অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून झाले महिला सक्षमीकरण

सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून झाले महिला सक्षमीकरण

आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि पीक पद्धतीत केले जाणारे नवनवीन प्रयोग यामुळे शेती करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती यशस्वी ठरत आहेत. यातीलच महत्वाचा प्रकार म्हणजे सेंद्रीय शेती. सेंद्रीय शेतीमधून उत्पादित झालेला माल अथवा भाजीपाला विषमुक्त असून आरोग्यास चांगला असतो. शिवाय शेतकरी व ग्राहकांना कमी खर्चात याचा अधिक आर्थिक फायदा मिळतो.

कृषि विभागाच्या आत्मा या प्रकल्पाद्वारे लातूर जवळ असलेल्या भूईसमुद्रा या गावात केवळ 14 गुंठे जमिनीच्या तुकड्यावर मंगला वाघमारे यांनी मिश्र पद्धतीची भाजीपाल्याची शेती केली असून यामधून त्यांना मागील वर्षी दीड लाख एवढं उत्पन मिळालं आहे. यानंतर ही महिलांची एक चळवळ म्हणून सुरु झाली आणि या गावातील 16 महिलांच्या माध्यमातून 10 एकरवर सेंद्रीय शेती करण्याचे तंत्र यशस्वी झालं, त्याची ही यशोगाथा.

बचत गटाच्या माध्यमातून मंगला वाघमारे यांनी आपल्या 12 वी पर्यंतच्या शिक्षणाचा फायदा घेत महिलांची साथ, कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि स्वयम् सारख्या संस्थेच्या सहकार्यातून सेंद्रीय शेतीचं एक एकर मॉडेल यशस्वी केलंय. याबरोबरच त्यांच्या अंगी असलेल्या विविध कौशल्याचा वापर करीत ब्यूटी पार्लर, बांगड्यांचा व्यवसाय तसेच आरोग्यदूत म्हणून परिचित असलेल्या ‘आशा’ कार्यकर्ती म्हणून त्या भूमिका पार पाडत आहेत. सर्व स्तरावर उत्तम कामगिरी करण्यासाठी त्यांना अहोरात्र मेहनत घ्यावी लागते. त्यांचं कार्य आता गावाच्या बाहेर राज्यातील इतर महिला बचत गटातील महिलांसाठी प्रेरणादायी असंच आहे. तसेच शेतकरी महिलांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. राज्यभरातील महिला शेतकरी दूरध्वनीवरुन सुद्धा त्यांचे मार्गदर्शन घेतात.

या सर्व भूमिकेत त्या एक उत्तम व्यवस्थापक, व्यावसायिक, शेतकरी, समाजिक कार्यकर्त्या आणि एक सक्षम कुटुंबाचा आधार ठरल्या आहेत. शेतीबरोबर इतर एकूण 16 महिलांना सोबत घेऊन गांडूळखत निर्मिती शेड, जैविक खत, निविष्ठा विक्री आणि प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन हा उद्योग देखील आत्मा योजनेतून त्या करीत आहेत. यासाठी महत्वाची भूमिका ठरली ती मांजरा कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा विभाग यामुळे महिला फक्त कष्टाचे मालक न राहता कुटूबांची खऱ्या अर्थाने मालकीन ठरत आहे. या बचत गटाने उत्पादित केलेला भाजीपाला सध्या तरी लातूर शहरात विक्री होत असून याला विशेष मागणी होत आहे.

सेंद्रीय शेती पद्धतीने भाजीपाला पिके यामध्ये चवळी, भेंडी, पालक, मिरची, फूलकोबी, कांदे, कोंथिंबीर, टोमॅटो, यांचे उत्पन्न होते. तसेच फूलशेती प्रकारात गुलाब, शेवंती, झेंडू, अस्टर याचा समावेश होतो. यासाठी खत म्हणून शेणखत, गांडूळ खत, जीवामृत यांचा अन्नद्रव्यासाठी वापर केला जातो. तसेच पिकांवर फवारणीसाठी रासायनिक कीटकनाशकाचा वापर न करता दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क दर दहा दिवसांनी फवारले जाते. जैविक खतांमध्ये बिव्हेरिया, बॅसियाना, ट्रायकोडम, व्हरीडी, एचएनपीव्ही याचा वापर शेतीमध्ये केला जातो. बाजारात याची विक्रीही या बचत गटाच्या माध्यमातूनच होते.

राज्याला जागतिक पातळीवर एक प्रगत औद्योगिक केंद्र बनविणे महिला, उद्योजकांसाठी मैत्रीपूर्ण व पूरक वातावरण निर्मिती, प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने महिलांचा विकास आणि त्यांच्या कार्यक्षमतेची राष्ट्रविकासात मोलाची भर पडावी या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत. नुकतेच महिला उद्योजकांसाठी जाहीर केलेले उद्योग धोरण ग्रामीण भागातील महिला उद्योजक यांना उद्योग संजीवनी ठरेल. यात विशेषत: महिला बचत गटांचा सहभाग हे तेवढेच उत्स्फूर्त राहील असे वातावरण मराठवाडा आणि विदर्भात दिसून येत आहे.

महिलांच्या विचार आणि कार्याला एक सांघिक मूर्त रुप देण्याचं काम हिमालय बचत गटाच्या प्रत्येक महिलेच्या माध्यमातून होत आहे. या बचत गटाच्या कार्यामुळे राज्यभरातून त्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरध्वनीही येत आहेत. त्यामुळे मंगला वाघमारे या सर्वांना सोबत घेऊन आत्मविश्वासाने एका यशस्वी प्रवासाची वाटचाल करीत आहेत. एक यशस्वी महिला उद्योजकामध्ये असणारे गुण मंगला वाघमारे यांच्यामध्ये आहेत. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी 9405733262 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येऊ शकतो. महिलांच्या विकासासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, हे निश्चित.

-मीरा ढास

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate