অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केळीवाढीच्या काळात खत, पाणी नियोजन

केळीवाढीच्या काळात खत, पाणी नियोजन

मृगबाग व्यवस्थापन

मृगबागेच्या लागवडीच्या केळी सध्या मुख्य वाढीच्या अवस्थेत आहेत. 
1. मृगबागेत स्वच्छता ठेवावी, शेत तणमुक्त ठेवावे. 
2. मुख्य खोडालगत येणारी पिले धारदार विळ्याने नियमित कापावीत. 
3. बागेमध्ये बनाना स्ट्रीक व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत, तसेच करपाग्रस्त व पिवळी पडलेली पाने कापून नष्ट करावीत. 
4. मृगबाग लागवडीच्या केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रॉपिकोनॅझोल 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. दुसरी फवारणी 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. 
5. मृगबाग लागवडीच्या वेळी खतमात्रा दिलेली असेलच. आता रासायनिक खताचा हप्ता साधारणपणे केळी लागवडीनंतर 165 दिवसांनी द्यावयाचा असतो. त्यामध्ये 82 ग्रॅम युरिया व 83 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रतिझाड या प्रमाणे बांगडी पद्धतीने देऊन लगेच मातीने झाकून द्यावे. 
6. ठिबकाद्वारा खत घ्यावयाचे असल्यास केळी पिकास 71 ते 146 दिवसांच्या दरम्यान प्रति एकरी 19ः19ः19 75 किलो आणि युरिया 150 किलो ही विद्राव्य खते टप्प्याटप्प्याने द्यावीत. तसेच कॅलशियम नायट्रेट 10 किलो प्रति एकरी घ्यावे. हा हप्ता पाच किलो याप्रमाणे दोन वेळा विभागून द्यावा. 
7. केळी पीक पाण्यासाठी फार संवेदनशील आहे. हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात पिकाच्या गरजेप्रमाणे पाण्याचे योग्य नियोजन करावे. हिवाळ्यात केळी पिकास 6 ते 7 लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिवस याप्रमाणे द्यावे.

कांदेबागेचे व्यवस्थापन

1. कांदेबाग लागवडीची केळी सध्या 20 ते 45 दिवसांची म्हणजे रोपे वाढीच्या पहिल्या अवस्थेमध्ये आहे. 
2. कांदेबाग लागवडी बरोबर बारा रोधक वनस्पतीची दोन ओळीत दाट लागवड करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शेवरी किंवा गजराज गवताची लागवड करावी. 
3. केळी बागेमध्ये उभी-आडवी वखर पाळी देऊन झाडाभोवतालचे गवत काढून बाग स्वच्छ ठेवावी. त्यानंतर ठिबक संच अंथरून घ्यावा. 
4. ठिबक संच अंथरण्यापूर्वी लॅटरलची व्यवस्थित तपासणी करावी. 
5. केळीची लागवड केलेल्या चारही बाजूंकडील बांधावरील वेलवर्गीय तणे उपटून नष्ट करावीत. जेणेकरून पुढील काळात विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. 
6. ठिबकद्वारा विद्राव्य खते द्यावयाची झाल्यास 19-19-19 हे विद्राव्य खत 25 किलो प्रति एकर तसेच युरिया 12.5 किलो प्रति एकर या प्रमाणे 20 ते 45 दिवसांदरम्यान द्यावा. 
7. कांदेबाग लागवडीच्या केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कार्बेन्डाझिम 100 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून 200 मि.लि. प्रतिझाड याप्रमाणे आळवणी करावी. 
8. नवीन कांदेबागेस निंबोळी पेंड 250 ग्रॅम प्रतिझाड द्यावी. 
9. कांदेबाग लागवड ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाली असल्यास त्यास रासायनिक खताचा पहिला हप्ता युरिया 82 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट 500 ग्रॅम व म्युरेट ऑफ पोटॅश 83 ग्रॅम प्रतिझाड बांगडी पद्धतीने द्यावा.
प्रा. आर. व्ही. देशमुख - 9421568674. 
डॉ. एस. व्ही. धुतराज - 7588612632. 
केळी संशोधन केंद्र, नांदेड.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate