অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेळी पालनातून लाखोंचे हमखास उत्पन्न

शेळी पालनातून लाखोंचे हमखास उत्पन्न

सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील वाघेरी येथील काळुबाई कृषीकन्या गोट फार्मच्या माध्यमातून अरुण कचरे हे शेतकरी शेळी पालन, सेंद्रीय शेती आणि गांडूळ खत याच्या माध्यमातून महिन्याला हमखास लाखोंचे उत्पन्न स्वत: मिळवत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी व रविवारी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देवून या व्यवसायाकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

काळुबाईच्या नावानं चांगभलं, बळीराजाच राज्य येवू दे आदी मराठी चित्रपट आणि कुणाल म्युझीक कॅसेटच्या माध्यमातून स्वत:ची ओळख असणारे श्री. कचरे गेल्या 6 वर्षांपासून वाघेरीच्या माळावर काळुबाई कृषीकन्या गोट फार्मच्या माध्यमातून शेळी पालन शास्त्रोक्त पद्धतीने करत आहेत. सुरुवातीला अवघ्या पाच शेळ्या आणि एक बोकड अशी त्यांनी सुरुवात केली होती. नंतर 25 शेळ्या त्यांनी आणल्या सध्या 100 शेळ्या, 110 बोकड इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवसायाची वाढ केली आहे.

या शेळ्यांना लसून घास, मका, कडवळ, मारवेली गवत, शेवळी, तुती, कडू लिंब, काटेरी पाला असा हिरवा चारा तर द्विदल धान्याचे भुस्कट, हरभरा, मटकी, मुग, चवळी, सोयाबीन, भुईमुग वेल, शाळू, डोंगर माथ्यावरचं गवत यामध्ये मिट घालून हा सुका चारा ते देतात. हवामान, तापमान यावर आधारित ते ओला आणि सुका चाऱ्याचे प्रमाण ठरवतात. एक शेळी दिड वर्षात आपल्या चार पिलांसह एक ट्रॉली लेंडी खत देते. याच पाच जनावरांपासून 30 टन वार्षीक गांडूळ खत आणि 1200 ते 1500 लिटर व्हर्मी वॉश मिळते, असे श्री. कचरे यांनी सांगितले. शेळी पालन व्यवसायात 18 महिन्यात लाखाला लाख रुपये नफा राहतो, असेही ते म्हणतात.

सध्या या फार्ममध्ये सिरोही, सौजत, उस्मानाबादी आणि देशी शेळ्या आहेत. या विषयी माहिती देताना श्री. कचरे म्हणतात, सर्वात जास्त उत्पन्न देणारी, फायदा देणारी आपली देशी शेळी असून शेतकऱ्यांनी देशी शेळी पालनाकडे जास्तीत जास्त भर द्यावा. गांडूळ खत मोठ्या प्रमाणात विक्रीला जाते. त्या शिवाय स्वत:च्या शेतामध्ये उपयोगात येते. गांडूळ खतापासून मिळणारे व्हर्मीवॉश हे पिकांसाठी टॉनिक म्हणून वापरले जाते. शास्त्रोक्त पद्धतीने हवामानावर आधारित लसीकरण आणि चाऱ्याचे व्यवस्थापन केल्यास शेळी पालनातून हमखास लाखोंचे उत्पादन मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.

व्हर्मी वॉश

गायी, शेळी यांच्या मुत्र एका टाकीत जमा केले जाते. हे मुत्र तयार करण्यात आलेल्या गांडूळ खतावर फवारले जाते. त्याचबरोबर यामधून काही प्रमाणात पाणीही फवारले जाते. या गांडूळ खताच्या बेडपासून पाझरुन येणारा द्रव पदार्थ एका छोट्याशा टाकीमध्ये जमा होतो. यालाच व्हर्मी वॉश म्हणतात. हे व्हर्मी वॉश पिकांच्या वाढीसाठी टॉनिक ठरले आहे, अशी माहितीही श्री. कचरे यांनी दिली.

सेंद्रीय कीटकनाशक

देशी गायी, शेळी यांचे एकत्रित केलेले 10 लिटर मुत्र त्यामध्ये कडू लिंब, करंज, एरंड, रुई, निरगुडी, निलगीर, सीताफळ, रामफळ, करवंद, जांभूळ, पपई आणि शिकेकाई या प्रत्येक वनस्पतींची मूठभर पाने आणि मूठभर बिया एकत्र करुन त्याची कुजवन करायची. 40 ते 45 दिवस हे सर्व बंदिस्त ठेवायचे. त्यानंतर निर्माण होणारा अर्क प्रत्येकी 10 लिटर पाण्यात 500 मिलिलीटर टाकून पिकांवर कीटकनाशक म्हणून फवारायचे. या कीटकनाशकाचा जमिनीचा पोत वाढविणे आणि कीडीचे उच्चाटन करण्यासाठी निश्चितपणे फायदा होत असल्याचे श्री. कचरे म्हणाले.

- गणेश घोरपडे, प्रकल्प संचालक आत्मा

अवघ्या 18 गुंठे क्षेत्रामध्ये श्री. कचरे यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने शेळी पालन व्यवसाय केलेला आहे. शेळी पालनाकडे जिल्ह्यातून इच्छूक शेतकऱ्यांना वळविण्याच्या माध्यमातून श्री. कचरे यांच्या गोट फार्मवर आम्ही प्रशिक्षण देण्याचे नियोजन करीत आहोत. कराड आणि पाटण या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रशिक्षण सध्या झाले आहे. इतर भागतील शेतकऱ्यांना एकत्र करुन आत्माच्या माध्यमातून श्री. कचरे यांच्या फार्मचे अभ्यास दौरे व प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. प्रशिक्षणानंतर सदर शेतकऱ्याला अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.

श्री. कचरे यांच्या गोट फार्ममधील किमान 60 किलो पुढील बोकड पाहिल्यानंतर त्यांच्या तंत्रशुद्ध शेळी पालन व्यवसायाची यशस्विता दिसून येते. संपर्क- अरुण कचरे मो.क्र. 8600552249, 9819035948

लेखक - प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 8/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate