অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुग्धव्यवसाय नोकरीपेक्षा चांगला

दुग्ध व्यवसायाची मनापासून आवड, झोकून देऊन काम करण्याची इच्छा, कुटुंबाची मदत, तसेच आर्थिक परिस्थितीवर मात करून सातारा जिल्ह्यातील भरतगाववाडी येथील नीलेश भोसले या युवा शेतकऱ्याने दुग्धव्यवसाय फायद्यात आणला आहे. नोकरी सांभाळत दोन गायींपासून सुरू केलेला व्यवसाय 20 गायींच्या संख्येपर्यंत पोचवला आहे. नेहमीच्या नोकरीइतके किंबहुना त्याहून अधिक उत्पन्न त्यातून मिळू लागले आहे.

शेती हा मुख्य तर दुग्धोत्पादन हा पूरक व्यवसाय समजला जातो. मात्र काही शेतकऱ्यांसाठी ही गोष्ट उलट आहे. त्यांच्यासाठी दुग्ध व्यवसायच सर्व काही असल्याची परिस्थिती आहे. सातारा तालुक्‍यातील भरतगाववाडी हे अडीच हजार लोकसंख्या असलेले छोटेसे गाव. या गावातील नीलेश वसंत भोसले हा तरुण शेतकरी. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक. घरची केवळ तीन एकर शेती. मात्र त्याच्या आई-वडिलांनी आपल्या अल्प क्षेत्रातूनच विहिरीच्या पाण्यावर भाजीपाला शेती केली. त्यातील उत्पन्नातून नीलेश यांना शिक्षण दिले.

दुग्धव्यवसायास सुरवात

नीलेश यांनी डेअरी क्षेत्रातील डिप्लोमा अभ्यासक्रम फलटण येथून पूर्ण केला. त्यांना दुग्ध व्यवसायाची आवड होती. त्यामुळे याच विषयात पुढील करिअर करायचे त्यांनी ठरवले. घरी एक म्हैस होती. सन 2006 च्या सुमारास सुमारे 50 हजार रुपयांच्या दोन संकरित म्हणजे होलस्टीन फ्रिजियन (एचएफ) गाई खरेदी केल्या. त्यासाठी आर्थिक जुळवाजुळवही झाली. गाईंचे संगोपन व शेतातील उत्पादनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. शिक्षणाचा पाया असल्याने आई वडिलांच्या इच्छेनुसार नीलेश यांनी स्थानिक खासगी डेअरीत नोकरी धरली. त्या वेळी दुग्ध उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सातत्याने संपर्क यायचा. गाईचे चांगल्या प्रकारे संगोपन केल्यास चांगले पैसे शिल्लक राहतात हे माहीत होऊ लागले. नीलेश यांचा अभ्यास वाढत गेला. टप्प्याटप्प्याने गाईच्या संख्येत वाढ होत गेली. नोकरी व दुधाच्या उत्पादनावर 2009मध्ये आणखी दोन गायींची खरेदी झाली. पाहता पाहता गायींची संख्या सहा, आठ अशी वाढत गेली. जागा कमी पडत असतानाही त्याच गोठ्यात संगोपन सुरू ठेवले. कुटुंबाची जबाबदारी व नोकरी सांभाळत नीलेश आई वडिलांच्या मदतीने गोठा व्यवस्थापन सांभाळू लागले.मोठा बांधीव गोठा बांधून गाईच्या संख्येत वाढ करावी असा विचार सुरू झाला. मात्र त्यासाठी भांडवल लागणार होते. मात्र मनाशी निश्‍चय करून खर्चाचे नियोजन केले.

गोठ्याचा केला विस्तार

भांडवलाची कमतरता असल्याने एका खासगी कंपनीकडून शेती तारण देऊन 2012 मध्ये 11 लाख रुपयांचे कर्ज काढले. या रक्कमेतून 55 बाय 45 फुटांचा "हेड टू हेड' असा चार गव्हाणीचा बांधीव स्वरूपाचा गोठा बांधला. शिल्लक पैशातून आणखी काही गायींची खरेदी केली. आता हाच गोठा 20 गायींचा झाला आहे. पैकी तीन गायी गोठ्यात पैदास झालेल्या आहेत. सहा कालवडी तयार होण्याच्या मार्गावर आहेत. दोन मुऱ्हा म्हशी आहेत. गाईची संख्या वाढल्याने दोन मजूर वाढविले. दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन खरेदी केली.गोठ्याचे एकूण क्षेत्र सुमारे सहा गुंठे आहे. त्यातील अडीच एकरात मुक्त संचार पद्धतीचा गोठा बांधला आहे. अर्थात ही जागा त्यासाठी कमी पडत असल्याची जाणीव नीलेश यांना आहे.

दूधसंकलन व ताळेबंद

दररोज प्रतिगाय दोन्ही वेळचे मिळून सुमारे 20 ते 22 लिटर दूध मिळते आहे. प्रतिदिन एकूण 180 ते 190 लिटर दूध उपलब्ध होते. हे दूध सातारा येथील खासगी दूध संस्थेकडे घातले जाते. याच संस्थेत नीलेश संकलन अधिकारी म्हणून नोकरी करतात. महिन्याला सुमारे पाच हजार 700 लिटर दूध विक्रीसाठी उपलब्ध होते. दुधास सरासरी 24 रुपये प्रतिलिटर दर मिळतो. फॅटची रेंज 3.8 ते 4.2 अशी आहे. खाद्य, मिनरल मिक्‍चर, कॅल्शियम, औषधे, सुका चारा यासाठी खर्च अधिक होतो. मजुरीसाठी महिन्याला 14 हजार रुपये खर्च होतो. प्रतिमहिना खर्च वजा जाता सुमारे 40 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
शेणखतापासून उत्पन्न 
वर्षाकाठी सुमारे 40 ट्रेलर शेणखत मिळते. सध्या शेणखताला चांगली मागणी असून प्रतिट्रॉली 3500 रूपयांप्रमाणे 22 ट्रॉली शेणखताची विक्री केली आहे. उर्वरित शेणखताचा वापर आपल्या शेतासाठी केला आहे.
चाऱ्यासाठीच सर्वाधिक क्षेत्र 
तीन एकर क्षेत्रापैकी दोन एकर क्षेत्रात कडवळ, मका चारा पिके घेतली जातात. उर्वरित एक एकरात घरच्यासाठी सोयाबीन, गहू, ज्वारी आदी पिके घेतली जातात.
आवडीतून प्रगती 
नीलेश यांनी लिपिकपदापासून नोकरी सुरू केली होती. दुग्धव्यवसायात आवड ठेऊन काम केल्याने संकलन अधिकारी या पदापर्यंत पोचणे त्यांना शक्‍य झाले. दूध उत्पादक शेतकऱ्यांशी दररोज संपर्क होत असल्याने विचारांची देवाणघेवाण होते. त्यातून या व्यवसायात पुढे जाणे शक्‍य झाल्याचे नीलेश सांगतात.
घरच्यांची होते मदत 
नीलेश यांची नोकरी सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत असते. सकाळच्या कामांत नीलेश यांना आई-वडील व पत्नी यांची मोठी मदत होते. गोठ्यातील कामे पहाटे पाचपासून सुरू होतात. सायंकाळी मात्र नोकरीवरून आल्यावर धारा काढणे, शेण काढणे तसेच अन्य कामांत नीलेश व्यस्त होतात. मजुरांचीही मदत घेतली जाते.

नीलेश यांच्या दुग्ध व्यवसायातील महत्त्वाच्या बाबी

1) हायड्रोपोनिक्‍स पद्धतीने गव्हावर आधारित चारानिर्मितीचा प्रयोग 190 ट्रे स्वरूपात केला आहे. 
2) गाईचे रक्ताभिसरण होण्यासाठी प्रत्येक गाईला काथ्याच्या साह्याने खरारा केला जातो. 
3) जनावरांचे प्राथमिक उपचार घरच्या घरी केले जातात. 
4) जनावरे निरोगी आणि सशक्त राहण्यासाठी गोठ्यात कायम स्वच्छता ठेवली जाते. 
5) गव्हाणीत 24 तास पाण्याची सोय केली आहे. 
6) सर्व चारा कुट्टी करून दिला जातो. यामुळे चाऱ्याची नासाडी होत नाही. 
7) जनावरांचे मूलमूत्र शेतापर्यंत वाहून नेण्याची व्यवस्था 
8) मिल्किंग मशिनद्वारे दूधकाढणी

मोठ्या गोठ्याचे स्वप्न

भविष्यात मोठा मुक्तसंचार गोठा बांधणे, तसेच सेंद्रिय दूधनिमिर्तीचा मानस आहे. पूर्वी आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने घर अगदी साधे होते. आज दुग्ध व्यवसायाच्या जोरावर लग्न, तसेच पक्के घर बांधणे नीलेश यांना शक्‍य झाले आहे. घेतलेल्या कर्जातील सुमारे अडीच लाख रुपयांची परतफेड करणे शक्‍य झाले आहे. आज नोकरीपेक्षाही या व्यवसायातून ते चांगले उत्पन्न मिळवत आहेत. चुलत बंधू किरण यांचे मार्गदर्शनही त्यांना लाभत आहे. 
नीलेश भोसले- 9822774283.

लेखक- विकास जाधव

-------------------------------------------------------------------------------------------------------------

संदर्भ: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate