदीच्या पूरक्षेत्रात अतुल यांची जमीन असल्याने पावसाळ्यात हिरवी वैरण पाण्याखाली जाते, त्यामुळे ती काढणे शक्‍य होत नाही. त्या वेळी ओल्या वैरणीचा प्रश्‍न निर्माण होतो. यासाठी मुरघासची व्यवस्था करावी लागते. यासाठी अतुल यांनी 24 बाय 13.5 फूट आकाराची मुरघास अर्थात "सायलेज बॅंक' तयार केली आहे. यासाठी दूध संघाचे 15 हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. यामध्ये अंदाजे 20 टन चारा साठविला जातो. मका, कडवळ, बाजरी, शाळू यांच्या कापणीनंतर 24 तासांच्या कालावधीनंतर त्यांची कुट्टी केली जाते. सायलेज बॅंक भरताना प्रथम एक इंचाचा वाळलेला चारा किंवा उसाचा पाला अंथरला जातो, त्यावर थोडे मीठ टाकले जाते. त्यानंतर त्यावर कुट्टी पसरली जाते. कुट्टी पसरताना त्यामध्येही मीठ टाकले जाते. ही कुट्टी भरताना दाबून घेतली जाते, जेणेकरून हवा राहणार नाही याची काळजी घेतली जाते. कुट्टी पूर्ण भरून झाल्यानंतर त्यावर मेणकागदाने झाकून घेतले जाते. त्यावर एक ट्रॉली माती अंथरली जाते. मातीने अंथरलेला मेणकागद पूर्णतः झाकून घेतला जातो. त्यातून तयार होणारा चारा पावसाळ्याच्या काळात जनावरांना खायला घातला जातो.

दूध व्यवस्थापन व उत्पन्न

संपूर्ण वर्षभराच्या हंगामात सर्वच गाई काही सतत गाभण अवस्थेतील नसतात. मात्र, वर्षभरातील हंगामात दिवसाला 250 लिटर दूध उत्पादनाची सरासरी कायम राहील, असे नियोजन अतुल यांनी केले आहे. गाभण गेलेल्या गाईचे दूध सातव्या महिन्यापासून बंद केले जाते. यामुळे दूध देण्याच्या कालावधीत गाईची झालेली झीज भरून निघते. फॉस्फरस, कॅल्शिअमची कमतरता भासत नाही. गाईचे आरोग्य उत्तम राहाते. गाय व्याल्यानंतर पहिले पंधरा दिवस 80 टक्के दूध वासरास दिले जाते. प्रत्येक गाय दिवसाला सुमारे 25 ते 30 लिटर दूध देते. दिवसाला एकूण 250 लिटर दुधाचे संकलन होऊन ते संघास दिले जाते. दुधाचा दर फॅटवर अवलंबून असून तो लिटरला 23 रुपये इतका मिळतो. वर्षाला पाच लाख रुपयांहून अधिक निव्वळ उत्पन्न मिळते. अतुल यांचे वडील व बंधू दूध संघाकडे नोकरीस आहेत, त्यांचीही मदत त्यांना गोठा व्यवस्थापनात होते.

अतुल यांच्या गोठा व्यवस्थापनातील काही गोष्टी

  • वर्षभराच्या कालावधीत दिवसाला 250 लिटर दुधाचे संकलन माझ्याकडील गोठ्यात होतेच असे अतुल म्हणतात.
  • मुक्त गोठा पद्धत असल्याने जनावरांना कोणत्याही प्रकारे ताणतणाव जाणवणार नाही असे वातावरण ठेवले जाते.
  • काही शेतकरी जनावरांना सतत वैरण टाकतात, त्यामुळे त्यांची रवंथ करण्याची क्षमता कमी होते. मी दिवसातून केवळ दोनच वेळा वैरण देतो.
  • दूध संघाचे पशुखाद्यही दिले जाते.
  • दर तीन महिन्यांनी जंतनिर्मूलनाचे डोस, तर दर सहा महिन्यांनी लसीकरण केले जाते.
  • पैदाशीसाठी कृत्रीम रेतन पद्धतीचा वापर केला जातो.
दुग्धव्यवसाय परवडत नाही असे जे म्हणतात, ते शेतकरी पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय करीत असावेत. सुधारित, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास व योग्य नियोजन ठेवल्यास या व्यवसायातून फायदा मिळण्यास अडचण नाही. 
- अतुल कदम
अतुल विश्‍वास कदम - 9604892700
केर्ली, ता. करवीर, जि. कोल्हापूर

लेखक : राजेंद्र घोरपडे

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate