অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जमीन सुधारणे आवश्‍यक

जमीन हे पीकवाढीचे माध्यम आहे. आपल्या सर्वांची उपजीविका ज्या जमिनीवर अवलंबून असते, त्या जमिनीची स्थिती सुधारणे आता फार आवश्‍यक झाले आहे. आपल्याकडील जमिनी क्षारपड व चोपण होण्याची समस्या वाढली आहे, त्यामुळे शक्‍य तितक्‍या लवकर जमीन सुधारणा करणे हा त्यावरील उपाय आहे. त्यासाठी एकात्मिक पद्धतींचा वापर करणे गरजेचे राहणार आहे.

जमिनीचे माती, सेंद्रिय पदार्थ, हवा आणि पाणी हे चार प्रमुख घटक आहेत. पिकांच्या निकोप वाढीसाठी मातीचे प्रमाण 45 टक्के, सेंद्रिय पदार्थ पाच टक्के, तर हवा आणि पाणी यांचे प्रत्येकी 25 टक्के प्रमाण जमिनीत असावे लागते. त्याचबरोबर जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण मुबलक असावे लागते, तसेच अन्नद्रव्ये उपलब्ध होतील अशा अवस्थेत असावी लागतात.

जमिनीतील सेंद्रिय पदार्थ हे अनेक जिवाणूंचे खाद्य असते. जिवाणूंचे खाद्य विपुल प्रमाणात उपलब्ध नसल्यास जिवाणूंची संख्याही कमी अथवा अत्यल्प असते. अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याचे काम जिवाणू अविरतपणे पार पाडत असतात. एखाद्या कारखान्यात दिवस आणि रात्रपाळी ज्याप्रमाणे सुरू असते, त्याच पद्धतीने हे काम जमिनीत सुरू असते. जिवाणूंसाठी अन्न अपुरे असेल, तर ही क्रिया मंदावते.

जमिनीचे तापमान हे जिवाणूंच्या घडामोडींना अतिशय अनुकूल असावे लागते. उन्हाळ्यातील तसेच हिवाळ्यातील तापमान या बाबी या घडामोडींवर आणि जिवाणूंच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. आपल्या भागात जेव्हा उन्हाळ्यातील तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस अथवा त्याहून अधिक होते, तेव्हा जिवाणूंची कार्यक्षमता मंदावते; तसेच हिवाळ्यात जेव्हा तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते, तेव्हाही कार्यक्षमता मंदावते. एकूणच बदलते हवामान आणि त्यानुसार होणारे बदल हे पिकांवर आणि त्यांच्या क्रियाशक्तीवर परिणाम करतात. या साऱ्या बाबी जमिनीच्या वातावरणावर अवलंबून असतात, त्यामुळे हवामानाचे परिणाम स्पष्टपणे पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम करताना दिसतात.

उन्हाळी हंगामात जसजसे तापमान वाढते, तसतसे मातीचे तापमानही वाढते. मातीच्या खोलीवर या सर्व बाबी इतर हंगामातही अवलंबून असतात. अति उथळ जमिनी, उथळ जमिनी, मध्यम खोल आणि खोल जमिनी असे खोलीवरून जमिनीचे प्रकार पडतात. अति उथळ आणि उथळ जमिनींची खोली 7।। सेंटिमीटर ते 22 सेंटिमीटर असते. अशा जमिनीत पाणी साठवण्याची क्षमता बेताचीच असते, त्यामुळे पिकांच्या पेरणीनंतर पावसात खंड पडल्यास ओलावा संपुष्टात येऊन पिके कोमेजून मृत पावतात. तीच परिस्थिती मध्यम प्रतीच्या 30 ते 60 सेंटिमीटर खोल जमिनीत पावसातील खंडाचा काळ वाढल्यास होते. अशा प्रकारच्या हलक्‍या ते मध्यम प्रकारातील जमिनींचे प्रमाण महाराष्ट्रात 40 टक्के आहे, त्यामुळे अशा जमिनींसाठी संरक्षित पाण्याची राज्याला फार मोठी गरज आहे. किंबहुना संरक्षित पाण्याची सोय नसल्याने आणि पावसाळ्यात पावसात मोठा खंड पडल्यास अजैविक ताण व्यवस्थापनाशिवाय पर्याय उरत नाही. काही वेळा पावसातील खंड मोठे असल्यास याच क्षेत्रात दुबार पेरणी करावी लागते आणि शेतीतील पिकांचे उत्पादन कमी येते आणि शेती फायदेशीर होत नाही.

उन्हाळ्यातील तापमानवाढ ही जमिनी खारवट आणि चोपण होण्यास कारणीभूत ठरत आहे. जमिनीतील पाण्याची वाफ होऊन जमिनीतील पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून निघून जाते. त्या वेळी त्या पाण्याबरोबर जमिनीतील क्षार पृष्ठभागावर साचतात. सुरवातीच्या काळात जमिनी खारवट आणि दुर्लक्षित केल्यास त्या चोपण होतात. जमिनी खारवट ते चोपण होण्याचे प्रमाण आता वाढत आहे, त्यामुळे त्या पिकांच्या वाढीसाठी निकामी बनत आहेत. एकूणच ही क्रिया झपाट्याने होत असून, जमिनींची उत्पादकता कमी होणे त्यामुळेच घडत आहे.

क्षारयुक्त जमिनी

क्षारयुक्त जमिनीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या क्षारांचा पातळ थर येतो. सामू (पीएच) 8.5 पेक्षा कमी असतो. निचरा चांगला होतो. जमिनीतील विद्राव्य क्षारांची विद्युत वाहकता चार डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते व विनिमययुक्त सोडिअमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असते. अशा जमिनी खारवट म्हणून संबोधल्या जातात.

चोपण जमिनी


या जमिनींचे विनिमययुक्त सोडिअमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असते. विद्राव्य क्षारांची विद्युत वाहकता चार डेसी सायमन प्रति मीटर असते व सामू 8.5 ते 10 पर्यंत असतो. जमिनीतून पाण्याचा समाधानकारक निचरा होत नाही. वाळल्यावर अशा जमिनी टणक बनतात. ओल्या असताना चिबड होतात. अशा जमिनीत हवा खेळती राहत नाही, त्यामुळे पिकांची वाढ नीट होत नाही.

चुनखडीयुक्त जमीन


अशा जमिनींचा सामू आठपेक्षा जास्त असतो. जमिनीची विद्युत वाहकता एक डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते. नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते, पिकांची वाढ खुंटते. अशा जमिनी या फळबाग लागवडीस योग्य नसतात; मात्र अशा प्रकारच्या जमिनीतून भुईमूग आणि बटाटा पिकांचे उत्पादन चांगले येते.

एकूणच क्षारयुक्त आणि चोपण जमिनीचा सामू जेव्हा 8.5 अथवा त्याहून अधिक असतो, अशा जमिनीत मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता अतिशय कमी होते, तेव्हा पिकावर अजैविक ताण वाढून पिकांचे उत्पादन कमी येते. पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांची उपलब्धता हा महत्त्वाचा घटक असताना त्यांची उपलब्धता न झाल्यास पिकांवर ताण येतात. या सर्व बाबींसाठी जमिनीची तपासणी ही बाब महत्त्वाची ठरते.

क्षारयुक्त आणि चोपण जमिनीत कडधान्य आणि द्विदल वर्गातील पिकांचे उत्पादन अतिशय कमी येते. पिकांना अन्नद्रव्यांची कमतरता भासताच त्यांच्या पानांवर कमतरतेची लक्षणे दिसतात. अन्नद्रव्यांची कमतरता काही वेळा अन्नद्रव्यांच्या फवारणीद्वारे कमी करता येते; परंतु ती बाब सतत करता येत नाही, त्यामुळे उत्पादकता घटते.

बागायत क्षेत्रातही समस्या वाढतेय


बागायत क्षेत्रात पाण्याचा अनिर्बंध वापर केला जातो. अति पाणी दिल्याने आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यास जमिनीत पाणी साचते. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होऊन क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर येऊन साचतात आणि जमिनी खारवट आणि चोपण होतात. ही क्रिया बागायत क्षेत्रात झपाट्याने होते. एकूणच ही समस्या दोन्ही भागांत भेडसावत असून जमिनींची सुधारणा करणे आणि त्यासाठी उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. तथापि बऱ्याचदा या सर्व बाबी दुर्लक्षित केल्या जातात आणि त्यामुळेच खतांचा वापर वाढूनही उत्पादन वाढत नाही असे चित्र स्पष्टपणे दिसते. ही बाब अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अतिशय घातक असून, त्याकडे भविष्यकाळात दुर्लक्ष केल्यास अन्नधान्य उत्पादनाचा मुख्य स्रोत बिघडून जाईल आणि त्यात सुधारणा करण्यासाठी अधिक वेळ लागेल.

देशभरात क्षारपड आणि चोपण जमिनीचे क्षेत्र सुमारे 70 लाख हेक्‍टर आहे. महाराष्ट्रात ते 8.14 लाख हेक्‍टर आहे. त्यात सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर सोलापूर आणि अमरावती या जिल्ह्यांत ते अधिक आहे. विदर्भातील पूर्णा नदीच्या दोन्ही काठांवरील अंदाजे 4600 चौरस किलोमीटर पसरलेल्या क्षेत्राची समस्या खारपट्ट्याने वेढली आहे. या बाबीकडे दुर्लक्ष केल्यास अन्यत्रही असेच चित्र निर्माण होण्यास फारसा वेळ लागणार नाही. जमीन सुधारणा हा या समस्येवरील उपाय असून सध्याच्या परिस्थितीत सेंद्रिय खतांचा वापर कमी होत असल्याने या समस्येची व्याप्ती वाढत आहे. त्यासाठी तीन वर्षांतून एकदा ताग किंवा धैंचा हे हिरवळीच्या खताचे पीक घेऊन ते जमिनीत नांगरटीनंतर गाडल्यास जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढण्यास उपयुक्त होईल. जमिनीतील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून योग्य अंतरावर चर काढणे अथवा सच्छिद्र पाइपद्वारे पाण्याचा निचरा करणे आवश्‍यक ठरणार आहे. अशा प्रकारे जमीन सुधारण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

 

स्त्रोत - अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate