অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिकाचे पाणी व्यवस्थापन

सध्याच्या पावसाचा ताण पाहता सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्था लक्षात घेऊन पाणी व्यवस्थापन करावे. आंतरमशागतीसाठी सायकल कोळप्याचा वापर करावा. कोळपणीमुळे पिकांतील तण नियंत्रण होऊन जमिनीतील भेगा बुजून ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.
यंदाचा खरीप हंगाम १ ते १.५ महिने उशिरा सुरू झाला आहे. काही ठिकाणी ओलितावर ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांची लागवड झालेली आहे. यापुढेही पावसाचे प्रमाण लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीमध्ये सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्था लक्षात घेऊन पाणी व्यवस्थापन करावे.
अ.क्र. ---- तपशील ----एकूण पाण्याच्या पाळ्या ----पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्था ----वाढीच्या अवस्थेचा पेरणीपासून काळ (दिवस)
१. ----ज्वारी ---- ३-४ ----१. गर्भावस्था २. पीक पोटरी असताना ३. पीक फुलोऱ्यात असताना ४. दाणे भरताना ----२५-३० ५०-५५ ७०-७५ ९०-९५
२. ----सोयाबीन ----३ ----१. पिकाला फांद्या फुटताना २. फुलोऱ्यात असताना ३. शेंगा असताना ----३०-३५ ४५-५० ६०-७०
३. ----बाजरी ---- २ ---- १. फुटवे फुटण्याची अवस्था २. पीक फुलोऱ्यात असताना ----२५-३० ५०-५५
४. ----भुईमूग ----३ ---- १. फांद्या फुटण्याची अवस्था २. आऱ्या उतरण्याची अवस्था ३. शेंगा भरण्याची अवस्था ----२५-३० ४०-४५ ६५-७०

मूलस्थानी जलसंधारण करा

सध्याच्या काळात मोकळ्या शेतात १० x १० मी. आकाराचे बंदिस्त वाफे तयार करावेत. या वाफ्यामुळे पुढे येणाऱ्या पावसाचे पाणी जिरवून मूलस्थानी जलसंधारण होते. सध्याच्या पावसाचे पाणी जमिनीत मुरवले गेल्यामुळे साठवलेल्या ओलाव्यावर पुढे रब्बी ज्वारी, हरभरा यासारखी कोरडवाहू पिकांचे चांगले उत्पादन घेता येईल.

पीक व्यवस्थापन करताना

१. पेरणीसाठी रुंद सरी वरंबा यंत्राचा वापर करावा.
२. आंतरमशागतीसाठी सायकल कोळप्याचा वापर करावा. कोळपणीमुळे पिकांतील तण नियंत्रण होऊन जमिनीतील भेगा बुजून ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.
३. आपत्कालीन परिस्थितीत पीक वाचवण्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
४. सूक्ष्मसिंचन पद्धतीचा अवलंब करावा. संवेदनशील अवस्थेत पाणी द्यावे.
५. पीकवाढीच्या अवस्थेत पावसाचा मोठा खंड पडल्यास पिकांची एक आड एक ओळ काढून विरळणी करावी. उदा. बाजरी, ज्वारी, सोयाबीन.
६. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर जास्त प्रमाणात करावा, त्यामुळे जमिनीची जलधारणा सुधारण्यास मदत होते.
७. पाण्याचा ताण बसल्यास झाडे कोमेजतात. अशा वेळी दोन टक्के युरिया पाण्यात मिसळून फवारावा म्हणजे पिकाच्या पानातील क्रिया गतिमान होण्यास मदत होते, पिके ओलावा शोषण्यास सुरवात करतात.

पावसाच्या आगमनानुसार पिकांची निवड

अ.क्र. ---- पंधरवड्यातील पावसाचे आगमन ----पंधरवड्यात पेरणी करावयाची पिके

१. ---- १ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत पाऊस झाल्यास ---- सूर्यफूल, तूर, एरंडी, हुलका, तीळ इत्यादी पिकांची पेरणी करावी. आंतरपीक सूर्यफूल + तूर (२ः१) लागवड करावी. कांदा (रांगडा) रोपवाटिका तयार करावी.
२. ----१६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत पाऊस झाल्यास ----सूर्यफूल, तूर, एरंडी इत्यादी पिकांची पेरणी करावी, तसेच कांदा (रांगडा) लागवड करावी.
संपर्क - ०२१३२ - २४२०८०
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे येथे कार्यरत आहेत)

------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन August 08, 2014

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate