অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चिकू लागवडची माहिती

हवामान

उष्ण व दमट, जास्त पावसाचा प्रदेश

जमीन

उत्तम निच-याची, खोल मध्यम काळी जमीन

    सुधारित जाती
  • कालीपत्ती
  • या जातीच्या झाडाची पाने हिरवी व फळे गोल अंडाकृती असतात. फळाची साल पातळ असून गर गोड असतो. फळे भरपूर लागतात.

     

  • क्रिकेटबॉल
  • फळे मोठी गोलाकार असतात. गर कणीदार असुन गोडी मात्र कमी असते. फळे भरपूर लागतात.

     

  • छत्री
  • या झाडाच्या फांद्यांची ठेवण छत्रीसारखी असते. पाने फिकट हिरव्या रंगाची असतात. फळाचा आकार कालीपत्तीच्या फळांप्रमाणे असतात परंतु गोडी कमी असते.

     

    अभिवृद्धीचा प्रकार

    खिरणी खुंट वापरुन तयार केलेले भेट कलम किंवा शेंडा कलम

    लागवडीचे अंतर

    दोन झाडातील व ओळीतील अंतर १० X १० मी, प्रति हेक्टरी झाडांची संख्या १००

    खते

    १ X १ X १ मी आकाराचे खडे घेऊन त्यात चांगली माती, ३-४ घमेली शेणखत आणि २.५ किलो सिंगल सुपर फॉस्पेट यांच्या मिश्रणाने भरावेत वाळवांचा उपद्रव टाळण्यासाठी रिकाम्या खड्यात १०० ग्रॅम २ % मिथिल पॅसाटीगॉन किंवा ५ % कार्बारील भुकटी मिसळावी. पहिल्या वर्षी प्रत्येक कलमास एक घमेले शेणखत, ३०० ग्रॅम युरिया, २०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्पेट, व १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश समप्रमाणात ऑगस्ट, जानेवारीमध्ये विभागून द्यावे. दुस-या वर्षी पहिल्या वर्षाच्या मात्रेन दुप्पट तिस-या वर्षी तिप्पट या प्रमाणे खताचे प्रमाण २० वर्षांपर्यत वाढवीत जावे. त्यानंतर दरवर्षी २० घमेली शेणखत, ६ किलो युरिया, १८ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ६ किलो mop ही खते चरातून बांगडी पद्धतीने प्रति झाडास द्यावीत.

    पाणी व्यवस्थापन

    हिवाळ्यात ८ व उन्हाळ्यात ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

    काढणी व उत्पन्न

    फलधारणेपासून फळे तयार होण्यास १५० ते १६० दिवस लागतात. पाचव्या वर्षी प्रत्येक झाडापासून १००, १० व्या वर्षी ५००, १५ व्या वर्षी १५०० आणि २० वर्षे व पुढील वयात २०००-३००० फळे मिळतात. फळे काढण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘अतुल ’ झेल्याचा वापर करावा.

    कीड व रोग नियंत्रण

      किडी
  • पाने आणि कळ्या खाणारी अळी
  • अळी पानांची जाळी करुन पानांवर उपजीविका करते. तसेच कळ्यांना छिद्र पाडून आतील भाग खाते. नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारी ५० %  कार्बारील भुकटी १० लीटर पाण्यात २० ग्रॅम मिसळून फवारणी करावी.

     

  • खोड पोखरणारी अळी
  • अळी साली खालील पेशीवर उपजीविका करते. खोडावरील छिद्रातून बाहेर पडणा-या चोथ्यावरुन या किडीचे अस्तित्व समजते. अळीचा मार्ग शोधून अळीचा नायनाट करावा. कीडग्रस्त फांद्या काढून जाळून टाकाव्यात. खोडावरील / फांद्यावरील छिद्रे केरोसीनमध्ये बुडविलेल्या कापसाच्या बोळ्याने बंद केल्यास अळी गुदमरुन मारणे शक्य होते.

     

  • फळातील बी पोखरणारी अळी
  • अळी देठाच्या भागातून कळीच्या पाकळ्या खाऊन फळात प्रवेश करते. फळाच्या गरातून थेट बी मध्ये प्रवेश करते. अळी सूक्ष्म असल्याने तिने पाडलेले प्रवेश छिद्र फळाच्या वाढाबरोबर भरून निघते. मात्र बी मध्ये शिरलेली अळी बीजदले खाऊन त्यावर उपजीविका करते. पूर्ण वाढलेली अळी बीचे कठीण कवच पोखरून छिद्र पाडते. त्याचप्रमाणे फळाच्या गरालाही छिद्र पाडून ती फळातून सरळ बाहेर पडते. नियंत्रणासाठी बागेची स्वच्छता राखून झाडांची योग्य छाटणी करुन बागेत पुरेसा सुर्यप्रकाश येईल असे पाहावे. कीडग्रस्त तसेच गळलेली सर्व फळे व पालापाचोळा गोळा करुन जाळून नष्ट करावा. झाड फुलो-यावर असताना किंवा फळे लहान असताना ५०,००० पी.पी.एम. निमॅझॉल ०.००४% (८ मिली/१० ली पाण्यात), १०,००० पी.पी.एम एकोनिमप्लस (४० मिली/१० पाण्यात) किंवा ५० % प्रवाही मॅलॉथिऑन ०.१ % (२० मिली/ १० ली पाण्यात ) यापैंकी कोणत्याही एका किटकनाशकाची १५ दिवसांनी आलटून पालटून फवारणी करावी.

     

    फुलकळी पोखरणारी अळी – अळी, कळी पोखरुन खाते. एका कळीतील सर्व भाग पोखरून खाल्ल्यानंतर त्यातून ती बाहेर पडते आणि शेजारच्या कळ्या पोखरुन खाते. परिणामी पोखरलेल्या कळ्या पोकळ बनून सुकतात. त्यामुळे फळधारणा कमी प्रमाणात होऊन उत्पन्नात घट येते. या किडीचा प्रादुर्भाव नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि मे-जून या कालावधीत मोठ्या प्रमाणात दिसून येतो  किडीच्या नियंत्रणासाठी ५०,००० पी.पी.एम. निमॅझॉल ०.००४% (८ मिली/१० ली पाण्यात), १०,००० पी.पी.एम एकोनिमप्लस (४० मिली/१० पाण्यात) किंवा ५० % प्रवाही मॅलॉथिऑन ०.१ % (२० मिली/ १० ली पाण्यात ) यापैंकी कोणत्याही एका किटकनाशकाची १५ दिवसांनी आलटून पालटून फवारणी करावी.

      रोग
  • पानांवरील ठिपके
  • पानांवर लहान गोल तपकिरी ठिपके दिसतात. ठिपक्यांवरील मध्यभाग   पांढ-या राखेसारखा दिसतो. खालच्या फांद्यावरील फळे मऊ होऊन कुजतात. नियंत्रणासाठी रोगट फांद्या कापून नष्ट कराव्यात. कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी. पावसाळ्याअगोदर एक व नंतर दोन अशा १ % बोर्डोमिश्रणाच्या फवारण्या कराव्यात.

     

  • फळांची गळ
  • पावसाळ्यात बुरशीजन्य रोगाने फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते. या रोगाचे नियंत्रणासाठी रोगट फांद्या कापून त्या जागी बोर्डोपेस्ट लावावी. पावसाळ्यात फळ गळ होऊ नये, म्हणून पावसाळ्यात अगोदर १ % बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी. आणखी दोन फवारण्या १५ ते २० दिवसांच्या अंतराने कराव्यात. पावसात द्रावण चिकटून राहण्यासाठी बिरोदा/सॅन्डोपीट या चिकटणा-या पदार्थांचा वापर करावा.

     

    माहिती स्रोत :कृषी विभाग महाराष्ट्र शासन

    अंतिम सुधारित : 7/21/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate