অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरचाच बोलबाला

भात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरचाच बोलबाला

सन 2016-17 मध्ये घेण्यात आलेल्या भात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूरच्या स्पर्धकांनी पहिले तीनही क्रमांक मिळवत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यामध्ये कागल तालुक्यातील सुळकुड येथील कलगोंडा बापूसो पार्वते यांनी हेक्टरी 119 क्विंटल 51 किलो भाताचे पीक घेऊन प्रथम क्रमांक तर सुळकुडच्या धोंडीराम खानगोंडा कतगर यांनी हेक्टरी 106 क्विंटल 34 किलो उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक मिळवीला आहे. तर गारगोटीच्या रामचंद्र शामराव चव्हाण यांनी 98 क्विंटल 15 किलो भात पीक घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे...

शेतकऱ्यांनी शेती करत असताना केवळ पारंपरिक पद्धतीने न करता कृषी विभागाने अगदी बांधापर्यत उपलब्ध करून दिलेले मार्गदर्शन व आपले नियोजनबद्ध कष्ट यांचा सुरेख ताळमेळ साधल्यास पिकाच्या गुणवत्तेत वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही निश्चितच वाढ होईल हे राज्यस्तरावर लख्ख यश मिळवून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

कागल तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील सुळकुड येथील दोन एकर शेतीमध्ये भात, शेंगा, ऊस अशी पिके घेऊन प्रगतीशील शेती करणाऱ्या कलगोंडा बापूसो पार्वते यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत भाग घेऊन ऊसाचा खोडवा गेल्यानंतर नांगरणी व रोटाव्होटरने मशागत करून 25 मे रोजी प्रो ॲग्रो 6444 या भात वाणाची लावण केली. लावण करण्यापूर्वी इफको, महावीर आणि न्यूट्रीकेट यांचा वापर केला. माती परीक्षण करून रासासनिक खतांचा वापर केला. दर 15 दिवसांनी असा तीन वेळा युरियाचा वापर केला. तर लावणीनंतर एक महिन्याने किटकनाशक व बुरशीनाशक यांची फवारणी केली. 20 दिवसांनी पुन्हा हिच फवारणी केली. नियोजनबद्ध प्रक्रियेमुळे पीक कापणी दिवशी हेक्टरी 144 क्विंटल उत्पादन आले. तर पीक वाळल्यानंतर 119 क्विंटल 51 किलो उत्पादन भरले. क्विंटलला 3,500/- रूपये तांदळाला दर मिळत असल्याचेही पार्वते यांनी सांगितले. कृषी विभागाचे अधिकारी व कृषी सेवा केंद्राचे मार्गदर्शन यामुळे हे यश साध्य झाल्याचेही श्री. पार्वते यांनी सांगितले. यापूर्वीही पार्वते यांनी सन 2015-16 मध्ये राज्यस्तरावर भात पीक स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळविला आहे.

सुळकुड येथीलच प्रगतशील शेतकरी धोंडीराम खानगोंडा कतगर यांची 4 एकर शेती असून यामध्ये आले, भात, ऊस, हळद अशा पिकांचे ते यशस्वी उत्पादने घेत आहेत. सन 2016-17 मध्ये झालेल्या भात पीक स्पर्धेत त्यांचा राज्यस्तरावर दुसरा क्रमांक आला आहे. भात पीक घेण्यापूर्वी त्यांनी दोनवेळा नांगरण केली. रोटावेटर फिरवले. भाताची टोकण करतानाच त्‍यांनी कोथंबीर व लाल पोकळा यांचेही उत्पादन घेतले. 24 गुंठ्यावरील प्लॉटवर ऊसाचा खोडवा घेतल्यानंतर त्यांनी भात पिकाचे नियोजन केले. प्रो ॲग्रो 6444 या जातीच्या बीयाणाची टोकण केली. कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जैवीक व रासायनिक खतांचा वापर केला. तीन वेळा भांगलन व दोन वेळा कोळपणी केली. माती परिक्षण करून रासायनिक खतांचा व दुय्यम खतांचा वापर केला. त्यांना बसवेश्वर कृषी सेवा मंडळाचेही मार्गदर्शन मिळाले. 23 ऑक्टोबरला झालेल्या कापणीमध्ये गुंठ्याला 146 किलो पीक मिळाले. तर पीक वाळल्यानंतर हेच उत्पादन हेक्टरी 106 क्विंटल 34 किलो भरले. सन 2014-15 मध्ये झालेल्या स्पर्धेतही त्यांचा राज्यस्तरावर तृतीय क्रमांक आला आहे.

शेतीची आवड असल्याने शेतीलाच प्राधान्य देऊन कुटुंबाच्या मालकीचे असणाऱ्या 10 एकर शेतीत भात, ऊस, केळी, भुईमूग अशी विविध पिके घेणाऱ्या गारगोटी येथील प्रगतीशील व प्रयोगशील शेतकरी चंद्रकांत शामराव चव्हाण यांचा सन 2016-17 च्या भात पीक स्पर्धेत राज्यस्तरावर तृतीय क्रमांक आला. शेती हाच एकमेव आणि मुख्य व्यवसाय असल्याने पिके घेत असताना त्यात उत्पादन वाढ, दर्जेदार पीक व उत्पन्नवाढ याबाबत सातत्याने जागृत राहून ते वेगवेगळे प्रयोग करत आहेत.

राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी असल्याने पीक चांगले घेतले पाहिजे व पिकाचा फेरपालटही झाला पाहिजे या दोन्ही दृष्टीने ऊस निघाल्यानंतर भुईमूगाचे पीक घेतले. भुईमूग काढणीनंतर भुईमूगाचे राहिलेले तन तसेच ठेऊन नांगरणी पूर्ण केली. तेथेच प्रो 4464 हा भाताचा वाण चांगला असल्याने गादीवाफ्यावर या वाणाची रोपे तयार केली. 24 व्या दिवशी चिखल पद्धतीने 20 गुंठ्यांच्या प्लॉटवर रोप लागण केली. रोपलागण करत असताना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शनासाठी शेतावर बोलवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोप लावण केली. किटकनाशकांचा पहिला डोस हा रोपलागण दिवशीच दिला. दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर केला.

पीक कापणी वेळी हेक्टरी उत्पादन 101 क्विंटल 28 किलो अशा सरासरीने निघाले. पीक वाळल्यानंतर ही सरासरी 98 क्विंटल 18 किलो अशी झाली. या सरासरीवर चंद्रकांत चव्हाण यांचा राज्यस्तरावर भात पीक स्पर्धेत तिसरा क्रमांक आला. या भाताची विक्री सरासरी 1200 ते 1300 क्विंटल दराने होते. तर खर्च 20 ते 22 हजार येतो.

भात पीकही शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारे असून योग्य मार्गदर्शन, बारकाईने लक्ष देऊन मशागत आवश्यक आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला प्रत्यक्ष बांधावर जाऊन केलेले मार्गदर्शन, माती परीक्षण व त्यानुसार पीकाचे केलेले नियोजन आणि शेतकऱ्यांचे नियोजनबद्ध कष्ट यामुळे पिकाच्या रूपाने मातीतूनही सोने उगवते हे खरेच आहे.

-वर्षा पाटोळे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate