অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चिंच

हिंदी नाव   : इमली

संस्कृत नाव : तिंतिंणी / अम्लिका

इंग्रजी नाव  : Tamarind

वनस्पतीशास्त्रीय नाव : Tamaridus indica

चिंच

 

भारतातील विस्तृत प्रदेशात चिंच वृक्ष आढळतात. उष्ण आणि समशीतोष्ण मैदानी अशा दोन्ही प्रदेशात चिंचेची झाडे दिसतात. दक्षिण भारतात खेडोपाड्यात ही झाडे विपुल प्रमाणात असतात. हिमालयाच्या पायथ्याला शिवालिक टेकड्यातही चिंच वृक्ष आढळतो. मात्र हिमालयात जेथे बर्फ पडतो अशा भागात चिंच उगवत नाही. वाळवंटी प्रदेशातही चिंच दिसत नाही. चिंच सामान्य शेतकर्यांचा मोठा आधार आहे. तो बहुतोपयोगी व मूल्यवान वृक्ष आहे. त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. मुख्यत: त्याच्या फळांपासून चांगले उत्त्पन्न मिळते. असंख्य खाद्य पदार्थांमध्ये चिंचेचा उपयोग केला जातो. दक्षिण भारतात चिंच विपुल प्रमाणात दिसतात. उत्पन्नासाठी शेतीच्या बांधावर चिंचेची झाडे उगवत असतात. तो देशी भारतीय वृक्ष आहे. चिंच हा सदाहरित वृक्ष असल्याने रस्त्याच्या कडेने सावलीसाठी लावला जातो. राजमार्ग व राष्ट्रीय महामार्गांच्या कडेने  लावलेली चिंचेची झाडे आपणास दिसतात.

चिंच हा दीर्घायुषी वृक्ष आहे साठ ते शंभर वर्ष तो जगतो. आपल्या देशात तामिळनाडू राज्यात २०० वर्षापर्यंतची जुनी चिंचेची झाडे आहेत. चिंच वर्षानुवर्षे फळांचे उत्पन्न देतो. म्हणून शेतकरी लाकडासाठी चिंचेची झाडे सहसा तोडत नाहीत. हा वृक्ष शेतकर्यांला दीर्घ कालपर्यंत आर्थिक उत्त्पन्न देतो. म्हणून पूर्वी ‘ज्याचे दारी चिंचेचे झाड तो सावकार’ अशी म्हण प्रचलित होती.

आकारमान व पाने-फुले

 

लहान, मध्यम व मोठी अशा अनेक प्रकारची चिंचेचे झाडे आढळून येतात. जमीन, माती, पाणी, हवामान यांतील फरकानुसार त्यांची कमी-जास्त प्रमाणात वाढ होत असते. मध्यम आकारापासून २४ मीटर उंची पर्यंत चिंचेचे झाड वाढते. त्याचा घेर ७ मीटरपर्यंत असतो. चिंचेच्या फांद्या खूप चिवट असतात. खोड आखूड व जड असते. कधी ते वाकडे तर कधी सरळ वाढते. सालीचा रंग तपकिरी किंवा काळसर राखट असतो. साल खडबडीत असते. मातकट रंगाचीही साल आढळून येते. सालीला पापुद्र्याच्या उभ्या भेगा असतात. त्यांना पुन्हा आडवे तडे गेलेले असतात.

चिंचेची मुळे खूप खोलवर जातात. जमिनीतील पाणी शोषतात. चिंचेची पाने दिसायला बाभळीच्या पानासारखी दिसतात. अनेक कातीव व नक्षीदार चिमुकल्या पानांचे मिळून संयुक्त पण बनलेले असते. फांदीवर हिरव्या फांद्या फुटलेल्या असतात. त्यांची लांबी पाऊण ते एक फुटापर्यंत असते. त्या फांदीला पुन्हा लहान लहान आडव्या फांद्या फुटतात. तिला छोटी पाने येतात. एका कांडीवर दोन्ही बाजूला १० ते २० पाने असतात. पाने पाव ते अर्धा इंच लांब असतात. पाने चवीला आंबट लागतात. एप्रिल मे मध्ये पिकलेली पाने गळू लागतात. लगेच त्या ठिकाणी नवीन लाल पालवी फुटते. त्यामुळे चिंचेचे झाड नेहमी सदाहरित दिसते, हिरवेगार दिसते.

नवीन पालवी फुटते त्याच वेळी चिंचेच्या झाडाला कळ्या येतात.  कळ्या लहान पिवळट पांढरट रंगाच्या असतात. शंकूच्या आकाराच्या असतात. साधारणतः पाहते ५ ।। ते सकाळी ८ या वेळेत कळ्या फुलतात. मे मध्ये चिंचेचे झाडं फुलांनी बहरून जाते. फांदीच्या टोकाला पानांच्या बगलेत फुलांचे झुपके येतात. फुले लहान असतात. चवीला आंबट असतात. फुलांत लाल, पिवळ्या व गुलाबी रंगाचा सुंदर संगम साधलेला असतो. त्यामुळं फुले सुंदर दिसतात. जुन-जुलैपर्यंत फुलांचा हंगाम चालतो. फुले अर्धा इंच लांब असतात. खाली झुकलेली असतात. झाडावरील लाल मुंग्या (बांबोले), मधमाश्या व इतर कीटक परागीभवनाची कामगिरी पार पडतात. त्याला संकरीत परागीभवन म्हणतात. झाडाला आलेल्या सर्वच फुलांत परागीभवन होत नाही. असंख्य फुले खाली गळून पडतात परागी भावनाची क्रिया झाल्यावर फलधारणा होते. जुलै-ऑगस्ट मध्ये झाडाला लहान-लहान हिरव्या रंगाच्या चिंचा येतात. आंबट चिंचा हा मुलामुलींचा आवडता मेवा आहे.

फळे व बिया

 

चिंचेच्या फळांना ‘चिंच’ याच नावाने संबोधले जाते. चिंचांचा आतील व बाहेरील रंग प्रारंभी हिरवा असतो. हळूहळू त्या वाढतात. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत त्यांची वाढ पूर्ण होते. हिरव्या कवचावर तपकिरी लव असते. नंतर त्या पाडाला येतात. त्या वेळी त्याचे घट्ट कवच ढिले होते. आतील हिरव्या गराचा रंगही बदलायला लागतो. त्यावर तांबूस झाक येते. चिंचांचे मोठे आकडे बनतात. काही चिंचा सरळ वाढतात. चिंचांची लांबी तीनपासून बारा इंचापर्यंत असते. रुंदी पाऊण ते एक इंच असते. त्यात ३ ते १२ बोटके असतात. जानेवारी–फेब्रुवारी पर्यंत चिंचा पिकतात. त्यावेळी कवचाचा रंग पूर्णपणे बदलून राखत तपकिरी बनतो. तसेच आतील गराचा रंग ही तांबडा बनतो. आतील गर कवचापासून वेगळा झालेला असतो. कवच दाबले की लगेच फुटते. कवचातील गर रेषाळ असतो. तसेच त्यात अॅसिड असते. चिंचेची फळे ४ प्रकारची आढळतात. काही चिंचा सरळ व फुगीर असतात. त्यात बिया अधिक असतात. फुगीर व वाकड्या चिंचात गर अधिक असतो. तसेच काही फळे सरळ व चपाती असतात, तर काही वाकडी व सापत असतात. चिंचांची लांबी, गर व बियांचे वजन, त्यांची जाडी, फायबर यांवर चिंचांचा भाव अवलंबून असतात.

चिंचेतील बोटकात जी बी असते तिला चिंचोका म्हणतात. त्याचा आकार गोलाकार किंवा लंबगोलाकार असतो. तसेच तो गुळगुळीत असतो. चिंचोक्याचे कवच कठीण असते. फोडला तर त्याच्या दोन पाकळ्या होतात. त्याच्या आतला रंग पांढरा असतो. लांबीनुसार चिंचेत ३ ते १२ चिंचोके निघतात. एक किलो वजनात १८०० चिंचोके बसतात.

 

माहिती लेखक : वनराई संस्था

अंतिम सुधारित : 6/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate