অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पशुपालकांसाठीचे वरदान; डॉक्टर आपल्या दारी अभियान

पशुपालकांसाठीचे वरदान; डॉक्टर आपल्या दारी अभियान

पशुपालन ही प्राचीन परंपरा आहे. सुरुवातीच्या काळात मनुष्याने उदरनिर्वाहासाठी पशुंचे पालन केले. कृषी संस्कृतीच्या वाढीनंतर शेतीच्या कामासाठी आणि त्याच बरोबर घरातील दूधदुभत्यासाठी या पशूधनाचा वापर होत होता. कृषी आणि पशुपालन हा एकत्रच व्यवसाय म्हणून वाढला. त्यामुळे या दोन्हीचे नाते अतूट असेच आहे. आजही देशातील शेतकरी हा शेतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर पशुधनावरच अवलंबून आहे. पशुधन ही शेतकऱ्याची संपत्ती मानली जाते.

आजकाल पशुधन हे ग्रामीण भागात चरितार्थाचं महत्वाचं साधन आहे. पशुधन पालनाचे अनेकविध फायदे आहेत. केवळ चरितार्थच नाही तर निसर्गाचा समतोल राखण्यात तसेच वनस्पती सृष्टीस पूरक असे हे पशुधन आहे. घरातील प्राण्यांचे आणि शेतकऱ्याचे संबंधही अगदी जिव्हाळ्याचे असतात. ही जनावरं म्हणजे शेतकऱ्याच्या कुटुंबाची सदस्यच. पण, अशी ही पशुपालनाची परंपरा आज रोडावत असल्याचे दिसते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे पशुधनाची संख्याही रोडावत आहे. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे पशुवैद्यकीय सेवांचे प्रमाण कमी असणे. या सर्व गोष्टींचा विचार करून कुडाळ तालुक्यातील डिगस येथील पशुवैद्यकीय दवाखना (श्रेणी-2) यांच्या मार्फत ‘डॉक्टर आपल्या दारी’ हे अभियान सुरू केले होते. या अंतर्गत पशुवैद्यकीय संस्थेचे प्रमुख आणि त्यांचे सहाय्यक यांनी प्रत्येक पशुपालकाच्या घरी जाऊन त्याच्याकडील सर्व जनावरांची तपासणी केली. डिगस येथील दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील डिगस, कारिवणे, रुमडागांव व टेंबगाव या गावांमध्ये हे अभियान राबवण्यात आले.

या अभियानाचा डिगस क्षेत्रामध्ये सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. तसेच यामुळे पशुपालक व वैद्यकीय कर्मचारी यांच्यामध्ये सौहार्दाचे संबंध प्रस्थापित झाले. तसेच 2016-2017 च्या तुलनेत 2017-2018 मधील कामकाजामध्ये वाढ झाली. या अभियानामध्ये 128 कृत्रिम रेतन, 86 खच्चीकरण, 95 शस्त्रक्रिया, 127 गर्भ व वांझ तपासणी, 1326 जनावरांचे लसीकरण व 1999 जनावरांवर उपचार करण्यात आले.

या शिवाय अभियानामध्ये पशुपालकांना अत्यावश्यक सेवा (दिवस-रात्र) (सुट्टीच्या दिवशी) उपलब्ध करुन देण्यात आली. जनावरांना जंत नाशकांचा डोस देणे, कॅसनूर फॉरेस्ट डिसिज (जंगल ताप) याच्या नियंत्रणासाठी जनावरांच्या अंगावरील गोचिडांचा नायनाट करणे, त्यासाठी सर्वच्या सर्व जनावारांना गोचिडनाशक आयव्हरमेक्टीन इंजेक्शनची टोचणी करण्यात आली. गोचिडांच्या निर्मुलानासाठी गोचिडनाशक औषधांचा पुरवठा करण्याबरोबरच त्याचा वापर व फवारणीबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. 100 टक्के जनावरांना पायलाग प्रतिबंध लसीकरण करण्यात आले. व्हॉट्सअपच्या माध्यमातून पशुपालन विषयक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यात आली. दवाखान्यामध्ये मिनी वाचनालय सुरू केले असून त्यामध्ये दुग्धव्यवसाय, पशुपालन, शेळीपालन व कुक्कुट पालन या विषयांची पुस्तके, मासिके व अंक वाचनासाठी उपलब्ध करुन ठेवण्यात आले आहेत.

ही योजना यशस्वीरित्या राबवल्याबद्दल डिगस ग्राम पंचायतीने पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांचे अभिनंदनही केले आहे.

अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबवणारे डिगस हे राज्यातील पहिलेच केंद्र आहे. या अभियानाअंतर्गत कोणत्याही प्रकारचे शुल्क (व्हिजीट फी) आकारण्यात आली नाही. एकूणच ही योजना पशुपालकांसाठी फायदेशीर ठरेलेली आहे.

-हेमंतकुमार चव्हाण

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate