Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia

मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / शेतीला रायपनिंग चेंबरची जोड
शेअर करा
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

शेतीला रायपनिंग चेंबरची जोड

नांदगाव शिंगवे (जि. नगर) येथील प्रयोगशील शेतकरी अतुल अष्टपुत्रे यांनी सुधारित तंत्र ; फळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी रायपनिंग चेंबरची उभारणी केली.

आंबा, केळीची योग्य पिकवण झाली, दराचा लाभ मिळाला.  नांदगाव शिंगवे (जि. नगर) येथील प्रयोगशील शेतकरी अतुल अष्टपुत्रे यांनी सुधारित तंत्र, फळबाग लागवडीच्या बरोबरीने बाजारपेठेची गरज ओळखून फळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी रायपनिंग चेंबरची उभारणी केली. स्वतःच्या शेतातील आंबा, केळी पिकविण्याच्या बरोबरीने परिसरातील शेतकऱ्यांनाही याचा फायदा होऊ लागला आहे.

नगर जिल्ह्यातील नांदगाव शिंगवे येथे अष्टपुत्रे कुटुंबीयांची वाडवडिलांपासून 200 एकर शेती आहे. अष्टपुत्रे कुटुंबीयांनी उपलब्ध क्षेत्रामध्ये फळबाग, हंगामी पिकांची लागवड आणि पशुपालनही योग्य पद्धतीने केले आहे. सध्या त्यांच्याकडे सोळा एकर केळी, चिकू सहा एकर, आंबा (केसर, हापूस, वनराज, लंगडा) दहा एकर, संत्रा दीड एकर, अंजीर एक एकर, डाळिंब पाच एकर, पपई तीन एकर, पेरू सहा एकर असे फळबाग लागवडीचे क्षेत्र आहे. त्याचबरोबरीने 20 एकरांवर ऊस लागवड आहे. उर्वरित क्षेत्रात हंगामी पिकांची लागवड केली जाते. याचबरोबरीने 20 जनावरांचा गोठाही शेतावर आहे. स्वतः अतुल चक्रपाणी अष्टपुत्रे कृषी पदवीधर आहेत. त्यांचे काका राजेंद्र अष्टपुत्रे 1976 सालचे कृषी पदवीधर आहेत. त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती नियोजन केले जाते.

रायपनिंग चेंबरची उभारणी

बाजारपेठेचा अभ्यास करून पीक नियोजनावर अतुल अष्टपुत्रे यांचा भर आहे. आतापर्यंत ते केळी, आंबा, चिकू ही फळे स्थानिक व्यापारी, तसेच पुण्यातील बाजारपेठेत विकत होते. दर्जेदार फळे असूनही म्हणावा तसा दर त्यांना मिळत नव्हता. त्यामुळे फळांच्या विक्रीसाठी काही नवीन प्रयत्न करता येईल का, या शोधामध्ये ते होते. या वाटचालीबाबत माहिती देताना अष्टपुत्रे म्हणाले, की आमच्याकडे 16 एकर क्षेत्रावर केळी लागवड आहे. केळीचे सरासरी एकरी 40 टन उत्पादन मिळते. दर्जेदार केळी असूनही स्थानिक बाजारपेठेत किलोला सहा ते आठ रुपये दर मिळायचा. त्यामुळे पुणे बाजारपेठेत केळी पाठवली. तेथेही अपेक्षित दर मिळत नव्हता. परंतु पुण्यामध्ये मी व्यापारी लोकांनी बांधलेली रायपनिंग चेंबर्स पाहिली. त्यामध्ये केळी, आंबा योग्य प्रकारे पिकवून चांगला दर आपल्यालाही मिळविता येईल, असे लक्षात आले. तसेच नवीन व्यवसायही मिळाला.
1) बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन अष्टपुत्रे यांनी नगर शहरातील सावेडी भागात सन 2010 मध्ये 20 टन क्षमतेचे रायपनिंग चेंबर उभारले. या रायपनिंग चेंबरमध्ये फळे पिकवण्यासाठी पाच टक्के इथिलीन वायूचा वापर केला जातो. 
2) पारंपरिक पद्धतीत आंबा आढी घालून पिकविला जातो. त्यामध्ये तो गरम होते. रायपनिंग चेंबरमध्ये केळी, आंबा हळूहळू पिकविला जातो. यामध्ये 10 ते 12 अंश सेल्सिअस तापमान राखले जाते. साधारणपणे सात दिवसांत आंबे, तर चार दिवसांत केळी पिकतात. 
2) रायपनिंग चेंबरमध्ये दोन खोल्या आहेत. त्यातील पहिली खोली चार टन क्षमतेची आहे. यामध्ये आंबा फळे, केळी क्रेटमध्ये ठेवली जातात. एका क्रेटमध्ये 15 किलो आंबा आणि 18 किलो केळी मावतात. या खोलीमध्ये केळीसाठी 16 अंश सेल्सिअस, तर आंब्यासाठी 10 ते 12 अंश सेल्सिअस तापमान ठेवले जाते. पहिल्या दिवशी पाच टक्के इथिलीन वायू एक मिनिट खोलीत सोडला जातो. या वायूचे प्रमाण खोलीच्या आकारमानानुसार ठेवणे आवश्‍यक असते. साधारणपणे18 तास ही खोली बंद ठेवली जाते. या काळात आंबा, केळी फळांतील इथिलीन वायूचे प्रमाण वाढण्यास सुरवात होते. त्यामुळे आंबा फळे आतून पिकण्यास सुरवात होते. यानंतर फळांचे क्रेट दुसऱ्या खोलीमध्ये हलविले जातात. 
3) दुसऱ्या खोलीमध्ये 16 टन फळे मावतात. येथे दर दोन तासांनी व्हेंटिलेशन केले जाते. त्यामुळे आतील हवा बाहेर जाते, बाहेरील शुद्ध हवा आत येते. या खोलीचे तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअस ठेवले जाते. या खोलीमध्ये आंबा फळे सहा दिवसांत, तर केळी चार दिवसांत पिकतात. या काळात फळे चांगली पिकतात. फळाची चव आणि नैसर्गिक रंग टिकून राहतो. फळ आतून पूर्णपणे पिकते.

असे आहे रायपनिंग चेंबरचे नियोजन

1) रायपनिंग चेंबरमध्ये रोज चार टन आंबा पिकविला जातो. आंब्याच्या हंगाम फेब्रुवारी ते 15 जूनपर्यंत चालतो. साधारणपणे या काळात 500 टन आंबा पिकविला जातो. अष्टपुत्रे स्वतःकडील आंबा या चेंबरमध्ये पिकवतात, तसेच काही आंबा रत्नागिरीहून आणतात. परिसरातील शेतकरीदेखील या ठिकाणी आंबा पिकविण्यास ठेवतात. केळीचा हंगाम जून ते फेब्रुवारी असा असतो. रोज तीन टन केळी पिकविली जातात. सध्याचा बाजार पाहता कच्ची केळी दहा ते बारा रुपये किलोने विकली जात आहेत, तर पिकविलेल्या केळ्यांना 18 ते 20 रुपये दर मिळतो आहे. अष्टपुत्रे वर्षभर या रायपनिंग चेंबरमध्ये केळी पिकवितात. केळीची विक्री सध्या स्थानिक बाजारपेठेत केली जाते. रायपनिंग चेंबरमुळे केळीला चांगला दर मिळतो. 
2) साधारणपणे 20 टन क्षमतेच्या रायपनिंग चेंबरसाठी दोन खोल्या, कुलिंग फॅन, कॉम्प्रेसर, एक्‍झॉस्ट फॅन, इथिलिनचे सिलिंडर, क्रेट, तापमान योग्य राखण्यासाठी भिंतीला ऍल्युमिनियमचे कोटिंग याचा खर्च सुमारे 12 लाख 40 हजार आला आहे. त्याच्या आकारानुसार तो कमी-अधिक होतो. रायपनिंग चेंबरसाठी कृषी विभागाचे अनुदान मिळते. 
3) आंबा पिकवण्यासाठी एका किलोस एक रुपया वीस पैसे खर्च वीज आणि इथिलीन प्रक्रियेला येतो. अष्टपुत्रे प्रति क्रेट चाळीस रुपये या दराने रायपनिंग चेंबरमध्ये आंबा, केळी पिकवून देतात. चांगल्या गुणवत्तेमुळे परिसरातील 25 आंबा आणि केळी उत्पादक, तसेच काही व्यापारी रायपनिंग चेंबरमध्ये फळे पिकवून घेतात. 
4) केळी, आंबा फळांच्या बरोबरीने चिकू, मोसंबी, संत्रा या फळांची पिकवण रायपनिंग चेंबरमध्ये केली जाते. हंगामानुसार सरासरी महिन्याचा हिशेब करता फळांच्या आवकेनुसार सर्व खर्च वजा जाता 25 ते 30 हजार रुपये नफा अष्टपुत्रे यांना मिळतो.

अष्टपुत्रे यांच्या शेतीचे वैशिष्ट्ये

1) सुधारित तंत्राने फळपिके, तसेच हंगामी पिकांचे व्यवस्थापन, पट्टा पद्धतीने ऊस लागवड, उसाचे एकरी 65 टन उत्पादन. 
2) माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर. सेंद्रिय खतांवर भर. 
3) दोनशे एकरांपैकी 65 एकर शेती ठिबक सिंचनाखाली. 
4) बियाणेबदलावर भर, फेरपालटीचे नियोजन. 
5) पीक व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञ, तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांशी सातत्याने चर्चा. 
6) बाजारपेठेच्या अभ्यासानुसार पीक लागवडीचे नियोजन. 
7) दर महिन्याला दोनदा गावातील शेतकरी गटाची शिवार फेरी, त्यातून पीक व्यवस्थापनाबाबत चर्चा. 

संपर्क - अतुल अष्टपुत्रे - 9404696490

 

स्त्रोत - अग्रोवन


3.07547169811
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन
Back to top