Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 05:24:53.055908 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / मधमाशा आणि सूर्यफुल
शेअर करा

T3 2019/10/17 05:24:53.061513 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 05:24:53.091934 GMT+0530

मधमाशा आणि सूर्यफुल

सातारा जिल्ह्यातील गोखळी (ता. फलटण) गावचे तरुण पदव्युत्तर प्रयोगशील शेतकरी नितीन गावडे गेल्या पाच-सहा वर्षांपासून चोपण जमिनीत सूर्यफुलाची शेती करतात.

सातारा जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग


सातारा जिल्ह्यातील गोखळी (ता. फलटण) गावचे तरुण पदव्युत्तर प्रयोगशील शेतकरी नितीन गावडे गेल्या पाच-सहा वर्षांपासून चोपण जमिनीत सूर्यफुलाची शेती करतात. कमी कालावधीत चांगला आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या या पीकाविषयीचा त्यांचा अनुभव चांगला आहे. या वेळी त्यांनी सूर्यफुलात परागीभवनासाठी मधमाशी वापराचा प्रयोग करून एकरी अकरा क्विंटल यशस्वी उत्पादन मिळविले आहे. 

नितीन गावडे दहावीत असतानाच त्यांचे वडील वारल्याने घरची व आईची जबाबदारी त्यांच्यावर पडली. शिक्षणाची प्रचंड आवड असल्याने शेतीत काम करण्याबरोबर त्यांनी बारामती येथील महाविद्यालयातून एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परंतु शिक्षणानंतर नोकरी न करता शेतीतच प्रगती करण्याचा निर्धार केला. त्यांच्याकडे एकूण सहा एकर क्षेत्र असून सहा वर्षांपासून ते शेती करत आहेत. शेतात एक विहीर असून 
पाणी मुबलक आहे. ऊस, गहू, सूर्यफूल, मका, बाजरी तसेच भाजीपाला पिके ते घेतात. 

""आमच्या भागातील जमिनी चोपण व पाणी खारट आहे. त्यामुळे या जमिनीत अन्य पिकांच्या मानाने सूर्यफूल चांगले येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इतर पीक किंवा मका घेतला तर त्याचे एकरी केवळ पंधरा ते वीस क्विंटल मिळते, त्या तुलनेत सूर्यफूल परवडते, म्हणून 
ते फायदेशीर ठरत आहे.'' 
- नितीन गावडे


ऊस तुटलेल्या शेतात सूर्यफूल -


नितीन यांनी सांगितले, की ऊस तुटल्यानंतर दरवर्षी उसाच्या रानात सूर्यफूल लावण्याचे नियोजन असते. या वर्षी जानेवारीत उसाच्या शेताची रोटाव्हेटरच्या साहाय्याने मशागत केली. मशागत करताना उसाचे पाचट कुट्टी करून शेतातच कुजविले. त्यानंतर तीन फुटांची सरी काढून बांधणी करून घेतली. खासगी कंपनीच्या संकरित सूर्यफूल बियाण्याची दोन किलोची बॅग आणून 15 जानेवारीला एक एकरात बी टोकून लागवड केली. सरीच्या दोन्ही बाजूंनी साधारण पाऊण फूट अंतरावर बियाणे टोकून दिले. याप्रमाणे एक एकरासाठी सुमारे सव्वा ते दीड किलो बियाणे लागले. बी टोकल्यानंतर सरीतून लगेच पाणी सोडले. त्यानंतर आंबवणीला शेत मजुरांद्वारे खुरपून घेतले. खुरपणी नंतर डीएपी, अमोनिअम सल्फेट, पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा पिकाला दिली. जिथे बी टोकली होती, तेथून चार बोट अंतरावर खड्डा करून त्यात खते टाकून बुजविली. सूर्यफूल पीक साधारण साडेतीन महिन्यांत तयार होते. 15 जानेवारी ते एप्रिल अखेर या कालावधीत पिकाला एकूण पाच ते सहा पाणी दिले. पंधरा दिवसांतून एकदा पाणी याप्रमाणे पाणी देण्याचे वेळापत्रक केले होते. पिकाला कोणत्याही रोग-किडींचा प्रादुर्भाव झाला नसल्याने फवारणीची गरज भासली नाही.


परागीभवनासाठी मधमाशी पेट्या -


बारामती "केव्हीके'ने मधमाशीपालनाचे युनिट सुरू केले आहे. मधमाशीपालनाचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करण्यावर भर दिला जात आहे. सूर्यफूल बी भरण्याच्या अवस्थेत असताना बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने संपर्क साधून शेतात मधमाशी पेट्या ठेवण्याविषयी विचारपूस केली. इतर शेतकऱ्यांना याची माहिती होण्याच्या उद्देशाने मधमाश्‍यांच्या एकूण पंचवीस पेट्या शेतात ठेवण्यात आल्या होत्या. एका पेटीत "मेलिफेरा'जातीच्या दहा हजार माश्‍या असून सूर्यफुलातून पराग व मकरंद दोन्ही मिळत असल्याने फायदा होत असल्याचे "केव्हीके'चे संतोष खुटवळ यांनी सांगितले. आसपासच्या शिवारात सूर्यफूल पीक मोठ्या प्रमाणात असल्याने इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा झाला. सूर्यफुलाच्या बिया भरेपर्यंत साधारण एकवीस दिवस या पेट्या शेतात मोकळ्या रानात उन्हात ठेवण्यात आल्या होत्या.


परागीभवनास मोठी मदत -


मधमाश्‍यांमुळे परागीभवन चांगले होण्यास खूप मदत झाली. तसे तर वाऱ्यामुळेही परागीभवन होते, परंतु सूर्यफुलांची तोंड एकाच दिशेने असल्यामुळे त्याचा तितका फायदा होत नाही. मधमाश्‍यांद्वारे चांगले परागीभवन होत असल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षांत सूर्यफुलात 
अर्धवट दाणे भरलेले अनुभवास यायचे. त्यामुळे बिया कमी राहून सरासरी उत्पादन मिळत नव्हते. मात्र या वेळी फुले बियांनी पूर्णपणे भरल्याचे दिसून आले. पहाट झाली की मधमाश्‍या शेतातील फुलांकडे जाण्यास सुरवात व्हायची आणि अंधार व्हायला आला की त्या पेटीत बसायच्या. 
मधमाशीमुळे बियांची गुणवत्ता सुधारली. बियांचे वजन जास्त भरले असून त्यांची जाडी थोडीशी वाढल्याचे नितीनने सांगितले.


"ऍग्रोवन' मार्गदर्शक -


"ऍग्रोवन' दररोज घरी येतो. त्यातील यशोगाथा, निरनिराळ्या पिकांचे लेख, सल्ला खूपच मार्गदर्शनीय असतात. तसेच पीक विम्याची माहिती, शासनाच्या योजना समजतात. चोपण जमीन सुधारणेबाबत लेख उपयोगी ठरल्याने "ऍग्रोवन' मार्गदर्शक ठरला आहे. तसेच "केव्हीके'बारामती येथील तज्ज्ञांचेही सतत मार्गदर्शन होत असल्याने शेतीत निरनिराळे प्रयोग करत असल्याचे नितीनने सांगितले.


काढणी, मळणी -


फुलांची मजुरांद्वारे खुडणी करून यंत्राने मळणी केली. यापूर्वी हाताने बडवून सूर्यफुलाच्या बिया काढल्या जात. परंतु या वर्षी मशिनने काढणी केली. त्यातून निघालेला फुलांचा चुरा खतासाठी शेतातच टाकला. एक एकरातून 11 क्विंटल सूर्यफूल उत्पादन मिळाले. तुलनेने गेल्या काही वर्षांत एकरी उत्पादन साधारण आठ ते साडेआठ क्विंटल एवढेच मिळायचे. मधमाशी पेट्या ठेवल्याने उत्पादनवाढीस चांगली मदत झाली. यापुढे खरिपात सूर्यफूल लावल्यानंतर बारामती "केव्हीके'तून भाड्याने मधमाशी पेट्या घेऊन शेतात ठेवण्याचा निश्‍चय नितीनने केला आहे.


पिकासाठी झालेला एकूण खर्च -


- रोटाव्हेटरने शेत तयार करणे - तीन हजार रुपये 
- बियाणे दोन किलोची बॅग - नऊशे रुपये 
- लागवड टोकणी मजुरी - अकराशे रुपये 
- खुरपणीसाठी मजुरी - एक हजार रुपये 
- खते - साडेचार हजार रुपये 
- खड्ड्यात खते बुजविणे - दीड हजार रुपये 
- काढणी, खुडणी, मळणीसाठी - सहा हजार रुपये 
- एकूण अठरा हजार रुपये


आर्थिक फायदा -


सूर्यफुलाला प्रति क्विंटल तीन हजार 400 रुपये दर मिळाला. त्याप्रमाणे अकरा क्विंटलचे एकूण 37 हजार 400 रुपये हाती आले. खर्च वजा जाता 19 हजार 400 रुपये निव्वळ नफा साडेतीन महिन्यात मिळाला.


सूर्यफुलाचा अनुभव -


माझ्या विहिरीचे पाणी खारट असल्याने जमीन चोपण झाली आहे. परंतु सूर्यफूल केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होत आहे. क्षारांचे प्रमाण कमी होऊन माती मऊ राहत असल्याचे दिसून येत आहे. सूर्यफुलाला मिश्र हवामान लागते, त्यामुळे अशा हवामानात हे पीक चांगले येते. कमी कालावधीत चांगले पैसे देणारे हे पीक आहे. आर्थिक फायदा होतो. फुलांचा पालापाचोळा जमिनीत गाडल्याने त्याच्या खताचाही फायदा शेताला होत असल्याचे नितीनने अनुभवातून सांगितले.


बाजारभावाचे गणित -


सूर्यफूल लावण्यास सुरवात केली तेव्हा प्रति क्‍विंटल 1400 रुपयांपासून दर मिळत होते, त्यानंतर दर 2300 ते 2800 रुपये आणि आता प्रति क्विंटल 3400 रुपये झाला आहे. गेल्या काही वर्षांत दर वाढतच आहेत. त्यातही खाद्यतेलाचा दर वाढला की सूर्यफुलाचे दर वाढतात. 
आता दर आणखी वाढला आहे. सध्या 3540 रुपये दर सुरू आहे. या वर्षी मला मिळालेला दर सर्वाधिक आहे. मार्केटचा अनुभव सांगायचा तर सूर्यफूल मार्केटमध्ये कमी प्रमाणात असते. त्यामुळे दर मिळायला समस्या येत नाही. उसापेक्षा जास्त दर मिळतो. पोत्यामध्ये भरून बी नेले जाते.


पिकात जाणवणाऱ्या समस्या -


- भुरी रोग या पिकात जास्त येतो. पीक दाट असल्यामुळे फवारणी करता येत नाही. 
- सोरट (केसाळ अळी) या किडीचाही प्रादुर्भाव होतो. परंतु कीडनियंत्रणात आणता येते.


गावडे यांच्याकडून शिकण्यासारखे -


- टाकाऊ पदार्थ, उसाचे पाचट शेतातच गाडतात, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारत आहे. 
- कमी कालावधीची पिके करणाऱ्यावर अधिक भर 
- शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, दोन जर्सी गाईंचे दूध डेअरीला पाठवितात.


वेगळा प्रयोग -


शेतात या वर्षी सबसॉयलरचा वापर केल्यामुळे शेतात पोकळी तयार झाली आहे. रान फुगले आहे. भांडवल कमी आहे, परंतु हळूहळू शेतीला ठिबक करण्याचे नियोजन आहे. विहिरीचे पाणी खारट असल्यामुळे वॉटर कंडिशनर बसविणार आहे. रान खराब होणार नाही, याची काळजी घेणार असल्याचे नितीनने सांगितले.


तज्ज्ञांचे मत -


कृषी संशोधन केंद्र, सावळीविहीर येथे सूर्यफुलावर संशोधन केले जाते, केंद्राचे प्रमुख डॉ. लक्ष्मण माने म्हणाले, की सूर्यफुलाचे हेक्‍टरी सरासरी पंधरा ते वीस क्विंटल हेक्‍टरी उत्पादन मिळते. तुलनेत चोपण जमिनीत एकरी अकरा क्विंटल उत्पादन घेणे ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. सूर्यफूल हे परपरागीभवित असल्याने मधमाश्‍यांमुळे परागीभवनास चांगली मदत होते. सूर्यफुलाचे परागकण वजनाला जड असल्याकारणाने वाऱ्याबरोबर एका फुलापासून दुसऱ्या फुलापर्यंत पोचत नाहीत. त्याचे माध्यम म्हणून मधमाशी फायदेशीर ठरते. फुलांच्या चुऱ्याचा वापर जनावरांच्या खाद्यासाठी देखील चांगला होऊ शकतो. पशुखाद्यात किंवा सोयाबीनचा भुसा यात ते मिसळून दिले तरी चांगले ठरू शकते. जमिनीचा चोपणपणा कमी करण्यासाठी जिप्सम टाकल्याने पोत तर सुधारण्यास मदत होते. शिवाय उत्पादन व तेलाचे प्रमाण एक टक्का वाढू शकते. 

संपर्क - नितीन गावडे, 9975363050

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

3.05882352941
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 05:24:53.749691 GMT+0530

T24 2019/10/17 05:24:53.756449 GMT+0530
Back to top

T12019/10/17 05:24:52.891817 GMT+0530

T612019/10/17 05:24:52.909773 GMT+0530

T622019/10/17 05:24:53.045389 GMT+0530

T632019/10/17 05:24:53.046248 GMT+0530