Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:57:24.289303 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता
शेअर करा

T3 2019/10/14 06:57:24.295008 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:57:24.325996 GMT+0530

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता

यवतमाळची ओळख आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्वदूर आहे. मात्र याच जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील गणोरी येथील शरदचंद्र उत्तरवार यांनी सीताफळ, मोसंबी सारख्या व्यवसायिक पीकपद्धतीतून आर्थिक वहिवाट प्रशस्त करण्यावर भर दिला आहे.

यवतमाळची ओळख आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्वदूर आहे. मात्र याच जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील गणोरी येथील शरदचंद्र उत्तरवार यांनी सीताफळ, मोसंबी सारख्या व्यवसायिक पीकपद्धतीतून आर्थिक वहिवाट प्रशस्त करण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे ‘सुपर गोल्ड सीताफळ’ नावाने आपल्या शेतमालाचे ब्रॅण्डींग करीत बाजारपेठ मिळविण्यातही ते यशस्वी झाले आहेत.

कापूस उत्पादक तालुका


बाभूळगाव तालुका लांब धाग्याच्या कापसासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्‍यात बेंबळा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना नेमके लक्ष्य गाठता येत नाही. दुष्काळी परिस्थितीला न घाबरता शेतकरी शरदचंद्र उत्तरवार यांनी ध्येय, चिकाटी व इच्छाशक्तीच्या बळावर मोसंबी व सीताफळाची बाग फुलविली आहे. दोन वर्षांपासून ते आपल्या फळबागेत विक्रमी उत्पादन घेत आहेत.

गावातील शेती विकली


पिंपळखुटी (ता. राळेगाव) येथील शरदचंद्र उत्तरवार यांनी शेती व्यवसायात प्रयोगशीलता जपली. 2002 मध्ये मका लागवडीचा प्रयोग त्यांनी केला होता. मका उत्पादन 35 क्‍विंटल एकरी त्यांनी मिळविले. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगूरू डॉ. अमीन यांनी त्यांच्या या प्रयोशगीलतेचे कौतुक केले होते.

डेअरी, शेळीपालन व्यवसायही त्यांनी केला. दरम्यान आजारपणामुळे 2009 मध्ये त्यांच्या पत्नी वारल्याने त्यांनी राळेगावातील हे सगळे प्रयोग बंद केले आणि शेतीही विकली. त्यानंतर यवतमाळला ते स्थायिक झाले. परंतू त्यांचे मन शहरात रमलेच नाही. सातत्याने शेतीची ओढ लागत असल्याने त्यांनी यवतमाळपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गणोरी येथे 18 एकर शेती खरेदी केली. यवतमाळ ते गणोरी असा दररोज प्रवास करुन ते शेतीचे व्यवस्थापन करतात. यावरुनच त्यांच्या जिद्द आणि चिकाटीचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही.

बागेचे व्यवस्थापन


श्री. उत्तरवार यांनी तीन एकरात सीताफळ व पाच एकरात मोसंबी लावून आपल्या कुशल व्यवस्थापनाच्या अनुभवाने सीताफळ व मोसंबी बागेची काळजी घेतली. चौथ्या वर्षात प्रत्यक्षात मेहनतीचे फळ चाखायला सुरवात केली. शेतात दोन विहिरी व दोन कूपनलिका आहेत. सिंचन सुविधेत ठिबक सिंचनासाठी दीड लाख रुपये खर्च केले. तर सीताफळाच्या बागेसाठी दरवर्षी 10 ते 15 हजार, असे 4 वर्षांत 50 ते 60 हजार रुपये व्यवस्थापनासाठी खर्च केले. त्यांनी पहिल्या वर्षी दोन लाख व दुसऱ्या वर्षी 4 लाख रुपयांचे सीताफळांचे विक्रमी उत्पादन घेतले. सीताफळाचे उत्पादन हे येणाऱ्या काळात दुपटीने वाढणार आहे. हे फळ पंचवीस ते तीस वर्षांपर्यंत सलग घेता येणार आहे. त्यांना सीताफळाची एकरी चार टनाची उत्पादकता झाली आहे. मिलीबगचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता राहते. त्याकरीता क्‍लोरापायरीफॉसची फवारणी केल्यास त्यावर नियंत्रण मिळविता येते, असे शरदचंद्र उत्तरवार सांगतात.

मोसंबीच्या बागेसाठी वर्षाकाठी 50 हजार रुपये खर्च करणाऱ्या श्री. उत्तरवार यांनी पहिल्या वर्षी 2 लाख व दुसऱ्यावर्षी 3 लाख रुपयांचे उत्पादन घेतले. मोसंबीचे उत्पादन 15 वर्षापर्यंत घेता येणे शक्‍य असल्याचे त्यांनी सांगितले. दर्जेदार मागणी असलेल्या सीताफळाची लागवड 16 बाय 9 फुट अंतरावर करण्यात आली.

यात तीन वर्ष सोयाबीन व उडीद यासारखे आंतरपीक घेण्यात आले. यामुळे फळबागेवरील खर्च या आंतरपिकातूनच निघाले. सधन लागवड करून छटाई तंत्राचा वापर करण्यात आला. गोरमळा, (ता. बार्शी जि. सोलापूर) येथील नवनाथ कसपटे या शेतकऱ्याव्दारे संशोधीत एन.एम. के.-1 या वाणांची लागवड त्यांनी केली आहे. 70 रुपये प्रती रोपाप्रमाणे एक हजार रोपांची खरेदी करण्यात आली. वाहतूकीसह या रोपांची किंमत 80 रुपये प्रती नग याप्रमाणे झाली होती.

रोटींग करीता ब्रॅण्डींग


यवतमाळ येथून पुष्ठ्याचे 1 फुट बाय 9 इंच आकाराचे बॉक्‍स खरेदी करण्यात आले. सहा रुपये प्रती नग याप्रमाणे या बॉक्‍सची खरेदी करण्यात आली. मोठ्या आकाराचे (500 ग्रॅम वजनाचे) 4 तर त्यापेक्षा लहान सीताफळ 5 बसतात. तणस आणि कागदाचा वापर करुन हे बॉक्‍स पॅक केला जातात. 150 रुपयांप्रमाणे या सीताफळ बॉक्‍सची विक्री होते. यवतमाळ, नागपूर, सुरत, नाशिक, पुणा बाजारपेठेत या सीताफळाची विक्री करण्यात आली. व्हॉटसअपच्या माध्यमातून आपल्या सीताफळाची माहिती त्यांनी विविध ग्रुपवर शेअर केली. त्याव्दारे देखील बाजारपेठ मिळविण्यात त्यांना यश आल्याचे ते सांगतात.

मोसंबीची लागवड


त्यांच्या बागेत 600 मोसंबीची झाडे आहेत. न्युसेलर जातीच्या मोसंबीची लागवड त्यांनी केली आहे. शेंदूरजना घाट (जि. अमरावती) येथून या रोपांची 35 रुपये प्रती नग याप्रमाणे खरेदी करण्यात आली होती. फायटोप्थोरा प्रतिबंधक रंगपूर खुंटावर याची कलम करण्यात आली होती. त्यामुळे या रोपांचे दर अधिक होते. मोसंबीची आंबीया बहारातील फळांची उत्पादकता घेतली जाते. ऑक्‍टोबरमध्ये फळे काढणीस येतात. सहा वर्षांपूर्वी मोसंबीची लागवड करण्यात आली. लागवडीनंतर पाचव्यावर्षी मालाची उत्पादकता झाली. नागपूरला मोसंबीची विक्री होते. गतवर्षी 22 हजार रुपये प्रती टनाचा दर मिळाला. 15 टनाची उत्पादकता झाली होती, असे शरदचंद्र उत्तरवार सांगतात.

सीताफळाची बाग पाहण्यासाठी गर्दी


संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झालेले दर्जेदार सुपर गोल्ड सीताफळाची बाग पाहण्यासाठी महाराष्ट्रातील असंख्य शेतकरी गर्दी करीत आहेत. टपोऱ्या आकारांची सीताफळाची बाग, लागवड व त्याचे व्यवस्थापन, सिंचन व्यवस्था व फळविक्रीची पद्धतही ते समजून घेत आहे.

जिल्ह्यासह राज्यात प्रसिद्ध झालेल्या गणोरीच्या सीताफळाचे मार्केटिंग व्हावे आणि त्यांची यशोगाथा जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी त्यांच्या शेती कौशल्याची दखल घेतली आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून होत आहे.

शब्दांकन : चैताली बाळू नानोटे,

निंभारा, पो. महान, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला

स्रोत - महान्यूज

 

2.90476190476
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:57:24.963270 GMT+0530

T24 2019/10/14 06:57:24.969969 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:57:24.117794 GMT+0530

T612019/10/14 06:57:24.136782 GMT+0530

T622019/10/14 06:57:24.278125 GMT+0530

T632019/10/14 06:57:24.279094 GMT+0530