অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुग्ध व्यवसायातील यश

दुग्ध व्यवसायातील यश

हायड्रोपोनिक मका, मुरघास व ऍझोला या त्रिसूत्री चाऱ्याचे काटेकोर नियोजन, मिल्किंग मशिनने दूधकाढणी, आरोग्य, पाणी यांचे नेटके व्यवस्थापन, मुक्त गोठा पद्धत आदी नगर जिल्ह्यातील निमगाव पागा (ता. संगमनेर) येथील अनिल पुंजाजी कानवडे कुटुंबाच्या यशस्वी दुग्ध व्यवसायाची वैशिष्ट्ये आहेत. एकत्रित कुटुंब असलेल्या या कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे कामांची जबाबदारी दिल्याने व्यवसायात सुसूत्रता आली आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका मुख्यालयापासून सुमारे पंधरा किलोमीटरवर निमगाव पागा गाव दुग्ध व्यवसायासाठी ओळखले जाते. गावातील कौटुंबिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम या व्यवसायाने केले आहे. गावात दररोज सुमारे चार हजार लिटर दूधसंकलन होते. कानवडे कुटुंब - प्रगतशील शेतीसाठी प्रसिद्ध
गावातील अनिल पुंजाजी कानवडे, त्यांचे बंधू काशिनाथ व अशोक असे तीन भावांचे एकत्रित कुटुंब आहे. सुमारे 1988 पासून त्यांच्याकडे वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय आहे. कुटुंबाने टप्प्याटप्प्याने सुधारणा करीत दुग्ध व्यवसाय आधुनिक व फायदेशीर केला आहे. तीन एकर शेती असणाऱ्या या कानवडे परिवाराने द्राक्ष, डाळिंब व भाजीपाला उत्पादनातही ओळख निर्माण केली आहे. सोळा सदस्यीय कुटुंबातील पाच सदस्यांकडे दुग्ध व्यवसायाची मुख्य जबाबदारी आहे. या विषयातील तज्ज्ञ एस. डी. मोरे, बाभळेश्‍वर कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. भास्करराव गायकवाड आणि पंचायत समितीचे पशुधन अधिकारी डॉ. डी. बी. दिघे यांचे मार्गदर्शन त्यांना होते. ऍग्रोवनच्या दुग्धविषयक प्रत्येक पानाचे त्यांच्याकडे संकलन आहे.

असा आहे कानवडे यांचा दुग्ध व्यवसाय


मुक्‍त गोठा रचना -
शंभर फूट लांबी व 80 फूट रुंद आकारात भोवताली तारांचे कुंपण असलेला गोठा. त्यातील मुक्‍त जागेत जनावरांना संचार करण्यासाठी मोकळीक दिली आहे. 
- सन 1988 ला नऊ गायींपासून व्यवसायाला सुरवात केली. गोठ्यातच पैदास वाढवत सद्यःस्थितीत 
एकूण जनावरांची संख्या 44 पर्यंत (मोठ्या गाई, दुभत्या व वासरे मिळून) वाढवली आहे. होलस्टीन फ्रिजियन, जर्सी, देशी असे वाण आहेत.

मुक्‍त गोठ्यामुळे झालेले फायदे


1. जनावरांना मुक्त फिरण्याची मोकळीक, त्यामुळे व्यायाम झाला. ती आनंदी राहिली. बैठक व्यवस्थित झाली. 
रवंथ जास्त करणे शक्‍य झाले. 
2. दोन वेळ चारा व गरजेनुसार पाणी पिणे शक्‍य झाले. 
3. गोचीड, मस्टायटीज किंवा अन्य आजार होण्यावर प्रतिबंध आला. 
4. जनावरे फिरत राहिल्याने त्यांच्या नख्यांची वाढ झाली नाही. 
5. मजूर कमी लागले. त्यावरील खर्चात बचत झाली. 
6. एकूण व्यवस्थापनामुळे दूध उत्पादनात वाढ झाली.

नेटके व्यवस्थापन


दुग्धउत्पादन कायम टिकविण्यासाठी कानवडे यांनी चारा, पाणी व आरोग्य व्यवस्थापनावर मुख्य भर दिला आहे. 
शंभर ट्रे असलेल्या एक शेडनेटमध्ये "हायड्रोपोनिक्‍स' (मातीविना शेती तंत्र) तंत्राद्वारा दोन किलो मका बियाण्यापासून सुमारे पंधरा किलो चारा उत्पादित केला जातो. 
ऍझोलानिर्मितीही केली जाते. 
सकाळी सात व सायंकाळी सहा वाजता खाद्य देण्यात येते. दररोज सकाळी सात वाजता गव्हाणी साफ करून त्यात स्वच्छ पाणी सोडण्यात येते. शेण तीन ते चार महिन्यांनी काढण्यात येते. 
वेळच्या वेळी लसीकरण होते.

हायड्रोपोनिक्‍स चारा पैदास तंत्राचा झाला असा फायदा


1. जनावरांसाठी नव्वद टक्‍के पचनास योग्य 
2. त्यासाठी शेतजमिनीची आवश्‍यकता नाही. 
3. पाण्याचा कमीत कमी वापर. 
4. कमी खर्चात हिरवा चारा. 
(आता चार शेडनेट तयार करण्यात येणार आहेत.)

30 ते 40 टन मुरघास कायम उपलब्ध


कानवडे यांच्याकडे सद्यःस्थितीत 30 ते 40 टन मुरघास उपलब्ध आहे. सुमारे तीन महिने तो पुरेल. चविष्ट, रुचकर असल्यामुळे जनावरे तो आवडीने खातात. चाऱ्यात मळी, गूळ, मीठ, युरिया, मिनरल मिक्‍श्चर किंवा प्रथिने आदी घटक मिसळले तर चारा अधिक चवदार होत असल्याचा कानवडे यांचा अनुभव आहे. मुरघास साठ दिवसांपर्यंत मुरवून पुढे एक वर्षापर्यंत वापरता येतो. दूध उत्पादनात या खाद्याचा महत्त्वाचा वाटा राहिला.

असा राहतो ताळेबंद


वर्षाला सुमारे 12 ते 15 गायी दुधाळ असतात. प्रति गाय दररोज दोन्ही वेळा मिळून सरासरी 15 लिटर दूध देते. काही गायी 18 ते 20 लिटरही दूध देतात. गावातील डेअरीला 22 ते 23 रुपये प्रति लिटर दराने दूध घातले जाते. प्रति गायीपासून प्रति दिन 330 रुपये मिळतात. त्यातील चारा किंवा एकात्मिक आहार, मजूर, औषधोपचार, वाहतुक असा मिळून सुमारे दीडशे रुपये खर्च असतो. पूर्वी हाच खर्च 250 रुपये असायचा. मात्र घरीच विविध खाद्याची निर्मिती सुरू केल्यापासून त्यावरील व मजुरांवरील खर्चात बचत केली आहे. 
महिन्याला सुमारे आठ ते दहा ट्रॉलीपर्यंत शेणखत मिळते. पिकांचे अवशेष, पाचट यांचाही वापर शेणखतात होतो. 
वर्षातून कालवडींचीही विक्री होते.

प्रति गायीमागे एक कोंबडी


मुक्‍त गोठ्यात 44 गायींमागे 44 कोंबड्या सोडण्यात आल्या आहेत. गोचीड, अळी व माशांची अंडी त्यातून साफ होतात. गोठा सफाईसाठी मजुरांची गरज कमी होते. कोंबड्या दिवसाकाठी 30 ते 40 अंडी देतात. त्या विक्रीतूनही उत्पन्न मिळते.

कार्याचा झाला गौरव


नगर जिल्हा परिषदेकडून आदर्श गोपालक म्हणून अनिल कानवडे यांचा गौरव झाला आहे. 
कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्‍वर यांच्यातर्फेही विशेष शेतकरी संशोधक पुरस्काराने सन्मान झाला आहे.

एक हजार शेतकऱ्यांच्या भेटीची नोंद


कानवडे यांच्या आदर्श गो प्रकल्पाला एक हजार शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. प्रत्येकाला सविस्तर मार्गदर्शन कानवडे यांच्यातर्फे करण्यात येते.

महिलांचा सहभाग ठरला महत्त्वाचा


दुग्ध व्यवसायातील महत्त्वाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कानवडे कुटुंबातील महिलांकडे सोपविण्यात आली आहे. अनिल यांच्याकडे गोठा व्यवस्थापन, सुयोग व योगेश यांच्याकडे दूध व चारा देणे, अनिल यांच्या पत्नी सौ. शीतल व योगेश यांच्या पत्नी सौ. रूपाली यांच्याकडे गोठा स्वच्छता व चारा व्यवस्थापन ही जबाबदारी आहे.

गटाची स्थापना अन्‌ डेअरीची उभारणी


अनिल कानवडे यांचा सहभाग असलेला साईप्रसाद शेतकरी दूध, भाजीपाला उत्पादक गट कार्यरत आहे. 
गटातील शेतकऱ्यांनी सामुदायिक पाणी व्यवस्थापन यंत्रणा उभारून जनावरांसाठी पाण्याचा प्रश्‍न सोडवला आहे. 
अनिल यांनीही डेअरी सुरू केली असून, सातशे लिटरपर्यंत दूधसंकलन होते. 

संपर्क : अनिल कानवडे : 9766070344 
सुयोग कानवडे : 9011883844

लेखक : गणेश फुंदे

माहिती संदर्भ : अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate