অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेळीपालनाने आर्थिक ताकद

चंडकापूर (ता. राहुरी, जि. नगर) येथील भास्कर मुरलीधर पंडित यांनी शेतीला जोड म्हणून शेळीपालनास सुरवात केली. उस्मानाबादी शेळ्यांची निवड, योग्य खाद्य व्यवस्थापन, वेळेवर लसीकरण आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार करडे आणि लेंडी खताच्या विक्रीतून त्यांना चांगला आर्थिक नफा होत आहे. शेळीपालनाच्या नफ्यातून त्यांनी शेतीमध्येही सुधारणा केली आहे. चंडकापूर (ता. राहुरी, जि. नगर) येथील भास्कर पंडित यांची अडीच एकर बागायती शेती आहे. कपाशी, ऊस आणि गहू ही मुख्य पिके. आठ वर्षांपूर्वी दुष्काळामुळे पीक लागवडीतून उत्पन्न मिळाले नाही. पुढे विहीरही आटली.

रोजगारासाठी पंडित यांनी परिसरातील शेतकरी नामदेव वढणे यांच्याकडे रोजाने काम सुरू केले. या दरम्यान अतिश्रमांमुळे पाठदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शेतीमध्ये पूर्ण वेळ राबणे अवघड झाले. अशा वेळी उत्पन्नासाठी काय करता येईल, याचा विचार करत असताना कमी खर्चाचा शेळीपालन व्यवसाय त्यांच्या डोळ्यासमोर आला.

1) परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून पंडित यांनी शेळीपालनास सन 2004 मध्ये सुरवात केली. पंडित यांनी गावातील शेतकऱ्यांच्याकडून दोन शेळ्या आणि चार करडे विकत घेतली. यासाठी पाच हजार आठशे रुपये खर्च आला. सुरवातीला शेताच्या बांधावरील चारा, नदीकाठी शेळ्यांना चारून संगोपन सुरू केले.

2) शेळीपालन व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी कळपात बोकड असला पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आले. याच काळात त्यांनी नगरजवळील डॉन बास्को ग्रामीण विकास केंद्रामध्ये शेळी व्यवस्थापनासंबंधी प्रशिक्षण घेतले. तेथूनच त्यांनी बोअर जातीचा बोकड दहा हजार रुपयांना खरेदी केला.

3) बोकड कळपात आल्याने शेळ्या वेळेवर गाभण राहू लागल्या. जातिवंत बोकडामुळे पहिल्या टप्प्यात चांगल्या वजनाची करडे जन्माला येऊ लागली. आर्थिक उत्पनातही वाढ होऊ लागली.

4) याच दरम्यान शेळीपालन आणि करडांच्या व्यवस्थापनासाठी त्यांना ब्राह्मणी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. संपत तांबे यांचे मार्गदर्शन मिळाले. मार्च 2012 मध्ये पंडित यांची शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेत लॉटरी पद्धतीने शेळीपालन व्यवसायासाठी निवड झाली. या योजनेतून त्यांना पंचायत समितीकडून दहा उस्मानबादी शेळ्या व एक उस्मानबादी बोकड असा 87 हजार 857 रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला. गेवराई येथील बाजारपेठेतून त्यांनी उस्मानाबादी शेळ्यांची खरेदी केली. पंडित हे अनुसूचित जातीचे लाभार्थी असल्याने त्यांना 75 टक्के अनुदान मिळाले.

असे आहे शेळ्यांचे व्यवस्थापन

1) शेळ्यांच्या व्यवस्थापनासाठी वीस फूट बाय चाळीस फुटांचा पूर्व-पश्‍चिम गोठा बांधलेला आहे. गोठ्यास तारेचे कुंपण घातले.

2) गोठ्यात शेळ्यांना पुरेसे पाणी पिण्यास मिळावे, यासाठी मोठ्या आकाराची भांडी पाणी भरून ठेवली जातात. शेळ्या त्यांच्या गरजेप्रमाणे पाणी पितात. दिवसातून दोन वेळा स्वच्छ पाण्याने भांडी भरली जातात.

3) पंडित दररोज सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास शेळ्या नदीकाठी चरावयास नेतात. शेळ्यांचे व्यवस्थापन स्वतःच करतात.

4) शेळ्यांना पुरेसा चारा मिळावा यासाठी त्यांनी 15 गुंठे क्षेत्रावर घासाची लागवड केली आहे. त्यातून वीस शेळ्यांची दररोजची खाद्याची गरज भागते. प्रत्येक शेळीस दररोज गरजेप्रमाणे दोन किलो हिरवा चारा दिला जातो.

5) पशुसंवर्धन विभागाच्या तज्ज्ञांच्याकडून शिफारशीनुसार लसीकरण केले जाते, तसेच जंतनिर्मूलन केले जाते. करडांना पुरेसे दूध पाजले जाते.

6) शेळ्यांमध्ये कोणत्याही रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी गोठ्याची स्वच्छता ठेवली जाते. दोन महिन्यांतून एकदा शेळ्या धुतल्या जातात.

7) गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये शेळ्यांच्या योग्य व्यवस्थापनामुळे पहिल्या टप्प्यात 15 आणि पुढील सहा महिन्यांत पंधरा करडे गोठ्यात जन्मली.

8) शेळी व्यवस्थापनामध्ये पशुसंवर्धन विभागातील डॉ. शिवाजी क्षीरसागर, डॉ. संपत तांबे, डॉ. बाजीराव टेमकर यांचे मार्गदर्शन मिळते.

9) शेळीपालन व्यवसायासाठी पहिल्यांदा शेळ्यांची खरेदी, विमा, गोठा, खाद्य, पाण्याची भांडी, आरोग्य सुविधा, औषधोपचार अशी 87,000 रुपयांची गुंतवणूक झाली. शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून त्यांना शेळीपालन व्यवसायासाठी 75 टक्के अनुदान मिळाले होते.

शेळीपालन ठरले आर्थिकदृष्ट्या फायद्याचे...

गेल्या दीड वर्षातील शेळीपालनातील आर्थिक उत्पन्नाबाबत पंडित म्हणाले, की शेळीपालनाच्या पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर महिन्यात पाच बोकडांच्या विक्रीतून 15 हजार आणि दहा पाटींची विक्रीतून 25 हजार मिळाले. 15 करडे आणि 15 शेळ्यांचा पाच महिन्यांचा चारा, खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापनाचा खर्च अधिक स्वतःची मजुरी असा एकूण 27 हजार खर्च झाला. यातून खर्च वजा जाता 13 हजार निव्वळ नफा झाला.

दुसऱ्या टप्प्यात जूनमध्ये सहा बोकडांच्या विक्रीतून 18 हजार आणि नऊ पाटींच्या विक्रीतून 22,500 रुपये मिळाले. या दुसऱ्या टप्प्यात शेळ्या आणि करडांचे व्यवस्थापन आणि स्वतःची मजुरी धरून 25 हजार रुपये इतका खर्च आला. खर्च वजा जाता 15,500 रुपये नफा झाला. आता चारा स्वतःच्या शेतातील असल्याने व्यवस्थापन खर्च कमी होणार आहे. साधारणपणे सहा महिन्यांची करडे वजनावर विकली जातात. व्यापारी स्वतः गोठ्यावर येऊन करडांची खरेदी करतात. पंडित यांना दीड वर्षात खर्च वजा जाता करडांच्या विक्रीतून 28,500 रुपये आणि लेंडीखत विक्रीतून 30 हजार रुपये निव्वळ नफा झाला आहे.

लेंडी खताला चांगली मागणी

पंडित हे दीपस्तंभ शेतकरी गटाचे सदस्य आहेत. या गटाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय वने आणि कृषी अधिकारी जयवंत भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी लेंडीखत प्रकल्प केला आहे. सात रुपये किलो दराने लेंडी खत परिसरातील शेतकऱ्यांना विकले जाते. शेतकरी गटातील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सुधारित पद्धतीने ऊस लागवडीला सुरवात केली.

सध्या दोन एकरांवर ऊस लागवड, 15 गुंठे क्षेत्रावर घास लागवड आहे. सुधारित तंत्रामुळे उसाचे उत्पादन एकरी 40 टनांवरून 60 टनांवर गेले आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून लेंडी खताचा वापर त्यांनी वाढविला आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार त्यांनी भाजीपाला लागवडीचेही यंदा नियोजन केले आहे.

शेळीपालन करताना...


1) जातिवंत उस्मानाबादी शेळी आणि बोकडाची निवड महत्त्वाची. 
2) शेळ्यांना वेळेवर लसीकरण, जंतनिर्मूलन आवश्‍यक. 
3) शेळ्यांना पुरेसा चारा आणि खाद्य व्यवस्थापनावर लक्ष हवे. 
4) दर तीन वर्षांनी बोकड बदलणे आवश्‍यक. 
5) गाभणकाळात शेळ्यांची काळजी घ्यावी. करडांना पुरेसे दूध पाजावे. 
6) गोठ्याची स्वच्छता महत्त्वाची. 

संपर्क - 
भास्कर पंडित - 9763073921 
डॉ. संपत तांबे - 9850297024

लेखक : अनिल देशपांडे

माहिती संदर्भ : अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate