অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जांभूळाची लागवड

करूया बहाडोली जांभूळाची लागवड

स्व. डॉ. जयंत पाटील

नियोजन आयोगाचे माजी सदस्य व ज्येष्ठ फळशेतीतज्ज्ञ, ठाणे

पाऊस सुरू झाला म्हणजे शेताच्या सभोवताली जांभूळ बियांची पेरणी करावी. दोन खड्ड्यांतील अंतर 20 फूट ठेवावे. एका खड्डयात एकच बी पेरावे. पाऊस संपल्यानंतर रोपांच्या सभोवताली काटेरी कुंपण करावे म्हणजे गुरे अगर बकर्‍या रोपे खाणार नाहीत. जांभळाचे झाड अत्यंत काटक असल्याने रब्बी व उन्हाळी हंगामात रोपांना पाणी देण्याची गरज नसते. अशा पद्धतीने बियांपासून निर्माण झालेली रोपे फार काटक असतात...

जांभूळ हे औषधी फळ आहे. त्यामुळे भविष्यात या फळाला मोठी मागणी राहणार आहे. जांभळाचे झाड अत्यंत काटक असल्याने महाराष्ट्रातील जिरायती जमिनीतही येऊ शकते. म्हणून महाराष्ट्रात जांभळाची सर्वत्र लागवड झाली पाहिजे.

कोकणातील पालघर जिल्ह्यात ‘बहाडोली’ नावाचे एक गाव आहे. त्या गावातील जांभळे मोठ्या आकाराची व अत्यंत स्वादिष्ट असतात. अशी उत्तम प्रतीची जांभळे महाराष्ट्रात सहसा आढळत नाहीत. मे महिना हा जांभळाचा हंगाम असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी बहाडोली येथे जातात; जांभूळ फळे खरेदी करतात. ती खाऊन त्यातून ज्या बिया निघतात, त्यांची आपल्या जमिनीत पेरणी करतात. ही जात इतकी लोकप्रिय झाली आहे की, आता
तामीळनाडू, कर्नाटक, आंध्र व गुजरात राज्यातील शेतकरीसुद्धा मे महिन्यात बहाडोलीला येतात व जांभूळ फळे खरेदी करतात. त्यापासून मिळणार्‍या बियांची पेरणी करतात.

जांभूळ लागवड कशी करावी?

पाऊस सुरू झाला म्हणजे शेताच्या सभोवताली जांभूळ बियांची पेरणी करावी. दोन खड्ड्यांतील अंतर 20
फूट ठेवावे. एका खड्डयात एकच बी पेरावे. पंधरा दिवसांत बी उगवून येईल. पाऊस संपल्यानंतर रोपांच्या सभोवताली काटेरी कुंपण करावे म्हणजे गुरे अगर बकर्‍या रोपे खाणार नाहीत.  जांभळाचे झाड अत्यंत काटक असल्याने रब्बी व उन्हाळी हंगामात रोपांना पाणी देण्याची गरज नसते.अशा पद्धतीने बियांपासून निर्माण झालेली रोपे फार काटक असतात. त्यांना सोटमूळ येते. ते जमिनीत 8 ते 10 फूट खोल जाते व तेथील ओलावा शोषून घेते. म्हणून जांभळाची लागवड बी पेरूनच करावी.

जांभळाची कलमे ‘कोकण-बहाडोली’ जात

बहाडोली येथील जांभळाची झाडे बियांपासूनच तयार झाली आहेत व त्यांना मोठ्या आकाराची फळे लागतात. याचा अर्थ हे फळझाड बियांपासून अभिवृद्धी करता येते. आता जांभळाची कलमे करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.
त्यामुळे दापोली येथील ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा’ने ‘कोकण-बहाडोली’ नावाची जात विकसित केली आहे. या जातीची कलमे तयार केली जातात; परंतु कलमे न मिळाल्यास बी पेरून लागवड करावी.

‘बहाडोली’ गावाला कसे जावे

बहाडोली हे गाव पश्‍चिम रेल्वेच्या पालघर स्टेशनपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. तेथे जाण्यास स्टेशनवरून रिक्षा मिळतात. ज्यांच्याकडे वाहन आहे त्यांनी मुंबई-अहमदाबाद हाय-वेने यावे व मनोर येथून डावीकडे वळावे. मनोरपासून बहाडोली 10 किलोमीटर अंतरावर आहे. मे महिना हा जांभूळ फळांचा हंगाम असतो. त्यावेळी तेथे जावे.

अ‍ॅपलसिड जॉनीची कथा

मला एक आठवण सांगावीशी वाटते. अमेरिकेत शिक्षण घेत असताना ‘ओहायो’ राज्यातील ‘चेस्टरलँड’ या गावी डॉ. विलार्ड पारकर यांच्या कुटुंबात मी राहत होतो. डॉ पारकर हे जगप्रसिद्ध ‘क्लेव्हेलँड क्लिनिक’ या संस्थेत तज्ज्ञ डॉक्टर होते. त्यांना शेतीची फार आवड होती. एक दिवस ते मला गावाशेजारच्या टेकडीवर घेऊन गेले. त्या टेकडीवर सफरचंदाची शेकडो झाडे होती. तो ऑगस्ट महिना होता, त्यामुळे गुलाबी रंगाच्या फळांनी झाडे बहरून गेली होती. ते दृश्य अत्यंत सुंदर दिसत होते.

डॉ. पारकर म्हणाले, “आमच्या ओहायो राज्यात सफरचंदाच्या झाडांनी मोठी समृद्धी निर्माण केली आहे”. येथे सफरचंदावर आधारित अनेक प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. या सर्व गोष्टींसाठी एका युवकाचा ध्येयवाद कारणीभूत आहे. त्या युवकाचे नाव होते ‘जॉन चॉपमन’. जॉन आपल्या आईला म्हणाला  होता की, “जीवनांत मी असे कोणते काम करू की,
ज्यामुळे आपले राष्ट्र समृद्ध होईल?” आई म्हणाली की, “आपले पूर्वज युरोप खंडातून येथे आले. त्यांनी स्वत:ला ‘यात्री’ म्हणवून घेतले. त्यांनी शेतातील नव-नवीन पिके येथे रुजविली. आपल्या मध्य-पूर्व अमेरिकेत सफरचंदाची फळझाडे नाहीत, ती रुजविण्याचे कार्य तू कर.” आईची आज्ञा शिरसावंद्य मानून जॉनने सफरचंदाच्या लागवडीसाठी वाहून घेण्याचे ठरविले. त्याच्या आईने एका पिशवीत सफरचंदाचे बी भरून दिले. ते घेऊन तो पदयात्रेस निघाला. गाव आले की, तो तेथे थांबत असे. तेथील विद्यार्थी व शेतकरी यांना बरोबर घेऊन सफरचंदाचे बी पेरत असे व रोपवाटिका तयार करीत असे. शेतकरी त्या रोपवाटिकेतून रोपे नेऊन त्यांची लागवड करीत असत. अशा रितीने जॉनने ‘ओहायो’, ‘इंडियाना’ व ‘इलिनॉय’ या तीन राज्यांत सफरचंदाच्या शेकडो रोपवाटिका निर्माण केल्या त्यामुळे या राज्यात सर्वत्र सफरचंदाची लागवड झाली. सफरचंदाचे बी हेच त्याचे आयुध होते.

जॉन चॉपमनच्या महान कार्याबद्दल अमेरिकन जनतेने ठरविले की, त्याला मोठे पारितोषिक द्यायचे; परंतु सर्वांचे मत पडले की, कोणतेही पारितोषिक त्याला अपुरेच पडेल! म्हणून अमेरिकतील जनतेने एक मताने ठरविले की, ‘जॉन चॉपमन’ हे त्याचे नाव बदलून, त्याचे नाव ‘जॉनी अ‍ॅपलसिड’ ठेवायचे. सफरचंदाच्या बियांशी जॉन किती एकरूप झाला होता, हे यातून सर्व जगाला समजेल. जगातील सर्व विश्‍वकोषात ‘अ‍ॅपलसिड जॉनी’ हे नाव असते. भारतातही असे ‘जॉनी अ‍ॅपलसिड’ निर्माण झाले तर आपले राष्ट्रही समृद्ध होईल.

 

स्त्रोत:  वनराई

अंतिम सुधारित : 7/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate