Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia

मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / हुमरमळा प्रगतीच्या वाटेवर
शेअर करा
Views
  • स्थिती: परीक्षण प्रक्रिया चालू

हुमरमळा प्रगतीच्या वाटेवर

एखाद्या गावाची, तसेच तेथील शेतकऱ्यांची मानसिकता बदलली तर शेतीचे चित्र कसे बदलते, याचे उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हुमरमळा (आढाव) हे गाव.

एखाद्या गावाची, तसेच तेथील शेतकऱ्यांची मानसिकता बदलली तर शेतीचे चित्र कसे बदलते, याचे उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हुमरमळा (आढाव) हे गाव. गेल्या चार वर्षांत हे गाव शेती विकासाकडे आश्‍वासकपणे पावले टाकत आहे.

मुंबई-गोवा महामार्ग गावच्या मधोमध जाऊनही पिढ्यानुपिढ्या आर्थिक उन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले हुमरमळा (आढाव) हे सुमारे 1200 लोकवस्तीचे गाव. पावसाळ्यात भातशेती पारंपरिक पद्धतीने पिकवायची. तीन-चार महिने राब राब राबायचे; त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कसेबसे वर्ष ढकलायचे, हा येथील जवळपास प्रत्येक कुटुंबाचा पिढ्यानुपिढ्या जपलेला क्रम. शेतीत वर्षभराचा खर्च भागत नसल्याने तरुण पिढी मुंबई गाठायची.

बदलाच्या दिशेने...

हुमरमळा गावाच्या एका बाजूने पिठढवळ नदी वाहते. सह्याद्री रांगांमध्ये उगम पावणारी ही नदी पावसाळ्यात रौद्र रूप धारण करायची; पण फेब्रुवारी-मार्च आला की आटायची. यामुळे उन्हाळी शेतीला संधी नव्हती. साधारणपणे चार वर्षांपूर्वी कृषी विभागाने या गावात शेती विकासाच्या दिशेने काम करण्यास सुरवात केली. कृषी सहायक धनंजय गावडे यांनी गावातील शेतकऱ्यांना एकत्र केले. सुधारित पद्धतीने पीक व्यवस्थापन केल्यास आर्थिक नफा वाढू शकतो, हे समजावून सांगितले. ग्रामसभेत गावामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मान्य करून घेतला. त्यांच्या प्रयत्नांना "लुपीन ह्युमन वेलफेअर रिसर्च फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेची आणि किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ बाळकृष्ण गावडे, परेश आंबरे, विकास धामापूरकर यांची साथ मिळाली.

शेतकरी आले एकत्र

पीकबदलाचे फायदे लक्षात आल्यावर नियोजनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले. "आत्मा'च्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत कृषी योजनांची माहिती पोचवण्यास सुरवात केली. हंगामनिहाय शेतीशाळा, कृषी प्रात्यक्षिकांना गावात सुरवात झाली. सुधारित तंत्राचे छोटे प्रयोग सुरू झाले. गावात 11 शेतकरी गट आहेत, तर 18 महिला बचत गट कार्यरत आहेत.
1) पहिल्या टप्प्यात भात उत्पादन वाढीसाठी कार्यशाळा, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर पीक लागवडीबाबत प्रात्यक्षिके घेण्यात आली. यामध्ये सुधारित, संकरित जातींची निवड, बीज प्रक्रिया, रोपवाटिका, चारसूत्री, तसेच एसआरआय पद्धतीने लागवड, हिरवळीच्या खतांचा वापर, माती परीक्षणानुसार एकात्मिक पद्धतीने खतांचा वापर, युरिया ब्रिकेटचा वापर, एकात्मिक कीड, रोग नियंत्रण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीने लागवड सुरू केली. पूर्वी भाताचे एकरी सहा क्विंटल उत्पादन मिळायचे, परंतु सुधारित पद्धतीने आता एकरी 12 क्विंटल उत्पादन मिळते. भाताच्या उत्पादनाबरोबरीने पेंढ्याचीही गुणवत्ता वाढली. जनावरांना चांगला चारा मिळाला. भात विक्रीसाठी शेतकऱ्यांना खरेदी-विक्री संघाशी जोडून देण्यात आले. त्यामुळे 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. पूर्वी गावात फक्त 800 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी होत होती.

2) पिठढवळ नदीवर वरच्या भागात खूप जुना कच्चा बंधारा होता. "लुपीन' संस्था आणि लोकांच्या सहकार्याने या बंधाऱ्यावर लोखंडी प्लेट बसवून पाणीसाठा वाढविण्यात आला. यातून पाण्याची सोय झाली. त्यांच्या खालच्या बाजूला सात वनराई बंधारे श्रमदानातून उभारण्यात आले. यामुळे पाणीसाठा वाढला.

3) शाश्‍वत पाणीसाठ्यामुळे भात पिकानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात भुईमूग, भाजीपाला, सूर्यफूल, कलिंगड, मिरची, तसेच बटाटा, कांदा या पिकांची लागवड सुरू केली. यासाठी शासनाच्या विविध योजनांतून सुधारित जातींचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले. सुधारित पद्धतीने लागवड पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पूर्वी भुईमुगाचे एकरी पाच क्विंटल उत्पादन मिळायचे ते आता दहा क्विंटल मिळते. भुईमुगामध्ये आंतरमशागतीसाठी सायकल कोळपे पुरविण्यात आले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना दिसून आला. सूर्यफुलाच्या सुधारित जातीचे बियाणे दिले. तसेच लागवडीचे सुधारित तंत्र, माती परीक्षणानुसार खतमात्रा, परागीकरणाबाबत गटांना मार्गदर्शन करण्यात आले. पूर्वी एकरी दीड क्विंटल उत्पादन मिळायचे ते आता पाच क्विंटलपर्यंत गेले. या भागातील शेतकरी पाण्याच्या उपलब्धतेनुसार 10 गुंठे, 20 गुंठे अशीच भुईमूग, सूर्यफुलाची लागवड करतात. सूर्यफूल, भुईमुगाचे तेल काढून घरी वापरतात किंवा गावातच विकले जाते. त्यातून शेतकऱ्यांनी नफा वाढविला.

4) कलिंगड लागवड सप्टेंबर ते एप्रिल या कालावधीत टप्प्याटप्प्याने केली जाते. प्रत्येक शेतकरी उपलब्ध क्षेत्रानुसार 10 ते 15 गुंठे लागवड करतो. किमान सात-आठ शेतकरी एकत्र येऊन कलिंगड लागवडीचे नियोजन करतात. फळांची विक्री रस्त्यावर स्टॉल लावून केली जाते. एक फळ प्रति किलो 15 रुपये दराने विकले जाते. त्यामुळे व्यापाऱ्याला विकण्यापेक्षा पाच ते दहा रुपये नफा जास्तीचा मिळतो. एकरी किमान खर्च वजा जाता हंगामात शेतकरी सत्तर हजार रुपये नफा मिळवितात.

5) शेतकऱ्यांना विविध योजनांमधून कृषिपंपासह शेती मशागतीची अवजारे पुरविण्यात आली. यामुळे पूर्ण गावात सुमारे चारशे हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आले. सुमारे 200 कुटुंबे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या शेतीशी जोडली गेली.

6) पाण्याच्या उपलब्धतेमुळे गावात भाताची लागवड 90 हेक्‍टर, सूर्यफूल सात हेक्‍टर,भाजीपाला तीन हेक्‍टर, भुईमूग 10 हेक्‍टर, मका तीन हेक्‍टर, कुळीथ तीन हेक्‍टर या प्रमाणात लागवड असते. गावात केळी, नारळ, सुपारी, आंबा, काजू लागवड आहे. या शेतकऱ्यांना खतांचा योग्य वापर, कीड,रोग नियंत्रणासाठी योग्य काळात फवारणी कशी करायची, याचे मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबरीने काढणीपूर्व आणि काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले जाते.

शेतकऱ्यांनी उभारले शेतमाल विक्री केंद्र

शेतकऱ्यांनी महामार्गावर शेतमाल विक्रीसाठी हंगामी छोटे आठ स्टॉल उभारले. महामार्गावरून जाणारे प्रवासी या स्टॉलवरून भाजीपाला, मका कणसे, कलिंगडे खरेदी करतात. वाहतूक खर्च नसल्याने शेतकऱ्यांचा नफा वाढला. ग्राहकांनाही ताजा भाजीपाला मिळतो. यातून उरलेला भाजीपाला लगतच्या कुडाळमधील बाजारपेठेत विकला जातो.

कुक्कुटपालन, पशुपालनावर भर ...

१)केवळ शेतीवर न थांबता कृषी विभाग आणि लुपीनने या शेतकऱ्यांना जोडधंदा करण्याच्या दृष्टीने प्रवृत्त केले. किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्राने सातपुडा, तसेच सुधारित गावरान जातीच्या कोंबड्यांची पिले 14 शेतकऱ्यांना दिली आहेत. सुरवातीला घरच्या गरजांसाठी सुरू केलेला हा व्यवसाय अनेकांनी वाढविला.

२)प्रत्येक घरात किमान एक गाय किंवा एक म्हैस असावी असे नियोजन आहे. अगोदर दूध विकत आणावे लागत होते, आता घराच्या गरजेइतके दूध मिळते. त्याचबरोबरीने शेण, गोमूत्र मिळते. त्याचा वापर शेतीसाठी होतो. शेतकरी आता गांडूळ खत तयार करतात.

3) जनावरांची संख्या वाढल्याने शेतकरी गोबरगॅस उभारत आहेत. त्याची स्लरी शेतीसाठी उपयोगी पडते, स्वयंपाकाला इंधन मिळते. इंधनासाठी लाकडांची आवश्‍यकता कमी झाली.
""गेल्या तीन-चार वर्षांत येथील कृषी क्षेत्राने साधलेली प्रगती लक्षणीय आहे. लोकांमध्ये कृषी विकासाबाबत एक प्रकारची चांगली स्पर्धा निर्माण झाली आहे. शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेण्यासाठीही शेतकरी पुढे येतात. यातूनच गावाची प्रगती होत आहे.''
- जयभारत पालव, (सरपंच)
""आम्ही आठ शेतकरी मिळून कलिंगड लागवड करतो. महामार्गावर स्टॉल लावून कलिंगडाची विक्री केली जाते.पाण्याची उपलब्धता झाल्याने हंगामानुसार भाजीपाला, भुईमूग, सूर्यफुलाच्या सुधारित लागवडीकडे वळलो आहे. यातून नफा वाढला आहे.''
- न्हानू पालव, (शेतकरी)


संपर्क -
धनंजय गावडे (कृषी सहायक) - 9860810824
न्हानू पालव (शेतकरी) - 9421262382
जयभारत पालव (सरपंच) - 9422633533
------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत - अग्रोवन


2.91935483871
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन
Back to top