অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चिंचांचा उपयोग व उत्पन्न

चिंचांचा उपयोग व उत्पन्न

चिंचकुळात एकूण २४ उपजाती आहेत. चिंच हा मुळ आफ्रिकेतला वृक्ष आहे. आशिया व अमेरिकेत पसरला आहे. दक्षिण युरोपातही तो वाढतो आहे. भारतात तर तो एकरूप झाला आहे की तो भारतीय वृक्ष बनला. पारशी भाषेत त्याला तमर-ई-हिंद म्हणजेच भारतीय खजूर म्हणतात. कारण शेतकर्यांच्या उत्पन्नाचे तो एक चांगले साधन बनला आहे. खजुराप्रमाणे चिंच हे टिकाऊ फळ आहे.

चिंचफळे हे चिंचवृक्षाचे मुख्य उत्त्पन्न आहे. १३/१४ वर्षाचे वय झाल्यावर चिंचवृक्ष उत्त्पन्न द्यायला लागतो. अगदी १०० वर्षापर्यंत तो दीर्घकाळ भरपूर उत्त्पन्न देतो. एका वाढलेल्या झाडापासून दरवर्षी १५० ते ३०० किलो चिंचा सहज मिळतात. ज्याप्रमाणे झाडाची वाढ होईल त्याप्रमाणे उत्त्पन्नात अधिक भर पडते. तमिळनाडूत २०० वर्षांचा एक जुना चिंचवृक्ष आहे. तो दर वर्षी २ टन एवढ्या प्रचंड प्रमाणात उत्त्पन्न देतो.

सूर्यप्रकाशात पिकलेल्या चिंचा झाडावरच वाळतात. त्यांचे टरफल गरापासून सुटे होईपर्यंत चिंचा तोडल्या जात नाहीत. चिंचेत ५५% भाग गराने व्यापलेला असतो. त्यातील १४% भाग चिंचोके असतात, ११% कवच व रेषा (फायबर) असतात. चिंचेत आंबट-गोड रसायन असते. त्याचा उपयोग तोंडी लावण्याच्या अनेक पदार्थात चवीसाठी करण्यात येतो. चिंचांचा वापर कधी, आमटीत करतात. दक्षिण भारतीय माणसांच्या भोजनात रोज चिंचसार असतेच.

चिंचांची उत्तम चटणी बनवतात. सॉस व सरबत बनवतात. युरोप, अमेरिकेत चिंचेतील आंबट रसायन वापरून उत्तम आरोग्यदायी पेय बनवितात. कैरीच्या पन्ह्याप्रमाणे चिंचेपासून पन्हे बनवतात. चटकदार भेळ, पाणीपुरी यांसाठी चिंचेचे पाणी वापरतात. याशिवाय अनेक खाद्यापादार्थंत चिंचेचा वापर करण्यात येतो.

तांब्या-पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी चिंच वापरतात, चिंचेमधील अॅसिड मुळे भांडी लख्ख व स्वच्छ निघतात. अनेक औषधात चिंचांचा उपयोग करतात. चिंचेची पावडर बनवतात. तिचा उपयोग गोळ्या, बिस्किटे व चॉकलेटमध्ये करतात.

साखर किंवा गूळ मिसळून चिंच खातात. चिंचा वाळल्यावर हाताने सहज सोलल्या जातात. सोलल्यावर बोटकातून चिंचोका (बी) बाहेर निघतो. तो चवीला तुरट असतो. हा चिंचोका बहुगुणी आहे. त्यात पेक्टिन नावाचे द्रव्य असते. त्याचा जेली व मुरांबा तयार करण्यासाठी उपयोग केला जातो.

चिंचोक्यात पेक्टिन बरोबरच स्टार्च व टॅनिन असते. रानावनात राहणारे आदिवासी चिंचोक्याच्या पिठाची भाकरी करून खातात.  तसेच त्या पीठाची खळही बनवितात. चिंचोके भाजून किंवा उकडून खातात. गुरांच्या खड्यात चिंचोक्याच्या पीठाचा वापर करतात. लोकर व रेशीम, इतर धाग्यांचे कापड विणताना चिंचोक्याच्या टरफलाचा उपयोग केला जातो. घोंगड्यांना खळ देण्यासाठी चिंचोक्याच्या टरफलाचा उपयोग केला जातो. घोंगड्याना खळ देण्यासाठी चिंचोक्यांचा उपयोग केला जातो.

दरवर्षी २२,००० टन चिंचोके पेक्टिन व गम बनवण्यासाठी वापरतात. खाद्य पदार्थांतील द्रवाला घनरुपाता आणण्यासाठी पेक्टिनचा उपयोग करतात. पेक्टिन प्लँट फॅक्टरीत चिंचोक्यावर विशिष्ट प्रक्रिया करून त्यातील पेक्टिन, प्रोटीन व स्टार्च वेगवेगळे करतात. जॅम, जेली, कॅनिंग व फळप्रक्रियेत पेक्टिनचा उपयोग करतात.

आईस्क्रीम व कॉड लिव्हर ऑईलमध्येही उपयोग केला जातो. हवाबंद टीनच्या डब्यांना आतून व बाहेरून पिवळे वंगण लावण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. कापडगिरण्या व ज्यूट फॅक्ट्ररीत खळीसाठी चिंचोक्याना चांगली मागणी असते. पेट्रोलियम उद्योगातही चिंचोक्याना मागणी असते.

फळे आणि बियांबरोबर चिंचेचा पालाही उपयोगी आहे. संधिवात, हाड मोडणे, मुत्रपिंडातील खडा यांवर तेलात परतलेल्या चिंचेच्या पानांचा उपयोग करतात. चिंचेची छोटी-छोटी पाने चवीला आंबट असतात. गरीब आदिवासी खायला काही मिळाले नाही त्तर चिंचेचा पाला खाऊन भूक भागवतात. चिंचेच्या पानांची चटणी बनवितात. चिंचेचा पाला जनावरांचे उत्तम खाद्य आहे. लाख आणि रेचीम किडे चिंचेचा पाला खातात. त्यांच्या पैदाशीसाठी पाल्याचा चांगला उपयोग होतो. गवई (गायक) आवाज कमावण्यासाठी चिंचेची पाने खातात.

चिंचेची साल जाड असते. सालीत टॅनीन असते. जुलाब होत असल्यास चिंचांची साल उगाळून चाटण पाजतात. याशिवाय सालीचे बहुविध उपयोग आहेत.

चिंचेचे लाकूड अतिशय कठिण व चिवट असते. दणकट असते. तानक असते. अगदी सहजपणे कापले जात नाही. या लाकडापासून तेलाची घाणी, मुसळ, बैलगाडीची चाके, आस, धुर्या. कुंभाराचे चाक, शिक्के, लाकडी हातोडा व फर्निचर इत्यादी टिकाऊ वस्तू बनवितात. चिंचेचे सरपण हे चांगले जळन आहे. त्याचा कोळसाही चांगला निघतो.

चिंचेचे झाडं वर्षानुवर्षे फळांचे भरपूर उत्त्पन्न देत असल्याने ते लाकूड व जळणासाठी तोडले जात नाही. एखादा चिंचवृक्ष खूप जुना झाला आहे, त्याचे औष्य संपले आहे, तो मृतवत झाला आहे तरच तो तोडला जातो. ५ ते ६ घनफूट इमारती लाकूड मिळते. त्याला लाकूड बाजारात चांगली किंमत येते. तसेच २ ते ३ टन जळणाचे सरपण मिळते.

घरासाठी लाकडाचा चांगला उपयोग होतो. झाडावर चिंचा वाळल्यावर त्या हाताने तोडल्या जातात. परंतु काही जण काठीने झोडपून चिंचा पडतात, ते योग्य नाही. काडीने झोडपल्याने चिंचेच्या फांद्यांना इजा पोचते. त्याचा पुढील हंगामात येणाऱ्या कळ्या व फुलांवर परिणाम होतो. काही चिंच फळे झाडाला उशिरा लागलेली असतात. त्यांना पिकायला वेळ असतो. अशा हिरव्या चिंचा ही काठीने झोडपल्याने खाली पडतात्त. त्यामुळे नुकसान होते. झाडाला कोणत्याही प्रकारची इजा (जखम) व धक्का (शॉक) न पोचता चिंचांची झाडावरून उतरणी करावी. झाडावर चढून हाताने चिंचा तोडाव्या, फांदी हलवून त्या खाली पाडाव्यात.

चिंचोके काढून चिंचाचे गोल लाडू बनवून त्यांचा साठा करतात. कोरड्या जागी ठेवल्यास चिंचा वर्षभर चांगल्या टिकतात. चिंचाचे मोठे व्यापारी वातानुकुलीत जागेत चिंचांचा साठा करतात. त्यामुळे चिंचा काळ्या पडत नाहीत. त्यांचा नैसर्गिक रंग तसाच राहतो.

तामिळनाडू, कर्नाटक, केरळ राज्यांत चिंचेचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. महाराष्ट्रात चिंचेला चांगला बाजार आहे. चिंचफळांच्या दर्ज्यानुसार १० ते २० रुपये किलो भावाने चिंच विकली जाते. व्यापारी चिंचांचा साठा करून हंगाम नसलेल्या काळात चिंचा विकतात. त्यावेळी चिंचा २० ते ४० रुपये किलो भावाने सहज विकल्या जातात.

चिंचोके ही विकले जातात. सर्व प्रकारचे उत्त्पन्न धरून या झाडापासून शेतकर्यास किंवा चिंचेच्या मालकास ३ ते ४ हजार रुपयांचे उत्त्पन्न दर वर्षी मिळते. त्यासाठी त्याला कोणत्याही प्रकारचे श्रम करावे लागत नाहीत. देखभाल व इतर खर्च त्याला करावा लागत नाही. अशा रीतीने चिंच वृक्षाच्या फळासह सार्याच भागाला बाजारात किंमत येते.

जमिनीचे रक्षण

चिंचवृक्षाची मुळे ९ ते १२ मीटर खोल जातात. जमिनीवरील माती पावसाच्या  पाण्याने वाहू न देता धरून ठेवण्याचे कार्य वर्षानुवर्षे चिंचमुळे करीत असतात. चिंचेच्या झाडाखाली मात्र दुसरा कोणताही वृक्ष वाढत नाही. कारण झाडाखाली दाट सावली असते. पुरेसा सूर्यप्रकाश त्यांना मिळत नाही. तसेच चिंचेच्या आम्लधर्मीय गुणधर्मामुळे चिंचेखाली इतर झाडे वाढत नाहीत. चिंचेची  झाडे पक्ष्यांचे मोठे आश्रयस्थान आहेत.

कावळे, बगळे, करकोचे इत्यादी पक्षी चिंचेच्या झाडावर घरटी बांधतात. करकोचे व बगळ्यांची मोठी वसाहत विशाल चिंचेच्या झाडावर असते. या वसाहतीला सारंगगार म्हणतात. चिंचेच्या फांद्या लवचिक असतात .वादळवार्याने त्या मोडत नाहीत. पक्ष्यांची घराती खाली पडत नाहीत.

चिंचेच्या फांद्यांचा गच्च गुतडा झाडावर असतो. त्यामुळे इतर झाडांवर चढणारे शिकारी प्राणी व साप यांना पक्ष्यांच्या घरट्यांपर्यंत पोचता येत नाही. पक्ष्यांची अंडी व पिले सुरक्षित राहतात. म्हणून बगळे, करकोचे, पाणकावळे हे पक्षी प्रजोत्पादनासाठी घरटी बांधण्यास चिंचेचे झाडं पसंद करतात. चिंचेच्या फुलांकडे मधमाश्या आकर्षित होतात.  त्यापासून उत्तम मध गोळा होतो. चिंचवृक्ष वर्षभर सदाहरीत राहतो. म्हणून

रस्त्याच्या कडेने सावलीसाठी व शोभेसाठी चिंचेची झाडे लावतात. आजही रस्त्याच्या कडेने चिंचेची झाडे लावलेली आढळतात.

 

माहिती लेखक : वनराई संस्था

अंतिम सुधारित : 6/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate