অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कॉफी

कॉफी

जगभर भरपूर खप असलेले व त्यामध्ये असणाऱ्या कॅफीन या अल्कलॉइडामुळे तरतरी आणणारे, विशिष्ट चव आणि स्वाद असलेले, भाजलेल्या कॉफीच्या बियांपासून तयार करण्यात येणारे पेय; रुबिएसी कुलातील कॉफिया वंशातील लहान वृक्ष. कॉफीची पहिली लागवड जरी दक्षिण अरेबियात झाली असली, तरी जंगली अवस्थेतील कॉफी ही वनस्पती प्रथम आफ्रिकेतच आढळल्याने तिचे मूलस्थान आफ्रिका मानतात.

कॉफीला तुर्की भाषेत ‘काहव्हेह’ (Kahveh) म्हणतात, त्यावरून अरबी ‘काहवाह’ (Qawah, Kahvah) व या ‘काहवाह’ चा ‘कॉफी’ म्हणजे अरबी मद्य अशा अर्थाने इंग्रजीमध्ये अपभ्रंश झाला असावा. काहींच्या मते इथिओपियातील (अ‍ॅबिसिनिया) ‘काफ्फा’ (Kaffa) या कॉफीच्या जन्मगावाचे नाव तिला मिळाले असावे. कडवट चवीच्या तरतरी आणणाऱ्या रसाला (पेयाला) संस्कृतात ‘कटु’ म्हणतात. अशा पेयाला द्रविड ‘कडू’ म्हणत, तर याच अर्थाचा ‘करूआ’ हा शब्दही हिंदूंच्या वापरात आहे.

काहींच्या मते या शब्दांवरूनही अरबीतील ‘काहवाह’ हा शब्द आला असावा. इंग्रजी कॉफी हा शब्दच भारतात त्याच अर्थाने प्रचारात आहे. भारतात कॉफीच्या फळाला ‘बुंद’ व तिच्या बियांना ‘बुंद बीज’ म्हणत असा उल्लेख सापडतो. निरनिराळ्या भाषांमध्ये कॉफीला निरनिराळी नावे आहेत. उदा. चिनी : कैफी (Kai-fey); जपानी : कीही (kehi); रशियन : कोफे (Kophe); पर्शियन : कीह्‌व्ही (qehve); लॅटिन : कॉफिया वगैरे.

कॉफीचा शोध इथिओपियात नवव्या शतकाच्या उत्तरार्धात लागला असावा. तिच्या शोधासंबंधी अनेक कथा, दंतकथा प्रसिद्ध आहेत. कॉफीमुळे तरतरी येत असल्याने ते एक उत्तेजक मादक पेय असावे आणि कुराणात अशा पेयपानावर बंदी घातलेली असल्याने ते पिण्याऱ्यास कडक शासन व्हावे असे विचार जरी सनातनी कडव्या मुल्ला-मौलवींनी मांडले, तरी अरब मुस्लीमांत कॉफीचा प्रसार वाढतच गेला. पंधराव्या शतकात कॉफी इथिओपियातून अरबस्तानात आणली गेली. तेथून मक्का, मदिना, एडन, कैरो या मध्य आशियातील ठिकाणांहून ईजिप्त, तुर्कस्तानद्वारा तिचा प्रसार सोळाव्या आणि सतराव्या शतकात यूरोपात जर्मनी, फ्रान्स व इंग्लंड येथे झाला. याच सुमारास कॉफीचा प्रसार जावा व इतर बेटे, डच गियाना व नंतर उष्णकटिबंधातील प्रदेशांत, उदा. ब्राझील (१८२७), जमेका (१७३०), क्यूबा (१७४८), मेक्सिको (१७९०) व हवाई बेटे (१८४०) येथे झाला.

भारतात कॉफी १६०० च्या सुमारास आणली गेली. मक्केहून आलेल्या बाबा बुढण नावाच्या एका मुसलमान फकिराने आणलेले कॉफीचे बी कर्नाटक राज्यातील चंद्रगिरी टेकड्यांवर लावण्यात आले. या लागवडीचा पुढे विस्तार होत गेला. कर्नाटकातील कॉफीच्या लागवडीखालील काही डोंगराळ भाग आजही या फकिराच्या नावाने ओळखला जातो. या मळ्यातून नेलेल्या रोपांपासून १७०० मध्ये डच ईस्ट इंडियामधील कॉफीची लागवड सुरू झाली असे म्हणतात. ब्राझीलमधील कॉफीची लागवडही गोव्यातून नेलेल्या रोपापासून सुरू झाली असावी असे म्हणतात.

दक्षिण भारतात कॉफीची लागवड सुरू होऊन दोन शतके लोटली तरी तिला म्हणावे तसे महत्त्व मिळाले नाही. १७९९ साली ईस्ट इंडिया कंपनीने प्रयोगासाठी तेलचेरी येथे कॉफीची लागवड केली. ती यशस्वी झाल्यामुळे दक्षिण भारतातील घाटांच्या उतारावर पद्धतशीर लागवडीस प्रारंभ झाला. एका शतकाच्या अवधीत या घाटांतील जंगले तोडून उतारवरील अनेक हेक्टर क्षेत्र कॉफीच्या लागवडीखाली आणण्यात आले. १८७२ च्या सुमारास म्हणजे भारतात कॉफी आल्यापासून सु. पावणे तीनशे वर्षांनी येथून २५,००० टन कॉफी निर्यात करण्यात आली.

कॉफी (कॉफिया अरॅबिका): (१) पाने, फुले व फळे यांसह फांदी; (२) फूल; (३) अर्धवट कापलेले फळ; (४) बी.

कॉफी (कॉफिया अरॅबिका) हा लहान सदापर्णी छायाप्रिय वृक्ष असून कमी उंचीच्या प्रदेशात सु. दोन मी., कधीकधी तीन-चार मी. वाढतो. अनुकूल नैसर्गिक परिस्थितीत तो सहा-सात मी. उंचही वाढतो. त्याची सामान्य लक्षणे ðरूबिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. पाने साधी, समोरासमोर, गर्द हिरवी व चकचकीत असतात. फुलातील प्रत्येक मंडलात पाच दले असतात; फुले जानेवारी ते एप्रिलच्या दरम्यान येतात.

ती लहान, पांढरी आणि सुवासिक असतात. आठळी-फळ निंबोणी एवढे, गोल व शेंदरी असते. ते कधी लांबट वाटोळे असून साधरणतः १·५ सेंमी. लांब असते. प्रत्येक कॉफीच्या फळामध्ये दोन हिरवट करड्या बिया असतात. त्यांचा आकार एखाद्या कवडीसारखा असतो. या बियांची एक बाजू सपाट व दुसरी बाजू फुगीर असते. प्रत्येक बीजाची सपाट बाजू दुसऱ्या बीजाच्या सपाट बाजूस जोडलेली असते.

प्रत्येक बीजावर पातळ चिवट कागदाप्रमाणे एक आवरण (अंतःकवच) असून ते सपाट बाजूकडे दुमडलेले अगर सुरकतलेले असते. दोन बियांवर चिकट, बुळबुळीत अशा पिवळट गराचे आवरण (मध्यकवच) असून तो चवीस गोड असतो. या गरावर एक जाड साल (बाह्यकवच) असते. फळ पिकल्यावर ते एका बाजूस दोन बोटांनी दाबले असता त्यातील दोन बिया दुसऱ्या बाजूने सहज बाहेर पडतात.

कॉफिया वंशात अनेक जाती आणि प्रकार असून त्यांपासून तयार होणाऱ्या कॉफीचा स्वाद, चव, उत्पन्न तसेच फलोत्पादनाचा काल, झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वगैरे गोष्टींचा विचार करून लागवडीसाठी योग्य अशा जाती निवडल्या जातात. या वंशातील अरॅबिका, रोबस्टा, लायबेरिका व स्टेनोफायला (एक्सेलसिया) या चार जातीच जगभर विशेष लागवडीत आहेत.

कॉफिया अरॅबिका

प्रथम शोध लागलेली व पूर्वापार लागवडीत असलेली हीच जाती असून जगातील कॉफीखालील एकूण क्षेत्रापैकी सर्वांत जास्त म्हणजे ७०% इतके क्षेत्र या जातीच्या लागवडीखाली आहे. तिच्या पोटजातीचे भारतात अनेक प्रकार लावले जातात. त्यापैकी चिक्स, कूर्ग, केंट्स हे प्रकार महत्त्वाचे आहेत. कर्नाटकातील चिकमंगळूर भागात लागवडीत असणाऱ्या अरॅबिकाच्या प्रकाराला चिक्स हे नाव दिलेले आहे.

याची फळे गोल आणि मोठी असतात. याच्या कॉफीला परदेशात चांगला भाव मिळतो. परंतु या प्रकारच्या झाडांना खोडकिड्यांचा फार उपद्रव होत असल्यामुळे त्याच्या खालचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. कूर्ग हा चिक्सपासून तयार केलेला खोडकिड्यांचा प्रतिकार करू शकणारा प्रकार असून याच्या लागवडीखालीही बरेच क्षेत्र आहे.

याचे फळ लांबट, हिरवट किंवा निळसर व चिक्सपेक्षा अधिक चपटे असते. कूर्गपासून तयार केलेला केंट्स हा प्रकार सध्या भारतात लोकप्रिय आहे. हा प्रकार भरपूर उत्पन्न देणारा असून त्याचे फळ राखी रंगाचे असते.

कॉ. रोबस्टा : हिचा बेल्जियम काँगोमधून व जावातून भारतात प्रवेश झाला असावा. अरॅबिका आणि लायबेरिकापेक्षा जोराने वाढणारी, भरपूर उत्पन्न देणारी, रोगप्रतिकारक व लवकर बहार येणारी ही जाती आहे. हिच्या बियांत कॅफिनाचे प्रमाण १·५ ते २·५% असते. फळे फिक्कट तांबडी. ही जाती समुद्रसपाटीपासून ३०० ते ६०० मी. उंचीवर जास्त लागवडीत आहे. केळी, आंबे, नारळ यांच्यामधूनही उपपीक म्हणून लावतात. जगात ही २८% इतकी लागवडीत आहे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate