অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकात्मिक कीड नियंत्रण

निसर्गाला समजून घेऊन वेळोवेळी शेत निरीक्षण करीत राहणे व त्यानुसार कीड नियंत्रणाचे विविध उपाय योजले तर अनावश्‍यक फवारण्या व त्यावरील खर्चात बचत होते. कसबे सुकेणे (जि. नाशिक) येथील प्रयोगशील बागायतदार वासुदेव काठे यांचे हे अनुभवाचे बोल आहेत. प्रयोग परिवाराचे ते राज्य समन्वयकही आहेत. द्राक्षासह फळे व भाजीपाला पिकांत एकात्मिक कीड नियंत्रणाविषयी त्यांनी केलेले प्रयोग व त्यासंबंधीचे अनुभव त्यांच्याच शब्दांत.

किडींची संख्या ठराविक मर्यादेत असतानाच कीडनाशकाचा वापर झाल्यास फवारण्याची संख्या कमी करता येते.
त्यांचे अंश कमी होतात. पर्यावरणीय हानी कमी होते. मजुरी खर्चात बचत होते. हवामान बदलामुळे वातावरणातील तापमानात वाढ होऊन 0.6 अंश सेल्सिअसने तापमान वाढले आहे. परिणामी रसशोषक किडींची संख्या वाढू लागली आहे म्हणून एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय अंमलात आणण्याची गरज वाढली आहे.

पाऊस व कीड नियंत्रण संबंध


मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कमीत कमी अर्धा तास झाल्यास फुलकिड्यांची (थ्रिप्स) संख्या मोठ्या प्रमाणात कमी होते. पाऊस पडल्यानंतर द्राक्षात पुढील चार-पाच दिवस फुलकिड्यांकरिता तसेच लाल कोळ्यांच्या नियंत्रणासाठीही 15 ते 20 दिवस फवारणी करावी लागत नाही. टोमॅटो, मिरची (ढोबळीसह), सोयाबीन आदी पिकांतही फुलकिड्यांसाठी फवारणी 4 ते 6 दिवस उशिरा करावी लागते.

वाढीची अवस्था व कीड संबंध


फळपिकांमध्ये सुरवातीची नवी वाढ जेव्हा असते तेव्हाच रसशोषक किडीचा प्रादुर्भाव असतो. ज्या वेळी नवी वाढ पक्व होते, त्यानंतर फुलकिडे, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव कमी होतो. द्राक्षपिकात छाटणीनंतर पहिले 60 दिवस हा प्रादुर्भाव असतो. पुढे तो कमी होतो. हा विचार करून कीड नियंत्रण केल्यास फवारणीची संख्या कमी होते. त्याचप्रमाणे पाने जुनी होऊ लागली की लाल कोळीचा प्रादुर्भाव वाढतो. याचाही विचार करून त्याचे नियंत्रण करावे. मात्र फळभाजी उदा. टोमॅटो, ढोबळी मिरची, वांगी, भोपळे, घोसाळी यामध्ये नवी वाढ सतत चालू असल्याने परिस्थितीनुसार रसशोषक किडीचे नियंत्रण करावे लागते.

फळभाज्यांमधील अळी नियंत्रण

टोमॅटो, वांगी, मिरची, दुधी यांसारख्या फळभाज्या प्रादुर्भावीत झाल्यानंतर माल काढणी करताना प्रादुर्भावीत फळे शेतातच त्या-त्या वेलाखाली, झुडपाखाली टाकली जातात. त्यामधील अळी बाहेर निघून दुसऱ्या फळात जाते. अशा चक्रामुळे अळीमुळे खराब होणाऱ्या फळांची संख्या वाढते व फळाच्या आतील भागात अळी असल्याने फवारलेले कीटकनाशक तिथेपर्यंत पोचण्याचे प्रमाण कमी राहते, त्यामुळे अळीचे नियंत्रण लवकर मिळत नाही. यावर उपाय म्हणून कीडग्रस्त फळे वेचून बाहेर काढून जमिनीत पुरून टाकल्यास कीड नियंत्रण लवकर मिळते व फवारणीची संख्या कमी होते.

पिकांमध्ये डब्ल्यूडीजी सल्फरचा वापर

पिकांवर बुरशी येण्याच्या अवस्थेमध्ये सल्फरचा (गंधक) वापर फवारणीकरिता केल्याने भुरी रोग तसेच लाल कोळीचेही नियंत्रण चांगले होते. रसशोषक किडींच्या व अळीच्या वेगवेगळ्या अवस्था नियंत्रित करण्यात सल्फरचा उपयोग काही प्रमाणात होतो. विशेषतः सर्व किडींच्या सुरवातीच्या अवस्थांचे सल्फरमुळे 30 ते 40 टक्‍क्‍यापर्यंत नियंत्रण मिळते. द्राक्षपिकात खरड छाटणीनंतर भुरी नियंत्रणाकरिता सल्फरचा वापर करीत राहिल्यास त्यासोबत काही प्रमाणात रसशोषक किडीचे नियंत्रण होते. पाने कुरतडणाऱ्या भुंग्याचे, अळीचेही प्रभावी नियंत्रण मिळते हे तुलनात्मकरीत्या लक्षात आले आहे.

फुलकिडे संख्या तपासून फवारणी निर्णय


फुलकिडीच्या नियंत्रणाकरिता भाजीपाला व फळपिकांमध्ये वारंवार फवारणी करावी लागते. बऱ्याच वेळा शेतात किडी आहेत की नाही याचा विचार न करता काही ठराविक कालावधीनंतर सातत्याने फवारण्या केल्या जातात. असे करण्याऐवजी पिकाचे नव्या वाढीचे शेंडे कागदावर घेऊन किडीचा अंदाज घेऊन फवारणीचा निर्णय घेणे जास्त फायदेशीर ठरते. उदा. शेंड्यावर 2 ते 4 फुलकिडे असल्यास लगेचच फवारणी करण्याची गरज नसते. अशा वेळी पुन्हा पुढील 3-4 दिवसांनी किडींची संख्या किती आहे याचा अंदाज घेत राहिल्यास त्यानुसार फवारणीचा निर्णय घ्यावा, असे निरीक्षण सातत्याने करीत राहावे.

जनावरांचे मूत्र फवारून नियंत्रण


भाजीपाला व फळपिकांत फवारणीची संख्या जास्त असते याचा विचार करून वेगवेगळ्या जनावरांचे मूत्र फवारून कीड नियंत्रणाचे प्रयोग आम्ही केले. या पद्धतीद्वारा फुलकिडीचे नियंत्रण झाल्याचे आढळले. मात्र साधारणपणे एक दिवसाआड सलग 4 ते 5 वेळा फवारणी केली, तरच किडीचे प्रमाण कमी होते. जनावरांच्या मूत्रामुळे किडी मरत नाहीत, फक्त शेतापासून दूर जातात. शक्‍य असलेल्यांनी हा प्रयोग जरूर करावा. फवारणीकरिता प्रमाण प्रति 1 लिटर पाण्यास 20 मि.लि. वापरावे.

पिवळे चिकट सापळे


टोमॅटो व ढोबळी मिरची या पिकांत तुडतुडे, पांढरी माशी यांची संख्या जास्त असते. विशेषतः पांढऱ्या माशीचे नियंत्रण करणे अवघड असते. आम्ही केलेल्या प्रयोगानुसार एकरी 500 नग पिवळे चिकट सापळे लावल्यास फुलकिडे, तुडतुडे व पांढऱ्या माशीची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे आढळले आहे. सापळ्यांचा चिकटपणा कमी झाल्यावर ते रॉकेलने धुवावेत. बाजारात मिळणारा चिकट द्रव त्यावर पुन्हा लावून पुन्हा या सापळ्यांचा वापर करता येतो.

पाणी फवारणीतून लाल कोळीचे नियंत्रण

लाल कोळी ही कीड द्राक्ष, गुलाब, टोमॅटो, ढोबळी मिरची, वांगी यासारख्या पिकांवर येते. विशेषतः थंड हवामानात या किडीची संख्या जास्त वाढते. ही कीड तिच्या वसाहतीभोवती जाळे तयार करते. त्यामुळे एकरी 400 ते 500 लिटर कीडनाशकाचे द्रावण फवारूनही किडीपर्यंत ते पोचत नाही व प्रभावी नियंत्रण मिळत नाही. त्यासाठी हे जाळे तुटणे गरजेचे असते. एकरी एक हजार ते दोन हजार लिटर पाणी जोरदार प्रेशरने फवारले तर वसाहतीभोवतालचे जाळे फाटते. काही प्रमाणात अंडी पाण्याने धुऊन जमिनीवर पडतात व किडीची संख्या कमी होते. पाणी फवारणी प्रयोगानंतर दुसऱ्या दिवशी लाल कोळी नियंत्रकाची फवारणी केल्यास कमीत कमी फवारण्यांमध्ये किडीचे यशस्वी नियंत्रण होण्यास मदत होते.

संपर्क : वासुदेव काठे- 9657411551

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate